
२९ एप्रिल १९५८ या दिवशी जवाहरलालांनी राजीनामा देण्याची इच्छा जाहीर केली. काँग्रेस संसदीय पक्षापुढे खुलेपणाने त्यांनी ही इच्छा व्यक्त केली होती. आपल्याला आयुष्यात थकवा व नीरसता जाणवत असल्याचं कारण त्यांनी दिलं होतं. ते म्हणाले होते, “पंतप्रधानपदाच्या कामात उसंत मिळत नाही. ते अविरत चालणारं आणि कधीही न थांबणारं आहे... शांतपणे विचार करण्यासाठी फारच थोडा वेळ मिळतो. मला वाटतं, मी या दैनंदिन ओझ्यातून स्वत:ला मुक्त केलं पाहिजे आणि भारताचा एक साधा नागरिक म्हणून स्वतःचा विचार केला पाहिजे.” त्या वेळी त्यांचं वय ६८-६९च्या दरम्यान होतं. जवळपास एक तप ते पंतप्रधानपदावर कार्यरत होते, तरीही त्यांच्या निम्म्या वयाला साजेल इतके ते तंदुरुस्त व उत्साही होते. ते दररोज नियमितपणे योगासनं करत आणि रात्री उशिरापर्यंत कामात व्यग्र असत. तरीही राजीनामा देण्याचा त्यांचा प्रस्ताव अवास्तव होता असं मानण्याचं कारण नव्हतं. त्यांचा प्रस्ताव स्वीकारला गेला असता तर विकसनशील जगात एक लोकशाही परिमाण स्थापित झालं असतं. तोपर्यंत नव्याने स्वतंत्र झालेल्या कोणत्याही देशाच्या पहिल्या नेत्याने स्वेच्छेने राजीनामा दिला नव्हता. १९७०च्या दशकापर्यंत ही स्थिती होती. पण काँग्रेस संसदीय पक्षाने हा विचार मान्य केला नाही, किंबहुना त्यांच्या विधानाने धास्तावून सदस्यांनी तातडीची बैठक बोलावली व नेहरूंना पदावर कायम राहण्याची विनंती केली. अमेरिकेचे आयसेनहॉवर व रशियाचे ख्रुश्चेव्ह यांनी नेहरूंना पत्र लिहून ते पद सोडणार नाहीत अशी आशा व्यक्त केली. अखेरीस राजीनाम्याऐवजी दीर्घकाळ सुटीवर जाणं त्यांनी पसंत केलं. सुटी घालवण्यासाठी ते त्यांच्या आवडत्या पर्वतराजीमध्ये गेले. तिथे डॉक्टरांनी रोखण्याआधी त्यांनी उत्साहाच्या भरात १३,६०० फुटांपर्यंत चढाई केली होती.
या सुटीमध्ये त्यांच्या कन्या इंदिरा त्यांच्याबरोबर होत्या. त्या त्यांच्या अधिकृत काळजीवाहक बनल्या होत्या. यासाठी त्यांनी स्वत:च्या वैवाहिक जीवनावर विपरीत परिणाम होण्याचीही पर्वा केली नाही. आपल्या पित्याची पूर्णवेळ जबाबदारी सांभाळण्यासाठी जेव्हा त्यांनी पंतप्रधान निवासात मुक्काम हलवला तेव्हा फिरोज गांधींनी मात्र दूर राहणं पसंत केलं. फिरोज गांधी संसदेत काँग्रेसचे सदस्य होते; मात्र स्वत:च्या सरकारला धारेवर धरण्याबद्दल त्यांची ख्याती होती. जेव्हा इंदिरांनी त्यांच्याऐवजी पित्याला आधार देण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याबद्दल फिरोजनी तीव्र संताप व्यक्त केला होता. फिरोज आणि इंदिरा औपचारिकरीत्या विभक्त झाले नसले, तरी या घटनेनंतर त्यांच्या संसाराचा केवळ सांगाडाच शिल्लक राहिला होता. त्यांच्यातील प्रेम म्हणजे निव्वळ उपचार उरला होता. १९५८ मध्ये फिरोजना हृदयविकाराचा पहिला झटका आला. सप्टेंबर १९६० मध्ये हृदयविकाराच्या दुसऱ्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून इंदिरा आजारी पडल्या. जवाहरलालांना स्वत:ला वैवाहिक जीवनाचा आनंद क्वचितच उपभोगता आला होता. त्यांच्या कन्येचं वैवाहिक जीवनातील समाधान हिरावून घेतल्याबद्दल त्यांनी स्वत:ला दोष दिला होता का? तसं असेल तर ते त्यांनी कधी जाहीर तरी केलं नाही.

काही टीकाकारांचा तर्क आहे, की नेहरू आपली उत्तराधिकारी म्हणून कन्येला तयार करत होते. मात्र, त्यांच्या मनात कधी असा काही विचार आला होता याचे पुरावे नाहीत. अर्थात, नेहरूंची काळजी घेण्यासाठी इंदिरा सतत त्यांच्यासोबत राहिल्या असल्याने त्यांना अगदी जवळून अनन्यसाधारण असं राजकीय शिक्षण मिळत होतं. त्यांनी लवकरच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणातील आपली रुचीही सूचित केली. तथापि, संभाव्य उत्तराधिकारी म्हणून उत्तेजन देण्यासाठी जवाहरलालांनी त्यांना आपल्या मंत्रिमंडळात स्थान दिलं नव्हतं. ‘नेहरूंनंतर कोण?' (आफ्टर नेहरू हू?) या वेल्लेस हँगन यांच्या १९६३ मधील पुस्तकातही अनेक नावांमध्ये एक नाव इंदिरांचं होतं. नेहरूंनी इंदिरा गांधींना राजकारणात येण्यासाठी प्रोत्साहन दिलं असं मानायला एकच पुरावा आहे. काँग्रेस पक्षातील इतर नेत्यांनी त्यांच्या कन्येला १९५३ मध्ये प्रथम पक्षाच्या महिला आघाडीच्या संघटक म्हणून आणि पुढे १९५९ मध्ये काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर निवड करून राजकारणात ओढलं तेव्हा नेहरूंनी आक्षेप घेतला नाही. या अधिकारपदांवर इंदिरा यांचा आक्रमकपणा व पक्षपातीपणा दिसून आला. केरळमधील लोकनियुक्त कम्युनिस्ट सरकारच्या विरोधात त्यांनी काँग्रेसला रस्त्यावर उतरवलं आणि राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरल्याबद्दल सरकार बरखास्त करण्यासाठी भारत सरकारवर दबाव आणला. मात्र, काँग्रेसच्या अध्यक्षपदावर पुनर्निवडीसाठी इंदिरा गांधींनी प्रयत्न केला नाही आणि नेहरूंनीही त्यांना प्रोत्साहन दिलं नाही.
१९६१ मधील एका मुलाखतीत लोकशाहीचे पुरस्कर्ते असलेल्या नेहरूंना उत्तराधिकाऱ्याच्या मुद्द्याशी थेट सामना करावा लागला. त्यांनी उत्तर दिलं, (माझ्या मृत्यूनंतर) “मी काही मृत्यूनंतर राज्य करत राहू शकत नाही आणि घराणेशाही सुरू करण्याचाही माझा प्रयत्न नाही. मी नेहमी लोकशाही शासनप्रक्रियेविषयी बोलत असतो. मीच जर माझ्या उत्तराधिकाऱ्याची निवड करण्याचा प्रयत्न केला तर ते किती भयंकर असेल! मी जास्तीत जास्त माझ्या जनतेला नवं नेतृत्व निर्माण करण्यास मदत करू शकतो- ज्याची कदाचित आज खरी गरज आहे.” तथापि, १९६१ साल संपेपर्यंत, थकवा स्पष्ट दिसत असूनही त्यांनी निवृत्तीचा विचार पूर्णपणे सोडून दिला. नॉर्मन कझिन्सनी नेहरूंना त्याबद्दल विचारलं असता त्यांच्या चेहऱ्यावर नकोसा प्रश्न विचारल्याचा भाव उमटला होता. जणू यापेक्षा वाईट प्रश्न त्यांना कधी विचारला गेला नव्हता. कझिन्सनी म्हटलं, “नेहरूंचं आपल्या कामावर प्रेम आहे आणि ते सोडण्याचा त्यांचा विचार नाही याची जाणीव आम्हाला झाली.” दुर्दैवाने विश्वासार्ह पर्यायी नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ते तयार करण्यासाठी त्यांनी फारसं काही केलं नाही.
परंतु नेहरूंऐवजी दुसऱ्या नेत्याचा विचार करणं सोपं नव्हतं. नेहरूंकडे अपरिमित ऊर्जा होती. ते दिवसाचे सोळा-सतरा तास कामासाठी देत होते. ते वक्तशीर व विनयशील होते. जीवनात त्यांनी नियमितता जपली होती. साधा आहार आणि योगासनांच्या नियमिततेतून त्यांनी प्रकृती उत्तम राखली होती. इतरांपेक्षा ते स्वत:कडून कामाच्या जास्त अपेक्षा ठेवत होते. त्यांचे पहिले मुख्य व्यक्तिगत सचिव एच. व्ही. अय्यंगारांनी सांगितलेली एक आठवण अशी , की ‘ऑगस्ट १९४७ मध्ये दिवसभर पंजाबच्या दंगलग्रस्त भागाचा दौरा करून आम्ही खूप थकलो होतो आणि परिस्थितीच्या विदारकतेने खूप उदास झालो होतो. मध्यरात्रीच्या सुमारास आम्ही निरोप घेतला. पुन्हा सकाळी सहा वाजता तितकाच थकवणारा व उदास करणारा आणखी एक दौरा आम्हाला सुरू करायचा होता. शारीरिक व मानसिक थकव्याने मी झोपी गेलो. सकाळी लवकर उठून तयार होण्यास मला थोडा त्रासच झाला. विमानतळावर जाण्यास मी सज्ज झालो तेव्हा नेहरूंच्या व्यक्तिगत मदतनिसाने मला पत्रं, तारा व स्मरणयाद्यांचा ढीग दाखवला. आम्ही सर्वजण गेल्यानंतर पंतप्रधानांनी मजकूर सांगून ती लिहून घेतली होती. ते रात्री दोन वाजता झोपले होते आणि पहाटे साडेपाच वाजता नव्या दिवसासाठी सज्ज झाले होते.' अय्यंगारांच्या मते नेहरूंच्या शरीरावर मनाने पूर्ण विजय मिळवला होता. त्यांच्या कामाचा भयंकर वेग हे त्याचंच लक्षण होतं.
या क्षमतेची नकारात्मक बाजू नेहरूंच्या तपशिलाच्या हव्यासात होती. पंतप्रधानांनी स्वत: लक्ष घालण्याइतक्या महत्त्वाच्या नसलेल्या बाबींवरही त्यांचा वेळ खर्च होत असे. भिंतीवर चित्र नीट टांगलेलं नसणं किंवा खोलीतील अस्ताव्यस्तता अशा छोट्या छोट्या गोष्टींनीही ते अस्वस्थ होत असत. इतके, की त्या गोष्टी व्यवस्थित झाल्याशिवाय ते काम करू शकत नसत. पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांच्या फायलींच्या तपशिलाचा ते इतका पिच्छा पुरवायचे की फारच थेोडे मंत्री तितका वेळ त्यासाठी खर्च करत असतील. एका मुत्सद्दी अधिकाऱ्याने सांगितलेली आठवण अशी, की ‘सरकारी नोकरांचा बराचसा भार पंडितजी हलका करत. मला वाटतं, नोंदी करणे, मसुदा तयार करणे, प्रत्येक प्रकारच्या पत्राला उत्तर देणे अशी कामं करताना त्यांना आपल्या अधिकाऱ्यांना त्यांच्याच कामात मात दिल्याचा आनंद मिळत असे... कागदपत्रांचा त्वरित निपटारा करणं त्यांना आवडायचं; पण असं करताना संबंधित विषयावरील आधीच्या पत्रव्यवहाराचा मागोवा घेण्याची गरज असते, हा मूलभूत नियम ते सोडून देत असत. यात भर म्हणजे पंतप्रधानांनी प्राधान्याने लक्ष देण्याच्या अनेक गोष्टी आहेत याचं भान न राखता गप्पांमध्ये रमण्याची त्यांची वृत्ती होती.' १९५०च्या दशकातील एका ब्रिटिश अधिकाऱ्याने नोंदवलेलं हे निरीक्षण याला दुजोरा देतं. ‘त्यांना जगातल्या नाना गोष्टींबद्दल गप्पा मारणं आवडायचं. जेव्हा मी त्यांच्याबरोबर होतो तेव्हा त्यांनी निव्वळ गप्पा मारल्या. ते चमत्कारिक होतं. मला आश्चर्य वाटलं. ते केवळ बोलतच होते.'
याची बीजं कदाचित जवाहरलालांच्या तारुण्यात रोवली गेली असावीत. स्वत:चा हुकूम गाजवण्याची वृत्ती असलेल्या मोतीलालांनी त्यांच्या मुलाला अति लाडाने बिघडवलं; पण त्याचबरोबर एखाद्या नेत्यासाठी गंभीर ठरू शकतो असा एक दोषही त्यामुळे त्यांच्यात तयार झाला असावा. तो म्हणजे त्याने घेतलेल्या निर्णयाची अंतिम जबाबदारी आपल्याऐवजी अन्य कोणाकडे तरी आहे असा समज. आधी पिता आणि नंतर महात्मा गांधी सोबत असल्याच्या जाणिवेमुळे जवाहरलालांमध्ये ठोस निर्णय न घेण्याच्या प्रवृत्तीला प्रोत्साहन मिळालं. चालढकल व द्विधावस्था, खूप विचार करणं व भावनेत गुंतणं हेदेखील त्याचेच परिणाम होते. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात सुभाषचंद्र बोसांनी याबद्दल त्यांच्यावर कटू टीका केली होती. नंतर त्यांच्या कार्यकाळाच्या उत्तरार्धात या प्रवृत्तीचे दुर्दैवी परिणाम दिसून आले. त्यांचे जिवलग मित्र सैद महमूद यांच्या मते ‘निर्णयाच्या अंमलबजावणीच्या शेवटच्या स्तरापर्यंत पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने जवाहरलालांची घडण झाली नव्हती.'
सदैव व्यस्त असलेल्या पंतप्रधानांच्या असामान्य घराची सूत्रं इंदिरा व जवाहरलालांकडे होती. त्यांचं निवासस्थान विविध प्रकारच्या प्राण्यांनी गजबजलेलं होतं. त्यात विविध जातींची कुत्री, हिमालयीन पांडाची एक जोडी, मोर व पोपट, खारी, हरणं आणि वाघाचे तीन छावे होते (घरात ठेवणं अवघड होईल इतके मोठे होईपर्यंत ते घरात होते). इंदिरा यांची मुलं राजीव आणि संजय घरभर हुंदडत असत. कधी कधी आजोबांना ते अक्षरश: घोडा करून त्यांच्या पाठीवर स्वार होत असत. तीन मूर्ती भवन सतत पाहुण्यांनी भरलेलं असे. त्यात वर्षातून एकदा एडविना माऊंटबॅटनचा इथे मुक्काम असे. संध्याकाळच्या जेवणाला मित्र टपकत असत. मग केंब्रिजचे टेबल मॅनर्स पाळत अलाहाबादी भोजन रंगत असे. तीन मूर्ती भवनाच्या उद्यानात ‘खुल्या भेटी'साठी सामान्य माणसं गर्दी करत. कोणाला अर्ज-विनंत्या करायच्या असत, कोणाला पंतप्रधानांशी बोलायचं असे, तर कोणी केवळ त्यांच्या दर्शनासाठी आलेले असत.
जवाहरलालांचं व्यक्तिमत्त्व चंचल होतं. संपूर्ण अनोळखी व्यक्तींसाठी ते आकर्षक, मोहक, थट्टेखोर, मनमिळाऊ असे होते. कधी (मूड असेल तर) ते गमतीजमतीही करत. सायंभोजनाच्या वेळी त्यांनी आपल्याला भेटलेल्या जागतिक नेत्यांच्या नकला केल्याच्या नोंदी आहेत. परदेश दौऱ्यांत त्यांना भेट मिळालेले त्या त्या ठिकाणचे राष्ट्रीय पेहराव ते अनेकदा संध्याकाळच्या भोजनाला आलेल्या पाहुण्यांना परिधान करण्यास भाग पाडत असत. १९३० किंवा अगदी १९५०च्या दशकातही त्यांना भेटलेल्या अनेक परदेशी व्यक्ती त्यांची नजर खिळवून ठेवणारी देहयष्टी, त्यांची वैचारिक रुंदी, त्यांची बुद्धिमत्ता व जिज्ञासा तसेच त्यांचे काटेकोर शिष्टाचार याबद्दल बोलत असत. त्यांच्याशी चर्चा करणाऱ्यांना ते आपल्या प्रेमळपणाने, व्यवहारज्ञानाने व सौजन्यपूर्ण वर्तणुकीने नि:शस्त्र करत असत. (फिलिप्स टालबोट नेहरूंना १९३९ साली पहिल्यांदा विद्यार्थी म्हणून भेटले होते. त्यानंतरच्या पंचवीस वर्षांत पत्रकार, विचारवंत व मुत्सद्दी अशा विविध रूपांत त्यांच्या भेटी झाल्या. पहिल्या भेटीनंतर जवळजवळ सहा दशकांनंतरही त्यांचं म्हणणं होतं, ‘नेहरूंविषयी वस्तुनिष्ठ विचार करणं मला अजूनही कठीण वाटतं. ते प्रचंड चित्तवेधक, प्रेमळ, बुद्धिमान, तल्लख होते. अगदी ते संतप्त होत तेव्हाही प्रेरक असत.') अभिनेते व चित्रपट निर्माते चार्ली चॅप्लिन यांनीही त्यांच्या आत्मचरित्रात नेहरूंविषयी एक गमतीदार आठवण सांगितली आहे. चॅप्लिननी १९५३ मध्ये नेहरूंबरोबर त्यांच्या गाडीतून प्रवास केला होता. स्वित्झर्लंडच्या डोंगराळ रस्त्यांवरून त्यांचा ड्रायव्हर ताशी ७० मैल अशा धडकी भरवणाऱ्या वेगाने गाडी चालवत होता, त्यामुळे चॅप्लिनची भीतीने गाळण उडाली होती, पण मागच्या सीटवर नेहरूंची मात्र उत्साहाने अखंड बडबड चालू होती.
नेहरूंचे जिवलग मित्र सैद महमूद त्यांना जेव्हा पहिल्यांदा भेटले तेव्हा त्यांच्या शिष्टाचारांनी ते लगेच प्रभावित झाले होते. त्यांचे शिष्टाचार उच्चवर्गीय इंग्रजांचे होते, पण त्यांच्या सौजन्याची व विचारांची पद्धत मात्र पूर्णपणे भारतीय होती. रेल्वेतून रात्रीचा प्रवास करताना बिछाना अंथरण्याचा व गुंडाळण्याचा कंटाळा येतो आणि त्यामुळे आपण नोकरांवरच अवलंबून राहतो, असं महमूद यांनी सांगितल्यावर नेहरूंनी ते काम स्वत:कडे घेतलं. पुढे जेव्हा जेव्हा दोघांनी एकत्र प्रवास केला तेव्हा त्यांचा बिछाना घालण्याचं काम नेहरू स्वत: करत असत.
घानाचे नेते क्वामे नक्रुमाह यांनी सांगितलेल्या आठवणीनुसार एका हिवाळ्यात ते भारताच्या भेटीवर आले होते. थंडीच्या दिवसांत रेल्वेने ते उत्तरेकडे जाण्यास निघाले होते, तेव्हा नेहरू अनपेक्षितपणे स्टेशनवर आले. ढगळ ओव्हरकोटमध्ये ते विचित्र दिसत होते. ते म्हणाले, “मला माहीत आहे, हा माझ्यासाठी खूप ढगळ आहे. तुमच्यासाठी हा जास्त योग्य आहे असं मला वाटतं... घालून पाहा.” नक्रुमाह यांनी तो अंगावर चढवला. त्यांना तो साजेसा होता. त्यांनी सहजपणे आपले हात कोटाच्या खिशांमध्ये घातले आणि ते पुन्हा चकित झाले. एका खिशात उबदार शाल होती आणि दुसऱ्या खिशात उबदार हातमोजे होते.
हे सौजन्य केवळ अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठीच नव्हतं. काश्मीरच्या एका दौऱ्यात त्यांच्या स्टेनोग्राफरची सुटकेस हरवल्यामुळे तो साध्या कॉटन शर्टात थंडीने कुडकुडत होता. तेव्हा त्याला स्वेटर आणि जाकीट पुरवण्यासाठी जवाहरलालांनी स्वत: लक्ष घातलं होतं. जवाहरलाल आपल्या भावंडांचे वाढदिवस कधीही विसरले नाहीत. अगदी तुरुंगात असतानाही. मुलांशीसुद्धा ते प्रेमाने वागत. इतके, की ते हयात असतानाच त्यांचा वाढदिवस संपूर्ण भारतात ‘बालदिन' म्हणून साजरा होऊ लागला होता.
तथापि, हेच जवाहरलाल कठोर आणि रागीटसुद्धा होते. स्वत:चा बचाव करण्याच्या स्थितीत नसलेल्या काही दुर्दैवी अधिकाऱ्यांची ते जाहीर खरडपट्टी काढत असत. श्रीलंकेचे नेते सालोमन बंदरनायके यांनी त्यांचं वर्णन ‘नाजूकपणे जोपासना झालेला संवेदनशील मनाचा सभ्य गृहस्थ' असं केलं होतं. त्यांच्या मते ‘चिंता करण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे ते कधी कधी चिडचिडे व रागीटसुद्धा होत असत.' बंदरनायके यांच्या एका गमतीदार आठवणीनुसार दुपारच्या भोजनाच्या वेळी त्यांच्या चाहत्यांनी केलेल्या गर्दीमुळे चिडून जवाहरलाल ओरडले होते, ‘मी लोकांमध्ये जेवूच शकत नाही.' त्यामुळे गर्दीला पांगवण्यात आलं. बंदरनायके यांनी मनात म्हटलं होतं, ‘हा खरा संवेदनशील सभ्य गृहस्थ बोलतो आहे.' नेहरू दूरस्थपणे आणि तटस्थपणेसुद्धा वागू शकत. जणू त्यांच्याशी संभाषण करणाऱ्या व्यक्तीला सोडून ते इतर अन्य कोणाचा तरी विचार करत असावेत. आणि अगदी पाहुण्यांचं स्वागत करतानासुद्धा (विशेषत: त्यांच्या उत्तरकाळात) ते दीर्घ आणि अभेद्य मौनात जात असत. ते केवळ लहरी होते असं नव्हे, तर अनेकदा त्यांच्यात आणि त्यांच्या जवळच्या व्यक्तींमध्येदेखील एक पडदा जाणवत असे. अनेकदा त्यांचं वर्णन ‘भारतातील सर्वांत एकाकी माणूस' असं केलं गेलं.
(‘नेहरू : द इन्व्हेन्शन ऑफ इंडिया' या शशी थरूर लिखित पुस्तकाचा मनोहर सोनवणे यांनी केलेला अनुवाद ‘शोध नेहरूंचा आणि भारताचाही' या नावाने समकालीन प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. त्यातील हा संपादित भाग.)