आम्ही कोण?
आडवा छेद 

मंदिर पुनरुज्जीवनाच्या पलीकडच्या अहिल्याबाई

  • मृदगंधा दीक्षित
  • 04.06.25
  • वाचनवेळ 4 मि.
ahilyadevi holkar

अहिल्याबाई यांनी अवघी २८ वर्षं राज्य चालवलं. त्यात शेतीसाठी पाण्याची सोय करणं, उद्योग व्यापारासाठी रस्ते आणि बाजारपेठा उभ्या करणं, मागासवर्गीय आणि महिला यांच्या शिक्षणासाठी शाळा उभारणं, आपल्या राज्याच्या सीमा सुरक्षित करून घेणं, सर्वधर्मांच्या सांस्कृतिक उन्नतीला प्रोत्साहन देणं हा राजधर्म त्यांनी अवलंबला. पण मुळात तीनशे वर्षांपूर्वीच्या पुरुषसत्ताक समाजात अहिल्याबाईंच्या हाती सत्ता आली कशी? आणि जवळजवळ तीन दशकं राज्य चालवून लोकांची 'राजमाता' होण्याचा त्यांचा प्रवास कसा झाला, याविषयी...

अहिल्याबाईंची पार्श्वभूमी आणि राज्यकारभाराची सुरुवात

अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ३१ मे १७३५ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी गावात एका धनगर कुटुंबात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे गावचे पाटील होते. त्यांनी अहिल्याबाईंना शिक्षण दिलं. मुलीला शिकवणं ही त्या काळात दुर्मीळच गोष्ट होती. १७३३ मध्ये मल्हारराव होळकर यांनी आपला मुलगा खंडेराव होळकर यांच्यासाठी अहिल्याबाईंची निवड केली आणि त्या होळकर घराण्याची सून बनल्या. १७५४ मध्ये खंडेराव यांचं निधन झालं. पुढच्या अवघ्या दहाएक वर्षांत मल्हाररावांचंही निधन झालं. अशा तर्‍हेने १७६७ मध्ये माळव्याचं राज्य अहिल्याबाईंकडे आलं. पुढची २८ वर्षं त्यांनी माळव्यावर राज्य केलं. राज्य करत असताना त्यांनी वंचित घटकांकडे प्रकर्षाने लक्ष देण्याचा प्रयत्न केला.

मागासवर्गीय जातींसाठी उद्योग आणि शाळा

अहिल्याबाईंनी जातीआधारीत भेदभाव कमी करण्यासाठी आणि मागासवर्गीय जातींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महत्त्वपूर्ण पावलं उचलली. त्या काळात माळव्यातील भिल्ल, गोंड जमातींना आणि इतर मागास जातींना आतापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात सामाजिक आणि आर्थिक हेटाळणीचा सामना करावा लागत होता. अहिल्याबाईंनी या जातींना आर्थिक संधी देण्यासाठी माहेश्वर येथे माहेश्वरी साड्यांचा उद्योग सुरू केला. या उद्योगामुळे मागासवर्गीय कुटुंबांना, विशेषतः महिलांना रोजगार मिळाला. यामुळे जातीव्यवस्था तत्काळ पुसली गेली असं नव्हे, पण किमान त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळण्यास मदत झाली.

तसंच, अहिल्याबाईंनी बाजारपेठा आणि व्यापारी केंद्रं उभारली. यामुळे विविध जातीतील कारागिरांना आणि व्यापाऱ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता आला. शिक्षणाच्या क्षेत्रातही त्यांनी मागासवर्गीयांसाठी दारं खुली केली. त्यासाठी शाळा स्थापन केल्या.

अहिल्याबाईंचा धर्म आणि सर्वधर्मसमभाव

अहिल्याबाई स्वतः शिवभक्त होत्या आणि त्यांनी आपलं राज्य श्री शंकराला समर्पित केलं होतं. परंतु त्यांनी सर्वधर्मसमभावाचा आदर केला. त्यांनी माहेश्वरमध्ये सर्व धर्मांसाठी सांस्कृतिक केंद्रं उभारली. तिथे हिंदू, मुस्लिम, जैन आणि इतर धर्मांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन दिलं. माहेश्वर हे सर्वधर्मीय विद्वानांचं आश्रयस्थान होईल असं बघितलं. यातून विचारांची देवाणघेवाण सुलभ करण्याचा प्रयत्न केला.

दुसरं उदाहरण म्हणजे त्यांनी माळवा प्रांतात सर्व धर्मांच्या यात्रिकांसाठी विश्रामगृहं बांधली. खर्गोनजवळील नर्मदाकिनारी त्यांनी सर्वधर्मीय यात्रेकरूंसाठी राहण्याची आणि प्रार्थनेची सोय केली. हिंदूंसह मुस्लिम आणि जैन यात्रेकरूंनाही तिथे समान सुविधा दिल्या जात. गरजूंना मदत करताना त्यांनी कधीच धर्म विचारला नाही. प्रशासनातही धार्मिक भेदभाव पाळला नाही.

अहिल्याबाईंनी अनेक सामाजिक आणि आर्थिक सुधारणा केल्या:

१. शेती आणि पायाभूत सुविधा: शेतीच्या विकासासाठी त्यांनी पाणी व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित केलं. विहिरी, तलाव आणि कालवे बांधून शेतकऱ्यांसाठी पाण्याची सोय केली. रस्ते आणि सराई बांधून व्यापार आणि प्रवास सुलभ केला. यातून माळव्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळाली.

२. शिक्षणाचा प्रसार: सर्व स्तरांतील मुलांसाठी शाळा स्थापन करून त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला. विशेषतः वंचित समुदायांना शिक्षण देऊन सामाजिक समानतेसाठी पाऊल उचललं.

३. न्याय आणि प्रशासन: अहिल्याबाई दररोज दरबारात बसून प्रजेच्या तक्रारी ऐकत आणि त्वरित निवारण करत. निःपक्षपाती प्रशासनासाठी त्या ओळखल्या जात.

४. महिला सक्षमीकरण: विधवांच्या हक्कांसाठी त्यांनी लढा दिला. विधवांना पतीची संपत्ती आणि मुलाला दत्तक घेण्याचा अधिकार मिळवून दिला. विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन देऊन सामाजिक सुधारणा घडवून आणल्या.

५. सांस्कृतिक संरक्षण: माहेश्वरला साहित्य, संगीत आणि कलेचं केंद्र बनवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मराठी कवी मोरोपंत, शाहीर अनंत फंदी आणि संस्कृत विद्वान खुशाली राम यांना आश्रय देऊन सांस्कृतिक वारसा जपला.

६. सामाजिक सुधारणा: सुरुवातीला खरे तर त्याच सती जायला निघाल्या होत्या. पण मल्हाररावांनी त्यांना रोखलं. ‘माझा मुलगा बनून राहा’, असं ते त्यांना म्हणाले आणि अहिल्याबाई थांबल्या. पुढे राज्यकारभार बघताना त्या स्वत: सतीविरोधी झाल्या. यासोबतच जातीआधारीत भेदभाव कमी करण्यासाठी मागासवर्गीयांना आर्थिक संधीही उपलब्ध करून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

त्या काळात एका महिलेने २८ वर्षं राज्य चालवणं ही साधीसुधी गोष्ट नव्हती. लष्करी रणनीती आणि प्रशासनात कुशाग्र बुद्धिमत्ता दाखवून अहिल्याबाईंनी अबाधितपणे राज्य चालवलं. त्यांनी सैन्य सुसज्ज ठेवलं, सीमांचं संरक्षण केलं, पण शांततेचा मार्ग स्वीकारला आणि अनावश्यक युद्धं टाळली. यामुळेच त्यांना ‘लोकमाता’ ही पदवी मिळाली. आज त्यांच्या केवळ मंदिरबांधणीच्या कार्याची चर्चा होते; तीच त्यांची एकमेव ओळख बनण्याची धास्ती आहे. म्हणून ही इतिहासाची उजळणी....

मृदगंधा दीक्षित | mrudgandha.uniqueportal@gmail.com

मृदगंधा दीक्षित युनिक फीचर्समध्ये संपादकीय विभागात कार्यरत असून त्यांना कथा-कादंबरी-कविता लिहिण्यातही रस आहे.







प्रतिक्रिया लिहा...

Select search criteria first for better results