२४ डिसेंबर १९७१. पेरूची राजधानी लिमाचा विमानतळ भरून वाहतो आहे. ख्रिसमसच्या आधीचा दिवस असल्यामुळे प्रत्येकालाच आपापल्या कुटुंबीयांजवळ पोहोचण्याची घाई आहे. सतरा वर्षांची ज्युलियन कोपेक आणि तिची आई मारिया या दोघी त्यात आहेत. ज्युलियनच्या आई-वडिलांचं पेरूच्या अमेझॉन जंगलात पुकाल्पा गावाजवळ संशोधन केंद्र आहे. तिचे वडील सध्या तिथेच आहेत. आदल्या दिवशी ज्युलियनच्या कॉलेजमध्ये कार्यक्रम असल्यामुळे त्यांना अगदी ऐन वेळचं फ्लाइट पकडायला लागतं आणि तेही अपघातांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या लान्सा एअरलाइन्सचं. ‘दरवेळी अशा दुर्घटना घडत नसतात आणि आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या आयुष्यात तर कधीच असं घडत नसतं', असं म्हणत या दोघी विमानात बसतात. लिमा ते पुकाल्पा हा अवघ्या तासाभराचा प्रवास. हवा अगदी उत्तम असते, प्रवास सुरळीत सुरू असतो; पण दुपारी साडेबाराच्या सुमारास कोणतीही पूर्वकल्पना न देता एक वादळ अचानक विमानावर थडकतं. मोठा हादरा बसतो आणि काही कळायच्या आत ज्युलियनच्या लक्षात येतं की आपण विमानातून खाली कोसळतो आहोत..
... जाग येते तेव्हा ज्युलियन ॲमेझॉनच्या जंगलात चिखलमाती आणि पालापाचोळ्याने आच्छादलेल्या जमिनीवर पडलेली असते. एका क्षणात तिच्या लक्षात येतं की आपलं विमान क्रॅश झालं आहे आणि आपण जंगलात कोसळलो आहोत आणि आपली आई आपल्याजवळ दिसत नाही. पण आई-वडिलांचं संशोधन केंद्र ॲमेझॉनमध्येच असल्याने या जंगलाचा स्वभाव तिच्या ओळखीचं असतो, हाच काय तो दिलासा. ती उठून उभी राहण्याचा प्रयत्न करते; पण त्यासरशी तिच्या डोळ्यांसमोर अंधारी येते. थोडा वेळ तशीच पडून राहिल्यावर ती हातावरचं घड्याळ चाचपून पाहते, तर बरेच तडे गेले असले तरी घड्याळ अजून सुरू असतं. नऊ वाजलेले असतात. प्रकाशावरून ज्युलियन ताडते की सकाळची वेळ असावी. म्हणजे आदल्या दिवशी दुपारी विमान कोसळल्यापासून सकाळपर्यंत ती बेशुद्धावस्थेत जंगलामध्ये पडून असते.
बऱ्याच प्रयत्नांनंतर तिला उठून उभं राहायला जमतं. आपल्याला नेमकं कुठे आणि किती लागलंय हे ती चाचपून बघते. मानेजवळचं एक हाड वेडवाकडं लागत असल्याचं आणि पिंढरीला एक खोल जखम झाल्याचं तिला तपासणी केल्यावर जाणवतं; पण आश्चर्य म्हणजे दोन्ही ठिकाणी तिला दुखत नसतं. किमान १० हजार फुटांवरून कोसळूनही एवढ्या मामुली जखमांवर आपलं कसं काय निभावलं हे तिला कळत नाही. आपण खरंच विमानातून खाली कोसळलो की हे केवळ स्वप्न आहे, असा प्रश्न तिला पडतो. या जखमांपेक्षा दोन-तीन गंभीर समस्या असतात. एक तर तिचा चष्मा हरवलेला असतो, एक सँडल गायब असते आणि तिचा उन्हाळ्यासाठी घातलेला आखूड ड्रेस जंगलातल्या मुक्कामासाठी अगदीच चुकीचा असतो. चांगले बूट आणि योग्य कपडे नसताना अमेझॉनच्या जंगलात राहणं म्हणजे खरं तर मृत्यूला आमंत्रण. कारण साप आणि नाना प्रकारच्या विषारी कीटकांचं ते साम्राज्यच. त्यामुळे कटकट वाटत असूनही ज्युलियन एक सँडल घालूनच चालत असते. किमान एका पायाचं तरी थोडं संरक्षण!
उठून चालता येऊ लागल्यावर ज्युलियनची पहिली प्रतिक्रिया असते ती आजूबाजूला विमानातलं अन्य कोणी दिसतं का ते पाहण्याची. ॲमेझॉनचं रेन फॉरेस्ट म्हणजे प्रचंड आकारांच्या झाडांची गर्दी असलेलं जंगल. दहा पावलंही सरळ चालता येऊ शकणार नाही इतकं दाट. त्यातून वाट काढत काढत ज्युलियन आसपासचा परिसर हिंडते, पण तिथे विमान कोसळल्याची कुठलीच चिन्हं नसतात. ना विमानाचे अवशेष, ना जखमी माणसं, ना विमानात तिच्या शेजारी बसलेली तिची आई. विमानातून फक्त आपणच खाली कोसळलो की काय असं ज्युलियनला वाटतं. अर्थात ही शोधाशोध करताना एखादी खूण लक्षात ठेवणं गरजेचं आहे याचं भानही तिला असतं. कारण अमेझॉनमध्ये व्यवस्थित आखलेल्या खुणा नसतील तर माणसाला चकवा लागायला वेळ लागत नाही हे ज्युलियनला चांगलं ठाऊक असतं. थोड्याच वेळात तिला कळून चुकतं की आपल्या आसपास मदतीला इतर कोणीही नाही. विमान नेमकं कुठे पडलंय ते आपल्याला माहिती नाही. थोडक्यात, या किर्र जंगलात आपण आता एकटेच असून कोणीही तातडीने आपल्या मदतीला येण्याची शक्यता नाही. पण तरीही ज्युलियन घाबरून जात नाही की आपण कुठे जंगलात येऊन पडलो अशी भावना तिच्या मनात तयार होत नाही. याचं एक कारण बहुधा विमानातून खाली कोसळल्याच्या धक्क्यामुळे ती काहीशी बधिर झालेली असते. कोणतीच भावना पटकन तिचा ताबा घेत नाही. ना तिला भीती वाटत असते, ना जखमांमुळे वेदना होत असतात, ना आता आपलं कसं होणार याची चिंता वाटत असते.
दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे अमेझॉनचं हे जंगल तिच्या ओळखीचं असतं. लहानपणापासून ती आई-वडिलांच्या संशोधन केंद्रात येत-जात असते आणि दोन-तीन वर्षं तर ती या जंगलात राहिलेली असते, आई-वडिलांबरोबर जंगलात भरपूर भटकलेली असते. जंगलाचे कायदेकानू तिला माहिती असतात. झाडा-वनस्पतींशी, प्राण्यांशी, असंख्य विषारी किड्यांशी, सापांशी आणि एकूणच प्रत्येक वेळेला रूप बदलणाऱ्या जंगलाशी तिची ओळखच नव्हे तर मैत्री असते.
आता आपल्यालाच जंगलातून बाहेर पडण्याचा रस्ता शोधावा लागणार हे लक्षात आल्यावर तिला वडिलांनी सांगितलेला जंगलातला पहिला नियम आठवतो : कधीही जंगलात हरवलीस तर वाहतं पाणी शोधून काढ. पाणी ज्या दिशेला वाहतंय त्या दिशेने पाण्यासोबत चालत राहिलीस तर माणसांच्या वस्तीपर्यंत पोहोचशील. त्यामुळे तिच्याही नकळत ती पाण्याचा शोध घेऊ लागते. थोडा वेळ आसपास फिरल्यावर ज्युलियनला एक ओळखीचा आवाज ऐकू येऊ लागतो. अगदी छोटा ओहोळ वाहत असल्याचा आवाज. त्या दिशेने गेल्यावर थोड्याच वेळात ती पाण्यापाशी जाऊन पोहोचते. वाटेत तिला कँडीचं एक पाकीट सापडतं, पण ते सोडता इतर प्रवाशांच्या काहीच खाणाखुणा तिला दिसत नाहीत. तिच्या स्वतःच्या तुलनेने छोट्या जखमा पाहता विमानातले प्रवासी बचावले नसतील अशी शंकाही तिला येत नाही. आपल्यापासून लांब कुठे तरी तेही जिवंत असतील आणि त्यात आपली आईही असेल असंच तिला वाटत असतं. त्यामुळे त्यांची वाट पाहत थांबून न राहता या छोट्या ओहोळाचा माग पकडून चालत राहायचं असं ती ठरवते.
पण या ओहोळाच्या सोबतीने चालणं सोपं नसतं. झाडांच्या गर्दीमध्ये पाय ठेवायलाही जागा नसते. शिवाय सगळा परिसर चढ-उताराचा असतो. कधी कधी ज्युलियनला झाडांमधून वाट काढत बरंच चढून जावं लागतं; पण हे चढ टाळण्यासाठी शॉर्टकट घेऊन जंगलाच्या आत शिरणं किती जोखमीचं आहे याची तिला कल्पना असते. त्यामुळे कितीही दमणूक होत असली तरी ती पाण्याच्या काठाने चालत राहते. थोड्या वेळाने हा ओहोळ मोठा होत जातो आणि त्याचं छोट्या झऱ्यात रूपांतर होतं. आता त्याच्या कडेने चालणंही थोडं कमी त्रासदायक बनतं. अपघातानंतरच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाचच्या सुमारास अंधार पडायला लागतो आणि ज्युलियन रात्री मुक्कामासाठी थोडी बरी जागा शोधून झोपण्याची तयारी करते.
फ्रुट कँडीचं एक पाकीट वगळता ज्युलियनकडे खायला काहीच नसतं. मासे पकडून भाजून खावेत, असा विचार केलाच तरी आग पेटवायलाही तिच्याकडे काही साधनं नसतात. अगदी दोन वाळक्या काटक्यांनी किंवा दगडांनी ठिणगी कशी पेटवायची हेही तिला माहिती असतं; पण या पावसाळ्यात सगळं जंगल भिजलेलं असताना तेही शक्य नसतं. एक कँडी खाऊन झऱ्यातलं पाणी भरपूर पिणं एवढंच तिच्या हातात असतं.
त्या रात्री ज्युलियनला गाढ झोप लागते. रात्रीतून किती किडे अंगावर वळवळले असतील, कोणते प्राणी आसपास फिरून गेले असतील याचा विचार करण्याचंही ती टाळते. बहुतेक अजूनही तिच्यावरच्या धक्क्याचा परिणाम पुरता ओसरलेला नसतो. सकाळी उठून ती पुन्हा चालू लागते. चालताना अनेकदा तिला धोकादायक किडे दिसत असतात. एके ठिकाणी पक्ष्याला गिळंकृत करू शकणारा एक मोठा विषारी कोळी तिला दिसतो. धोका वाटला तर माणसावरही हल्ला करणारा तो कोळी असतो. पण नशिबाने तो झऱ्याच्या दुसऱ्या बाजूला असतो. ज्युलियन आणि तो दोघंही एकमेकांकडे बघतात आणि आपापल्या दिशेने चालू लागतात.
खूपदा ज्युलियनला आकाशातून विमानांचे आवाजही ऐकू येत असतात. बचावकार्यासाठी घिरट्या घालणारं विमान असावं असं ती ताडते; पण झाडांच्या दाटीतून तिला विमान दिसणं शक्य नसतं, मग विमानातून ती दिसणं तर लांबच राहिलं. पण तरीही विमानाचा आवाज ऐकू आल्यावर ती खच्चून ओरडून घेते. आपला आवाज या झाडांच्या टोकांपर्यंत पोहोचणंही शक्य नाही हे माहिती असूनही. कदाचित जसजसा हा झरा मोठा होत जाईल आणि त्याचं रूपांतर नदीत होईल तिथे कदाचित जंगलही कमी झालेलं असेल आणि विमानातून खालचा भाग दिसू शकेल. तोपर्यंत आपल्याला चालत राहण्याशिवाय पर्याय नाही, अशी खूणगाठ बांधून ज्युलियन चालत राहते.
पायपिटीचे पहिले दोन-तीन दिवस ज्युलियन जास्त विचार न करता यांत्रिकपणे चालत असते. अजूनही तिची बधिरावस्था पूर्ण संपलेली नसते. अधूनमधून तिच्या मनात आईचा विचार डोकावत असतो; पण आतापर्यंत नक्कीच आईची सुटका झाली असेल असं मानून ती सारे विचार मनातून बाजूला काढून टाकते. झऱ्याकाठाने चालत राहणं एवढंच आपलं सध्याचं काम आहे असं जणू या परिस्थितीने तिला सांगितलेलं असतं.
चौथा दिवस थोडा वेगळा उजाडतो. दुपारच्या वेळेस तिला एक कर्कश आवाज ऐकू येतो. तो ऐकून पहिल्यांदाच ज्युलियन भीतीने गोठून जाते. आवाजावरूनच ती ओळखते की हा भल्या मोठ्या गिधाडांचा आवाज आहे. एवढ्या जवळ गिधाडं आहेत याचा अर्थ कुठे तरी मोठ्या प्रमाणावर मांस आहे हे उघड असतं. तिच्या मनात येतं, या गिधाडांचं इथे येण्याचं कारण माझी आईच असेल तर? थोड्याच वेळात तिला गिधाडांचं अन्न दिसू लागतं. विमानातल्या तीन आसनी खुर्चीवर तीन मृतदेह वेड्यावाकड्या अवस्थेत पडलेले असतात. जमिनीत घुसलेली तोंडं आणि आकाशाच्या दिशेने उंचावलेले पाय. त्या तिघांमधली एक बाई असते. ती आपली आई तर नसेल ना, या विचाराने ज्युलियन सुन्न होऊन जाते. त्या ठिकाणाहून पळून जावं अशी इच्छा तिचा ताबा घेते, पण शहानिशा करण्याशिवाय पर्याय नसतो. जवळ जाऊन बघते तर तिला त्या बाईच्या पायाची रंगवलेली नखं दिसतात. ती सुटकेचा निःश्वास टाकते. आई कधीच नखं रंगवत नाही, हे तिला माहीत असतं. पण त्या दृश्यामुळे तिची बधिरावस्था थोडीशी कमी होते. आपल्या आईचं काय झालं असेल, हा विचार तिच्या मनाचा ताबा घेतो. आई सुखरूप असणार, असं स्वतःला बजावत ती चालत राहते.
आता ज्युलियनकडच्या कँडीही संपलेल्या असतात. पावसाळा असल्यामुळे कुठल्याच झाडाला फळं नसतात. पामचा गर वगैरे खावा म्हटलं तर तो काढण्यासाठी तिच्याकडे सुरी नसते. जंगलातल्या बहुतेक गोष्टी विषारी असल्यामुळे कुठलाही धोका पत्करायला ती तयार नसते. त्यामुळे झऱ्यातलं माती मिसळलेलं गढूळ पाणी पिऊन पोट भरण्याशिवाय आता दुसरा पर्याय नसतो, पण जिथे मानवी वस्ती नाही तिथलं पाणी पिण्यात फारसा धोका नाही एवढं ज्युलियनला माहिती असतं. बहुधा ते पाणी प्यायल्यामुळेच तिला भुकेचीही फारशी जाणीव होत नाही ही त्यातल्या त्यात चांगली गोष्ट. पण तिच्या शरीरातली ताकद मात्र झपाट्याने कमी व्हायला लागलेली असते.
पाचव्या किंवा सहाव्या दिवशी तिला एका ओळखीच्या पक्ष्याचा आवाज येतो. पाण्याच्या मोठ्या साठ्याजवळ आढळणाऱ्या या पक्ष्याचा तिच्या आईने सखोल अभ्यास केलेला असतो. पाण्याजवळ आढळत असल्याने त्याच्या आसपास मानवी वस्तीही असू शकते, असं वाटून आपला एरवीचा बेफिकीर मूड बाजूला ठेवून ज्युलियन काहीशी आनंदित होते. अतिशय अवघड वाट चालत चालत अखेर ती अशा ठिकाणी येऊन पोहोचते की तिच्या झऱ्याने आता छोट्या नदीचं रूप घेतलेलं असतं. साधारण तीसेक फूट रुंद पात्र तिच्या समोर असतं. वर पाहते तर जंगलही काहीसं विरळ झालेलं असतं आणि आकाशाचा एक तुकडा तिला स्वच्छ दिसू लागतो. आता इथून वस्ती फार दूर नसणार असं तिला वाटून जातं. थोड्याच वेळाने तिला विमानांची घरघरही ऐकू येऊ लागते. ती पुन्हा एकदा जोरजोरात ओरडून विमानांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करते. आता आपण विमानातून नक्की दिसू असं तिला वाटत असतं. विमानांचे आवाज कमी कमी होत लांब निघून जातात तेव्हाही ती स्वतःची समजूत काढते, की आता थोड्याच वेळात विमान पुन्हा परतेल आणि आपली सुटका होईल. पण बराच काळ जाऊनही काहीच घडत नाही. अंधार पडू लागतो तसं तिचं मन निराशेने भरून येतं. आपण सोडून विमानातल्या इतर सगळ्या प्रवाशांची सुटका झाली असणार आणि आपण सापडत नसल्यामुळे आता शोधमोहीम थांबवण्यात आली असणार असं वाटून तिचा संताप संताप होतो.
रागाचा भर ओसरल्यावर ज्युलियन थोडी शांत होते. आपल्याकडे एवढ्या भावनिक आंदोलनांसाठी अजूनही इतकी शक्ती शिल्लक आहे याचं तिला आश्चर्य वाटत राहतं. याचा अर्थ अजूनही आपण आशा सोडता कामा नये. चालत राहिलो तर लवकरच एखाद्या वस्तीपाशी पोहोचू, हा विचार पुन्हा एकदा तिचा ताबा घेतो आणि पुन्हा एकदा पुढे मार्गक्रमण कसं करायचं याचा विचार करण्यात ती स्वतःचं मन गुंतवते. एकच सँडल घातलेल्या पायांनी काठावरून चालवणं अवघड जात असल्यामुळे ती नदीच्या पात्रातूनच चालायचं ठरवते. शिवाय जंगलामध्ये नदीच्या काठावर स्टिंग रे विश्रांती घेत बसलेले असतात याचीही तिला माहिती असते. अशा एखाद्या स्टिंग रेवर चुकून जरी पाय पडला तरी मृत्यू ओढवणार हे नक्की. त्यापेक्षा नदीतून चाललेलं बरं, असा विचार ती करते. अर्थात नदीच्या पाण्यातही धोके कमी नसतात. मगरींची भीती असते. शिवाय पिरान्हा नावाचे शिकारी मासेही या पाण्यात आढळण्याची शक्यता असतेच. पण हे प्राणी कारणाशिवाय माणसावर हल्ला करणार नाहीत हे ज्युलियनला माहिती असतं. शिवाय, काहीही असलं तरी हे धोके पत्करून चालत राहण्याशिवाय तिच्यापुढे पर्याय काय असतो? एखादी चांगली जागा सापडली तर तिथेच थांबून राहावं आणि सुटकेसाठी कोणी येईल याची वाट पाहावी का, असंही तिच्या मनात एक-दोनदा येऊन जातं. पण आता थांबलो आणि आणखी चार दिवसांनी पुन्हा चालण्याची वेळ आली तर तेवढी शक्ती आपल्याकडे उरणार नाही आणि आपण या जंगलातच संपून जाऊ याची जाणीव तिला पुढे रेटत असते. चालत राहिलो तर आपण एक ना एक दिवस मानवी वस्तीपर्यंत किंवा सुटकेसाठी शोधमोहीम राबवणाऱ्यांपर्यंत पोहोचू, असा विश्वास तिला मनातून वाटत असतो.
एक चांगलं असतं, की मनातून तशी शंका असली तरी आता लवकरच शोधमोहीम थांबवली जाणार असल्याचं ज्युलियनला कळण्याची काही शक्यता नसते. तिला हेदेखील कळण्याची शक्यता नसते की विमानातील एकाही व्यक्तीची सुटका झालेली नसते. किंवा, तेव्हा तिला याचीही कल्पना आलेली नसते की विमान पडल्यानंतर सर्वच प्रवाशांना लगेच मृत्यू आलेला नसतो. काही प्रवासी काही काळ जिवंत असतात; पण तिथून बाहेर पडून स्वतःची सुटका करून घेण्याचं ज्युलियनसारखं भाग्य त्यांना लाभत नाही. त्या प्रवाशांमध्ये तिच्या आईचाही समावेश असतो. पुढे तिला जेव्हा हे समजतं तेव्हा आईचं त्या काळात काय झालं असेल या विचाराने ती किती तरी रात्री तळमळत काढते. जंगलात असताना झाला नसेल एवढा त्रास तिला पुन्हा बाहेरच्या जगात येऊन या सत्याशी सामना करताना होतो. एका अर्थाने तिचा जगण्याचा झगडा सुरू होतो तो तिथून बाहेर पडल्यावरच.
पण सध्या आत जंगलात मात्र सर्व बातम्यांपासून दूर ती स्वतःच्या विचारांमध्ये चालत असते; पण पहिल्या तीन-चार दिवसांनंतर मात्र चालणं आणि रात्रीची झोप या दोन्ही गोष्टी अधिकाधिक त्रासदायक बनत जातात. रात्र तर अतिशय वेदनादायी असते. डास किंवा कोणते ना कोणते किडे रात्री तिच्या जवळपास उघड्या अंगावर चाल करून येत असतात. थोडी डुलकी लागते ना लागते तोच नवा दंश तिला जागं करत असतो. चिलटं, माश्या, पिसवा आणि अशा हजारो प्रकारच्या किड्यांची संख्या इतकी असते की बास. ते किडे तिच्या तोंडात, नाकात, डोळ्यांत, कानांत सगळीकडे शिरून चावे घेत असतात. हे कमी की काय, म्हणून कधी तरी रात्रीतूनच पाऊस सुरू होतो. दिवसाच्या वेळी जंगलातली हवा दमट आणि उष्ण असली तरी रात्री पाऊस सुरू झाल्यावर मात्र कडाक्याची थंडी वाजते. पावसाचे थेंब सुया टोचल्यासारखे ज्युलियनच्या अंगात घुसत असतात. छोट्याशा ड्रेसमध्ये चिंब भिजून आता आणखी थंडी सहन होणं शक्य नाही अशा परिस्थितीत ज्युलियन रात्रच्या रात्र कुडकुडत काढते.
अशा वेळी बहुतेकदा ज्युलियन आपल्या आईचा विचार करत प्रार्थना करत राहते. हा अपघात कसा काय झाला, आपण उठलो तेव्हा एकट्याच कशा काय होतो, बाकीचे प्रवासी कुठे गेले, आई कुठे असेल, विमानाचे अवशेष कुठे पडले असतील, असे कोड्यात टाकणारे प्रश्न तिच्या मनाला व्यापून असतात. एवढ्या उंचीवरून पडल्यावरही आपण कसे काय वाचलो, हा प्रश्न तर अनेकदा तिच्या मनात उचंबळून येत असतो. ज्याअर्थी आपण १० हजार फुटांवरून कोसळूनही वाचलो त्याअर्थी आता आपण या जंगलात मरून जाणं शक्य नाही. आपण जिवंत राहिलो त्यामागे काही तरी कारण असणार, असं तिला सतत वाटू लागतं. चालता चालता, रात्र मुक्कामाच्या ठिकाणी थांबल्यावर ती खूप वेळ हा विचार करत राहते. आपण का जिवंत राहिलो? आपल्या आयुष्याचा हेतू काय? त्यातून आजवर कधीच न पडलेले प्रश्न तिला पडू लागतात. आपल्या आई-वडिलांप्रमाणे आपणही जीवशास्त्राचा अभ्यास करायचा हे आधीपासूनच ठरलेलं असतं, पण त्यामागच्या कारणांचा फारसा विचार मात्र तिने केलेला नसतो. पण आता स्वतःचा संवाद करायला वेळच वेळ असण्याच्या काळात हा विचार तिचं मन व्यापून टाकतो. ज्या जंगलातून ती बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते त्याच जंगलाच्या अभ्यासासाठी, तिथल्या पक्ष्या-प्राण्यांच्या अभ्यासासाठी आपण आयुष्यभर काम करायला हवं. तोच आपल्या आयुष्याचा अर्थ असू शकतो याची जाणीव तिला या प्रवासात होते. ज्युलियनचा हा प्रवास जसा मृत्यूकडून जीवनाकडे चाललेला असतो तसाच तो जगण्याचा अर्थ शोधण्याच्या दिशेनेही सुरू होतो हे विशेष. जिथे तू अडकली होतीस त्या जंगलाचं पुन्हा तोंडही पाहू नये असं वाटणं साहजिक नाही का, असा प्रश्न पुढे ज्युलियनला अनेकदा विचारला गेला. तिला अर्थातच तसं कधीही वाटत नाही. उलट, अशा खडतर जीवन-मरणाच्या प्रसंगी माणसांच्या प्रतिक्रिया आपण मानतो तशा एका साच्यातल्याच नसतात, हेच ज्युलियनची गोष्ट आपल्याला सांगते.
एकीकडे ज्युलियनच्या मनात स्वतःच्या हिमतीवर बाहेर पडण्याची इच्छा कायम असली तरी तिची शक्ती मात्र कमी कमी होऊ लागलेली असते. त्यातच आणखी एक समस्या डोकं वर काढते. तिच्या खांद्याजवळ एक जखम झालेली असते. अधूनमधून मान मागे वळवून ती जखम तपासण्याचा चाळा ज्युलियनला लागलेला असतो. एकदा तिच्या लक्षात येतं की त्या जखमेत अळ्या वळवळताहेत. बहुतेक एक प्रकारच्या माश्यांनी त्या जखमेत अंडी घातलेली असतात आणि त्यातून अळ्या बाहेर आलेल्या असतात. ती जखम डोळ्यांसमोर नसल्यामुळे त्या अळ्या काढणं ज्युलियनसाठी अतिशय अवघड असतं. मान तिरकी करून एका काटकीचा चिमटा तयार करून ती त्या अळ्या काढण्याचा प्रयत्न करते; पण काटकीचा स्पर्श झाल्यावर त्या पुन्हा जखमेच्या आत गायब होतात. ज्युलियनच्या घरच्या कुत्र्याच्या जखमेतही अशाच अळ्या झाल्याचं तिला आठवतं. तेव्हा त्याच्या जखमेवर केरोसीन टाकून त्या बाहेर काढलेल्या असतात. पण इथे तिच्याकडे ना केरोसीन असतं ना आणखी कुठलं औषध. त्यामुळे वेळ मिळेल तेव्हा काटकीने डिवचून त्या एकेक करून बाहेर काढण्याशिवाय पर्याय नसतो. सध्या तरी त्या अळ्यांमुळे काही त्रास नसला, तरी आपल्या शरीरात अळ्या वळवळताहेत ही जाणीव फारशी चांगली नसते. या अळ्या आपलं शरीर आतून पोखरून काढताहेत, अशी दृश्यं ज्युलियनला आपल्या डोळ्यांसमोर दिसू लागतात.
आता नदीचा प्रवाह आणखी मोठा झालेला असतो आणि तो वाहता असल्यामुळे त्यात पोहत पोहत पुढे जाता येऊ शकेल असा शोध ज्युलियनला लागतो. त्यामुळे तिच्या प्रवासाचा वेग वाढतो आणि शक्तीही कमी खर्च होते. नदीत मध्ये मध्ये मोठाले ओंडके पडलेले असतात. त्यांच्यावर न आदळता पुढे जाण्याची कसरत तिला करावी लागते एवढंच. या टप्प्यात तिला नदीकिनारी अनेक प्राणीही दिसतात, पण त्यांची भीती वाटावी असं त्यात कुणीही नसतं. एकदा मात्र ज्युलियन संकटात सापडता सापडता बचावते. थोडा काळ नदीच्या काठी विश्रांती घेत असताना तिला एक ओळखीचा आवाज ऐकू येतो. छोट्या मगरीच्या पिल्लांचा तो आवाज असतो. ती पिल्लं नदीतून बाहेर येत अगदी तिच्या जवळ येऊन ठेपलेली असतात. पाहते तर त्यांची आईही नदीतून बाहेर पडण्याच्या बेतात असते. पिलांच्या सुरक्षेपोटी ती आपल्यावर जीवघेणा हल्ला करू शकते हे ज्युलियनला माहिती असतं. पण इथेही जंगलाबद्दलचं तिचं ज्ञान आणि अनुभव उपयोगी पडतो. काठावर येणारी मगर दिसली की कुणीही तिच्यापासून दूर जंगलात पळून जाण्याचा विचार करणार. पण जंगलात घुसलं तर इतर प्राण्यांची भीती तर आहेच, शिवाय वाट चुकण्याचा धोकाही मोठा आहे, हे ज्युलियनला माहिती असतं. त्यापेक्षा ती स्वतःच्या अनुभवावर विसंबून थेट पाण्यात शिरते आणि मगरीशेजारून पोहत पुढे पुढे जाते. आपण आपल्या मार्गाने गेलं तर मगर आपल्या वाटेला जाणार नाही, हा तिचा होरा बरोबर ठरतो आणि एक धोका टळतो.
आता पोहणं आणि चालणं ज्युलियनसाठी आणखी अवघड होऊ लागलेलं असतं. नजर आणखी धूसर होऊ लागते. आता आणखी तग धरायचा असेल तर काही तरी खायला हवं हे तिला कळत असतं. पण काय खाणार? पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सगळीकडे बेडूक ओरडत असतात. ते पकडून खावेत, असा विचार तिच्या मनात येतो. किळस बाजूला ठेवून ती बेडूक पकडण्याचा प्रयत्नही करते; पण काही केल्या तिला ते जमत नाही. शक्ती आणि चपळता दोन्ही कमी झालेली असल्यामुळे अगदी हातात येऊनही बेडूक तिच्या तावडीतून सुटतात.
दहावा दिवस उजाडतो. आता थोडा काळ विश्रांती घेतल्याशिवाय पुढचा प्रवास शक्य नाही, असं वाटून ती एका ठिकाणी किनाऱ्याशी थांबते. थोडं चालल्यावर तिला समोर एक बोट उभी दिसते. अगदी नवी कोरी करकरीत बोट. आपल्याला नक्कीच भास होतोय याची जणू ज्युलियनला खात्रीच असते; पण तरीही शंका नको म्हणून जवळ जाऊन हात लावून बघते, तर बोट खरीच असते. किनाऱ्याकडे लक्ष जातं, तर तिथे एक छोटा तंबू उभारलेला तिला दिसतो. ती एका ओढीने त्या तंबूकडे जायला लागते; पण तिच्या अंगात त्राण इतके कमी असतात की शंभर फूट चालायला तिला काही तास लागतात.
त्या तंबूत कुणी तरी माणूस असेल अशी तिला आशा असते; पण तिथे कुणीच नसतं. कुणी येऊन गेलंय अशी चिन्हंही नसतात. पण त्या तंबूमुळे ज्युलियनला किमान एक आसरा मिळतो. शिवाय तिथे तिला केरोसीनची बाटली मिळते. ती पाहिल्यावर तिला खांद्याजवळच्या जखमेत झालेल्या अळ्या आठवतात. महत्प्रयासाने बाटलीचं बूच उघडून ती थोडं थोडं केरोसीन जखमेवर टाकते. प्रचंड वेदना होतात आणि पहिल्यांदा अळ्या आणखी आत जाण्याचा प्रयत्न करतात, पण नंतर मात्र त्या झपाट्याने बाहेर येऊ लागतात. ज्युलियन अशा ३० अळ्या मोजते. सगळ्या बाहेर आलेल्या नसल्या तरी तेवढ्या कामगिरीमुळेही ती स्वतःवर खूष होते. ज्युलियन इतकी थकलेली असते की तिथे मेल्यासारखी झोपून राहते. इतकी चांगली झोप फाइव्ह स्टार हॉटेलमध्येही लागणार नाही असं तिच्या मनात येतं.
आता पुढे चालत राहावं की थांबून या तंबूचा मालक येईल याची वाट पाहावी हे ज्युलियनला कळत नाही. नदीच्या काठाशी लागलेली बोट घेऊन पुढे जावं असा मोहही तिला एकदा होतो; पण स्वतःची सुटका करून घेण्यासाठी दुसऱ्या माणसाचा जीव धोक्यात घालणं तिला पटत नाही. शिवाय या अशक्त अवस्थेत ती बोट चालवू शकेल का याबाबतही शंका असतेच. त्यामुळे आणखी थोडी विश्रांती घेऊन चालणं पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेते.
बाहेर पाऊस पडत असतो आणि आत ज्युलियन अर्धवट जागी अर्धवट ग्लानीत पडून असते. डोक्यात नाना विचारांचा गोंधळ उडालेला असतो. तिच्या मनात येतं, अपघाताला दहा दिवस नक्कीच उलटून गेले आहेत. आतापर्यंत नक्कीच सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं गेलं असणार. फक्त आपणच या जंगलात एकटे भरकटतोय. आपली सुटका होण्याआधीच आपण मरून गेलो तर आपला शेवट कुठे झाला हे जगात कुणालाही कळणार नाही. दहा दिवस आपण कोणत्या परिस्थितीतून गेलो, किती धीराने-किती कष्ट घेऊन चालत राहिलो हे जगात कधीच कुणाला कळणार नाही, ही भावना तिला व्यापून टाकते. कालपर्यंत आपल्या गोतावळ्यात असणारा माणूस असा अचानक कसा नाहीसा होऊ शकतो, या नियतीच्या खेळाचं तिला प्रचंड कोडं वाटत राहतं. या परिस्थितीचं नवल करत ती पडून राहते..
.. आणि तितक्यात बाहेरून माणसांचे आवाज ऐकू येतात. आधी ज्युलियनला हाही भासच वाटतो. पण हळूहळू ते आवाज जवळ येतात, तिच्या समोर येऊन उभे ठाकतात. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य, धक्का आणि भीतीचं मिश्रण असतं. त्यांनी काही विचारण्याआधीच ज्युलियन बोलू लागते, 'मी लान्सा क्रॅशमधून वाचलेली मुलगी आहे. माझं नाव ज्युलियन. मी गेल्या दहा दिवसांपासून चालते आहे. आणि आता मरणाची दमले आहे.” तिचं बोलणं ऐकल्यावर त्या माणसांचे चेहरे बदलतात. ते भराभर तिला हवं-नको ते बघायला लागतात. आपल्याकडचं खाणं काढून तिला देतात. खरं तर त्या दिवशी या तंबूकडे येण्याचा त्यांचा अजिबात विचार नसतो; पण सहज म्हणून ते तिथे येतात आणि त्यांना ज्युलियन सापडते.
ज्युलियन सुखरूप हॉस्पिटलमध्ये जाऊन पोहोचते. वडिलांना भेटते. पण लान्साच्या अपघातात वाचलेले आपण एकमेव प्रवासी आहोत आणि आपल्या आईसह इतर सर्व प्रवासी मृत्युमुखी पडल्याचं तिला कळतं. आपण वाचल्याचा आनंद घ्यावा की आईच्या मृत्यूचं दुःख करावं अशा नव्या पेचात ती सापडते. हीच द्विधा अवस्था तिचे वडीलही अनुभवत असतात. मुलगी सापडली याचा आनंद तर असतोच; पण त्यांचं आपल्या पत्नीवर इतकं प्रेम असतं की त्या धक्क्यातून ते कधीच सावरू शकत नाहीत. त्यामुळे जंगलातल्या संकटातून वाचली असली तरी नव्या परिस्थितीत नव्या समीकरणांसह आयुष्याची घडी बसवण्याच्या नव्या आव्हानाला तिला सामोरं जावं लागतं.
ज्युलियन सुखरूप बचावल्याची बातमी जगभर पोहोचल्यावर आणि नंतरही ती किती धाडसी आणि असामान्य आहे असा कौतुकवर्षाव तिच्यावर झाला- अजूनही होत असतो. पण ज्युलियन म्हणते, ‘मी असामान्य अजिबातच नव्हते. आजही नाही. आई-वडिलांनी मला जंगलाच्या सान्निध्यात वाढवलं म्हणून मी तिथे तरू शकले; पण माझ्या जागी आणखी कोणी असतं तरी त्यांनीही तेवढंच धाडस दाखवलं असतं. असामान्य परिस्थिती आपल्याला त्या त्या वेळी असामान्य बनवते, हे त्यामागचं खरं कारण असलं पाहिजे.
(समकालीन प्रकाशनाच्या 'मृत्यू पाहिलेली माणसं' या पुस्तकातून साभार)
गौरी कानेटकर | gauri.uniqueportal@gmail.com
गौरी कानेटकर या युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाच्या संपादक आहेत. मितानिन फाउंडेशनच्या `सलाम पुणे` या उपक्रमाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. उपेक्षितांचं जगणं, त्यांचे प्रश्न आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती-संस्था समाजासमोर आणण्याची त्यांना कळकळ आहे.
