I fear the day that technology will surpass our human interaction. The world will have a generation of idiots.
-Albert Einstein
फार पूर्वीची गोष्ट नाही. तेव्हा उसंत नावाची एक चीज आपल्या आयुष्यात होती. माणसं अंथरुणावर आडवी व्हायची अन् स्वतःशी विचार करत करत हळूहळू झोपेच्या अधीन व्हायची. सकाळी उठल्यावर आवराआवर करून शरीराचं इंजिन सुरू होण्यापर्यंतचा वेळ एका तंद्रीत जायचा. दिवसाला सामोरं जाण्यासाठी हा तंद्रीतला संक्रमण काळ मदत करायचा. कधी ना कधी अशी वेळ यायचीच, की हातात पुष्कळ मोकळा वेळ आहे अन् आपण स्वतःशीच विचार करत बसलोय. गावाला निघालोय आणि गाडीची वाट बघत एखादं पुस्तक हातात धरलंय. पुस्तक बाजूला ठेवून विचारात गुंगलोय. लांबच्या ट्रेन प्रवासाला निघालोय अन् मनात म्हणतोय, चला, आता दोन दिवस आपले आपण; जग गेलं खड्ड्यात! मित्रमंडळींसोबत लांब फिरत फिरत निघालोय, कोणत्याही दुसऱ्या व्यवधानाविना. एकदाही फोनमध्ये न डोकावता. घरात एकटेच आहोत. हाताशी वेळ आहे अन् काय करावं सुचत नाहीये. नुसतेच शून्यात बघत बसलोय. काहीच न करता बसून राहण्यातूनही काही मिळत होतं..
पण हे सारं आता जणू इतिहासात जमा झालंय. मोकळ्या वेळाचं काय करायचं, या प्रश्नाचं अगदी सोपं उत्तर आपल्याला मिळालंय, ते म्हणजे स्मार्टफोनमध्ये डोकं घालायचं! सकाळी उठल्या क्षणापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या फोनने आपला ताबा घेतलेला आहे. ‘सकाळी उठल्यावर आपल्या डोक्यात पहिला विचार फोन चेक करण्याचा येतो' असं कबूल करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढते आहे. वेगवेगळी सर्वेक्षणं पाहिली तर आकडेवारी थोडीफार इकडे-तिकडे होईल, पण साऱ्यांचं निरीक्षण एकच- आपण जगतोय ते या स्मार्टफोनसाठी, अशी परिस्थिती आहे. जगभरात स्मार्ट फोन वापरणाऱ्यांपैकी जवळपास 90 टक्के लोक सकाळी उठल्यावर दहा मिनिटांच्या आत फोन चेक करतात म्हणे! झोप लागता लागता फोन वाजला की आपण त्यात डोकावतोच. एवढंच काय, रात्रीतून जाग आली तरी फोन चेक करणाऱ्यांचं प्रमाण कमी नाही. व्हॉट्सप मेसेज, फेसबुक नोटिफिकेशन, एखादा मेल किंवा एखादा न्यूज अलर्ट, असं काही का असेना, ते त्या क्षणी पाहिलं नाही तर जणू आपल्यावर खटलाच चालवला जाणार आहे!
दिवसभरातही हा फोन आपलं लक्ष त्याच्याकडेच असावं याची पुरेपूर काळजी घेत असतो. माणूस तहान लागल्यावर पाणी पितो, भूक लागली की मगच खातो, नैसर्गिक विधींची भावना झाल्यावरच तिकडे जाऊन येतो; पण आपली स्मार्टफोनशी जवळीक मात्र त्याला अपवाद आहे. खुट्ट वाजलं की आपलं लक्ष त्यात जातं अन् बऱ्याच वेळात खुट्ट वाजलं नाही म्हणूनही जातं. किती वाजले पाहण्यासाठी त्याकडे लक्ष जातं, आपण पाठवलेला मेसेज पाहिला गेलाय की नाही हे पाहण्यासाठी जातं, कोण कधी ऑनलाइन होतं हे तपासण्यासाठी जातं. दिवसातला किती वेळ या फोनने व्यापला असेल? चोवीसातले चोवीस तास, म्हणजे अगदी झोपताना आणि टॉयलेट-बाथरूममध्येही स्मार्टफोन आपल्या सोबत आहे.
सिग्नलला थांबल्यावर आसपास पाहिलं तर त्या दीड-दोन मिनिटांतही फोन बाहेर काढून त्यावर सपासप बोटं चालवणारे महाभाग दिसतात. कोणत्याही एखाद्या चौकातली वर्दळ बघा, मॉल्ससमोर रेंगाळणारी तरुणाई बघा, मॉलच्या कामामधून पाच-दहा मिनिटांच्या ब्रेकसाठी बाहेर आलेले कर्मचारी बघा, चहाच्या-पानाच्या टपऱ्यांसमोर उभी असणारी मंडळी बघा, रस्त्यावरून चालणारी माणसं बघा, रस्त्याकडेला गाडी लावून गप्पा छाटणारी पोरं बघा, दुचाक्यांवर मागच्या सीटवर बसलेली माणसं बघा किंवा चौकातले ट्रॅफिक पोलिस बघा- एक तर लोक फोनवर बोलत असतात किंवा त्यांची बोटं तरी!
स्मार्टफोन कामाच्या वेळेवर अतिक्रमण करतोय हे तर झालंच, पण तो आपल्या फुरसतीच्या अन् उसंतीच्या क्षणांमध्येही घुसखोरी करतोय. माणसाच्या सहजप्रेरणाही आता काही दिवसांनी ॲपड्रिव्हन होतील की काय?
If we tell people that brain is an app, maybe they will start using it.
(अनुभव २०१७ मधील लेखमालिका. माणसं फोनच्या आहारी जाऊ लागल्याची पहिली वहिली चिन्हं दिसू लागली तेव्हा लिहिलेली.)
गौरी कानेटकर | gauri.uniqueportal@gmail.com
गौरी कानेटकर या युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाच्या संपादक आहेत. मितानिन फाउंडेशनच्या `सलाम पुणे` या उपक्रमाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. उपेक्षितांचं जगणं, त्यांचे प्रश्न आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती-संस्था समाजासमोर आणण्याची त्यांना कळकळ आहे.
