
जगात आपण कोणकोणत्या बाबतींत पहिल्या क्रमांकावर आहोत, याची चर्चा करायला भारतीयांना फार आवडतं. नुकतीच भारत सरकारच्या केंद्रीय रस्ते मंत्रालयाकडून एक आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार भारतात रस्त्यांवर अपघात होऊन मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या जगात सर्वाधिक आहे असं निष्पन्न झालं आहे. चीनसोबत बरोबरी करून आपण याबाबत जगात पहिला क्रमांक गाठला आहे.
मंत्रालयाच्या अहवालानुसार २०१३ ते २०२३ या दहा वर्षांच्या काळात १५ लाख ३० हजार लोक रस्त्यांवरील अपघातांत मृत्युमुखी पडले आहेत. हा आकडा नैसर्गिक संकटांमध्ये बळी पडलेल्या लोकांपेक्षाही अधिक आहे.
एका वर्षाचा विचार करायचा झाला तर २०२३ च्या एका वर्षात रस्त्यांवर ४.८ लाख अपघात झाले आणि त्यात १.७२ लाख लोक मरण पावले. २०२२च्या तुलनेत हे दोन्ही आकडे वाढलेले दिसतात. त्या वर्षी ४.६ लाख अपघात झाले होते आणि त्यात १.६८ लाख लोक मृत्युमुखी पडले होते.
या आकडेवारीच्या पोटात शिरलं तर देशात अपघातांमध्ये किती नाहक बळी जात आहेत हे कळतं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातांमध्ये १० हजार अल्पवयीन मुलं मारली गेली आहेत. शाळेच्या आणि महाविद्यालयांच्या आसपासच्या रस्त्यांवर जे ३५ हजार अपघात झाले त्यात १० हजार मृत्यू झाले आहेत. या अपघातांमध्ये ३५ हजार पादचारी मारले गेले आहेत, ५४ हजार मृत्यू हेल्मेट न घातल्याने झाले आहेत, तर १६ हजार मृत्यू चारचाकी वाहनात सीटबेल्ट न लावल्याने झाले आहेत. १२ हजार मृत्यू ट्रकमध्ये परवानगीपेक्षा अधिक माल भरल्याने झाले आहेत. केंद्रीय मंत्र्यांच्या माहितीनुसार या अपघातांमधील ३४ हजार अपघात हे सुयोग्य ड्रायव्हिंग लायसन्स नसलेल्यांचे झाले आहेत.
अपघात हे काही पूर्वसूचना देऊन होत नसतात, पण योग्य खबरदारी घेऊन बहुतेक अपघात टाळता मात्र येऊ शकतात. त्यासाठी चांगले रस्ते, वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित व्हावी यासाठी व्यवस्थापन, सदोष रस्त्यांची दुरुस्ती, खड्डेमुक्त रस्ते, शहरांमधील निर्दोष सिग्नल यंत्रणा, तसंच वाहनचालकांचं प्रशिक्षण आणि समुपदेशन असे अनेक उपाय योजले तर अपघातांची आणि मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी होऊ शकते.

या अपघातांमागे अनेक कारणं असली तरी माणसांचं वर्तन आणि त्यांच्यामध्ये कायद्याची भीती राहिलेली नसणं ही त्यातली मुख्य कारणं असल्याचं गडकरींचं म्हणणं आहे. याशिवाय रस्त्यांचा दर्जा चांगला नसणं, रस्त्यांवरचे खड्डे, अंडरपासेस आणि फूट ओव्हरब्रिज नसणं अशीही अनेक कारणं रस्ते अपघातांमागे असल्याचंही त्यांनी मान्य केलं आहे.
त्यांनी सांगितलेल्या कारणांबाबत दुमत असण्याचं कारण नाही. शिवाय केंद्रीय परिवहन मंत्री झाल्यापासून गडकरींनी राष्ट्रीय महामार्गांचं प्रचंड काम फत्ते केलं आहे, ही बाबही निर्विवाद आहे. राष्ट्रीय महामार्गांवर जिथे अपघात घडतात ती ठिकाणं शोधून तिथेही दुरुस्तीचं काम त्यांनी हाती घेतलं आहे. त्यामुळे येत्या वर्षांत भारतातील रस्त्यांचा चेहरामोहरा बदलून जाईल, अशी आशा आहे.
मात्र, वाढते अपघात कसे रोखायचे हा प्रश्न अजून सुटलेला नाही. भारतात रस्त्यांच्या पुनर्निर्माणाचं आणि नव्याने उभारणीचं काम साधारण २००० सालापासून वेग धरू लागलं असं मानलं जातं. त्या वर्षी भारतात ९८,०३८ अपघाती मृत्यू झाले होते. त्यानंतरच्या वीस-पंचवीस वर्षांत भारतात रस्ते मोठे बनले, नवे राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग बनले. समृद्धी वगैरेंसारखे शेकड्यांत एक्स्प्रेस वे बनले. रस्त्यांचा दर्जा सुधारल्यामुळे अपघातांची संख्या कमी व्हायला हवी होती. प्रत्यक्षात मृतांची संख्या जवळपास दुपटीने वाढून ती १.७२ लाख एवढी झाली आहे. गडकरी दिल्लीत ज्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतात, तो महाराष्ट्र अपघातात उत्तर प्रदेश व तामिळनाडूनंतर देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. यामागे काय कारणं आहेत हे शोधून काढणं आवश्यक आहे.
गडकरी हे देशातील सर्वाधिक लोकप्रिय मंत्री आहेत. त्यांचा कामाचा झपाटा मोठा असल्याचं सतत बोललं जातं. त्यांनी याही बाबतीत लक्ष घातलं तर कदाचित अपघातबळींची संख्या कमी केल्याचं पुण्य त्यांच्या पदरी पडू शकतं.
सुहास कुलकर्णी | uniquefeatures.portal@gmail.com
सुहास कुलकर्णी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. गेली तीन दशकं ते राजकीय प्रक्रियांचं विश्लेषण करत आले आहेत.