आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी : पुण्याचा जाज्वल्य मानबिंदू

  • राजीव साबडे
  • 30.05.26
  • वाचनवेळ 22 मि.
nda

शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात सायकलवरून भटकंती, हा माझ्या पिढीतील अनेकांचा आवडता छंद होता. शाळेत असताना आम्ही वर्गमित्रांनी आगाखान पॅलेस, महादजी शिंदे छत्रीपासून थेऊर आणि सिंहगडाच्या सायकल स्वाऱ्या केल्या होत्या. पुणे परिसरातील एकही आकर्षणाचं, ऐतिहासिक महत्त्वाचं किंवा वेगळेपणाचं स्थान पाहायचं राहिलं नव्हतं. पण इच्छा असूनही जाता आलं नाही असं एकमेव ठिकाण होतं, एनडीए म्हणजेच नॅशनल डिफेन्स अकॅडमी किंवा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी. तिथल्या मुख्य प्रवेशद्वारातूनच सुरक्षा रक्षकांनी आम्हाला परतायला लावलं होतं. आत सायकलवर रपेट करत फिरणारे एनडीएचे छात्र लांबूनच पाहत सायकली मागे वळवून आम्ही नूमविचे छात्र निराशेने परत फिरलो होतो.

त्यावेळी अपूर्ण राहिलेली ती इच्छा पत्रकारितेतील पहिल्याच वर्षी पूर्ण करण्याची संधी मला मिळाली. डिसेंबर १९७६मध्ये लष्कराच्या दक्षिण विभागाकडून ‘सकाळ'ला आलेलं पासिंग आऊट परेडचं निमंत्रण आणि त्याच्या वृत्तांकनाची संपादकांनी दिलेली संधी, आनंदाबरोबरच उत्सुकता आणि उत्कंठा वाढवणारी होती. शिवाय परेडची मानवंदना स्वीकारणार होत्या पंतप्रधान इंदिरा गांधी. त्यामुळे मोठी बातमी मिळेल याची खात्री होती. त्या काळी अशा कार्यक्रमात पुण्या-मुंबईतील वृत्तपत्रांचा एक एक प्रतिनिधी आणि आकाशवाणी-दूरदर्शन यांचे प्रतिनिधी मिळून १२ ते १४ जणच असायचे. लष्कराच्या दक्षिण विभागाचे जनसंपर्क अधिकारी मेजर हसन यांनी आम्हाला निमंत्रण देतानाच बजावलं होतं, “फॉर्मल ड्रेस आणि शूज घालणं आवश्यक आहे. पत्रकारांसाठी खास व्यवस्था केलेली गाडी निघण्याच्या आधी १५ मिनिटं तरी ठरलेल्या जागी पोहोचलंच पाहिजे. एनडीएतील कार्यक्रम ‘मिनिट टू मिनिट'असल्यामुळे प्रेसची असली तरी गाडी एक मिनिटही उशिरा निघणार नाही.” आणीबाणीचा काळ आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा कार्यक्रम यामुळे सर्वजण वेळेआधी हजर झाले. आमची गाडी थोड्याच वेळात एनडीए गेटपाशी पोहोचली. जिथून आपल्याला प्रवेश नाकारून परत पाठवलं होतं, तिथे सन्माननीय अतिथी म्हणून जात असल्याचा सूक्ष्म आनंद मनात तरळून गेला. प्रत्येकाचं निमंत्रण तपासून सुरक्षा रक्षकांनी आमची गाडी आत सोडली आणि आम्ही आतल्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो. त्याचं नाव ‘त्रिशक्ती गेट'. भूदल, हवाई दल, नौदल या तिन्हींचं प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेची ती सार्थ तोंडओळख होती; त्यातून आत गेलो आणि दृष्टीस पडली ती एक भव्य-दिव्य वास्तू ‘सुदान ब्लॉक'. वर्षापूर्वीच पत्रकारिता अभ्यासक्रमाचा विद्यार्थी म्हणून दिल्लीच्या अभ्यास दौऱ्यात मी राष्ट्रपती भवन आणि संसद भवन पाहिलं होतं. वास्तुकलेचे ते अद्भुत नमुने डोळ्यांना सुखावणारे होते. पण इथे पाहायला मिळत होती ती भव्यतेपलीकडील वास्तुशैली. वर घंटेच्या किंवा लष्करी हेल्मेटच्या आकाराचा घुमट आणि त्याच्या दोन्ही बाजूंना पंखासारख्या पसरलेल्या दोन विलक्षण देखण्या इमारती. दुतर्फा असलेली हिरवळ आणि त्याच्याकडेला एकसारख्या आकाराच्या आणि उंचीच्या वृक्षराजी. एखाद्या निसर्गचित्रातील वाटावी एवढी रेखीव दृश्यं. ठरल्या वेळी पासिंगआऊट परेडचा कार्यक्रम सुरू झाला. परेडसाठी सज्ज असलेल्या छात्रांच्या रांगा एवढ्या शिस्तबद्ध होत्या, की ती माणसं नसून पुतळे असावेत असा भास होत होता. मोजक्या निमंत्रितांपुरता असलेला शामियाना भरलेला होता, पण सर्वत्र पिन ड्रॉप सायलेन्स होता. नंतरचे दोन तास जो सोहळा मी अनुभवला तो अनुपम्य होता. मेजर हसन म्हणाले होते, ‘मिनिट टू मिनिट कार्यक्रम'. प्रत्यक्षात तो ‘सेकंड टू सेकंड' चालला होता. ठरलेल्या वेळी एनडीए कमांडंट ॲडमिरल मनोहर आवटी यांच्यासह पंतप्रधान इंदिरा गांधींचं आगमन. परेडची पाहणी आणि नंतर पासिंग आऊट परेड. मोकळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर एखादा थ्रीडी चित्रपट आपण पाहतो आहोत असा भास होत होता. मानवंदना देत दोन रांगांमधून बाहेर जाणारे छात्र म्हणजे एका विशाल यंत्राचे भाग असावेत एवढी त्यांची सामूहिक अचूकता होती. छात्रांनी काही क्षणात उभा केलेला मानवी मनोरा, लढाऊ विमानांनी आकाशात घेतलेली झेप आणि आपल्या डोक्याला ते चाटून जात आहेत असं वाटावं, एवढ्या जवळून वर जाताना त्यांनी केलेल्या हवाई कसरती हे कधी चित्रपटातही पाहायला मिळालं नव्हतं. डोळे विस्फारून त्यातील प्रत्येक दृश्य मी मन:पटलावर गोंदवून घेत होतो.

बँडच्या ठेक्यावर मैदानाबाहेर हळूहळू छात्रांची लयबद्ध पावलं पडत असताना ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा' हे परिचित गाणं सुमधुर सुरात वाजवलं जात होतं. पूर्वी अनेकदा ऐकलेल्या त्या गाण्याची संचालनाला मिळणारी साथ रोमांचकारी अनुभव देत होती. एनडीएतील ती पहिली भेट एवढी संस्मरणीय ठरली होती, की त्यानंतर संधी मिळेल तेव्हा मी तिथे जात राहिलो. देशाचं वैभव असलेल्या या संस्थेची अधिकाधिक माहिती मिळवत राहिलो आणि दरवेळी काही नव्या आठवणी जमा करत गेलो.

भारतीय सैन्यदलाशी जोडला गेलेला एनडीएचा इतिहास एका प्रेरणादायी कथानकाप्रमाणे आहे. दुसऱ्या महायुद्धात असंख्य भारतीय तरुण ब्रिटिश आर्मीतर्फे लढले. सहा वर्षांच्या त्या भयानक युद्धानंतर भूदल, हवाई दल, नौदल या तिन्ही दलांना आधुनिक युद्धतंत्राचं एकत्रित प्रशिक्षण देण्याची कल्पना भारतात मांडली गेली. त्यावेळी जगात अगदी प्रगत राष्ट्रातही तसा विचार कधी केला गेला नव्हता. १९४५मध्ये तेव्हाचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल क्लॉड ॲचिनलेक यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त प्रशिक्षण केंद्राची आखणी करण्यासाठी समिती नेमण्यात आली. त्या समितीने प्राथमिक आराखडाही तयार केला, पण १९४७मध्ये भारत स्वतंत्र झाल्यावर ही योजना मागे पडली. पुढे समितीच्या शिफारशीनुसार डेहराडूनला असलेल्या इंडियन मिलिटरी अकॅडमीतच तिन्ही दलांसाठी हंगामी स्वरूपाची प्रशिक्षण शाखा उघडण्याचं ठरलं. ऑक्टोबर १९४७मध्ये काश्मीरमध्ये घुसखोरी करून पाकिस्तानने भारतावर पहिलं युद्ध लादलं, तेव्हा संरक्षण सज्जतेची गरज अधोरेखित झाली. त्यामुळे प्रशिक्षणासाठी अत्यंत उच्च दर्जाची संस्था उभी करण्याचा निर्णय झाला. त्यासाठी संभाव्य जागा म्हणून मुंबई, बेंगलोर, डेहराडून, बेळगाव, सिकंदराबाद, विशाखापट्टण अशा काही शहरांचा विचार झाला. पण लष्करी सरावासाठी लागणारा डोंगराळ प्रदेश, लोहगावला असलेला हवाई दलाचा तळ आणि खडकवासला धरणामुळे नौदलाच्या सरावास आवश्यक संरचना यामुळे पुण्याची निवड झाली.

अर्थात या निर्णयामागे दोन मराठी मान्यवरांचं मोठं योगदान होतं. पहिले म्हणजे न.वि. उर्फ काकासाहेब गाडगीळ. नेहरूंच्या मंत्रिमंडळात ते सार्वजनिक बांधकाममंत्री होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काश्मीरमध्ये पाकिस्तानने केलेल्या आक्रमणानंतर जम्मू-काश्मीरला मुख्य भूमीशी जोडणाऱ्या पठाणकोट-श्रीनगर मार्गाचा प्रकल्प त्यांनी वेगाने पूर्ण करून दाखवला होता. तो मार्ग लष्करी वाहनांच्या हालचालींसाठी सक्षम होईल अशी त्याची बांधणी करण्यात आली होती. तशीच दूरदृष्टी दाखवून काकासाहेब गाडगीळ यांनी खडकवासला हीच एनडीएसाठी सर्वोत्तम जागा ठरेल हे पंतप्रधान नेहरूंना पटवून दिलं. हल्ली एखाद्या छोट्या गल्लीला कोणाचं नाव दिलं तरी नगरसेवक त्या पाटीखाली संकल्पना म्हणून स्वतःचं नाव लावतात. काकासाहेबांनी पुण्याला एक अमूल्य ठेवा मिळवून दिला, तरी त्याचं श्रेय कधी स्वतःकडे घेतलं नाही. त्यांना साथ दिली ती कोल्हापूरचे सुपुत्र एस. पी. पी. (शंकरराव पांडुरंग पाटील) थोरात या लष्करी अधिकाऱ्याने. त्यावेळी ब्रिगेडियर असलेले थोरात पुढे लेफ्टनंट जनरल पदावरून सेना दलाच्या पूर्व विभागाचे प्रमुख होऊन निवृत्त झाले. पुण्यात शिक्षण झालेल्या थोरात यांना खडकवासल्याचा परिसर उत्तमप्रकारे माहीत होता. तत्कालीन बॉम्बे प्रॉव्हिन्सकडून लष्कराला एनडीएसाठी जमीन मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली.

हेही वाचा - डिहार - सैन्यासाठी ‘झटणारी’ संस्था

६ ऑक्टोबर १९४९या दिवशी खडकवासल्यात पंडित नेहरूंच्या हस्ते एनडीएची पायाभरणी झाली. त्यावेळेपर्यंत डेहराडूनमध्ये तिन्ही दलांच्या एकत्रित प्रशिक्षणाची सुरुवातही झाली होती. तिथून संपूर्ण यंत्रणा पुण्यासारख्या लांबच्या ठिकाणी नेऊन नव्या व्यवस्थेत बसवणं हे मोठं अवघड काम होतं. त्यामुळे एखाद्या लष्करी मोहिमेला द्यावं तसं या स्थलांतराला ‘ऑपरेशन बदली' असं नाव देण्यात आलं. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश आर्मीतील भारतीय लष्कराने अतुलनीय पराक्रम गाजवून आफ्रिकेतील सुदान या देशांमधील हजारो नागरिकांचे जीव वाचवले होते. त्याबद्दलची कृतज्ञता म्हणून सुदान सरकारने भारतीय लष्कराला एक लक्ष पाउंडांचा निधी दिला होता. त्याचा वापर एनडीएची मुख्य प्रशासकीय वास्तू बांधण्यासाठी करण्यात आला. सुदानशी नातं सांगणाऱ्या या इमारतीला ‘सुदान ब्लॉक' असं नाव देण्यात आलं. या वास्तूची शिल्परचना म्हणजे सुदान आणि भारतीय परंपरांचा संगम आहे. एनडीएचे अधिकारी या वास्तूला ‘एनडीए की धडकन' असं म्हणतात.

छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपणारी पुण्यभूमी, अटकेपार मराठी साम्राज्याचा झेंडा नेणाऱ्या पेशव्यांची राजधानी, नरवीर तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा सांगणाऱ्या सिंहगडाची स्कायलाइन आणि खडकवासला जलाशयाची समृद्ध जोड अशी वैशिष्ट्यं बाळगत एनडीएचा परिसर उभा राहिला. तो पूर्ण होण्यास तब्बल सहा वर्षं लागली. १६ जानेवारी १९५५ या दिवशी एनडीएचं उद्घाटन झालं. राज्य सरकारने दिलेल्या ७००० एकराच्या विस्तीर्ण भूमीवर भारतीय सेनादलाचा एक मानदंड उभा राहिला. डेहराडूनला सुरू झालेल्या जॉईंट सर्व्हिसेस विंगचे प्रमुख मेजर जनरल हबीब उल्लाह हे एनडीएचे पहिले कमांडंट बनले. ७ डिसेंबर १९४९ हा जॉईंट सर्व्हिसेस विंगचा स्थापना दिन होता. त्यानुसार एनडीएने आता गौरवशाली परंपरेची ७५वर्षं पूर्ण केली आहेत. ‘सेवा परमो धर्म:' हे आपलं ब्रीदवाक्य मानचिन्हासह सुदान ब्लॉकवर मिरवणारी एनडीए ही केवळ सैनिकी प्रशिक्षण देणारी शाळा नाही. ती अत्युच्च दर्जाचे सेनाधिकारी घडवणारी एकमेवाद्वितीय अकादमी आहे. तिथे छात्रांना (कॅडेट) शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती, लष्करी व्यूहरचना आणि डावपेच, लष्करी प्रशिक्षणात युद्धभूमीसारख्या परिसरात करायचा सराव, आयुधांचा वापर आणि तंत्रज्ञानाने विकसित होणाऱ्या नव्या युद्धपद्धतीचा सराव घडवला जातो. त्याबरोबरच विज्ञान-तंत्रज्ञान आणि संगणकीय विषयांचं औपचारिक शिक्षणही दिलं जातं. त्यात पदार्थविज्ञानशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, इतिहास, भूगोल, इंग्लिश आणि अन्य एक परदेशी भाषा हे विषय सक्तीचे असतात. तीन वर्षांच्या अभ्यासक्रमात प्रत्येक छात्राची बौद्धिक आणि शारीरिक क्षमता कसाला लागते आणि ती पूर्ण करून बाहेर पडणारा उगवता अधिकारी सोन्यासारख्या क्षमतेचा बनत असतो. ७५ वर्षांत एनडीएतून प्रशिक्षित झालेल्या तीन लष्करी अधिकाऱ्यांनी ‘परमवीर चक्र' हे सर्वोच्च शौर्यपदक आणि १२ जणांनी ‘अशोक चक्रा'चा सन्मान मिळवलेला आहे. २७ माजी छात्र भूदल, हवाईदल किंवा नौदलाचे प्रमुख बनले. २०२३ मध्ये तर तिन्ही दलांचे प्रमुख एनडीएचे माजी छात्र असल्याचा सुयोग जुळून आला. तिन्ही सेनादलांचे प्रमुख एनडीएचे माजी छात्र असण्याची ही तिसरी वेळ होती.

एनडीएत प्रवेश मिळवल्यापासून प्रशिक्षण पूर्ण करून बाहेर पडण्यापर्यंतचा तीन वर्षांचा प्रवास अत्यंत खडतर असतो. शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक क्षमतेत किंचितही कमी पडणारा तरुण इथे टिकाव धरू शकत नाही. दरवर्षी प्रवेशासाठी देशभरातून साडेसोळा ते साडे एकोणीस या वयोगटातील सुमारे चार लाख तरुण प्रवेश परीक्षा देतात. त्यापैकी ३५० ते ४०० जणांची निवड होते. ज्या वयात अनेक प्रकारची आकर्षणं आणि प्रलोभनं तरुण मनाला सतत खेचत असतात, अशा वेळी त्यावर मात करून देशसेवेसाठी वाहून घेणाऱ्या युवकांची अंत:प्रेरणा केवढी जबरदस्त असेल याची कल्पनाच केलेली बरी. दरवर्षी काही मित्र-राष्ट्रांतील निवडक तरुणांनाही या प्रशिक्षणात समाविष्ट करून घेतलं जातं. आधी लेखी परीक्षा, त्यानंतर सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या मुलाखती, शारीरिक तंदुरुस्तीच्या कसोट्या यातील प्रत्येक पायरी इच्छुकाची दमछाक करणारी असते. एनडीएत प्रशिक्षण झालेल्या आणि पुढे उच्च पदावर गेलेल्या एका अधिकाऱ्याने मला सांगितलं होतं, “या कसोट्यांमध्ये क्षमता तपासली गेली नाही, असा शरीराचा एकही अवयव नसतो आणि बुद्धीला ताण देण्यासाठी मेंदूचा एकही कोपरा शिल्लक ठेवलेला नसतो.” नंतरचं प्रशिक्षण एवढं आव्हानात्मक असतं, की ताकदवान दिसणारे आणि उत्तम शरीरसौष्ठव असलेले काही जण प्रशिक्षण सुरू झाल्यावर प्रत्यक्ष कसोट्यांना कमी पडतात आणि त्यांना प्रशिक्षण सोडावं लागतं. अर्थात अशी उदाहरणं अगदी अपवादात्मक आहेत.

निवड झालेल्या छात्रांची १८ स्क्वाड्रनमध्ये विभागणी केली जाते. अल्फा, ब्रावो, चार्ली, डेल्टा अशा स्वरूपाची नावं असलेल्या प्रत्येक स्क्वाड्रनमध्ये देशाच्या वेगवेगळ्या भागांतील छात्र एकत्र येतील अशा प्रकारे निवड केली जाते. ज्युनियर्स-सीनियर्स मिळून एकेका स्क्वाड्रनमध्ये शंभर ते दोनशे छात्र असतात. प्रत्येकाला एक स्वतंत्र निशाण म्हणजे रंग असतो. निवड झालेल्या स्क्वाड्रनचा इतिहास प्रत्येक छात्राला अवगत केला जातो. एखाद्या स्पर्धेत उतरलेल्या टीमप्रमाणे आपल्या स्क्वाड्रनसाठी सांघिक कामगिरी सिद्ध करण्याची जबाबदारी प्रत्येक छात्रावर बिंबवली जाते. तीन वर्षं हे स्क्वाड्रन म्हणजेच त्या छात्राचं घर असतं. प्रत्येकाला मिळणारी सायकल ही त्याची तीन वर्षांची हक्काची जोडीदार असते. छात्रांची दिनचर्या कल्पनेपलीकडे कडक आणि कठोर असते. पहाटे चारपासून त्यांच्या दिवसाची सुरुवात होते. वार्मअप, कवायतीचे सराव, नाश्ता, शैक्षणिक वर्ग, दुपारचं भोजन, मैदानावरील साहसी उपक्रम, संध्याकाळी क्रीडा आणि सांघिक स्पर्धा, नंतर शैक्षणिक स्वयं अध्ययन, रात्रीचं भोजन आणि त्यानंतर पुन्हा काही शारीरिक कसरती. हे सर्व मिनिट टू मिनिट असं चालतं. कशातही सवलत नाही, थोडा जरी विलंब झाला तर शिक्षा. रात्री दहा वाजता दिवे मालवले जातात. अंथरुणाला पाठ टेकताच झोप लागली नाही तरच नवल. कवायतीचे, मेसमध्ये जातानाचे, शैक्षणिक वर्गातले, संध्याकाळच्या खेळाचे ड्रेस, मोजे आणि शूज वेगवेगळे. ते परिधान करणं हाही वेळापत्रकाचा भाग. मेसमध्ये कसं बसायचं, कसं खायचं याचेसुद्धा नियम ठरलेले. सीनियर्स ते आपल्या ज्युनियर्सना शिकवतात. हाही शिकण्याचा आणि शिकवण्याचा एक भाग असतो.

रॅगिंग हा अन्यत्र भीतीदायक वाटणारा प्रकार इथे नित्याचा आहे. १९६६-६९ या बॅचचे छात्र आणि माजी छात्र संघटनेचे उपाध्यक्ष निवृत्त ब्रिगेडियर अजित आपटे यांनी त्या संबंधात बोलताना सांगितलं, “आमच्या वेळी रॅगिंग फारच जोरात चालायचं. पण त्याचा उद्देश तुमची सहनशक्ती आणि शारीरिक, मानसिक क्षमता वाढवण्याचा असे.” एका पासिंग आऊट परेडच्या नंतर सुवर्णपदक विजेत्या छात्राला मी रॅगिंगबद्दल विचारलं होतं, तेव्हाचं त्याचं वाक्य माझ्या चांगलं लक्षात आहे “इथे चुका झाल्या की त्याबद्दल शिक्षा किंवा करेक्टिव ॲक्शन सीनियर्सकडून सांगितली जाते आणि ती करूनही घेतली जाते. तुम्ही त्याला ऑफिशियल रॅगिंग म्हणू शकता. पण ते आमच्या तयारीला पोषकच असतं. ‘जितना रगडा, उतना तगडा' ही इथली प्रचलित म्हण आहे.”

एनडीएतील छात्रांना युद्ध तयारीसाठी ज्या काही कृत्यांचा सराव करावा लागतो, त्याची छायाचित्रं किंवा फिल्म पाहतानाही आपल्याला घाबरायला होतं. दोरावरून उलटं लटकत जाणं, उंच भिंत चढून जाणं, प्रचंड वजनाचं सामान पाठीवर घेऊन पहाड चढणं आणि आणखीही कितीतरी. लष्कर, हवाई दल आणि नौदल यातील आपलं क्षेत्र निवडलेल्यांना त्यानुसार कधी सिम्युलेटरमध्ये, कधी प्रत्यक्ष विमानात किंवा जहाजावर सरावाचं प्रशिक्षण दिलं जातं. प्रशिक्षणाच्या शेवटच्या टप्प्यात असतं ‘जोश रन'. लष्करी छात्रांची प्रत्येक स्कॉड्रन डोंगर-दऱ्यांत लढायला उतरल्याप्रमाणे नकाशे, संदेश यंत्रणा यांचा वापर करत पाठीवर अजस्त्र सामान घेऊन, अंधार पडला, की परिसरातील डोंगराळ भागात लढाईत उतरलेल्या तुकड्यांप्रमाणे नियोजनबद्ध चढाया करते. रात्रभर न जेवता, न झोपता ही लढाईची रंगीत तालीम चालते. त्यात सर्वोत्तम ठरणाऱ्या स्क्वाड्रनचा खास करंडक देऊन सन्मान केला जातो. इथलं प्रशिक्षण शिस्त, वक्तशीरपणा, नियम आणि आचारबंधन या प्रमुख चार तत्त्वांवर चालतं. लष्कर, हवाईदल आणि नौदल यांचं एकत्रित प्रशिक्षण असतंच. त्याशिवाय आपल्या निवडीचं दल घेतलेल्या छात्रांसाठी त्यांचं ‘स्पेशलाईज्ड ट्रेनिंग' घेतलं जातं. लष्करी सेवा निवडलेल्या छात्रांसाठी शस्त्रास्त्रांच्या वापराबरोबरच मॅप रीडिंग, रेडिओ टेक्नॉलॉजी, संदेश यंत्रणेचं प्रमाण, कॅमोफ्लाज, आगीतून मार्ग काढण्याची तंत्रं असे अनेक प्रकार या प्रशिक्षणात असतात. हवाई दल छात्रांना लढाऊ विमानांची सिम्युलेटर्स, एअर ट्रॅफिक कंट्रोल, संदेश यंत्रणा, हवामानाचा अंदाज आणि प्रत्यक्ष विमानातून सराव याचेही धडे मिळतात. नौदलाच्या छात्रांना खडकवासल्याच्या ‘पीकॉक बे'मध्ये प्रत्यक्ष जहाजांचा सराव, सिम्युलेटर, तटरक्षण यंत्रणा यांची प्रात्यक्षिकं करायला मिळतात.

ब्रिगेडियर आपटे यांनी सांगितलं, “१९७४पर्यंत एनडीएत मुख्य भर लष्करी प्रशिक्षणावरच होता. त्यावेळी शैक्षणिक अभ्यासक्रम असला तरी, त्याची वेगळी पदवी देण्याची पद्धत तेव्हा नव्हती. ती सुरू झाली १९७४मध्ये. आता तिसऱ्या वर्षाअखेर अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या छात्रांना जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीची (जेएनयू) बीएससी किंवा बी.टेक अशी पदवी मिळते.” वास्तविक पूर्वापार शिक्षणाच्या दर्जात पुणे विद्यापीठ देशात अग्रगण्य असताना त्याच्या जवळ असलेल्या एनडीएमधील छात्रांना दिल्लीतील जेएनयूची पदवी दिली जावी हे माझ्यासारख्या अभिमानी पुणेकराला नेहमीच खटकत आलं आहे. मी ‘सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठा'चा सिनेट सदस्य असताना हा अभ्यासक्रम आपल्या विद्यापीठाला संलग्न करून घ्यावा आणि त्यांना आपल्या विद्यापीठाची पदवी दिली जावी असा प्रयत्न केला होता. पण ‘अनेक वर्षं चालत आलेली पद्धत आता बदलली जाणार नाही' असं ऐकवून विद्यापीठ प्रशासनाने तो प्रयत्न उडवून लावला.

पदवी प्रदान समारंभ पासिंग आऊट परेडच्या आदल्या दिवशी होतो. त्याला प्रमुख पाहुणे हे शिक्षण क्षेत्रातील एखादे मान्यवर असतात. वर्षातून दोनदा होणाऱ्या पासिंग आऊट परेडला मानवंदना स्वीकारण्यास प्रमुख पाहुणे हे मात्र राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री किंवा तीन सेनादलांच्या प्रमुखांपैकी एक, यातीलच असतात.

एनडीएतील प्रत्येक वास्तू वैशिष्ट्यपूर्ण आणि कलात्मकतेने सजलेली आहे. पहिले कमांडंट मेजर जनरल हबीब उल्लाह यांचं नाव दिलेल्या प्रेक्षागृहात नव्या छात्रांसाठीचं कमांडंटचं अभिभाषण ते पदवी प्रदान असे अनेक समारंभ होतात. या वास्तूत असलेल्या संग्रहालयात अकादमीचा इतिहास सांगणारे फोटो, ग्रंथ आणि प्रकाशनं पाहायला मिळतात. प्रत्यक्ष युद्धात हौतात्म्य प्राप्त केलेल्या २७१ माजी छात्रांचं विलक्षण रेखीव स्मारक ‘हट ऑफ रेमेंबरन्स' छात्रांनीच उभं केलेलं आहे. ते त्यागाचं आणि अभिमानाचं प्रतीक आहे. पुण्यात जन्मलेल्या आणि २१व्या वर्षी पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात अतुलनीय कामगिरी करून वीरमरण पत्करलेल्या अरुण खेत्रपाल यांचं नाव परेड मैदानाला देण्यात आलं आहे. ते छात्रांच्या प्रत्येक पिढीला प्रेरणा देणारं आहे. आवारातील क्रिकेट, फुटबॉलसह एकेका खेळाचं मैदान आंतरराष्ट्रीय स्पर्धा केंद्रांच्या तोडीचं आहे. ब्रिगेडियर आपटे यांनी सांगितलं, “१९५८ मध्ये पुण्यात क्रिकेटचं एकही दर्जेदार मैदान नव्हतं, तेव्हा वेस्ट इंडिज विरुद्ध सेनादल असा तीन दिवसांचा क्रिकेट सामना इथे झाला होता. गॅरी अलेक्झांडरच्या नेतृत्वाखालील विंडीजच्या संघात तेव्हा वेस्ली हॉल आणि रॉय गिलख्रिस्ट यांसारखे विख्यात द्रुतगती गोलंदाज होते.” त्या सामन्याविषयी त्यावेळी कॅडेट असलेल्या अमरजीत सिंग तूर यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रात लिहिलेल्या जुन्या लेखाचं कात्रण ब्रिगेडियर आपटे यांच्याकडे आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे, की ‘सेनादलाकडून खेळणाऱ्या सेनगुप्ता या फलंदाजाने बलाढ्य वेस्टइंडीजविरुद्ध या सामन्यात शतक झळकावून सर्वांना चकित केलं.' तूर यांनी त्यात लिहिलेली एक आठवण मजेशीर आहे. विंडीजच्या खेळाडूंची उतरण्याची व्यवस्था एनडीए छात्रांच्या स्क्वाड्रनमध्येच करण्यात आली होती. तूर यांची सरदारी पगडी पाहून महान अष्टपैलू खेळाडू गॅरी सोबर्स इतका प्रभावित झाला, की त्याने हट्टाने तशी पगडी तूर यांच्याकडून बांधून घेतली. नंतर मोकळ्या वेळात त्या पगडीसह सोबर्स कमांडंट हबीब उल्लाह यांच्यासमोर गेला आणि ‘कॅडेट सोबर्स सिंग हिअर' असं म्हणत त्याने सॅल्युट ठोकला. क्षणभर कमांडंट हबीब गडबडले आणि नंतर त्यांच्यासह सर्वच जण जोरजोरात हसू लागले.

पुढे १९६७ मध्ये भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडला जाणार होता. त्यावेळी या संघातील खेळाडूंचा फिटनेस वाढवणं आणि चांगल्या वातावरणात त्यांना सराव करायला मिळणं यासाठी एनडीएच्या क्रिकेट मैदानावर शिबिर घेण्यात आलं होतं. मन्सूर अली खान पतौडीच्या नेतृत्वाखालील त्या संघात चंदू बोर्डे, फारुख इंजिनियर, जयसिंहा असे त्या वेळचे नामवंत खेळाडू होते. “आम्हा छात्रांना त्यावेळी फिल्डिंगसाठी नेमण्यात आलं होतं; पण एकदा चंदू बोर्डे यांना गोलंदाजी करण्याची संधीही मला मिळाली,” असं आपटे यांनी सांगितलं. एनडीएबाहेरील अन्य कुणाला इथल्या मैदानावर अशी तयारीची संधी देण्यात आल्याची ती पहिली आणि शेवटची वेळ होती.

पासिंग आऊट परेडपूर्वीचा आठवडा हा छात्रांच्या जीवनातील सर्वांत संस्मरणीय असतो. तीन वर्षांचं जीवघेणं प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण झालेलं असतं, देशातील एका अत्युच्च अधिकाऱ्याला सलामी देत अकादमीतून पाऊल बाहेर टाकायचं असतं आणि सेनादलात रुजू होण्याच्या नव्या टप्प्याकडे वाटचाल सुरू करायची असते. या दिवसातला त्यांचा भरभरून वाहणारा उत्साह आणि त्याच्या आविष्काराची विविध रूपं मला अनेकदा पाहायला मिळाली आहेत. प्रशिक्षणाच्या कालावधीतील सर्वात कष्टमय असा ‘जोश रन' हा सराव नुकताच पूर्ण केलेला असतो आणि मग मुक्तपणे तरुणाईला साजेसं सेलिब्रेशन करण्याची वेळ आलेली असते. एनडीएमधील सर्वात मोठा झगमगाटी कार्यक्रम ‘बॉल'चा असतो. तीन वर्षं असंख्य बंधनात वावरणारे तरुण त्या रात्री मुक्तपणे हसत, खेळत, नाचत, गात असतात. तो कार्यक्रम बॉल हॉलमध्ये होतो. कमांडंट आणि त्यांची पत्नी हे पहिलं दांपत्य बॉल डान्सची सुरुवात करतात. पाठोपाठ इतर अधिकाऱ्यांच्या जोड्या त्यात उतरतात. ज्या छात्रांनी कॅम्पसमध्ये राहणाऱ्या परिवारातील किंवा रविवारच्या सुट्टीत पुण्याला जाऊन मैत्रीण मिळवली असेल त्यांना अशा मैत्रिणीला डान्स पार्टनर म्हणून निमंत्रित करण्याची मुभा असते. बॉलची सांगता ‘मिस्टर अँड मिस एनडीए' निवडीच्या घोषणेने होते. त्या दोघांना अक्षरशः डोक्यावर घेतलं जातं. अर्थात हा संपूर्ण कार्यक्रम लष्करी शिस्त आणि शिष्टाचाराच्या चौकटीत चालतो आणि ठरलेल्या वेळेत संपतो. तिथे कुठेही गोंगाट, कर्कश्शपणा किंवा असभ्यपणा याला वाव नसतो.

पासिंग आऊट परेडला तिसऱ्या वर्षातील छात्रांच्या आई-वडिलांना आवर्जून निमंत्रित केलेलं असतं. देशाच्या लांबवरच्या भागातील अल्पशिक्षित दांपत्यांपासून लष्करात उच्चपदी सेवा करून निवृत्त झालेल्यांपर्यंत सर्व माता-पित्यांची राहण्याची व्यवस्था एकसारखी केलेली असते. परेडच्या वेळी त्यांच्यासाठी शामियान्यात वेगळी आसनं ठेवण्यात आलेली असतात. ज्यांनी आपला पुत्र देशसेवेसाठी अक्षरशः अर्पण केलेला असतो त्या मातापित्यांचा हा उचित सन्मान असतो. पासिंग आऊट परेड संपली, की प्रत्येक छात्राची आई-वडिलांबरोबर छायाचित्रं काढण्यासाठी अहमहमिका लागते. प्रत्येक माता-पित्याच्या चेहऱ्यावरील कृतार्थतेची भावना त्यावेळी आपोआप व्यक्त होते. पासिंग आऊट परेड संपली की छात्रांच्या उत्साहाच्या ऊर्जेला उधाण येतं. गोलाकार उभे राहून डोक्याला डोकं लावत केलेलं ‘हडल', एकेकाला उंच फेकून झेलण्याचा आनंद, एकेका स्क्वाड्रनने चतुरंग दंडासन करत मैदानावर मांडलेली अद्भुत रचना या गोष्टी केवळ अनुभवानेच कळण्याजोग्या असतात.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने २०२२पासून मुलींनाही एनडीएची वाट खुली झाली. मुलांबरोबरच कठीण प्रवेश परीक्षा देऊन निवड झालेल्यांमध्ये हरियाणाची शानन धाका ही पहिली महिला छात्रा ठरली. अकादमीतील एका अधिकाऱ्याने मला सांगितलं, की निवड झालेल्या या मुली क्षमता, जिद्द, उत्साह यात मुलांपेक्षा थोड्याही कमी नसतात. मुलांसाठी असलेले सर्व नियम त्यांनाही लागू असतात. त्यात कोणी कमी पडत नाही किंवा सवलत मागत नाही. फक्त केशरचनेबाबत प्रारंभी विशिष्ट बंधन घातलेलं नव्हतं, पण या मुलींनी मुलांप्रमाणेच ‘क्रू कट' करून घेऊन प्रशिक्षणाला सुरुवात केली. २०२३च्या पासिंग आऊट परेडमध्ये मानवंदना स्वीकारताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या बदलाचा ‘ऐतिहासिक क्षण' म्हणून केलेला उल्लेख उचितच होता.

एनडीएने अमृतमहोत्सवी वर्ष अनेक आगळ्यावेगळ्या उपक्रमांनी साजरं केलं. १९जानेवारी २०२३ पासून १६ जानेवारी २०२४ पर्यंतच्या कालखंडात नेतृत्वगुणांवर परिसंवाद, देशाच्या विविध भागात गिर्यारोहण, अतिदुर्गम भागांत मोहिमा, रिघाटा स्पर्धा, रिव्हर राफ्टिंग, क्रॉस कंट्री, लढाऊ विमानातून उड्डाणं, कार रॅली, अनेक प्रकारच्या क्रीडा स्पर्धा, सायकल शर्यती आणि मॅरेथॉन यांचा त्यात समावेश होता. अमृतमहोत्सवी वर्षाचा खास लोगो यावेळी प्रकाशित करण्यात आला.

१९७६ पासून २००२पर्यंत अनेक पासिंग आऊट परेडना उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली. प्रत्येक परेडची काही वैशिष्ट्यं होती आणि प्रत्येकीशी निगडित काही आठवणीही. कर्नल विनायक तांबेकर दक्षिण विभागाचे जनसंपर्क अधिकारी म्हणून नियुक्त झाल्यावर त्यांनी आम्हा पत्रकारांच्या दृष्टीने काही स्वागतार्ह प्रथा सुरू केल्या. कमांडंटची भेट, परेडनंतर पदकविजेत्या छात्रांशी आणि त्यांच्या आई-वडिलांशी गप्पागोष्टी, इतकंच नाही, तर मानवंदना स्वीकारणाऱ्या बड्या पाहुण्यांची पत्रकार परिषद त्यांच्या प्रयत्नांमुळे होऊ लागली. १९८३ मध्ये ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ या परेडला विशेष अतिथी म्हणून आल्या होत्या. एनडीएच्या परेडमध्ये बाहेरच्या देशातील प्रमुखाला आमंत्रित करण्याचा तो बहुधा एकमेव प्रसंग होता. अर्थात मानवंदना स्वीकारण्याचा मान तेव्हाचे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल दिलबाग सिंग यांना देण्यात आला होता. पण राणी एलिझाबेथ यांना संपूर्ण कार्यक्रमात मोठा सन्मान देण्यात आला होता. दुसऱ्या महायुद्धात व्हिक्टोरिया क्रॉस हे ब्रिटिश आर्मीचं सर्वोच्च शौर्य पदक मिळविलेल्या एका ज्येष्ठ सैनिकाचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

एनडीए हे पुण्याचंच नाही, तर भारताचं वैभव आहे. ७५ वर्षांत एनडीएने ३८ हजार कॅडेट प्रशिक्षित केले. त्यातील सुमारे एक हजार ३२ मित्र राष्ट्रांतील आहेत. गुरू बचनसिंग सलेरिया (१९६१ मध्ये शांतिसेनेतर्फे काँगोत लढताना), अरूण खेत्रपाल (१९७१ पाकिस्तान युद्ध) आणि मनोजकुमार पांडे (१९९९ कारगील युद्ध) या माजी छात्रांनी अतुलनीय पराक्रम गाजवून प्राणांची आहुती दिली आणि मरणोत्तर परमवीर चक्र मिळवलं. भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा एनडीएच्याच परंपरेतून आले होते. राज्यवर्धन सिंग राठोड यांनी २००४ या वर्षी अथेन्स ऑलिम्पिक्समध्ये नेमबाजीत रौप्य पदक जिंकलं. काही थोड्यांनी लष्करी सेवेनंतर राजकीय क्षेत्रात नाव कमावलं. अमरिंदर सिंग पंजाबचे मुख्यमंत्री झाले. जनरल जे. जे. सिंग अरूणाचल प्रदेशचे राज्यपाल बनले. जनरल व्ही. के. सिंग खासदार आणि केंद्रीय मंत्री झाले. सुरेश कलमाडी यांची राजकीय कारकीर्द एवढी प्रभावी झाली, की हवाई दलातील त्यांच्या कामगिरीचा कधी फारसा उल्लेखही झाला नाही. १९६०च्या तुकडीतील कलमाडींनी १९७१च्या बांग्लादेश युद्धात पूर्व सीमेवर एक अवघड मोहीम यशस्वीपणे पार पाडली. हवाई दलातील सेवेत उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांनी तब्बल आठ पदकं मिळवली. तिथून निवृत्त झाल्यावर ते राजकारणात उतरले.

प्रमुख पाहुण्यांशी झालेल्या संवादांमधील काही आठवणी आजही ताज्या आहेत. तेव्हाचे लष्कर प्रमुख जनरल विश्वनाथ शर्मा यांनी मानवंदना स्वीकारली त्याच दिवशी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मिर्झा अस्लम बेग यांचं भारताला धमकवणारं वक्तव्य परदेशी वृत्तपत्रात छापून आलं होतं. “या पुढचं युद्ध पाकिस्तानच्या नाही तर भारताच्या भूमीवर होईल” अशी दर्पोक्ती त्यांनी केली होती. जनरल शर्मांशी आमची भेट होताच ते वाक्य ऐकवून मी त्यांची प्रतिक्रिया विचारली. जनरल शर्मा ताडकन म्हणाले, “मोस्ट वेलकम, मागील तीन युद्धांत काय हालत झाली ते त्यांच्या लक्षात नसावं.” एका सेनानीची ती अत्यंत स्वाभाविक आणि उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती, पण आपण पत्रकारांशी बोलत आहोत याची जाणीव झाल्यामुळे ते लगेच पुढे म्हणाले “आम्हाला युद्ध नको आहे, पण कोणी आमच्यावर ते लादलंच तर आम्ही चोख उत्तर द्यायला तयार आहोत.” दुसऱ्या दिवशी देशभर त्यांच्या वक्तव्याला प्रसिद्धी मिळाली. पाकिस्तानी लष्कर प्रमुखाला भारताच्या लष्कर प्रमुखांनी अशाप्रकारे दुसऱ्याच दिवशी प्रत्युत्तर देण्याची ती बहुदा पहिलीच वेळ होती. एरवी आपले परराष्ट्र मंत्री किंवा संरक्षण मंत्री अशा धमक्यांचा समाचार घेत असतात. एका वर्षी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग मानवंदनेसाठी आले होते. राजशिष्टाचाराचा भाग म्हणून संरक्षण राज्यमंत्री अरुण सिंग त्यांच्याबरोबर उपस्थित होते. परेडनंतर पत्रकारांशी संवाद सुरू झाल्यावर आम्ही काही विचारण्याच्या आधी ग्यानीजींनीच उलट आम्हाला प्रश्न विचारायला सुरुवात केली. ‘बताओ आज की ताजा खबर क्या है?' इथपासून ‘तुमच्यापैकी किती जणांच्या परिवारात फौजी आहेत?' असले प्रश्न ते विचारत राहिले. शेवटी एका ज्येष्ठ पत्रकाराने त्यांना थांबवून उलटा प्रश्न केला, तेव्हा झैलसिंग म्हणाले, “आप को मालूम होगा राष्ट्रपती कभी प्रेस कॉन्फरन्स नहीं ॲड्रेस करते। वो काम रक्षा राज्यमंत्रीजी का है।” असं म्हणून त्यांनी आपल्यासमोरचा माईक अरुण सिंग यांच्यापुढे ठेवला. ते प्रारंभी गडबडले पण पूर्वाश्रमीचे फौजी आणि कसबी राजकारणी असल्यामुळे त्यांनी व्यवस्थित उत्तरं दिली. त्यावेळी झैलसिंग शांतपणे बसून ऐकत होते आणि काही वेळा मिश्कीलपणे हसत होते. सर्वांत संस्मरणीय प्रसंग होता तो, फिल्ड मार्शल सॅम माणेकशा प्रमुख पाहुणे असतानाचा. आमच्यातील प्रत्येकाशी त्यांनी हस्तांदोलन केलं. माझ्यासमोर आल्यावर ते मला म्हणाले, “यंग मॅन ऑफ युवर हाईट शूड बी इन द आर्मी. व्हॉट आर यु डुइंग विथ दीज गाईज?” त्यावेळी आपण एक लष्करी अधिकारी आहोत अशा कल्पनेनेच मला क्षणभर हात आकाशाला पोहोचल्यासारखा आनंद झाला होता. बहुतेक वेळा या मान्यवर पाहुण्यांची भाषणं औपचारिक स्वरूपाची असत. पण राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचं भाषण हे खऱ्या अर्थाने सेनादलांना भविष्यातील अज्ञात व्यूहतंत्रांची जाणीव करून देणारं होतं. ते बहुधा त्यांनी स्वतःच लिहिलं असावं. ‘मी हवाई दलात भरतीसाठी गेलो होतो, पण उंची कमी म्हणून मला नाकारण्यात आलं त्यामुळे मी विज्ञान क्षेत्राकडे वळलो,' अशी सुरुवात करून त्यांनी ‘मॉडर्न वॉरफेअर' कशा प्रकारचं असू शकतं याचं विलक्षण प्रभावी विवेचन केलं.

एनडीएच्या अनेक कमांडंटना भेटण्याची आणि संवाद साधण्याची संधी मला मिळाली. पण १९८२ ते 1985 या तीन वर्षात कमांडंट असलेले रिअर ॲडमिरल रवी प्रकाश सहानी यांच्याशी तर माझी व्यक्तिगत मैत्री जमली. परेड आणि अन्य कार्यक्रमांखेरीज एरवीही मी त्यांना एनडीएत भेटलो. एकदा त्यांनी मला घरी चहापानाला बोलावलं तेव्हा कमांडंटचा बंगला ही काय चीज असते हे पाहायला मिळालं. माझ्या विनंतीवरून एक अधिकारी बरोबर देऊन त्यांनी हबीब उल्लाह बिल्डिंग, व्यास ग्रंथालय, हट ऑफ रिमेंबरन्स, कॅडेट्स मेस आणि बॉल डान्स हॉल दाखवायची व्यवस्था केली. त्यांचा कार्यकाळ पूर्ण होताना; पुणे सोडण्यापूर्वी त्यांनी निरोपाचं छान पत्र पाठवून माझे आभार मानले. वास्तविक त्यांनी मला असं पत्र लिहावं एवढी वयाने, श्रेणीने किंवा अनुभवाने माझी कोणतीच पात्रता नव्हती. औपचारिकता म्हणूनही आभार मानावेत असं मी त्यांच्यासाठी काही केलेलं नव्हतं. उलट अन्य कोणाही पत्रकाराला पाहायला न मिळणारं एनडीएचं अंतरंग मला दाखवून त्यांनीच मला उपकृत केलं होतं. ते पत्र मी काही निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांना दाखवलं तेव्हा ते म्हणाले, की ‘आर्मीतील एवढ्या उच्चपदस्थाने असं पत्र पाठवणं हे दुर्मिळ आहे.' आजही एखाद्या सन्मानपत्राप्रमाणे मी ॲडमिरल सहानींचं ते पत्र जतन करून ठेवलं आहे.

एनडीएशी आता तसा संपर्क राहिला नसला, तरी त्या परिसरातून जाताना आणि टीव्हीवर पासिंग आऊट परेड पाहताना त्या जुन्या सुखद आठवणी मन:पटलावर पुन्हा तरळू लागतात. आज ७५ वर्षांची झाली तरी ही राष्ट्रीय संरक्षण अकादमी सळसळत्या तारुण्याची आणि देशसेवेसाठी प्रेरित होऊन एक प्रचंड सामूहिक ऊर्जा उभी करणाऱ्या छात्रवर्गाची माता म्हणून दिमाखात उभी आहे. पुण्याच्या आधुनिक इतिहासातील तो एक सर्वोच्च मानदंड आहे. सुदान ब्लॉकवरील ‘सेवा परमो धर्म:' हे त्याचं ब्रीदवाक्य, तर ‘जितना रगडा, उतना तगडा' हे प्रत्येक छात्राचं स्फुरण वाक्य आहे. एनडीए हे शब्द कानावर पडले की ही दोन्ही वाक्यं त्या उज्ज्वल परंपरेचा जयघोष करत असल्याचा भास होतो.

(पुण्यभूषण, दिवाळी २०२४च्या अंकातून साभार.)

राजीव साबडे







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results