आम्ही कोण?
आडवा छेद 

जयपूरची ‘पाक’विरोधी ना‘श्री’ हरकत

  • सुहास कुलकर्णी
  • 26.05.25
  • वाचनवेळ 6 मि.
  • Share on Tweeter
  • Share on Whatsapp
  • Share on Facebook
pak shree

परवा एक बातमी वाचण्यात आली. जयपूरमधील मिठाईवाल्या दुकानांनी ज्या पदार्थांच्या नावांमध्ये ‘पाक’ असा शब्द आहे, त्या पदार्थांची नावं बदलल्याचं बातमीत म्हटलं होतं. पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारत-पाकिस्तानमधील ताणलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेल्याचंही सांगितलं गेलं. ‘पाक’ शब्द असलेल्या पदार्थांची नावं बदला अशी ग्राहकांची मागणी होती त्यामुळे हा बदल केला गेल्याचं दुकानदारांचं म्हणणं होतं. पाक या शब्दामुळे पाकिस्तानची आठवण येते आणि त्यामुळे आनंद किरकिरा होतो, अशी ग्राहकांची भावना होती म्हणे!

या मागणीमुळे म्हैसूर पाक या प्रसिद्ध मिठाईसह मोती पाक, चांदीभस्म पाक, सुवर्णभस्म पाक, केसर पाक, आमपाक वगैरे मिठायांच्या नावातील पाक हा शब्द वगळून त्याऐवजी ‘श्री’ हा शब्द जोडला गेला. त्यामुळे या मिठायांची नावं म्हैसूर श्री, केसर श्री वगैरे बनली आहेत. हा बदल जयपूरमधील बहुतेक दुकानदारांनी केल्यामुळे तो बातमीचा विषय बनला.

कुणी म्हणेल, असल्या बातम्या वाचाव्यात आणि सोडून द्याव्यात! शेकडो वर्ष रुळलेली नावं कुठल्याश्या गावात बदलली गेली म्हणून ती देशभरातून गायब होणारेत की काय? नामांतराचा लोंढा आला की असं काही घडणारच, असंही कुणी म्हणेल. पण मुद्दा तो नाही. जयपूरमधील आणि एकूणही देशातील लोकांमध्ये पाकिस्तानच्या कुकर्मांबद्दल किती टोकाची भावना आहे हे या घटनेतून कळतं, त्यामुळे ही बातमी महत्त्वाची आहे. लोकांना पाकिस्तानची आठवणही नको आहे इतकी तीव्र भावना लोकांमध्ये तयार झालेली दिसते आहे.

भावना जेव्हा तीव, अतितीव्र होतात तेव्हा अनेकदा तारतम्य सुटतं. विचारांवर भावना स्वार होतात आणि माणसं भावनांमध्ये वाहून जातात. जयपूरमधील बातमी कळलेल्या अनेकांची प्रतिक्रिया अशीच असणार. पदार्थांची नावं बदलून पाकिस्तानवर काय परिणाम होणार आहे, असा प्रश्न त्यामुळेच विचारला जाणं स्वाभाविक आहे. अनेकजण तर जयपूरच्या दुकानदार आणि ग्राहकांची आणि त्या अनुषंगाने या मानसिकतेची खिल्लीही उठवत आहे. पाकिस्तानमधील पाक आणि म्हैसूर पाकमधील पाक हे वेगवेगळ्या अर्थांचे आणि वेगवेगळ्या भाषांतील शब्द आहेत, हे जयपूरवाल्यांना कसं माहीत नाही, असं विचारलं जात आहे. पाकिस्तानच्या कृती नापाक असल्या तरी त्यातील पाकचा अर्थ पवित्र असा आहे आणि हा शब्द फार्सीतून आला आहे. दुसरीकडे म्हैसूरपाक मधील पाकाचा संबंध साखरेच्या द्रावणाशी आहे. हिंदी भाषेतही पाकचा संबंध पकवणं, शिजवणं याच्याशी आहे. पण सुतावरून स्वर्ग गाठण्याच्या मानसिकतेतून या शब्दांची गल्लत झाली आहे. सोशल मिडियातही त्यावरून बरंच काही बोललं जात आहे.

खरं पाहता ज्या मिठायांची नावं बदलली गेली आहेत, ते सर्व पदार्थ पाकातले आहेत. त्यातील म्हैसूर पाक या मिठाईचा जन्म तर म्हैसूरच्या राजवाड्यात झाला आहे. कृष्णराज वडियार (चौथे) यांच्या काकामुरा मुरप्पा या मुख्य स्वैपाक्या (सुशेफ!)ने हा पदार्थ एका मेजवानीच्या वेळी बनवला आणि राजाला खिलवला, असं सांगितलं जातं. ऐनवेळी झटपट तयार होईल असा हा पदार्थ होता. तो राजाला आवडला म्हणून तो त्याच्या राज्यात सर्वांना मिळावा अशी इच्छा त्याने व्यक्त केली. त्याप्रमाणे सगळ्या म्हैसूर प्रांतात हा पदार्थ बनवला गेला आणि पसंतीसही पडला. हा पदार्थ एका हिंदू स्वैपाक्याने हिंदू राजासाठी बनवला होता. त्यात पाकिस्तानचा संबंध कुठून येणार! एवढंच काय पाक हा शब्द वैदिक संस्कृतमध्येही आहे म्हणतात. यजुर्वेदामध्ये पीष्ठपाक म्हणजे दळलेल्या धान्यापासून बनवलेला पदार्थ असा उल्लेख आहे. या पाकाचा पाकिस्तानच्या पाकशी काडीचा संबंध नाही. पण असा तर्काने विचार करण्याचा विषय भावना प्रधानतेत बराच मागे पडलेला असतो.

या विषयाच्या अनुषंगाने अनेक लोक मजा करून घेत आहेत. कुणी म्हणतंय की आपल्याकडील पाकशास्त्र हा शब्द बदलून आता श्रीशास्त्र करायचा का? कुणी म्हणतंय, पाककला श्रीकला म्हणून ओळखायची का? कुणी म्हणतंय स्वयंपाकला स्वयंश्री म्हणायचं का? पण अजूनही घरात स्त्रियाच या कार्यात गुंतलेल्या असतात, मग स्वयंश्रीऐवजी स्वयंश्रीमती म्हणायचं का? पाकिजा सिनेमाचं नावही श्रीजा करून टाका, असंही कुणी म्हटलं असेल.

चेष्टा सोडा, मुद्दा त्याही पलिकडचा आहे. आपल्या समाजाला अशा भावनिक आणि प्रतीकात्मक प्रतिक्रिया देण्याची सवय लागण्याचा आहे. अशा कृती करून आपण काहीतरी भलंच करतो आहोत, अशी समाधानाची भावना तयार होण्याचा आहे. मिठायांचा नावबदल ही तर केवळ झलक आहे. पाकिस्तानसोबतच्या संघर्षाच्या काळात तुर्कीये आणि अझरबैजान या देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दिल्यामुळे निषेध म्हणून अनेक भारतीय पर्यटकांनी तिकिटं रद्द केल्याची बातमी आली होती. असं केल्याने या देशांच्या अर्थव्यवस्थेला धक्का पोहचेल अशीही भावना व्यक्त केली गेली. पुण्यातल्या फळव्यापाऱ्यांनी तुर्कीयेतून येणारी सफरचंद नाकारली, अशीही बातमी आली. या नामबदलाच्या पुढच्या कृती म्हणता येतील. अशी पावलं उचलून आपण त्या देशांवर बहिष्कार घालू आणि त्यातून त्यांची आर्थिक नाकेबंदी होईल असं अनेकांना वाटून गेलं.

प्रत्यक्षात काय आहे? तुर्कीयेसोबत आपली आयात कमी आहे आणि निर्यात जास्त आहे. आपण त्यांच्याकडे पेट्रोलियम, वाहनं आणि त्याचे सुटे भाग, स्टील, रसायनं, औषधं, कापड निर्यात करतो, त्याचं मूल्य ५.२ अब्ज डॉलर्स एवढं आहे. या उलट आपण त्यांच्याकडून क्रूड पेट्रोलियम, संगमरवर, सोनं, प्लास्टिक वगैरे आयात करतो. त्याचं मूल्य २.९ अब्ज डॉलर्स आहे. आपण त्याची सफरचंद खाणं बंद केलं आणि त्यावर प्रतिक्रिया म्हणून त्यांनी आपली निर्यात रोखली तर नुकसान कुणाचं आहे? आंतरराष्ट्रीय व्यापार असा होत नसतो हे खरं पण जर-तरच्या भाषेत विचार करायचा तर नुकसान आपलंच होणार आहे. थोड्या फार फरकाने अझरबैजानबद्दलही असंच म्हणता येईल. जग देवाणघेवाणीच्या गरजेनुसार चालतं. प्रतिकात्मककृती करून फक्त समाधान मिळतं, हाती ठोस काही लागत नाही. चिनी मालावर बहिष्कार घाला अशी हाक अधूनमधून दिली जाते. काही लोक भाबडेपणाने चिनी प्लास्टिकची खेळणी आणि गृहोपयोगी वस्तू न घेण्याचा निर्धार करतात, पण तेव्हाच भारत सरकार चीनकडून हजारो कोटी डॉलर्सच्या वस्तू किंवा सेवा आयात करत असतं किंवा त्यासाठी परवानगी देत असतं. जग या मोठ्या आथिक व्यवहारांवर चालत असतं. खेळणी आणि सफरचंदांवर चार दिवसांचा बहिष्कार टाकून काहीही घडत नसतं.

जाता जाता आणखी एक गोष्ट. तुर्की सफरचंदांवर बहिष्कार टाकल्याने काश्मीरमधील सफरचंद उत्पादक आणि विक्रेते खुश झालेत अशा बातम्या आल्या. पण प्रत्यक्षात काश्मिरी सफरचंदांना तुर्कीपेक्षा इराणमधून येणाऱ्या सफरचंदांची स्पर्धा जास्त आहे, असंही कळतं. पण इराणने भारतविरोधी भूमिका न घेतल्याने त्यांच्यावर आपले अतिउत्साही ग्राहक बहिष्कार टाकणार नाहीत! मजाच आहे सगळी! प्रत्यक्षात इराणी सफरचंदाच्या आवकीमुळे आपला उत्पादक संकटात कसा येणार नाही हे पाहणंही आपली प्राथमिकता असायला हवी.

आंतरराष्ट्रीय व्यापार, आंतरराष्ट्रीय व्यवहार आणि फुटकळ भावनाप्रधान प्रतीकात्मक कृती यांचा एकमेकांशी काडीचा संबंध नाही. लोकमान्य टिळकांनी परदेशी कपड्यांची होळी करण्याचा कार्यक्रम जनतेमध्ये जागृती घडवण्यासाठी दिला होता. महात्मा गांधींनी स्वदेशी कापड निर्मितीची चळवळ उभारून मँचेस्टरला आव्हान दिलं होतं. त्या संघटित कृती होत्या. त्यांचा परिणामही मोठा होता. पण हल्ली ज्या फुटकळ कृती करून देशसेवेचं समाधान मिळवणं चालू आहे तो वृथा देशाभिमान आहे. जयपूरचा मिठाई नाम बदल त्यामुळे हसण्यावारी नेण्याचा विषय बनला आहे.

सुहास कुलकर्णी | uniquefeatures.portal@gmail.com

सुहास कुलकर्णी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. गेली तीन दशकं ते राजकीय प्रक्रियांचं विश्लेषण करत आले आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 1

Santosh Dalvi27.05.25
Sarva Baju atishay chan paddhatine mandli aahe.Chan lekh 👍
See More

Select search criteria first for better results