३० सप्टेंबर १९९३ला मराठवाड्यात भूकंप झाला, तेव्हा मेघना आणि ब्रह्मनाथला राहत होतो. तिथे कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी शाळा, कष्टकरी महिला आणि पुरुषांसाठीही रोजगार हमी योजना राबवणं अशी कामं सुरू होती. पण भूकंप झाला त्यादिवशी सकाळीच मृत्यूचा आकडा ५००पर्यंत पोहोचल्याचं आम्ही रेडिओवर ऐकलं. दीड तासात एवढा आकडा खात्रीशीर रीत्या सांगितला जातो, त्याअर्थी भूकंपबळींची संख्या त्याहून कितीतरी जास्त असणार हे लक्षात आलं. त्यामुळे आम्ही तातडीने किल्लारी येथे जाण्याचा निर्णय घेतला आणि मोटरसायकलवरून रात्रीपर्यंत तिथे पोहोचलोही.
पुढचे कित्येक दिवस मी गावागावांमध्ये, तर मेघना भूकंपग्रस्तांना मदक करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या समन्वय कार्यालयात काम करत होतो. मदतकार्याचा पहिला टप्पा आटोपल्यावरही भूकंपग्रस्त गावांमध्ये जनजीवन सुरळीत होण्यासाठी प्रचंड काम करावं लागणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. स्वयंसेवी संस्थांनी आपापलं कार्यक्षेत्र निवडून कामाला सुरुवात करावी, असा निर्णय ‘भूकंप पुनर्वसन स्वयंसेवी संस्था समन्वय समिती’ने घेतला होता. माझ्या आणि मेघनाच्याही डोक्यात तेच चक्र फिरत होतं. आम्ही ब्रह्मनाथचं काम सोडून इकडे आलो होतो हे खरं, पण या गावांची परिस्थिती पाहता इथल्याच एखाद्या गावात मुक्काम ठोकून काम सुरू करण्याची गरज जाणवत होती. मी विविध कामांसाठी भूकंपग्रस्त भागात सतत फिरत होतो. ज्या गावापर्यंत फारशी मदत पोहोचली नाही अशी ‘ए’ आणि ‘बी’ कॅटेगरीतली गावं मला माहिती होती. त्यापैकी माळुंब्रा, हसलगन, जवळगा पोमादेवी, संक्राळ, हिप्परगा (कवळी), लोहटा ही गावं अधिक गरजू असल्याचं मला जाणवलं होतं. या गावांमध्ये मीडियाचे प्रतिनिधी, बाहेरचे व्हिजिटर्स व साहित्यवाटप करायला आलेली मंडळी क्वचितच यायची. याच भागात मी व मेघना भूकंप पुनर्वसनाचं काम कायमस्वरूपी करणार हे एव्हाना निश्चित झालं होतं.
या प्रत्येक गावात मी आधीच ब्रह्मनाथमधले आणि आमच्या संस्थेचे स्वयंसेवक मदतीसाठी पाठवले होते. हसलगण, जवळगा पोमादेवी, संक्राळ इथे आमचे कॅम्प होते. माळुंब्रा, हिप्परगा (कवळी), लोहटा, माळकोंडजी इथे नव्याने कॅम्प उभारावे लागले. मेघना अजून लातूरमध्ये होती. स्वयंसेवी संस्था समन्वयाच्या ऑफिसमध्ये इंग्रजी समजणारी, इंग्रजी लिहिता-वाचता येणारी, टायपिंग करू शकेल आणि स्वयंसेवी वृत्तीने काम करेल अशा व्यक्तीची गरज होती. मेघनाने ती जबाबदारी घेतली होती. म्हणून तिला पारिजात हॉटेलमधील समन्वय समितीच्या ऑफिसमध्येच राहावं लागत असे. आमची दोन-तीन दिवसांतून केव्हा तरी भेट व्हायची.
मी कायम कार्यक्षेत्रात असायचो. स्वतंत्र कार्यक्षेत्राचं काम सुरू होण्याआधीपासून आमची ब्रह्मनाथची कार्यकर्ती संध्या कार्यक्षेत्रात नोंदी घेणं, त्याचं दस्तवेजीकरण करणं यासाठी माझ्या मदतीला होती. कुठल्या तरी गावातील लोकांचा घोळका हेच आमचं घर असायचं. आमच्या मेटॅडोरमध्ये दोन-चार सतरंज्या, ताडपत्री, पांघरायला सोलापुरी चादरी असं सर्व साहित्य असायचं. ज्या गावात रात्री एक-दीड वाजायचा, तिथेच आम्ही झोपायचो. संध्या मेटॅडोरमध्ये किंवा एखाद्या महिलेसोबत त्यांच्या झोपडीत झोपायची. मी ताडपत्रीवर सतरंजी टाकून झोपायचो. अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे जमीन ओली असायची, तेव्हा एवढं अंथरूण गरजेचं होतं. बऱ्याच वेळा पक्क्या सडकेच्या उतारावर झोपायचो. तुलनात्मकदृष्ट्या ही जागा अधिक कोरडी असायची. निवडलेल्या कार्यक्षेत्रातील सगळ्या गावांत आम्ही लोकांसोबत राहत होतो. आमचं सेंटर सुरू झाल्यावरही लोकांसोबत गप्पा मारत त्यांच्यासोबतच कुठे तरी झोपणं आम्ही पसंत केलं, याचा आम्हाला पुढे प्रचंड फायदा झाला.
आमच्या संस्थेसाठी गावं शोधायची म्हणून मी एकदा हसलगणवरून बेलकुंडच्या रस्त्याने येत होतो. देवताळ्याच्या पुढे तीन किलोमीटरच्या अंतरावर एक युवक सडकेच्या बाजूला मेढी (दांड्या) रोवताना दिसला. मी त्याची विचारपूस करण्यासाठी थांबलो. तो म्हणाला, “गावातले लोक आमच्या समाजाला राहायला योग्य जागा देत नाहीत आणि ते लोक स्वतः गावात येणाऱ्या रोडच्या बाजूला चांगल्या जागेवर बसले आहेत. तेव्हा विचार केला, आपण इथल्या माळावर सडकेच्या कडेला राहावं, म्हणजे येणाऱ्या-जाणाऱ्यांचं आमच्याकडे लक्ष जाईल.” मी त्याला थांबवलं. ‘संध्याकाळी तुमच्या गावात येतो, मीटिंग घेऊ,’ असं म्हटलं.
ठरल्याप्रमाणे मी संध्याकाळी हिप्परगा (कवळी) गावात गेलो. गावातील बहुसंख्य कुटुंबं गावाबाहेर राहत होती. काही लोक वेशीपाशी राहत होते. पडलेल्या गावाच्या दुसऱ्या टोकाला मागास वस्ती होती. मी मागासवर्गीय वस्तीतील लोकांसोबत बसलो. त्यांना समजावलं, “तुम्ही एक व्हा. आपल्यालाही योग्य जागा मिळाली पाहिजे. तुम्ही गावाच्या पक्क्या सडकेच्या दुसऱ्या बाजूला शेतात झोपड्या टाका.” संबंधित शेतकऱ्याची भेट घेऊन त्याच्या शेतात जागा देण्यासंबंधात बोललो. तो तयार झाला. दुसऱ्या दिवशी मागासवर्गीय लोक ठरल्याप्रमाणे मेढी ठोकायला त्या शेतात गेले, तेव्हा त्यांना तिथून हाकलून लावलं गेलं. मी पुन्हा गावकऱ्यांबरोबर बोललो. ‘उपलब्ध जागेवर गावातले लोक बसणार आहेत, थोडी पुढच्या बाजूला त्यांना जागा दाखवली आहे’ असं त्यांनी सांगितलं. मागासवर्गीयांना दाखवलेलं ते शेत काळ्या मातीचं होतं. त्यामुळे तिथे प्रचंड चिखल होता. तिथे राहणं अशक्य होतं.
शेवटी मागासवर्गीय लोक व काही माळी समाजाचे लोक यांनी एकत्र बसून निर्णय घेतला- माळी समाजापैकी काहीजणांची शेतं बेलकुंड-देवताळा टाररोडला लागून आहेत, देवताळा रोड गावापासून दीड किलोमीटरवर आहे, तेव्हा आपण तिथे राहू. माळी समाजाचे काही लोक सोबत राहायला तयार होते. शेतमालक जागा द्यायला तयार होता. मागासवर्गीय व माळी समाज, एक मराठा समाजाचं घर अशा लोकांचं सामान ट्रॅक्टरच्या मदतीने बेलकुंड मातोळा सडकेवर आणलं. आम्ही या लोकांना त्यांच्या तात्पुरत्या निवाऱ्यासाठी लाकूड, बांबू, तट्टे-पत्रे अशी सर्वतोपरी मदत केली. गावाने डावललेल्या समाजाला चांगल्या जागेवर सन्मानाने राहता येईल अशी व्यवस्था केली.
सडकेच्या दुसऱ्या बाजूला माळुंब्रा गावाच्या लोकांचे तात्पुरते निवारे होते. त्यामुळे माळुंब्रा पाटी आता हिप्परगा-माळुंब्रा पाटी झाली. वास्तविक हिप्परगा हे दोन-अडीच हजार लोकसंख्येचं गाव होतं. अशा गावातील एका समाजाच्या लोकांना गावापासून दुसरीकडे नेणं तसं धोक्याचं होतं. तरीही मानवतेच्या दृष्टीने विचार करता उपेक्षित समाजाला गाव राहायला चांगली जागा देणार नसेल तर त्यांनी अन्याय सहन करून त्या लोकांसोबत का राहावं, हा मुद्दा होता. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्या लोकांना न्याय देण्यासाठी कुठलाही धोका पत्करण्याची माझी तयारी होती आणि ती माझी जबाबदारीही होती. शेवटी मीही चळवळीतला कार्यकर्ता होतो. शिवाय मानवी हक्क अभियानाशी संबंधित होतो. मी या लोकांना न्याय देण्यात यशस्वी झालो. त्या लोकांनीही मला अतिशय चांगली वागणूक दिली. हिप्परगा (कवळी) या मुख्य गावातील लोकांनाही आम्ही तात्पुरता निवारा साहित्यवाटप केलं.
माळुंब्र्याच्या तात्पुरत्या आणि पुढे कायमस्वरूपी पुनर्वसित झालेल्या वसाहतीची अशीच रंजक कथा आहे. एकदा मी आणि संध्या मेटॅडोरमधून माळुंब्र्यातल्या आमच्या कॅम्पवर निघालो होतो. मुख्य सडक सोडून माळुंब्रा ॲप्रोच रोडला वळलो, तेवढ्यात एस.टी. आली. पाटीवर दहा-बारा लोक उतरले. आम्ही मेटॅडोर थांबवली. खाली उतरून लोकांसोबत बोलत जायचं ठरवलं. या गप्पांतून गावासंबंधात काही विशेष माहिती मिळते का बघावं हा उद्देश होता. संध्याने अंदाज घेऊन एका महिलेला गाठलं व थोडं मागे राहत तिच्याशी बोलायला सुरुवात केली. मीही एका गावकऱ्यासोबत बोलत चाललो होतो. आम्ही शेडवर पोहोचलो तेव्हा संध्याजवळ अत्यंत महत्त्वाची माहिती होती. गावातील ८० टक्के लोक माळुंब्रा पाटीवरच्या पोलिस पाटलाच्या शेतात राहायला तयार होते, पण त्यांच्यावर गावातल्या ३० घरांचा प्रचंड दबाव होता. आम्ही लोकांना जुन्या गावाबाहेर जाऊ देणार नाही, अशी या २० टक्के लोकांची भूमिका होती.
तात्पुरत्या पुनर्वसनासाठी लोकांनी पोलिस पाटलांचं सडकेजवळील शेत निवडलं होतं. पोलिस पाटीलही शेत द्यायला तयार होते. त्या शेतात जाऊन राहावं, हा लोकांचा व जमीनमालकाचा निर्णय होता. फक्त कृती करायला लोक घाबरत होते. कोंडी फुटणं महत्त्वाचं होतं. शेडवरचे कार्यकर्ते व आम्ही मिळून संध्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे प्लॅनिंग केलं. कार्यकर्त्यांमार्फत काही महत्त्वाच्या लोकांना निरोप पाठवला- लोकांनी न घाबरता सरळ पोलिस पाटलांच्या शेतात जाऊन राहावं, संस्था तुमच्याबरोबर तिथे कायमस्वरूपी राहील.
जेवण करून आम्ही रात्री उशिरा लातूरला समन्वय समितीचं कार्यालय ‘पारिजात’ इथे गेलो. संध्याचं मेघनाकडे काही तरी काम होतं. शिवाय दोन दिवस अंघोळ झालेली नव्हती. सकाळी रिपोर्ट द्यायचा होता. दुसऱ्या दिवशी लातूरची कामं संपवून संध्या व मी ब्रह्मनाथवरून आलेल्या नवीन कार्यकर्त्यांना घेऊन दुपारी माळुंब्र्याला पोहोचलो. ‘संस्थेचा कॅम्प उद्या पहाटे सडकेजवळच्या पोलिस पाटलांच्या शेतात जाणार’ एवढंच रात्री गावात पसरवायचं काम कार्यकर्त्यांनी केलं. पूर्वनियोजनानुसार लोकांना काय करायचं हे चांगलं माहीत होतं. विरोधकांचं लक्ष आमच्या कॅम्पकडे होतं.
दिवस उजाडला तरी संस्थेची शेड जिथल्या तिथे होती. तिकडे गावातील जवळपास ९० कुटुंबं गावाबाहेर पडली होती. आमचं प्लॅनिंग यशस्वी झालं होतं. आम्ही आमची शेड सकाळी काढायला सुरुवात केली. दहा वाजेपर्यंत आम्ही पाटलांच्या शेतात गेलो. लोकांनी त्यांच्या जवळच्या साहित्याने तात्पुरत्या शेड उभारल्या. गावातील मराठा समाजाची अर्धी घरं, संपूर्ण माळी समाज, जवळपास संपूर्ण मागासवर्गीय समाज, आणि गोसावी, परीट, कोळी यांची अनुक्रमे दोन, दोन व एक घर, इतकी घरं नव्या जागेत राहायला आली होती. ज्यांची शेतं खालच्या गावात गावाला लागून होती, तेवढीच मंडळी खालच्या गावात राहिली. कोणत्याही वादाविना हे प्रकरण निकालात निघालं असं आम्ही समजून होतो.
औसा तहसील बंद आंदोलन आणि जेल यात्रा
भूकंप होऊन साधारणतः सहा महिने होऊन गेले होते. तरीही भूकंपग्रस्त गावांमध्ये योग्य संख्येने तात्पुरते निवारे उभारले गेले नव्हते. योग्य पद्धतीने आरोग्यसेवा मिळत नव्हती. पाण्याची कमतरता जाणवत होती. या सर्व गोष्टींचा सर्वाधिक त्रास गावातल्या महिलांना होत होता. या अडचणींतून सुटका व्हावी, त्यांना या संदर्भात दाद मागता यावी यासाठी स्वयंसेवी संस्था समन्वयाने ‘भूकंपग्रस्त महिला संघर्ष समिती’ची स्थापना केली. भूकंपग्रस्त भागात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी आपापल्या कार्यक्षेत्रात भूकंपग्रस्त महिला संघर्ष समितीचं काम सुरू केलं. एका अर्थीने महिलांची संघटना बांधायला सुरुवात केली. सात-आठ स्वयंसेवी संस्थांच्या महिला आघाडीच्या प्रतिनिधी भूकंपग्रस्त महिला संघर्ष समितीच्या मार्गदर्शक म्हणून काम करत होत्या.
भूकंपग्रस्त महिलांना निवारा, आरोग्य आणि पाणी या समस्यांना तोंड द्यावं लागत असल्याने या मुद्द्यावर किल्लारी इथे महिला संघर्ष समितीचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात भूकंपग्रस्त भागांतील जवळपास पाच हजार महिला सहभागी झाल्या होत्या. त्यात आमच्या कार्यक्षेत्रातील जवळपास बाराशे ते तेराशे महिला सहभागी होत्या. संघटनेच्या मार्गदर्शकांची भाषणं झाली, ठराव पास झाले. त्यात मेघनाचंही भाषण होतं. महिलांच्या अडचणीसंदर्भात औसा आणि उमरगा तहसीलवर एकाच दिवशी सकाळी ११वाजता मोर्च्याने जाऊन ‘तहसील बंद’ आंदोलन करण्याचं व मागण्यांचं निवेदन तहसीलदारांच्या हातात द्यायचं निश्चित करण्यात आलं. मोर्च्याचा दिवसही ठरवण्यात आला.
भूकंपग्रस्त भागात काम करणाऱ्या पुरुष कार्यकर्त्यांनी या मोर्च्याच्या वेळी महिला समन्वयकांना मदत करायची होती. ठरलेल्या दिवशी आम्ही कार्यक्षेत्रामधल्या सहा गावांतून महिलांना घेऊन औसा मोडवर आलो. मानवी हक्क अभियानाच्या मनीषा तोकले व अशोक तांगडे त्यांच्या कार्यक्षेत्रातील महिलांसहित आले. अन्य दोन-तीन संस्थांच्या महिलाही आल्या. ठरल्याप्रमाणे आम्ही मोर्चा घेऊन तहसीलवर गेलो. तहसीलच्या गेटवर मोर्चा अडवला जाईल याची कल्पना होती. म्हणून मी व अशोक आधीच पुढे जाऊन पोलिसांशी बोललो. ‘तहसील कार्यालयाला लागून असलेल्या रिकाम्या जागेतील पाण्याच्या टाकीच्या सावलीत महिला थांबतील’ असं सांगितलं. त्याप्रमाणे महिलांना सावलीत थांबवलं. तहसीलदारसाहेबांनी आमच्यापर्यंत येऊन निवेदन घ्यावं, एवढीच मोर्च्यातल्या भूकंपग्रस्त महिलांची अपेक्षा होती. पण तहसीलदारांनी त्यांच्या कचेरीतील एक शिपाई पाठवला. त्याच्याजवळ निवेदन देऊन टाका असा निरोप दिला. पण साहेबांनी स्वतः निवेदन घ्यावं यासाठी आम्ही आग्रही होतो. तहसीलदारांकडून काहीच प्रतिसाद मिळत नाही हे बघून महिला चिडल्या. ‘ऐकत कसं नाही? चला, ते बाहेर येणार नसतील तर आपण त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन निवेदन देऊ’ असं म्हणत महिला तहसीलदारांच्या ऑफिसकडे पळत सुटल्या. पोलिसांच्या लक्षात येईपर्यंत महिलांनी तहसीलदाराच्या चेंबरसमोरचा व्हरांडा गाठला. पोलिस साखळी करून साहेबांच्या चेंबरसमोर उभे राहिले. साहेबांनी पोलिसांना दरवाजा लावून घ्यायला सांगितलं. तहसीलदार ओळखीचे होते. त्यांना समजावून सांगून निवेदन स्वीकारायला लावावं व प्रकरण संपवावं म्हणून मी पी.एस.आय.ला सांगून चेंबरमध्ये गेलो. माझ्या मागे मेघनाही आत आली.
आतमध्ये जाण्याआधी मी फोटो काढत होतो. तो कॅमेरा माझ्या हातात होता. तहसीलदारसाहेब कसे कोण जाणे, भयंकर भडकले, वाट्टेेल त्या शिव्या द्यायला लागले. माझा कॅमेरा काढून घेण्यासाठी त्यांनी तहसीलच्या शिपायांना हुकूम सोडला. दोन शिपाई माझ्याकडे येत आहेत हे पाहून मी कॅमेरा मेघनाकडे दिला. मेघना ओरडली, “बायकांच्या अंगाला हात लावायचा नाही!” चेंबरचा दरवाजा पोलिसांनी बंद केला. त्यानंतर तर महिला प्रचंड खवळल्या. महिलांनी दार ढकलायला सुरुवात केली. तेव्हा तिथे असलेल्या दोन पत्रकारांनी पोलिसांना दरवाजा उघडायला लावला. ते आत आले. त्यांनी तहसीलदारांना परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आणून दिलं. पत्रकारांनी मला विचारलं, “निवेदन घेतल्यावर महिला परत जातील का?” मी व मेघनाने पत्रकारांना तशी खात्री दिली. तहसीलदारांच्या हॉलमध्ये उभ्या राहू शकतील एवढ्याच महिला आत आल्या. महिलांनी रीतसर निवेदन दिलं. साहेबांनी निवेदन घेतलं आणि ते बाजूच्या रूममध्ये निघून गेले.
त्या महिला हॉलबाहेर आल्या. बाहेर चार-पाचशे महिला होत्या. महिलांनी घोषणा देऊन तहसील दणाणून टाकली. आम्ही महिलांना शांत केलं. नायब तहसीलदार बाहेर आले, ‘तुमचं निवेदन मिळालं, ते आम्ही तातडीने पुढे पाठवू’ असं त्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे ‘तुमच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी पाठपुरावा करू’ असं आश्वासनही दिलं. दोन-चार भाषणं झाली आणि महिला घोषणा देत आवाराबाहेर गेल्या. मी, मनीषा तोकले, अशोक तांगडे, मेघना आणि दोन-चार कार्यकर्ते पोच घेण्यासाठी तहसीलदारसाहेब बसलेल्या खोलीत गेलो. आम्हाला पाहून तहसीलदारसाहेब पुन्हा खवळले. ‘या लोकांनी माझं करियर संपवलं! मी या लोकांना सोडणार नाही,’ असं ते बोलत होते. ते घामाने डबडबले होते. नायब तहसीलदारांनी आम्हाला बाहेर आणलं. पोच देण्याची व्यवस्था केली. तिथून आम्ही सरळ लातूरला निघालो, कारण जिल्हाधिकाऱ्यांसोबत त्यांच्या कार्यालयामध्ये स्वयंसेवी संस्थांची बैठक होती. रस्त्यात थोडं थांबून पोटात घातलं.
जिल्हाधिकारी प्रवीणसिंह परदेशीसाहेब प्रशिक्षणासाठी परदेशात गेले होते. त्यांचा कार्यभार उपजिल्हाधिकारी गद्रेसाहेबांकडे होता. म्हणून आम्ही त्यांच्या केबिनकडे गेलो. आत वेगळाच प्रकार चालू होता. औशाचे तहसीलदारसाहेब डोळ्यांत पाणी आणून झाला प्रकार अतिरंजित करून सांगत होते. तहसीलदारांच्या न्यायदानाच्या टेबलावर आम्ही तीन-चार जण नाचलो, टेबलवरच्या फाइल्स फेकून दिल्या, आंदोलकांनी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला... काय वाट्टेल ते सांगत होते. आम्ही ते ऐकून थक्क झालो. गद्रेसाहेब चिडले. तहसीलदारसाहेबांना त्यांनी सांगितलं, “तातडीने कारवाई करा, मी तसं पत्र देतो.” आम्ही काही बोललो नाही. एवढ्यात अपेक्षित स्वयंसेवी मंडळी आली. मीटिंग व्यवस्थित झाली. तहसीलदारसाहेब काही घडलंच नाही अशा थाटात बैठकीत सहभागी झाले होते. आम्ही हे प्रकरण फारसं गांभीर्याने घेतलं नाही. खरं तर हे अत्यंत सनदशीर आंदोलन होतं. तहसीलदारांनी मात्र जमतील तेवढी कलमं आमच्यावर लावली. मला मुख्य आरोपी बनवलं. आमच्या दोन भूकंपग्रस्त महिला कार्यकर्त्या, मनीषा, अशोक व दुसऱ्या दोन संस्थांच्या एक-एक महिला कार्यकर्त्या अशा सातजणांवर खटला दाखल केला. कोणतंही हिंसक कृत्य झालेलं नसताना तहसीलदारांनी केवळ आपलं प्रमोशन गेल्याच्या गैरसमजातून हे सगळं केलं होतं.
आम्हाला अटक होणार हे उघड होतं. पण पोलिसांच्या हाती लागायचं नाही असं आम्ही ठरवलं. दहा दिवस आम्ही बाहेर होतो. आम्हीच पुन्हा विचार केला, कधी तरी हजर व्हावंच लागेल, तेव्हा पोलिसांच्या स्वाधीन होऊ आणि पुढची रणनीती ठरवू. संवेदनशील व कायदेशीर मार्गाने लढा चालूच राहील, अशी रणनीती आम्ही आमच्या सेंटरच्या माध्यमातून ठरवली. याची संपूर्ण जबाबदारी मेघनावर सोपवली आणि आम्ही पोलिसांना एक दिवस दिला. माळुंब्र्याच्या आमच्या शेडवर पोलिसांना यायला सांगितलं. ‘तिथे आम्ही पाचजण तुमच्या स्वाधीन होऊ’ असा निरोप दिला. उर्वरित दोन कार्यकर्त्या कुठल्या संस्थेच्या आहेत हे कोणालाच माहिती नव्हतं. नाव, पत्ते व संस्थेचं नाव त्यांनी चुकीचं सांगितलं होतं. त्यामुळे पोलिसांना त्या महिला मिळाल्या नाहीत.
एव्हाना प्रवीणसिंह परदेशी परदेशातून परत आले होते. ते आम्हाला अगदी नावानिशी चांगलं ओळखत होते. साहेब खूप नाराज होते. आमच्यामधल्याच काही संस्थाचालकांनी तहसीलदारांना खूष करण्यासाठी कलेक्टरसाहेबांच्या कानावर बरीच उलटसुलट माहिती घातली होती. या गोष्टी आम्हाला नंतर समजल्या. परदेशीसाहेबांनी माझी चांगलीच कानउघाडणी केली. साहेब म्हणाले, “तुम्हाला कळलं ते तुम्ही केलं, शासकीय पातळीवर शासकीय पद्धतीने ॲक्शन घेतली, विषय संपला. आता सर्वांनी आपापल्या कामाला लागा.” एकूण काय, तर आम्हाला कारवाईला सामोरं जाव लागणार होतं.
आता भूकंपग्रस्तांचे प्रश्न सोडवूनच लढाई थांबवू, असा निर्णय आम्ही घेतला. मेघनासह आम्ही फक्त सहाजण होतो. तरीही आम्ही लढायचं ठरवलं. पोलिसांच्या स्वाधीन व्हायचं पण जामीन घ्यायचा नाही, आम्ही तुरुंगात गेल्यावर मेघनाने धरणं आंदोलन चालू करायचं, ही रणनीती ठरवली. ठरल्याप्रमाणे आम्ही माळुंब्र्याच्या टेम्पररी शेडमधल्या आमच्या कार्यालयात एकत्र आलो. पोलिसांना निरोप दिलेला होताच. आम्हाला पोलिस पकडायला येत आहेत, ही गोष्ट माळुंब्रा व हिप्परगा वस्तीत वाऱ्यासारखी पसरली. पोलिसांची गाडी आली, तसं दोन-तीनशे महिला-पुरुष आमच्याभोवती जमले. त्यांनी शेडला घेराव घातला. पोलिस आमच्याशी बोलत होते. काही महिला पुढे आल्या आणि म्हणाल्या, “आधी आम्हा सर्वांना अटक करून न्या आणि मगच या पाचजणांना पकडा.” या महिला तहसीलच्या मोर्च्यात होत्या, त्यामुळे त्यांना वास्तव माहिती होतं. अचानक महिलांनी घेतलेल्या भूमिकेमुळे पोलिसांचा गैरसमज व्हायचा, म्हणून महिलांना मी समजावलं, “पोलिस हुकुमाचे ताबेदार आहेत. पोलिसांना त्यांचं काम करू द्या. पुढे काय करायचं, केव्हा करायचं ते ताई तुम्हाला सांगतील.” मी हात जोडल्याबरोबर महिला बाजूला झाल्या. आम्हाला औसा पोलिस स्टेशनला नेण्यात आलं. तासाभराने पोलिस इन्स्पेक्टर म्हणाले, “जामिनासाठी कुणाला तरी सांगा, तुम्हाला हजर करू तेव्हा जामीन होईल.” आम्ही स्पष्टपणे सांगितलं, “आम्हाला जामीन घ्यायचा नाही.”
उस्मानाबाद जेलमध्ये रवानगी
आमच्या अशा भूमिकेमुळे पोलिसांची पंचाईत झाली. हे आंदोलन भूकंपग्रस्तांसाठी होतं. हे प्रकरण थोडं संवेदनशील असल्यामुळे त्यांना यातून मार्ग काढणं गरजेचं वाटत होतं. आम्ही जामीन घ्यावा यासाठी दुपारनंतर जोरदार प्रयत्न झाले. त्यावेळचे काँग्रेसचे एक राजकीय पुढारी त्रिंबकदाजी झंवर पुढे आले. त्यांनी ‘मी स्वतः जामीन देण्यासाठी आलो’ असं सांगितलं. या संबंधात निर्णय घेण्याचा अधिकार आम्ही भूकंपग्रस्त महिलांना दिला होता. त्या महिला जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असं आम्ही पोलिसांना व पुढाऱ्यांना सांगितलं. महिला खंबीर होत्या. त्या म्हणाल्या, “आम्ही अडचणी घेऊन तहसीलदाराकडं गेलो, तर तहसीलदारांनी आमच्यावर खटला भरला, पोलिस पाठवून अटक केली, गुन्हा नसताना पकडलं. मग आता पोलिसांनीच ठरवावं, आमचं काय करायचं.” बरेच प्रयत्न झाले पण प्रश्न सुटला नाही. आम्हाला संध्याकाळी साडेसहा वाजता कोर्टासमोर हजर केलं गेलं. ‘आम्हाला आरोप मान्य नाहीत, आम्ही काहीच केलेलं नाही, आम्ही जामीन घेणार नाही,’ असं आम्ही कोर्टाला सांगितलं. आम्हाला १४ दिवसांची मॅजिस्ट्रेट कस्टडी मिळाली. आमची उस्मानाबाद जेलमध्ये रवानगी झाली. रात्री साधारण सव्वानऊ वाजता आम्ही जेलच्या दारात होतो.
आम्ही घेतलेले निर्णय हे सर्वस्वी आमच्या पाचजणांचे होते. त्यामुळे आम्हाला समजावायला किंवा मार्गदर्शनाला कोणी मोठे संस्थाचालक वगैरे आले नव्हते. आम्हाला अपराधी वगैरे काही वाटलं नाही. उलट, आम्ही काही चूक किंवा गुन्हा केलाच नव्हता. भूकंपग्रस्तांच्या प्रश्नांसाठी आम्ही सनदशीर मार्गाने आंदोलन केलं होतं, तरीही आम्हाला पकडून आणलं होतं. तेव्हा ज्या प्रश्नासाठी आम्हाला पकडून आणलं होतं, ते सर्व प्रश्न सुटल्यावरच आम्ही बाहेर येऊ, असा निर्धार आम्ही केला.
आमची तपासणी झाली. पाकीट, पैसे, बेल्ट, घड्याळ, अंगठी सर्व वस्तू काढून जेल व्यवस्थापनाकडे दिल्या गेल्या. मनीषा आणि आमच्या दोन महिला कार्यकर्त्यांना आमच्यापासून वेगळं केलं गेलं. मी महिला कार्यकर्त्यांना सांगितलं, “मनीषा सोबत आहे, काळजी करू नका.” मुळात आमच्या दोन्ही कार्यकर्त्या बिनधास्त होत्या. शिवाय त्यांच्या कुटुंबीयांचा माझ्यावर उदंड विश्वास होता. त्या म्हणाल्या, “बापू, तुम्ही जवळच्या जेलमध्ये आहात ना, मग आम्हाला काय काळजी!” आम्ही एकमेकांना शुभेच्छा दिल्या. ‘घाबरायचं नाही’ असं त्यांना पुन्हा सांगितलं. जेलचे प्राथमिक सोपस्कार झाल्यावर आम्हाला एका बरॅकमध्ये आणून सोडलं गेलं.
त्या बरॅकमधील सर्व कैदी झोपले होते. बरॅक खचाखच भरली होती. आम्हाला दारात जागा देण्यात आली. बाजूला चार फुटांवर संडास होते. जेलमधले संडास म्हणजे फक्त बसल्यावर छातीच्या खालचा भाग दिसत नाही, एवढाच आडोसा. कैदी काय करतो हे सतत नजरेत राहावं यासाठी केलेली ही व्यवस्था. संडासची दुर्गंधी आणि मूत्राचा उग्र दर्प डोक्यात शिरला. डोक भणभणायला लागलं. तिथेच अर्धवट ओल्या जागेत आम्हाला दिलेल्या सतरंजीवर रग घेऊन झोपलो. थाळी आणि कटोरा उशाला ठेवला. ब्रह्मांड आठवलं. आता चौदा दिवस हे सहन करावं लागणार होतं. अशोक म्हणाला, “बापू, बरं आहे ना?” मी म्हटलं, “तुला बरं वाटत असेल तर मला काही प्रॉब्लेम नाही.” आम्ही दोघंही आवाज न करता हसलो आणि रात्री केव्हा तरी झोपलो.
सकाळी घंटा झाली. ती ऐकून उठलो. हौदावर पाण्यासाठी गेलो. तोंड धुतलं. मधल्या आवारात सगळे प्रार्थनेला जमले होते. प्रार्थना सर्वांना बंधनकारक होती. आम्हीही त्यांच्यात सहभागी झालो. प्रार्थना झाली. बहुतेक कैद्यांना ती पाठ होती. कैद्यांपैकीच एकजण ती म्हणत होता. काही कैदी दंडुका घेऊन सर्वांना शिस्त लावण्यासाठी उभे होते. तेवढ्यात जेलर आले. सर्वजण उभे राहिले. आम्हीही उभे राहिलो. जेलरसाहेबांनी आम्हाला समोर यायला सांगितलं. साहेबांना आमची नावं माहिती होती. त्यांनी सर्व कैद्यांना आमची माहिती सांगितली- हे गुन्हेगार नाहीत, भूकंपग्रस्तांच्या अडचणी सुटाव्यात म्हणून आंदोलन केलं, म्हणून पकडलं आहे, वगैरे.
त्यांनी ही माहिती सांगितल्यावर एकच गलका उडाला. तेव्हा आमच्या लक्षात आलं की इथे आत अडकून पडलेल्या कैद्यांना बाहेरच्या भूकंपाबद्दल फारशी माहिती नव्हती. बऱ्याचजणांची कुटुंबं, नातेवाईक भूकंपग्रस्त भागात होते. त्यांचं नेमकं काय झालं, ते कशा परिस्थितीत आहेत याची फारशी कल्पना त्यातल्या अनेकांना नव्हती. वर्तमानपत्र व वॉर्डनकडून माहिती कळेल तेवढंच त्यांना माहिती होतं. त्याबद्दल माहिती मिळावी असं प्रत्येकालाच वाटत होतं. जेलरसाहेबांनी आम्हाला भूकंपाबद्दल बोलायला सांगितलं. अशोक म्हणाला, “बापू, होऊन जाऊ द्या.” मी जवळपास ४०-५० मिनिटं बोललो. वातावरण अतिशय गंभीर होतं. अनेकांच्या डोळ्यांत पाणी होतं. काहींचे चेहरे रडवेले झाले होते. जेलरसाहेबही गंभीर झाले होते. त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला. म्हणाले, “तुम्ही भूकंपग्रस्त भागाचं अत्यंत वास्तव चित्र आमच्यापुढे उभं केलंत.” साहेबांनी आम्हा दोघांचे आभार मानले. माझ्या वक्तृत्वाने जादू केली होती. आमच्या बराकीचा मुख्य दादा अशोकजवळ आला. म्हणाला, “तुम्ही लोक भारी आहात.” तो अशोकचा जातभाई निघाला. त्याने अशोकला माझ्याबद्दल विचारलं. अशोक म्हणाला, “आपल्यातलेच आहेत. आपल्यासाठीच काम करतात.”
नाष्ट्याची वेळ होती. आम्ही आयुष्यात पहिल्यांदा जेलमधली पेज घेतली. ती देणाऱ्याने मात्र आम्हाला अदबीने विचारलं, “सर, अजून देऊ का?” कटोऱ्यामध्ये मोठी पळी भरून पेज वाढली होती. तेवढी तरी संपते की नाही हा प्रश्न होता, म्हणून ‘नको’ म्हणून सांगितलं. पण आम्हाला पेज आवडली. उद्यापासून मजबूत पेज घ्यायची, जेवणाचं जे होईल ते होईल, असं ठरवून टाकलं. आम्ही बराकीत आलो. बराकीचा दादा आमच्याबरोबर होता. त्याने विचारलं, “तुमचं सामान कुठे आहे?” संडासपासून चार फुटांवर ठेवलेल्या वळकट्या आम्ही दाखवल्या. दादाने दोन पोरं धरली. म्हणाला, “ते उचला.” पोरांनी आज्ञाधारकपणे आमच्या वळकट्या उचलल्या आणि बराकीच्या दुसऱ्या टोकाला दादाच्या वळकटीशेजारी ठेवल्या. त्या प्रमाणात इतरांच्या वळकट्या खाली सरकत गेल्या.
तिथून आम्हाला मागे फिरून पाहावं लागलं नाही. भेटेल तो नमस्कार करायचा. लाइनचा वांदा नव्हता. मोजून-मापून नव्हतं. रात्री भूक लागली तर उशाला दोन भाकरी ठेवलेल्या असायच्या. ही दादाने आमच्यासाठी केलेली खास सोय होती. बाकीच्या लोकांना जेवण ठरलेल्या मापात मिळायचं. गुन्हेगारांनाही मन असतं, चांगल्या-वाईटाची जाण असते, चांगलं वागणाऱ्या आणि चांगलं करणाऱ्यांबद्दल आदर असतो याची परोपरी प्रचिती येत होती.
आमच्या बरॅकमध्ये रोज भजन-गायन व्हायचं. औराद शहाजनीमध्ये एका मुलीला चार तरुणांनी जाळून मारल्याने सारा महाराष्ट्र हादरला होता. त्यातले चार तरुण आरोपी आमच्या बरॅकमध्ये शेजारीच होते. त्यातला एकजण तबला व ढोलकी वाजवायचा. एकजण पेटी वाजवायचा. पोरं चांगली गाणी म्हणायचे. पंचवीस-सव्वीस वर्षांची पोरं. नक्की काय झालं, कसं झालं, वगैरे विचारांच्या भानगडीत आम्ही कधी पडलो नाही. तिथल्या प्रत्येकाची एक कथा होती. त्यातले काही घडलेल्या गुन्ह्यांत अडकलेले, तर काही गुंतवलेले. कुणाकुणाचं ऐकायचं आणि काय काय ऐकायचं? एक तर इंजिनियर पोरगा होता. बायकोच्या खुनाच्या केसमध्ये अडकलेला. वडील वकील. पोरगा मात्र जेलमध्ये. बाजूच्या बराकीमध्ये रोज काही तरी घडायचं. हाणामाऱ्या व्हायच्या. सामानाची आदळआपट, फेकाफेकी व्हायची. आमची बरॅक दादामुळे एकदम शांत होती.
रोज जेवणात मजबूत जाड भाकरी ती मुडपण्याचा वगैरे प्रश्न नाही. ही भाकरी बहुधा ज्वारी आणि बाजरीच्या मिक्स पिठाची असावी. सोबत पातळ भाजी, वरण-भात. कटोरा घेऊन रांगेत उभं राहून जेवण घ्यायचं आणि खाली बसून जेवायचं हा नियम होता. यावर वॉर्डनची सक्त नजर असायची. आम्ही सगळे नियम पाळत होतो. लोक आम्हाला म्हणायचे, “तुम्ही पुढे जाऊन घ्या.” पण आम्ही रांगेतच जायचो. तेवढाच वेळ चांगला जायचा. बरं वाटायचं. इथली प्रत्येक गोष्ट शिस्तीत असायची.
अचानक एके दिवशी वॉर्डन आमच्याकडे आला आणि म्हणाला, “तुम्हाला साहेबांनी बोलावलं आहे.” आम्ही साहेबांकडे गेलो. माझे वडील भेटायला आले होते. साहेबांची कृपा. जेलमधला आमचा तो चौथा दिवस होता. पण कोणी भेटायला येणं केवढं आनंद देणारं असतं याची प्रचिती आली. जे महिनोन् महिने, वर्षानुवर्षं इथे आहेत, त्यांचं काय होत असेल? माझ्या वडिलांना माझं हे वागणं मान्य नव्हतं. वडील म्हणाले, “तिकडे मेघना रोज तीन-चारशे बायका घेऊन बसते, तू आत आहेस. संपवा हे आता.” मी त्यांना सांगितलं, “आमच्या मागण्यांच्या पूर्ततेचा निरोप आला की आम्ही बाहेर येऊ, त्याशिवाय नाही.” हे ऐकून वडील निराश झाले. ‘बघ बाबा’ म्हणून ते परतले. त्यांच्याबरोबर गावातले दोन-चार लोकही आले होते.
तिकडे ठरल्याप्रमाणे मेघना रोज महिला घेऊन तहसीलसमोर बसत होती. माळुंब्रा-हिप्परगा पाटी, तसंच आणखी एका गावातल्या एकूण चार-पाचशे महिला असायच्या. एक दिवस ‘मानवलोक संस्थे’चे द्वारकादासजी लोहिया म्हणजे बाबूजी मेघनासोबत धरणं आंदोलनात होते. ‘मानवी हक्क अभियाना’चे एकनाथ आवाड होते. ‘स्त्री आधार केंद्रा’च्या नीलम गोऱ्हे यांनी एक दिवस देणार असं जाहीर केलं होतं. पण मेघनाने त्यांना निरोप पाठवला, ‘तेवढ्यासाठी मुंबईवरून येऊ नका.’ ‘नारी प्रबोधन मंच’च्या चंद्रकला भार्गव मॅडम भेटून बसून गेल्या. याशिवाय अनेक स्वयंसेवी संस्थांचे संस्थाचालक मेघनाला भेटून जात होते आणि तहसीलदारसाहेबांवर दबाव आणत होते.
तहसीलदारांनी युद्धपातळीवर कामं केली आणि सातव्या दिवशी सकाळी सरपंचाची पत्रं व तहसीलदारांचा निरोप घेऊन माणूस आला. ‘उद्या जामीन प्रक्रिया करू’ असा निरोप होता. कागदपत्रावर आम्ही सह्या केल्या. आम्हाला खूप आनंद झाला. आमच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या होत्या. सर्व मागण्या प्रत्यक्षात उतरवल्याचे दाखले सरपंचांनी पाठवले होते. आम्ही जिंकलो होतो. रात्री बराकीत जल्लोष होता. जेलमधून एखादा माणूस जातोय याचा आनंद सर्वांना व्हायचा. आमच्या सह्या घेणं वगैरे संपूर्ण प्रोसीजर पूर्ण व्हायला दुसऱ्या दिवशीची संध्याकाळ झाली.
आमचं जमा केलेलं साहित्य घेऊन आम्ही जेलच्या बाहेर पडलो. बाहेर द्वारकादास लोहिया (बाबूजी), एकनाथ आवाड, अनिल शिदोरे, नितीन शितोळे, सूर्यकांत, ओंकार बिराजदार ही मंडळी हारतुरे घेऊन आमच्या स्वागताला हजर होती. आमच्या महिला सहकारीही जेलबाहेर आल्या. आमच्या सर्वांच्या गळ्यात हार पडले. पेढे वाटले गेले, आम्हाला भरवले गेले. आमचे कार्यकर्ते जीप घेऊन आले होते. कडकडून मिठ्या पडल्या. मी अशोक आणि मनीषाला कडकडून मिठी मारली. हे माझे खरे साथीदार होते. एकनाथभाऊ अशोक, मनीषाला घेऊन लिंबाळा दाऊला गेले. आम्ही सर्वांचा निरोप घेतला आणि कार्यकर्त्यांसह हसलगणला निघालो. हसलगणची एक भूकंपग्रस्त महिला आमच्यासोबत जेलमध्ये होती. तिला घरी सोडायचं होतं व गावात लोकही आमची वाट पाहत होते.
माझी तब्येत जेलमध्ये सुधारली असं कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं. जेलबाहेर येण्याआधी आमचं वजन करण्यात आलं. खरोखरच माझं वजन दीड किलोने वाढलं होतं. बराकीच्या दादाचे मी मनातून आभार मानले. हसलगणला त्या कार्यकर्तीला सोडून आम्ही जवळगा पोमादेवीला गेलो. तिथे भव्य कार्यक्रम झाला. मागासवर्गीय वस्तीमध्ये महिलांनी परातभरून साखर वाटली. एका माउलीने आमच्यावरून आरती ओवाळली, टिळा लावला. आम्हाला माळुंब्र्याला यायला रात्रीचा एक वाजला. जवळपास अर्धाअधिक गाव आणि हिप्परगा कवळीचे काही लोक आमच्या शेडसमोर आमची वाट बघत बसले होते. आमची जीप आली तशा इतर महिलाही पटापट जमल्या. छोटेखानी कार्यक्रम झाला. साखर वाटली गेली. मेघनाने माझ्याबरोबर जेलमध्ये असलेल्या आमच्या मंगल नावाच्या आमच्या कार्यकर्तीला, मला आनंदाने मिठी मारली. लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्या क्षणी आम्ही नवरा-बायकोपेक्षा कार्यकर्तेच जास्त होतो. माझ्या छोटेखानी भाषणात मेघनाच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिल्याबद्दल मी लोकांचे आभार मानले.
आम्ही जेलमध्ये गेल्यावर तहसीलदार आमच्या कार्यक्षेत्रातील गावागावांत फिरले. लोकांना भडकवण्यासाठी व माझ्यावरचा आरोप सिद्ध करण्यासाठी गावोगावच्या सरपंच, पोलिसपाटील व प्रतिष्ठित लोकांना भेटले. असंही कळलं, की ते त्यांच्याकडे ‘रमाकांतबापू आमच्या गावात येऊन लोकांना भडकवतात, त्यांच्यामुळे समाजा-समाजात भांडणं होतात, गट पडतात व सरकारी कामांमध्ये अडथळा येतो,’ असं काही तरी लिहून मागायचे. तहसीलदारांना माझ्याविरुद्ध पुरावे गोळा करायचे होते. पण कार्यक्षेत्रातील एकाही गावातून त्यांना कुणी एक ओळही लिहून दिली नाही. तहसीलदार ज्या गावात जायचे, त्यांच्यामागे आमचे कार्यकर्ते मोटरसायकलवर असायचे. ते लोकांना भेटायचे. मेघना रोजचं धरणं संपलं की संध्याकाळी त्याच गावात जायची, बैठक घ्यायची व दुसऱ्या दिवशी त्याच गावच्या शंभर-दीडशे महिला व माळुंब्रा हिप्परग्याच्या पाटीवरच्या महिला अशा चार-पाचशे महिला तहसीलसमोर धरणं आंदोलनाला बसायच्या. शेवटी तहसीलदारांनी तो नाद सोडून दिला.
या कालावधीत मेघनाने प्रचंड काम केलं. ही प्रदीर्घ लढाई तिला एकटीला लढावी लागली. कुणाची साथ नव्हती. औसा तहसीलवर धरणं आंदोलनाला लोकांची साथ मिळायची. पण कार्यक्षेत्रातील या महिलांना जमवण्यासाठी मेघनाला व कार्यकर्त्यांना प्रचंड कष्ट करावे लागले. या काळात खऱ्या अर्थाने तिला साथ मिळाली ती जवळगा पोमादेवीच्या राजकुमार पाटलांची, संक्राळच्या आमच्या ड्रायव्हर सुरेश सोमवसेची व आमच्यासोबत असलेल्या संध्या देशपांडे, श्रीरंग चौरे, भरत कछवे या कार्यकर्त्यांची. या कार्यकर्त्यांनी जिवाचं रान केलं आणि साथ दिली म्हणून मेघना हे सगळं करू शकली.
आम्ही खऱ्या अर्थाने जिंकलो होतो. भूकंपग्रस्त लोक या अस्मानी संकटाने खूपच हळवे बनले होते. मेघना लोकांना तहसीलदारांबद्दल सांगायला जायची, तेव्हा लोक तिला म्हणायचे, “ताई, तुम्ही लोक घरदार सोडून आमच्या इथे आलात. आम्हाला सोयी मिळाव्यात म्हणून बापू जेलमध्ये गेले. आम्हीही माणसं आहोत. तुमच्याविरुद्ध तहसीलदारांना काही बोललो, काही वेडंवाकडं सांगितलं तर देव आम्हाला माफ करणार नाही. त्यापेक्षाही आमचं गाव आम्हाला माफ करणार नाही. तुमच्या महिला कार्यकर्त्या आमच्या बायकांना घेऊन धरणं आंदोलनाला जातात, त्या आम्हाला माफ करणार नाहीत. आमच्यापेक्षा तुमचीच चर्चा आमच्या घरात जास्त असते. आम्ही शपथेवर सांगतो आमच्या गावाकडून असं काहीही होणार नाही.” भूकंप झालेल्या दिवसापासून आम्ही या लोकांमध्ये रात्रंदिवस बसलो, त्यांच्याशी बोललो, त्यांना धीर दिला, त्याचा हा परिणाम होता.
या सर्व दिवसांत मेघनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. तिची एखादी चूक आंदोलनाला महागात पडली असती. ठरलेली गोष्ट अगदी शिस्तीत आणि नियोजनपूर्वक करणं हा तिचा स्वभाव असल्याने हे शक्य झालं. खरं तर हे आंदोलन महिला संघर्ष समितीचं होतं. मी व अशोक फोटो काढण्यासाठी आणि महिलांना मदत करण्यासाठी त्यांच्यासोबत होतो. मेघनाचं नाव प्रथम आरोपी म्हणून होतं. पण तहसीलदार साहेबांना मला अडकवण्यात जास्त इंटरेस्ट होता, म्हणून मेघनाचं नाव वगळून माझं नाव प्रमुख आरोपी म्हणून घातलं गेलं. इथेच आम्ही अर्धी लढाई जिंकलो होतो. खरं तर हे आंदोलन आणि जेलयात्रा आम्ही एन्जॉय केली, असंच म्हणायला हवं.
(रमाकांत (बापू) कुलकर्णी यांनी लिहिलेल्या ‘लोकांमध्ये लोकांसोबत' या समकालीन प्रकाशित पुस्तकातून साभार)
