भारतीय हवाईदलातील मिग-२१ विमानांच्या सतत होणाऱ्या अपघातांमुळे अलीकडे त्याची ‘उडती शवपेटी’ (फ्लाइंग कॉफिन) म्हणून संभावना केली जात असली तरी या विमानाने एक काळ गाजवला आहे. मिकोयान आणि गुरेविच (MiG) या डिझायनर्सची उत्तम निर्मिती असेलेलं हे लढाऊ विमान सोव्हिएत युनियनच्या हवाईदलात १९५९ साली सामील झालं. तेव्हापासून १९८०च्या दशकापर्यंत भारतासह साधारण ६० देशांच्या हवाईदलांची मुख्य भिस्त या विमानावर राहिली आहे. या काळात १० हजारांहून अधिक मिग-२१ विमानांनी जगभर सेवा बजावली असून शत्रूच्या उरात धडकी भरवली आहे. अरब-इस्रायल युद्धं आणि व्हिएतनाम युद्धात मिग-२१ चा प्रताप जगाने पाहिला आहे. आधुनिक काळात त्यांचं महत्त्व थोडं कमी झालं असलं तरी भारतासह इतरही काही देशांच्या हवाईदलात मिग-२१ अद्याप कार्यरत आहेत.
भारतीय हवाईदलातील लढाऊ वैमानिकांच्या दोन ते तीन पिढ्या या विमानावर घडल्या आहेत. भारत-पाकिस्तान यांच्यात १९७१ साली बांगलादेश मुक्तीसाठी झालेल्या युद्धात या विमानांनी महत्त्वाची कामगिरी केली होती. ढाक्यातील गव्हर्नर हाऊसमध्ये पाकिस्तानी उच्चाधिकाऱ्यांची बैठक सुरू असताना मिग-२१ विमानांतून तिथे रॉकेट्सचा मारा केला होता. त्यामुळे पाकिस्तानच्या शरणागतीच्या प्रक्रियेला वेग मिळाला होता.
सोव्हिएत युनियनचं मिग-२१ आणि अमेरिकेचं एफ-४ फँटम ही समकालीन आणि प्रतिस्पर्धी विमानं. कोरियन युद्ध (१९५० ते ५३) संपल्यानंतरच्या काळात जगात या दोन विमानांचा दबदबा होता. मिग-२१ च्या रचनेमागची भूमिका अमेरिकेच्या अगदी विरोधातली आहे. अमेरिकी एफ-४ फँटम या विमानात तंत्रज्ञानावर खूप भर होता. इतका की, त्यावरील क्षेपणास्त्रांमुळे शत्रूची विमानं त्याच्या आसपास फिरकू शकणार नाहीत असं गृहीत धरून त्यावर जवळच्या लढाईसाठी (एरियल डॉगफाइट्स) मशिनगन किंवा कॅनन बसवल्या नव्हत्या. त्याऐवजी साईडवाईंडर आणि स्पॅरो ही क्षेपणास्त्रं होती. पण व्हिएतनाम युद्धात मिग-२१ नी अमेरिकेची ही मस्ती उतरवली आणि सुधारित फँटमवर कॅनन बसवावी लागली.
याउलट मिग-२१ ची रचना साधी, सोपी, सुटसुटीत पण प्रभावी आणि मोठ्या प्रमाणात किफायतशीर उत्पादनास योग्य अशी होती. मिग-२१ चे ७५०० किलो थ्रस्ट उत्पन्न करणारे तुमान्स्की टर्बोजेट इंजिन त्याला ध्वनीच्या वेगाच्या दुप्पट (ताशी २२३० किमी) वेग प्रदान करत असे. सिगारच्या आकाराचे फ्यूजलेज, त्रिकोणी आकाराचे पंख (डेल्टा विंग्ज) आणि त्यासह स्टॅबिलायझर (मागील बाजूचे लहान पंख) ही रचनेतील वैशिष्ट्यं त्याच्या वायुगतिकीय कामगिरीत भर टाकत होती. एका मिनिटाला १७,६८० मीटरच्या वेगाने ते अधिकतम १८,००० मीटर (५९,०५० फूट) उंची गाठत असे. त्यावर दोन कॅनन, १५०० किलो बॉम्ब, रॉकेट्स आणि हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रं अशी माफक पण प्रभावी शस्त्रं होती.
मिग-२१ ची मुख्य उणीव म्हणजे त्याचा मर्यादित पल्ला (११६० किमी) आणि हवेत राहण्याची कमी क्षमता (एन्ड्युरन्स). मिग-२१ केवळ ३० ते ४५ मिनिटंच हवेत राहू शकत असे. त्यामुळे मिग-२१चे तळ बहुतांशी सीमेजवळ असत. मात्र, नंतर त्यावर इंधनाच्या अधिक टाक्या (ड्रॉप टँक्स) बसवण्याची सोय करून ही त्रुटी भरून काढण्यात आली.
त्याच्या ‘हँडलिंग कॅरॅक्टरिस्टिक्स’ उत्तम होत्या. पण चूक झाल्यास क्षमा नाही, असं मिग-२१ बद्दल भारतीय हवाईदलातील निवृत्त वरिष्ठ अधिकारी म्हणाले होते.
मिग-२१ आणि अन्य विमान अपघातांत प्राण गमावलेल्या वैमानिकांचा पूर्ण आदरच आहे. त्यांतील अनेकांनी सामान्य नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी पॅराशूटमधून बाहेर उडी मारून स्वतः बचावण्याचा पर्याय नाकारला आणि मृत्यूला कवटाळलं.
मिग-२१ विमानांच्या अपघातांना अनेक कारणं होती. भारतीय हवाईदलात ते १९६०च्या दशकात सामील झालं. कोणत्याही लढाऊ विमानाचा कार्यकाळ २५ ते ३० वर्षं असतो. यातील निम्मा काळ झाल्यानंतर त्याची पूर्ण डागडुजी (mid-service overhauling) करावी लागते. तर हा २५ ते ३० वर्षांचा सेवाकाळ पूर्ण वापरात आणता येतो. सध्या आपल्याकडील सुखोई-३० एमकेआय विमानांच्या बाबतीत हा टप्पा आला आहे. मिग-२१च्या सेवाकाळातही त्याची डागडुजी, देखभाल, दुरुस्ती आणि सुधारणा करण्यात आली. तरीही २५ ते ३० वर्षांनंतर ही विमानं सेवेतून बाहेर काढणं गरजेचं होतं. विविध कारणांमुळे आजवर ते होऊ शकलं नाही आणि ठरल्यापेक्षा जवळपास दुप्पट वर्षं ही विमानं सेवेत राहिली.
मिग-२१ विमानांपूर्वी किंवा त्यांच्याबरोबर हवाईदलात जी विमानं होती – कॅनबेरा, मिस्टियर, व्हँपायर, नॅट आदी – त्यांच्या तुलनेत मिग-२१ चा वेग बराच जास्त होता. ते एक सुपरसॉनिक (ध्वनीच्या वेगापेक्षा जात वेगानं उडणारं) विमान आहे. हवाईदलातील नवीन वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी सुरुवातीला पोलंडकडून घेतलेली इस्क्रा आणि अन्य विमानं वापरली जात असत. ही विमानं निवृत्त झाल्यानंतर काही काळ हवाईदलात योग्य प्रशिक्षण विमानं नव्हती. तसेच पुरेशा संख्येने फ्लाइट-सिम्युलेटर्स नव्हते. सामान्य आणि सुपरसॉनिक विमानाच्या प्रशिक्षणातील दरी भरून काढण्यासाठी आवश्यक असलेली अॅडव्हान्स्ड जेट ट्रेनर्स (एजेटी) विमानं उपलब्ध नव्हती. बराच कालापव्यय झाल्यानंतर ब्रिटनकडून एजेटी हॉक ही आधुनिक प्रशिक्षण विमानं घेण्यात आली. त्यामुळे दरम्यानच्या काळात वैमानिकांच्या प्रशिक्षणात कसूर होत गेली. शिवाय सोव्हिएत युनियनचं १९९१ साली विघटन झालं. त्यानंतर सुटे भाग मिळणं अवघड झालं. रशिया आणि अन्य ठिकाणांहून घेतलेले सुटे भाग आवश्यक तेवढ्या दर्जाचे नव्हते. अशी अनेक कारणं मिग-२१च्या अपघातांना जबाबदार होती.
पण सर्वांत महत्त्वाचं कारण, जे आजही अबाधित आहे, ते म्हणजे स्वदेशी विमान तयार करण्यात आलेलं अपयश. भारतीय हवाईदलात १९६० च्या दशकात सामील झालेली मिग-२१ विमानं १९८० ते ९० च्या दशकांत निवृत्त होणं अपेक्षित होतं. त्यांना बदली म्हणून स्वदेशी हलक्या वजनाचं लढाऊ विमान (लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट – एलसीए) तयार करण्याचा प्रकल्प १९८३ साली हाती घेण्यात आला. त्यावर बसवण्यासाठी कावेरी नावाचं स्वदेशी इंजिन विकसित करण्याचा प्रकल्पही सुरू झाला होता. कावेरी इंजिन अपेक्षित क्षमतेचं बनू शकलं नाही आणि तो प्रकल्प बारगळला. मग नेहमीप्रमाणे परदेशातून इंजिन मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले. ते आजतागायत सुरूच आहेत. दरम्यान, परदेशी इंजिनांच्या मदतीने एलसीएची काही प्रारूपं (प्रोटोटाइप्स) तयार करण्यात आली. त्याचं तेजस असं नामकरण झालं. त्यांची देश-विदेशांत काही यशस्वी उड्डाणं झाली. देशातील तसेच विदेशातील अनेक जणांनी या विमानाचं कौतुकही केलं. पण या विमानासाठी स्वदेशी इंजिन काही आपण तयार करू शकलो नाही. पुन्हा अमेरिकेच्या जीई या कंपनीकडून इंजिन घेण्याचा करार झाला. पण अमेरिकेने विविध कारणं देत या इंजिनांचा पुरवठा अद्याप नीटपणे सुरू केलेला नाही.
मिग-२१ विमानांना बदली म्हणून वापरण्यासाठीचं स्वदेशी विमान आपण गेली ४० वर्षं तरी बनवू शकलेलो नाही. या काळात भारताने नाईलाजाने ब्रिटिश आणि फ्रेंच बनावटीची जग्वार, फ्रान्सची मिराज-२०००, रशियाकडून मिग श्रेणीतील मिग-२३, मिग-२५, मिग-२७, मिग-२९ ही विमानं, तसेच रशियाकडूनच सुखोई-३० एमकेआय आणि आता पुन्हा फ्रान्सकडून राफेल ही लढाऊ विमानं विकत घेतली. ही विमानंदेखील आता अपुरी पडत आहेत. हवाईदलाने वारंवार त्याबद्दल नाराजी आणि काळजी व्यक्त केली आहे. तरीही अद्याप स्वदेशी तेजस विमानांचं उत्पादन अपेक्षेप्रमाणे सुरू झालेलं नाही.
या काळात तंत्रज्ञान आणि युद्धशास्त्रात बरेच बदल झाले आहेत. तेजस हवाईदलाला मिळेल तेव्हा त्याचंही तंत्रज्ञान जुनं झालेलं असेल. शिवाय इंजिन परदेशी असल्याने युद्धकाळात पुरवठा बंद होण्याची सतत धास्ती राहील. नुकत्यात झालेल्या ऑपरेशन सिंदूरने स्वदेशी आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची गरज ठळकपणे अधोरेखित केली आहे. आता चीनसारखे शत्रूदेश पाचव्या किंवा सहाव्या पिढीतील स्टेल्थ (रडारवर न दिसणारी) विमानं बनवत आहेत. त्यासाठीही भारताचे प्रयत्न सुरू आहेत. पण जोवर विमानाचं स्वदेशी इंजिन बनवलं जात नाही तोवर हे प्रयत्न अर्धवट राहणार आहेत.
अर्मेनिया-अझरबैजान, युक्रेन-रशिया, हमास-इराण-इस्रायल ही युद्धं आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये ड्रोन्सची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे दिसून आलं. आता लढाऊ विमानांची बरीचशी कामं ड्रोन्स करू लागले आहेत. त्यामुळे लढाऊ विमानं आणि वैमानिक यांची ही कदाचित शेवटची पिढी असेल, अशी चर्चा सुरू आहे. तरीही देशाच्या हवाईदलाला स्वदेशी लढाऊ विमान मिळू न शकणं ही लाजिरवाणी बाब आहे.
(सचिन दिवाण हे कोल्हापूरस्थित मुक्तपत्रकार असून संरक्षण आणि युद्धशास्त्र हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.)
