
सकाळी १० वाजताची वेळ. ५५ वर्षांचे शहाजीराव चहाचे घोट घेत पेपर वाचत बसलेले. त्यांच्या मोबाइलवर एक मेसेज आला. ‘तुमचं मागच्या दोन महिन्यांचं लाइटबिल थकलेलं आहे. आज बिल भरण्याची शेवटची तारीख आहे. नाही भरलं तर लाइट कट केली जाईल. लाइट कट होऊ नये असं वाटत असेल तर अमुक तमुक नंबरवर संपर्क करा.'
मेसेज वाचून शहाजीराव गोंधळून गेले. कारण त्यांचा मुलगा दर महिन्याला लाइटबिल भरायचा. त्यांना काय करावं सुचेना. घरात मुलगा माहीतगार. त्याला विचारायचं म्हटलं, तर मुलगा आणि सून नोकरीवर गेलेले. त्यांना फोन करून उगाचच कशाला त्रास द्यायचा, असा विचार करून शहाजीरावांनी मुलाला फोन करणं टाळलं. घरात फक्त शहाजीराव आणि त्यांच्या पत्नी. कदाचित या वेळी मुलाकडून बिल भरायचं राहून गेलं असेल. रक्कम किरकोळ असेल तर आपण लगेच भरून टाकू, हा विचार करून शहाजीरावांनी मेसेजमधल्या नंबरवर फोन लावला.
शहाजीराव : नमस्ते. तुमचा मेसेज बघितला. माझा मुलगा दर महिन्याला वेळच्या वेळी लाइटबिल भरतो. या वेळी कदाचित त्याच्याकडून चुकून राहून गेलं असेल. किती बिल आहे सांगा, भरून येतो.
फोनवरील व्यक्ती : आज शनिवार आहे. आज महावितरणच्या ऑफिसला हाफ डे असतो. तुम्ही बिल भरायला जाईतोपर्यंत उशीर होईल. तुमची वीज कट केली जाईल. आणि वीजजोडणी करणारी माणसं डायरेक्ट सोमवारीच येतील. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, बिल ऑनलाइन भरा. ऑनलाइन पेमेंट भरल्यावर तुम्हाला १०० रुपये डिस्काउंटही मिळेल.
शहाजीराव : ठीके; पण मला ऑनलाइन पेमेंट करता येत नाही.
फोनवरील व्यक्ती : काही अवघड नाहीये. तुम्ही फक्त मी सांगतोय तसं करा. फोन स्पीकरवर लावा. प्लेस्टोरवर जाऊन महावितरणाचं ॲप डाउनलोड करा. त्यावर तुमचं जुनं लाइटबिल बघून तुमची माहिती टाका. त्यानंतर मी एक लिंक पाठवतो, ती ओपन करा.
शहाजीराव : ठीक आहे. (शहाजीराव फोनवरील व्यक्ती सांगतील तसं करत गेले.)
फोनवरील व्यक्ती : लिंक ओपन केल्यानंतर तुमच्या एटीएम कार्डवरचे डीटेल्स टाका.
शहाजीराव (१० सेकंदांनंतर) : टाकले.
फोनवरील व्यक्ती : आता तुमच्या मोबाइलवर एक ओटीपी येईल.
शहाजीराव : हो, आलाय. आता?
फोनवरील व्यक्ती : आता काही नाही. तुमचं पेमेंट झालंय. आता तुमचं लाइट कनेक्शन कट होणार नाही. शिवाय १४५०चं लाइटबिल होतं. त्यावर तुम्हाला १०० रुपयांचा डिस्काउंट मिळालाय.
‘ठीके' म्हणून शहाजीराव फोन ठेवून देतात.
आता आपली लाइट कट होणार नाही याचा त्यांना आनंद झालेला असतो; पण हा आनंद क्षणिक ठरतो. त्यांच्या फोनवर आणखी एक मेसेज येतो. त्यांच्या अकाउंटमधून ३५ हजार रुपये काढून घेतले आहेत याचा. तो वाचून त्यांना धक्का बसतो. शहाजीराव पुरते हादरून जातात. आपण तर १३५० भरले, मग ३५ हजार कसे कट झाले? त्यांना दरदरून घाम फुटतो. ते मुलाला फोन लावतात आणि सगळी हकीगत सांगतात. मुलाला कळतं की आपल्या वडिलांची ऑनलाइन फसवणूक झालेली आहे.
कशी केली जाते ही फसवणूक?
ऑनलाइन लाइटबिल भरायला सांगण्यासाठी किंवा केवायसी अपडेट करण्यासाठी फोन केला जातो. त्यानंतर मेसेज पाठवून, लिंक ओपन करायला लावून फसवणूक केली जाते. या प्रकरणामध्ये फोनवरील व्यक्तीने पाठवलेली लिंक ओपन केल्यानंतर शहाजीरावांच्या स्क्रीनवरची सगळी माहिती समोरच्या व्यक्तीला मिळू लागली. शहाजीराव इकडे जे काही करतील त्याचे सगळे डीटेल्स त्या व्यक्तीला दिसू लागले. एटीएम कार्डचे डीटेल्स आणि ओटीपी बघितल्यानंतर फोनवरील व्यक्तीने लगेच ३५ हजार रुपये शहाजीरावांच्या खात्यातून काढून घेतले.
शहाजीरावांच्या मुलाने सायबर क्राइम विभागात तक्रार दाखल केली. या घटनेचा तपास सध्या पोलिस करत आहेत. पण अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी मोबाइलवर अनोळखी नंबरवरून येणारी कुठलीही लिंक उघडून न बघण्याचा आणि आपले अकाउंट डीटेल्स शेअर न करण्याचा पोलिसांनी शहाजीरावांना सल्ला दिला.
फसवणूक होऊ नये म्हणून काय कराल?
घाबरू नका, पोलिस तुमच्या सोबतीला आहेत.
पुणे शहरात सायबर गुन्ह्यांविषयी तक्रार नोंदवण्यासाठी संपर्क - ०२० २९७१००९७, ७०५८७१९३७१, ७०५८७१९३७५
ई-मेलद्वारे तक्रार नोंदवण्यासाठी – crimecyber.pune@nic.in
(ई-मेलद्वारे तक्रार दिल्यानंतर पाठपुरावा करण्यासाठी तक्रारदाराने आपला संपर्क क्रमांक द्यावा.)