
डॉ. अशोक काळे. यांचं वय अवघं ७५ वर्ष. मात्र याही वयात ते गावोगावी प्रवास करतात आणि तोही सार्वजनिक वाहतुकीने. हा सगळा खटाटोप कशासाठी? तर एका महत्त्वाच्या विषयावरील जनजागृतीसाठी. महिलांची प्रसूती ही नैसर्गिक पद्धतीनेच व्हायला हवी, हा त्यांच्या धडपडीचा उद्देश आहे आणि मोहिमेचं नाव आहे 'लज्जागौरी'.
डॉ. अशोक काळे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या संस्थापकांपैकी एक. ग्राहकांच्या आरोग्याच्या, तसंच इतरही विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचं कामही त्यांनी दीर्घ काळ केलं आहे. ते स्वतः स्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ. त्या विषयाबाबतही ते सातत्याने जनजागृती करत आले आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी नैसर्गिक प्रसूतीचा आग्रह धरणाऱ्या लज्जागौरी मोहिमेवर आपलं लक्ष केंद्रित केलं आहे. पूर्वी घरच्या घरी नैसर्गिक प्रसूती होत असे, तेव्हा उभ्याने किंवा उकिडवं बसून कळा देण्याची पद्धत होती. त्यालाच डॉ. काळे ‘लज्जागौरी पद्धत’ म्हणतात.

महिलांना आणि त्यांच्या कुटुंबियांना नैसर्गिक प्रसूतीचं महत्त्व आणि फायदे माहीत नसतात. त्यामुळे कधी अज्ञानातून, तर कधी डॉक्टरांच्या चुकीच्या मार्गदर्शनातून गरज नसताना सिझेरियन प्रसूती केली जाते. त्याचे दुष्परिणाम आई आणि बाळ दोघांनाही सहन करावे लागतात. त्यामुळे शक्यतो सिझेरियन प्रसूती टाळून नैसर्गिकरीत्या बाळंतपण करण्याचा प्रयत्न करायला हवा, याबाबत जागृती करण्यासाठी डॉ. काळे गावोगावी फिरतात. तसंच नैसर्गिक प्रसूतीमध्येही आडवं पडून कळा देण्यापेक्षा उभं राहून कळा देण्याची पद्धत अधिक उपयोगी आणि नैसर्गिक आहे. त्याबद्दलही अलीकडे महिलांना फारशी माहिती नसते, ती पद्धत पुन्हा रूढ करण्यासाठीचा प्रयत्न म्हणजे लज्जागौरी मोहीम, असं ते सांगतात.

पूर्वी भारतात घरातच प्रसूती होण्याचं प्रमाण मोठं होतं. घरातल्या जुन्याजाणत्या महिला किंवा सुईणीच्या मदतीने प्रसूती होत असे. त्यात धोके होतेच, पण काही चांगल्या पद्धतीही होत्या. विशेषतः गरोदर महिलेला आडवं न झोपवता उभ्याने किंवा उकिडवं बसून कळा दिल्या जात असत. जसजशी आरोग्य यंत्रणा विस्तारत गेली, तसतसं दवाखान्यांमध्ये प्रसूती होण्याचं प्रमाण वाढलं. पण त्याचबरोबर काही चुकीच्या पद्धतीही रूढ होत गेल्या. गर्भवती महिलांची संख्या आणि दवाखान्यांमध्ये त्यांच्यासाठी उपलब्ध असलेलं मनुष्यबळ यात आपल्याकडे कायमच तफावत असते. त्यामुळे महिलेला नैसर्गिक प्रसूतीसाठी द्यावा लागणारा वेळ, मदत मिळत नाही. दवाखान्यांमध्ये खाटांची संख्या मर्यादित असते. अशा कारणांमुळे अनेकदा वाट बघण्याऐवजी सिझेरियन प्रसूतीचा निर्णय घेतला जातो, याकडे डॉ. काळे लक्ष वेधतात. सिझेरियन टाळायचं असेल तर ‘टेबलाशिवाय कळा’ घेण्याची जुनी पद्धत पुन्हा आणायला हवी, असं ते आग्रहाने सांगतात.

प्रसूतीचे साधारणपणे तीन टप्पे असतात. सुरुवातीला गर्भाशय पिशवीचे घट्ट बंद असलेलं तोंड उघडू लागतं. ते चार इंच उघडल्याशिवाय बाळाचं डोकं बाहेर येऊ शकत नाही. हा झाला पहिला टप्पा. दुसऱ्या टप्प्यात, बाळ संपूर्णपणे गर्भाशयातून बाहेर येतं. या दुसऱ्या टप्प्यात अनेकदा बाळाचं डोकं योनी मार्गात अडकतं. अशा वेळी त्याला बाहेर ओढून काढण्यासाठी डॉ. पीटर चेंबरलेन यांनी सतराव्या शतकात प्रसव चिमटा वापरण्याची पद्धत शोधली. हा चिमटा लावण्यासाठी बाळंतिणीला टेबलावर झोपवावं लागू लागलं. त्यासाठी टेबल आलं. अन्यथा त्याआधी प्रसूती प्रामुख्याने उभ्यानेच होत असतं, अशी माहिती डॉ. काळे देतात. कालांतराने सर्रास चिमटा वापरला जाऊ लागला. पुढे आधुनिक काळात नव्या औषधांचे शोध लागले, कळा येण्यासाठी इंजेक्शनं वापरली जाऊ लागली. त्यामुळे चिमट्याचा वापर कमी झाला, जवळ जवळ थांबला. पण टेबल मात्र तसंच राहिलं. त्या टेबलमुळेच सिझेरियनचं प्रमाण वाढण्याला हातभार लागला असल्याचं ते सांगतात.

‘गरोदर महिलेला कळा देण्याचं योग्य ज्ञान द्यायला हवं. तसंच लेबर रुममध्ये जाताना तिच्यासोबत तिच्या जवळची, कळा द्यायला मदत करू शकेल अशी व्यक्ती असायलाच हवी. महिलेला शारीरिक, मानसिक आणि भावनिक सोबत मिळाली तर प्रसूतीची प्रक्रिया तुलनेने सोपी होऊ शकते’, असा विश्वास डॉ. काळे यांना वाटतो. गरोदर महिलांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना याबाबत पुरेशी माहिती दिली जावी, यासाठी त्यांनी लज्जागौरी मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत ते महाराष्ट्रातील विविध भागांत जाऊन महिलांना नैसर्गिक प्रसूतीविषयी माहिती देतात.
‘‘भारतातील जास्तीत जास्त महिलांची नैसर्गिक प्रसूती होणं हाच माझ्या कामाचा मोबदला’’, असं डॉ. काळे म्हणतात.