अगाथा ख्रिस्ती. रहस्यकथांची अनभिषिक्त महाराज्ञी अशी तिची जगभरातील ओळख. आजवर मानल्या गेल्या तशा अगाथाच्या कथा निव्वळ ‘सुखावह’ रहस्यकथा नाहीत, तर महायुद्धोत्तर भांडवलशाहीतील नैतिक पतनावर भाष्य करणाऱ्या एका भयस्वप्नाचा पट त्यातून विणला जातो. तिच्या वाङ्मयाचे काहीसे निराळे आकलन करणारा हा लेख. परवाच झालेल्या तिच्या जन्मदिनानिमित्त.
Money, money, money! I think of money
morning, noon and night! I dare say it
is mercenary of me but there it is!
- The Secret Adversary, 1922
दोन महायुद्धांदरम्यान होरपळणाऱ्या इंग्लंडची चित्रगुप्त बनून तिथल्या सामूहिक पाप-पुण्याचा हिशोब मांडण्याचा एक आगळा खेळ अगाथा ख्रिस्ती नामक रहस्यकथांच्या महाराज्ञीने आरंभला होता. शतकभराच्या कालखंडानंतर या लेखाच्या निमित्ताने अगाथाच्या मायाजालाला पुन्हा एकदा भेट द्यावीशी वाटली ती तीन कारणांमुळे.
एक म्हणजे अगाथाच्या लेखनाची नुकतीच साजरी झालेली शताब्दी. तिचा जगप्रसिद्ध गुप्तहेर हर्क्युल पॉयरॉ अवतीर्ण झाला ती ‘मिस्टेरिअस अफेअर्स ॲट स्टाईल्स’ ही कादंबरी लंडन टाइम्समध्ये १९२० साली क्रमश: प्रसिद्ध झाली होती. त्यानंतरची शंभर वर्षे अगाथाने जगभरातील रहस्यकथांच्या वाचकांवर अनिभिषिक्त राज्य केले. एकंदर सहासष्ट कादंबऱ्या; चौदा कथासंग्रह; ‘माऊसट्रॅप’सारखी काही गाजलेली नाटके; तितकेच गाजलेले आत्मचरित्र आणि ‘कम, टेल मी हाऊ यू लिव्ह’ (१९४६) सारखी आत्मचरित्रात्मक कादंबरी; मेरी वेस्टमाकॉट या टोपणनावाने लिहिलेल्या कादंबऱ्या असा अतिप्रचंड साहित्यसंभार अगाथाच्या खात्यावर जमा आहे. आजवर या पुस्तकांच्या दोनशे कोटींहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. आणि जगभरातल्या सुमारे पन्नास निरनिराळ्या भाषांमध्ये त्यांची भाषांतरे झाली आहेत. (मराठीतही प्रा. मधुकर तोरडमल यांनी अगाथाच्या अनेक कादंबऱ्यांचे सुरस भाषांतर केले आहे. परंतु या भाषांतरास त्यांची चिकित्सक प्रस्तावना मात्र नाही.)
युनेस्कोने प्रसिद्ध केलेल्या भाषांतर मापदंडानुसार अगाथाच्या पुस्तकांची सात हजारांहून अधिक भाषांतरे उपलब्ध आहेत. (तिच्या खालोखाल नंबर लागतो तो ज्यूल्स व्हर्न या विज्ञान लेखकाचा आणि त्यानंतर शेक्सपिअरचा!) बायबल आणि शेक्सपियर यांच्या बरोबरीने सर्वाधिक आणि सार्वकालिक लोकप्रिय कादंबरीकार म्हणून अगाथाने आपली कीर्ती गेली शंभर वर्षे कायम राखली आहे.
तिच्या कादंबऱ्यांवर-कथांवर आधारित कितीतरी चित्रपट; दूरचित्रवाणीवरील रहस्यमालिका, रुपांतरित नाटके; व्हिडिओ गेम्स केवळ ब्रिटिश आणि आंग्लभाषिक समाजांसाठीच नव्हे तर सुदूर पूर्वेकडच्या आशियाई देशांमधेही रचले गेले. भारतातही बंगाली, मल्याळी, हिंदी चित्रपट-नाटककारांनी कधी तिला श्रेय देत, तर कधी श्रेयाविना तिच्या कथावस्तू आजवर अनेकदा वापरल्या आहेत.
अगाथाच्या वाङ्मयीन विश्वाकडे परत जाण्यामागचे हे दुसरे महत्त्वाचे कारण. भारतातले प्रसिद्ध चित्रपट-निर्माते विशाल भारद्वाज यांनी गेल्या वर्षी अगाथा ख्रिस्तीच्या कादंबऱ्यांवर आधारित चित्रपट बनवण्याची घोषणा केली (यापूर्वी त्यांनी रस्किन बाँडपासून तर शेक्सपिअरपर्यंत अनेक महत्त्वाच्या जागतिक साहित्यकृतींवर आधारलेले अनवट चित्रपट बनवले आहेत हे वाचकांना आठवत असेलच.) कोव्हिड महासाथीने लादलेल्या तुरुंगवासात विशाल भारद्वाज यांना अगाथा पुनश्च एकवार सापडली असे ते त्यांच्या मुलाखतीत म्हणतात. परंतु असे म्हणणारे ते एकटेच नव्हेत. भारद्वाजप्रमाणेच जगभरात अनेकांना कोव्हिडच्या महासाथीच्या काळात अगाथाकडे परत जावेसे वाटले. भारतात ‘सोनी’ टीव्हीने अगाथाच्या दूरचित्रवाणी मालिकांचे हक्क विकत घेतले तेव्हा टाळेबंदीच्या काळात भावुक भारतीय दर्शकांच्या त्यावर उड्या पडल्या. अगाथाचे हे माध्यमांतरही नव्या जमान्याला साजेसेच म्हणायला हवे. हा जमाना काही पुस्तकांचा नाही. अगाथाच्या नागमोडी, गुंतागुंतीच्या कथावस्तूत हरवून तिच्या संगतीने निवांत आळसावलेल्या दुपारी किंवा अनोख्या उत्कंठेने जागवलेल्या रात्री (वाया) घालवायला या जमान्याला वेळ नाही. कोव्हिड काळातील सक्तीच्या तुरुंगवासाने सध्याच्या आपल्या समाजमाध्यमकेंद्री आस्वाद संस्कृतीत थोडाफार बदल घडला असला, तरी पुस्तकांकडून चित्रपटांकडे आणि (पुस्तकातून साकारणाऱ्या) ज्याच्या-तिच्या खाजगी-स्वायत्त कल्पनाविश्वाकडून ढोबळ, सपाट आणि सरसकट उपलब्ध असणाऱ्या दृक-श्राव्य प्रतिमांकडे आपली वाटचाल केव्हाच पूर्ण झाली आहे. त्यामुळे करोनाकालीन बंदिवासात अगाथाच्या पुस्तकांच्या विक्रीत वाढ झाली असली तरी तिच्या कादंबऱ्यावर आधारित चित्र-मालिकांवर दर्शकांच्या अधिक उड्या पडल्या नाहीत तरच नवल.
करोना काळातल्या मृत्युकल्लोळाशी अगाथाचे; तिच्या कादंबऱ्यांचे एक दृढ नाते जुळले आहे असे न्यूयॉर्क टाइम्समधील एक समीक्षक जेमी फिशर यांना वाटते. एकतर, बरोबर शंभर वर्षांपूर्वी फ्लूच्या महासाथीदरम्यानच्या अशाच एका मृत्युकल्लोळाच्या पार्श्वभूमीवर अगाथाच्या रहस्यकथा अवतरल्या. परंतु त्याहून महत्त्वाचे म्हणजे तेव्हाही आणि म्हणून आत्ताही; महासाथीच्या असह्य आणि अगम्य वणव्यावर अगाथाच्या रहस्यकथांनी; त्यातल्या निश्चित आणि सुसंगत न्यायप्रदानाच्या प्रक्रियेने काहीशी फुंकरही घातली, असे फिशर यांचे मत आहे.
अगाथाचा सर्वज्ञ गुप्तहेर पॉयरॉ म्हणजे कमालीचा शिस्तबद्ध आणि तितकाच विक्षिप्त; तर्हेवाईक गृहस्थ. न्याहरी करताना उकडलेली अंडी सारख्याच आकाराची, रंगरूपाची आहेत ना आणि आपल्या कोटावरती कुठे धुळीचा (काल्पनिक) कण तर अडकला नाही ना याची सतत तपासणी करणारा बेल्जियन निवृत्त पोलिस अधिकारी. पद्धतशीरपणा आणि गुन्हेगाराची मानसिकता हुडकण्याची हातोटी हे पॉयरॉच्या तपास खेळातले मूलमंत्र. याबाबतीत तो (आणि अगाथा) शेरलॉक होम्सच्या पुढे गेले होते. होम्सचा विक्षिप्तपणा आणि त्याचा मर्मग्राही-रहस्यभेदी विवेक तसेच होम्स-वॉटसन यांचे गुरु-चेल्याचे खेळीमेळीचे नाते या बाबी अगाथाने सर आर्थर कॉनन डॉईल यांच्याकडून जशाच्या तशा उचललेल्या दिसतात. म्हणूनच पॉयरॉच्या सोबतीला तिच्या रहस्यकथांमधे कॅप्टन आर्थर हेस्टिंग्ज अवतरतो तसाच होम्सचा विक्षिप्तपणा आणि विवेक पॉयरॉतही तंतोतंत उतरतो.
होम्स आणि पॉयरॉमध्ये ठळक साम्य होते तसेच ठळक फरकही. अगाथा आणि तिचे गुप्तहेर ब्रिटिश (आणि जागतिक) रहस्यकथांच्या सुवर्णयुगाचे साक्षीदार. पहिल्या महायुद्धादरम्यान रहस्यकथांचे हे सुवर्णयुग अवतरले ते प्रामुख्याने दोन कारणांमुळे, एक साधे कारण म्हणजे त्या काळात झालेले छपाईच्या तंत्राचे आगमन आणि दुसरे त्याहून महत्त्वाचे म्हणजे युद्धकालीन ब्रिटिश समाजात झपाट्याने होऊ घातलेले सामाजिक-आर्थिक आणि सांस्कृतिक बदल. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात घडत असणाऱ्या या बदलांचा झपाटा इतका मोठा आणि इतका अगम्य होता की त्यांच्या वावटळीत; औद्योगिक क्रांतीसारखे मूलगामी बदलदेखील लीलया रिचवलेले ब्रिटनसारखे प्रगत-प्रगल्भ समाजदेखील सैरभैर झाले. या सैरभैर मानसिकतेतून पळ काढण्यासाठी ‘मर्डर मिस्टरीज्’ कामी आल्या. तत्कालीन वास्तविक जगात साकारत असलेल्या अधोविश्वाचे प्रतिबिंब या रहस्यकथांमध्ये होतेच परंतु त्याचबरोबर वास्तविक जगण्यात ज्या प्रश्नांची ओळ कुणालाच लावता येत नव्हती ते प्रश्न रहस्यकथाकार आणि त्यांचे होम्स-पॉयरॉसारखे चेले रहस्य कादंबरीच्या शंभर-दोनशे पृष्ठांच्या अवकाशात लीलया सोडवत होते. या सोडवणुकीतून रहस्यकथांमध्ये विवेकवादाचा जागर होत होता, तशीच न्यायतत्वाची प्रस्थापना देखील. युद्धकालीन ब्रिटिश समाजात; या दोहोंचीही अचानक वानवा तयार झाल्याने रहस्यकथांमधून एका सुरक्षित अंतरावरून गंभीर समस्यांचे होणारे निराकरण आणि विवेकाच्या आधारे न्यायतत्वाची होणारी प्रस्थापना यातला पलायनवाद वाचकांना हवाहवासा वाटला. सामाजिक-सांस्कृतिक बदलांच्या झंझावातातून येणाऱ्या सार्वत्रिक-नैराश्याला तत्कालीन रहस्यकथांनी थोड्याफार प्रमाणात का होईना रोखले आणि त्यातून अगाथासह जी. के. चेस्टरसन, एडमंड क्रिस्पिन, निकोलस ब्लेक अशा अनेक रहस्यकथाकारांची एक मांदियाळी तयार झाली.
शेरलॉक होम्सचा काळ थोडा आधीचा. या काळात विवेक आणि न्याय प्रस्थापनेला निरीक्षणांची आणि निरीक्षणावर आधारित अनुमानांची जोड होती. अगाथाचे गुप्तहेर त्याऐवजी गुन्हेगारांच्या आणि गुन्हेगारीच्या मानसिकतेवर भर देतात. हा शोध पॉयरॉसाठी अधिक पद्धतशीर, शिस्तबद्ध, तर्कबुद्धीचा खेळ आहे. अगाथाने निर्मिलेली जेन मार्पलही (पॉयरॉइतकीच प्रख्यात) दुसरी गुप्तहेर मात्र गावाकडच्या गप्पांमधून; म्हाताऱ्या-कोताऱ्यांच्या निरागस ‘गॉसिप’मधे गुन्हेगारी, मानसिकतेचे धागेदोरे शोधते. पॉयरॉ आणि मार्पल यांच्या कामाची ही पद्धत शेरलॉक होम्सपेक्षा जशी निराळी होती तशीच तत्कालीन अमेरिकन मारधाड रहस्यकथांमधल्या गुप्तहेरांपेक्षाही वेगळी होती. म्हणूनच अगाथाच्या रहस्यकथा वाचकांना आणि समीक्षकांनाही ‘सुखावह’ रहस्यकथा वाटल्या. आणि म्हणूनच शंभर वर्षांनंतरही; जेव्हा कोव्हिडच्या झंझावाताने जग सैरभैर झाले तेव्हा युद्धकाळातल्या ब्रिटनप्रमाणेच आत्ताही जगभरातले वाचक-दर्शक अगाथाच्या पलायनवादी, सुखावह रहस्य-कम (मृत व्यक्तींनी लदबदलेल्या) परिकथांकडे वळले असे कित्येक समीक्षकांना वाटते.
१९७१ साली; अगाथा ख्रिस्ती ‘डेम’ अगाथा ख्रिस्ती बनल्या. डेम कमांडर ऑव्ह द ब्रिटिश एम्पायर हा ब्रिटनमधील सर्वोच्च आणि सरंजामी सन्मान अगाथाला प्राप्त झाला. तो तिला सर्वार्थाने साजेसा होता असेच तिच्या आजवरच्या कित्येक समीक्षकांना वाटते. ब्रिटनमधील उमरावशाही अस्तंगत होण्याच्या काळात अगाथाचा जन्म झाला होता तो एका श्रीमंत उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात. सुरुवातीला ब्रिटिश सैन्यातील अधिकार्याशी आणि नंतर मॅक्स मॅलोवेन या प्रख्यात पुरातत्व शास्त्रज्ञाशी विवाह केल्यानंतरही ब्रिटनमधील अभिजन, उच्चभ्रू वर्तुळातच तिचा वावर राहिला. तिचा पहिला जोडीदार कमांडर ख्रिस्ती यांच्याबरोबर तिने तत्कालीन ब्रिटिश साम्राज्याची पाहणी करणाऱ्या गटात सामील होऊन ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड-अमेरिका-दक्षिण पूर्व आशिया असा जागतिक दौरा केला होता. दुसरे जोडीदार मॅक्स मॅलोवेन यांच्याबरोबर ती मध्यपूर्वेतील विशेषत: सिरियामधील ब्रिटिश उत्खनन मोहिमांमधे नेहमी सामील होत असे. मर्डर इन मेसोपोटेमिया (१९३६); अपॉइंटमेंट विथ डेथ (१९३८) यासारख्या तिच्या गाजलेल्या कादंबऱ्या तसेच अनेक लघुकथांना मध्यपूर्वेतील उत्खननांची पार्श्वभूमी आहे. या कथा-कादंबऱ्यांमध्ये (ब्रिटिश) पुरातत्वशास्त्रज्ञाच्या (ब्रिटिश) पत्नीचे जे विशेषाधिकारी वर्णन येते (आणि जिचा सहसा कादंबरीत खून होतो) त्या वर्णनातून पुरातत्वशास्त्राच्या तत्कालीन अभ्यासातील पौर्वात्यवादी प्रभाव नानाविध पातळ्यांवर सामोरा येतो. एका ब्रिटिश पुरातत्व शास्त्रज्ञाची पत्नी म्हणून एका अर्थाने अगाथादेखील तिच्या वास्तविक आयुष्यात एक विशेषाधिकारी व्यक्ती होती. वसाहतवाद; पौर्वात्यवाद; उमरावशाही आणि राजकीय स्थितीवाद अशा कोणत्याही विचारचौकटीतून तपासून पाहिले तर अगाथाचे वर्चस्वशाली व्यक्तिगत आणि सामाजिक स्थान अधोरेखित होते. याच वर्चस्वशाली आणि एका स्मरणरंजनात्मक चौकटीत अगाथाच्या कथा-कादंबऱ्याही साकारतात असा आजवर समीक्षकांचा मुख्य आक्षेप आहे.
अगाथाची कथानके ब्रिटनमधल्या सरंजामी अस्तकाळाच्या खुणा असणाऱ्या भल्यामोठ्या हवेल्यांमध्ये घडतात; तिची पात्रे उच्चभ्रू; उच्च मध्यमवर्गीयांमधून येतात; तत्कालीन ब्रिटिश समाजातले गोठलेले वर्गवास्तव आणि क्षुद्र, संकुचित मनोवृत्तीतून साकारलेले सामाजिक वास्तव तिच्या कादंबऱ्यांमधून जोजवले जाते; तिच्या कादंबऱ्यांमधे वंशवादाच्या खुणा आढळतात आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तिच्या कादंबऱ्यांमधून अगाथाने उदारमतवादाऐवजी तत्कालीन ब्रिटनमधील स्थितीवादी; पुराणमतवादी राजकीय भूमिकांचे समर्थन केले, असे अनेक आक्षेप समीक्षकांनी अगाथाच्या लेखनावर आत्ता आत्तापर्यंत घेतले आहेत. आणि म्हणूनच तिच्या रहस्यकथा या ‘सुखावह’; दूरस्थ, रम्य, पलायनवादी रहस्यकथा बनतात असे वाङ्मयीन समीक्षकांना वाटते.
आज जवळपास शतकभराचा काळ उलटून गेल्यानंतर; आणि कोव्हिडच्या थरारनाट्यात अगाथा वाचक-समीक्षकांना पुन्हा सापडली त्यानंतर तिच्या ‘सुखावह’ दूरस्थ रहस्यकथांमधे दडलेले; तिने विणू घातलेले (मिस मार्पल सतत विणकाम करत असे तोही संदर्भ इथे मनाशी आहे) एक तरल परंतु जीवघेणे; दु:खद आणि उदास भयस्वप्न (डिस्टोपिआ)आता हळूहळू सामोरे येते आहे.
अगाथाने आपल्या कादंबऱ्यांमधून रचलेल्या भयस्वप्नाचे दोन आरंभबिंदू आहेत. युद्ध आणि भांडवलशाही. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला या दोन्ही क्षेत्रातील घडामोडींनी सुशेगाद आणि सुरक्षित ब्रिटिश समाजात उलथापालथ घडवली. ही आर्थिक, सामाजिक आणि भावनिक उलथापालथ अगाथाच्या रहस्यकथांसाठी पार्श्वभूमी म्हणून काम करते. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या भळभळत्या जखमा इंग्लंडमधीलच काय पण संपूर्ण युरोपमधील जवळपास प्रत्येक कुटुंब आज इतक्या वर्षांनंतरही आपल्या आत वागवते. अगाथाच्या प्रत्येक कादंबरीत या खोलवर रुजलेल्या दु:खाचे संदर्भ जागोजागी सापडतात. खुद्द तिने युद्धकाळात परिचारिका-वैद्यकीय मदतनीस म्हणून भाग घेतला होता (आणि त्या अनुभवातून विषप्रयोगांतून घडवलेल्या हत्यांचे सविस्तर आणि नेमके तपशील तिच्या गाजलेल्या रहस्यकथांचे भाग बनले) शिवाय आधी उल्लेख केल्याप्रमाणे तिचा पहिला जोडीदार ब्रिटिश हवाई दलातील कमांडर होता. किंबहुना युद्धाच्या छायेतच त्या दोघांचा विवाहदेखील घाईघाईने पार पडला होता.
परंतु या वैयक्तिक अनुभवांच्या पलीकडे युद्धाच्या विषण्ण छाया अगाथाच्या सर्व कलाकृतींना वेढून राहतात. मिस मार्पलसह तिच्या कादंबऱ्यांमधील अनेक स्त्री पात्रांनी एक फोटो आणि त्या भोवतीच्या मृदूआठवणी कपाटाच्या तळाशी जपून ठेवल्या आहेत. त्या चित्रप्रतिमांमधे मुलगा, प्रियकर, बाप अशा निरनिराळ्या भूमिकांमधले पुरुष डोकावत असले तरी दु:खाचा, विरहाचा आकांत मात्र मिळताजुळता आहे. हा आकांत अगाथाच्या सर्व कथा-कादंबऱ्यांना वेढून राहतो. भारतातील लष्करी कारकिर्दीच्या आठवणी आणि उमाळे काढणारे (अ मर्डर इज अनाउन्स्ड- १९५०); आफ्रिकेतील आदिवासी जमातींना छळणारे (देन देअर वेअर नन- १९३९); युद्धकाळातील सहकाऱ्यांचा विश्वासघात करणारे (मर्डर ॲट द विकारेज - १९३०); युद्धात आणि मुख्य म्हणजे युद्धानंतरच्या शांततेतले अस्वस्थात्मे (द मूव्हिंग फिंगर- १९४३) निव्वळ वानगीदाखल मानले तरी अशा कितीतरी छटांचे लष्करी अधिकारी अगाथाच्या रहस्यकथांमधे वावरतात. टॉमी आणि टपेन्स ही दुक्कल तिच्या काही ‘दुय्यम’ गुप्तहेरांपैकी एक. या नवरा-बायकोलाही गुप्तहेर खात्यातल्या कारकीर्दीचा इतिहास आहे. पॉयरॉचा वॉटसन बनलेला आर्थर हेस्टिंग्ज याने पहिल्या महायुद्धातील कामगिरीच्या बळावर मानसन्मान मिळवले आहेत. खुद्द पॉयरॉदेखील पहिल्या महायुद्धाचा बळी ठरून निर्वासित म्हणून इंग्लंडमधे आश्रयाला आला आहे. तर मिस मार्पलकडे तिच्या व्यक्तिगत जीवनातला युद्धाचा एक भळभळता, हळवा कोपरा सर्व काळ जिवंत आहे.
बा. भ. बोरकर म्हणतात त्याप्रमाणे कवीने आपली प्रतिभा वापरून क्रौर्याला शौर्याचा कितीही मुलामा दिला आणि युद्धकथांमधून विशेषत: नि:शस्त्र गुलामांना रिझवण्याचे कितीही प्रयत्न केले तरीही प्रलंयकराचे आव्हान; त्यातला विषाद अगाथासारख्या कित्येकांसाठी कायम आणि सर्वव्यापी राहिला. इतकेच नव्हे तर बोरकरांप्रमाणेच ‘प्रलंयकर हे खरे त्यात परी तुझा नि माझा वाटा आहे’ याचीही विषण्ण जाणीव अगाथाला होती. आणि म्हणूनच तिच्या सर्व मृत्युकथांवर युद्धाची; युद्धातील विध्वंसाची छाया पडली आहे.
अगाथाच्या वाङ्मयातील विषण्णतेला केवळ महायुद्धांचा संदर्भ नव्हता. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात भांडवलशाहीच्या ज्या अरिष्टातून जागतिक महायुद्धे निर्माण झाली; त्या अरिष्टाचाही विनाशकारी संदर्भ अगाथाच्या सर्व कथा-कादंबऱ्यांना लाभला आहे. ॲट बरट्रॅम्स हॉटेल (१९६५) या अगाथाच्या उत्तरकाळातील कादंबरीत मिस मार्पलने खुनाचा उलगडा करताना एक सोपे भरतवाक्य दिले, ‘इट्स ऑल अबाउट मनी, डिअर!’ मार्पलची-पॉयरॉची आणि अगाथाची दुनिया पैशाभोवती फिरते आहे. पॉयरॉचा विक्षिप्त तर्हेवाईकपणा आणि त्यातून होणारी विनोदाची सौम्य पखरण; सेंट मेरी मीड किंवा मार्केट बेसिंगसारख्या नावाच्या आणि सुशेगाद लहानशा ब्रिटिश खेड्यामधले मिस मार्पलचे रिकामपण; तिचे आणि तिच्या मैत्रिणींचे (आणि साक्षीदारांचे) निरुपद्रवी गॉसिप; कॅप्टन हेस्टिंग्ज, स्कॉटलंडचा प्रमुख इन्स्पेक्टर जॅप, सुपरिटेंडंट बॅटल आणि गावोगावी विखुरलेल्या त्यांच्या छोट्या आवृत्त्या- अगाथाने स्वत:चीच खिल्ली उडवण्यासाठी बेतलेली रहस्यकथाकार ॲरिएडने ऑलिव्हर, अशा सर्व व्यक्तिरेखांमधून प्रेक्षकांनाही हौशी गुप्तहेर बनण्याच्या तिने दिलेल्या संधी- या सर्वांमधून अगाथाच्या रहस्य कथा-कादंबऱ्या फुलत जातात- प्रेक्षकांना आपल्या कथावस्तूत ओढून घेत हलक्या आणि आकर्षक बनतात.
रहस्यकथांचे वाचक मुख्यत: मध्यमवर्गातील. आणि अगाथाची पात्रे येतात मुख्यत: अस्तंगत होत चाललेल्या अमीर उमरावांमधून आणि नव्याने धनवान बनलेल्या उच्च मध्यमवर्गीयांमधून. कथेतले बळी आणि कथेचे वाचक यांच्यातल्या सामाजिक-सांस्कृतिक अंतरामुळे देखील अगाथाच्या रहस्यकथा वाचक/प्रेक्षकांसाठी मनोरंजक; थरारक तरीही हव्याहव्याशा बनतात.
तरीही तिच्या रहस्यकथा निव्वळ ‘सुखावह’ रहस्यकथांमधे मोडतात का? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे. तिचा समकालीन भांडवली समाज, या समाजात अंगभूतपणे वावरणारी गुन्हेगारी मानसिकता आणि स्थायीभाव असणारा संशय; भांडवलशाहीच्या वाटचालीत मानवी नातेसंबंधांचे होणारे परात्मीकरण आणि त्यातून समग्र मानवी जीवनावर पसरलेली मृत्यूची आणि विषण्णतेची एक गडद छाया. भांडवली समाजाच्या नैतिक अधोगतीची; सांस्कृतिक परात्मतेची आणि त्याचा परिपाक म्हणून निर्माण होणाऱ्या औदासिन्याची समग्र समीक्षा करू पाहणाऱ्या अगाथाच्या कथा आहेत. भांडवलशाहीच्या आजवरच्या मार्क्ससारख्या पंडिती; गांधींसारख्या मातृहृदयी किंवा (गेल्या वर्षीचाच धागा पुढे चालवायचा झाला तर)
ऑर्वेल-हक्सले यांच्या वाङ्मयीन चिकित्सेइतकाच अगाथाचा भांडवलशाहीच्या अध:पतनाचा धांडोळाही मोलाचा आहे.
या धांडोळ्याची सुरुवात ‘संशया’पासून होते. केवळ नफ्या-तोट्याचेच गणित पवित्र मानणारा भांडवली समाज हा मुळातच एक संशयी समाज बनतो. आणि म्हणूनच अगाथाच्या रहस्यकथेत सारेच संशयित बनतात (आणि कथेतील पात्रांचा मृत्यु झाल्याखेरीज संशयितांच्या यादीतून त्यांची सुटका होत नाही.) रहस्यकथेच्या या प्रकाराला whodunit (इंग्रजीतल्या who (has) done it? चा अपभ्रंश-मराठीत कोणी केले काय ठाऊक? असे भाषांतर करता येईल) प्रकारातील रहस्यकथा म्हटले जाते. रहस्यकथांच्या सुवर्णयुगात अवतरलेल्या या तंत्राची अगाथा ही महाराज्ञी मानली जाते. तिच्या लिखाणातील या तंत्राचा कळसाध्याय म्हणजे ‘अँड देन देअर वेअर नन’ (१९३९) ही कादंबरी. एका निर्जन बेटावर अडकलेल्या दहा संशयित अस्वस्थात्म्यांचा एकमेकांबरोबरचा जीवघेणा कलह रंगवणारी ही कादंबरी अगाथाची सर्वांत लोकप्रिय कादंबरी मानली जाते. या कादंबरीतील प्रत्येक संशयिताला एक लाजिरवाणा इतिहास आहे आणि त्यांच्यातील संघर्षात शेवटी कुणीच वाचत नाही या दोन बाबी लक्षात घेतल्या तर तिचे भांडवली समाजातील विदारक सत्याशी असलेले नाते चटकन स्पष्ट व्हावे. आधुनिक भांडवली संस्कृतीला गांधींनी सैतानी संस्कृतीची उपमा दिली होती. अगाथाची सर्वांत लोकप्रिय कादंबरी म्हणजे या संस्कृतीचा केवळ एक ‘स्नॅपशॉट’.
महायुद्धोत्तर भांडवलशाहीने निव्वळ पैशाभोवती उभारलेली एक नवी आर्थिक व्यवस्था उभी केली असे नव्हे तर एक नीतीभ्रष्ट समाजव्यवस्थाही उभारली. या व्यवस्थेत सहसा ‘पवित्र’ मानले गेलेले नातेसंबंध देखील कलुषित बनतात. प्रेमाची जागा संपत्तीभोवती साकारलेला द्वेष घेतो आणि विवेकाऐवजी सूडाने पेटलेला अविवेक समाजजीवनाच्या केंद्रस्थानी येतो. भांडवली स्थित्यंतराच्या या उलथापालथीमध्ये केवळ उच्चभ्रू; उच्च मध्यमवर्गीय ब्रिटिश समाजाचा बळी पडला असे नाही तर या स्थित्यंतराला जागतिक परिणाम होते. मिस मार्पल ज्या लहानशा ब्रिटिश खेड्यांमध्ये वावरते तिथपासून पॉयरॉच्या तपासकक्षेत येणाऱ्या पंतप्रधानांच्या कार्यालयापर्यंत आणि ब्रिटिश वसाहतवादाचे धागेदोरे पोचलेल्या कॅनडा-न्यूझीलंडसारख्या दूरस्थ देशांपासून इजिप्त-सिरियासारख्या- ब्रिटनला भौगोलिकदृष्ट्या जवळच्या पण सांस्कृतिकदृष्ट्या दूरस्थ समाजांपर्यंत सर्वत्र अगाथाची कथानके वावरतात आणि या सर्व कथानकांमधे मृत्यूचे तांडव; पैशाचा लोभ आणि भ्रष्ट मानवी नातेसंबंध मध्यवर्ती भूमिका बजावतात.
अगाथाच्या कादंबऱ्या जशा ग्रामीण इंग्लंडच्या प्रासादिक हवेल्यांमधे वाचकाला घेऊन जातात द मिस्टिरिअस अफेअर्स ॲट स्टाईल्स (१९२१); हर्क्युल पॉयरॉज ख्रिसमस (१९३८); आफ्टर द फ्युनरल (१९५३) तशाच लंडनच्या उच्चभ्रू हॉटेल आणि उपाहारगृहांमधे (ॲट बरट्रम्स हॉटेल- १९६५). मध्यपूर्वेतील देशांचा प्रवास अगाथाने आपल्या पतीबरोबर आणि स्वतंत्रपणेही केला होता. मात्र निव्वळ त्या कारणाने तिची कथानके मध्यपूर्वेत पोचतात असे नाही. वसाहतवाद हा भांडवलशाहीचाच एक आविष्कार मानला तर ब्रिटिश वसाहतवादाने आपल्या भ्रष्ट नीतिमत्तेचे आरोपण मध्यपूर्वेतील ‘निरागस’ समाजांवर कसे केले याचे चित्रण अगाथाच्या कादंबऱ्या करतात. वसाहतवादाच्या जोडीने अकादमिक क्षेत्रात अवतरलेला पौर्वात्यवाद आणि त्यातून ब्रिटिशांनी सुरू केलेले जागोजागच्या संस्कृतींचे अवलोकन-संग्रहण या उद्योगातूनच अगाथाचे मध्यपूर्वेतील प्रवास घडले होते. मध्यपूर्वेतील विशेषत: सिरियातील जनजीवनाबद्दल तिला काहीसे भाबडे आकर्षणही होते (ज्याची जातकुळी कदाचित रोमँटिक अराज्यवादाशी मिळतीजुळती म्हणता येईल.) परंतु ही निरागसता गढूळण्याचे पाप तिच्या कादंबऱ्यांमधील धनाढ्य (मध्यपूर्वेत किंवा कॅरेबिअन बेटांवर सुट्ट्या घालवणारे) किंवा अभिजन (पुरातत्व शास्त्रज्ञ आणि त्यांचा गोतावळा) करतात (मर्डर इन मेसोपोटेमिया, १९३६; डेथ ऑन द नाईल १९३७; द कॅरेबिअन मिस्टरी - १९६४, मर्डर ऑन द ओरिएंट एक्स्प्रेस - १९३४).
अगाथाच्या गाजलेल्या ‘मर्डर ऑन द ओरिएंट एक्स्प्रेस’ या कादंबरीत गुन्हा घडतो तो रेल्वेच्या प्रवासात. हा प्रवास आधुनिक भांडवली युरोपीय देशांना-मध्यपूर्वेतील आधुनिकतेच्या परिघावर (तेव्हा) वावरणाऱ्या प्रदेशांशी जोडणारा प्रवास आहे. या कादंबरीतील गुन्ह्याला पैशाची हाव तर कारणीभूत आहेच पण त्याचबरोबर एका अजाण बालकाच्या मृत्यूशी जोडलेले नैतिक अध:पतन; आणि आधुनिक न्यायव्यवस्थेतील अपुरेपणही तितकेच कारणीभूत आहे. या अपुरेपणावर उतारा म्हणून जेव्हा गुन्हेगाराची सामूहिक हत्या ओरिएंट एक्सप्रेसमधील सर्व प्रवासी घडवतात तेव्हा न्याय आणि अन्यायाच्या सीमा अंधुक बनून पॉयरॉ आणि अगाथा वाचकांपुढे गुंतागुंतीचे नैतिक पेच मांडतात.
अगाथाची कथानके रेल्वेत घडतात, तशीच बोटीवर. बेटांवर घडतात तशीच विमानात. चर्चमधे घडतात तशीच कारखान्यात. भांडवलशाहीच्या आगमनानंतर जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी मानवी क्रौर्याचे कसे आणि किती आविष्कार घडत गेले आणि त्यातून कोणता नैतिक हाहा:कार माजला याचे चित्रण अगाथाच्या रहस्यमय कथा-कादंबऱ्यांमधे येते.
पहिल्या महायुद्धानंतरच्या काळातील भांडवलशाहीचा विस्तार आणि या व्यवस्थेची पालटत गेलेली रूपे याचे नेमके चित्रण तिच्या कादंबऱ्यांमधे झाले आहे. म्हणून सुरुवातीच्या काळात व्यक्तिगत संपत्तीवर डल्ला मारण्याच्या उद्देशाने केलेले गुन्हे नंतरच्या काळात संघटित गुन्हेगारीचे स्वरूप घेतात. (द मर्डर ऑफ रॉजर ॲक्रॉईड- १९२६; द बॉडी इन द लायब्ररी - १९४२ ते ॲट बरट्रम्स हॉटेल- १९६५ किंवा द पेल हॉर्स - १९६१ ही उदाहरणे वानगीदाखल घेता येतील.) अस्तंगत होणाऱ्या उमरावशाहीतील ‘जुन्या’ संपत्तीवर कब्जा मिळवण्यासाठी केलेल्या धनाढ्य नातेवाईकांच्या हत्येपासून तर नव्या भांडवली जगात होणारी संभाव्य परवड टाळण्यासाठी म्हणून शे-पाचशे रुपयांसाठी केलेल्या गुन्ह्यांपर्यंत भांडवलशाहीतील विकृत मानसिकता ख्रिस्तीच्या कादंबऱ्या टिपत जातात.
या मानसिकतेला शह देण्यासाठी, भांडवलशाहीतील नैतिक अध:पतनाचा पर्दाफाश करण्यासाठी आणि आधुनिक उदारमतवादी चौकटीत सर्वश्रेष्ठ मानले गेलेले न्यायदानाचे पवित्र कर्तव्य बजावण्यासाठी म्हणून अगाथाने तिचे दोन प्रमुख गुप्तहेर मुक्रर केले होते. पॉयरॉ आणि मिस मार्पल या दोघांची कार्यपद्धती निराळी होती. तसेच कार्यक्षेत्रही. ‘जगातला सर्वश्रेष्ठ गुप्तहेर’ असे स्वत:च स्वत:चे आगाऊपणे वर्णन करणारा पॉयरॉ भांडवलशाहीच्या अधोयुगातील संघटित; उच्चभ्रू अभिजन वर्तुळात वावरतो. तर जेन मार्पलचे विश्व तथाकथित निवांत ब्रिटिश खेड्यांमधे सामावले आहे. (अधूनमधून अर्थातच हे दोघे एकमेकांच्या विश्वात शिरकाव करतात तो भाग वेगळा.) परंतु अगाथाच्या कादंबऱ्यांमधील या दोन्ही जगांमधे झपाट्याने स्थित्यंतरे घडत होती आणि या स्थित्यंतरांचा माग काढून न्याय-अन्यायाची पडताळणी करणे तिच्या गुप्तहेरांसाठी कमालीचे अवघड बनले होते. ब्रिटनमधील नव्या भांडवली स्थित्यतरांमधे जशा शहर आणि खेडी; श्रीमंत आणि गरीब यांच्यामधील सीमारेषा विस्कटल्या, तसेच न्याय आणि अन्याय यांच्या व्याख्या आणि मोजमाप करणेही जिकिरीचे बनले. म्हणूनच ‘द मर्डर ऑफ रॉजर ॲक्रॉईड’मधे पॉयरॉने गुन्हेगाराचे खाजगीपण (त्याच्या नातेवाईकांखातर) जपले तर ‘मर्डर ऑन द ओरिएंट एक्सप्रेस’मधे एका निर्घृण सामूहिक हत्येला सरसकट माफी दिली. भांडवली, उदारमतवादी कायद्याच्या चौकटीतील न्यायदान हे खरोखरच नैतिकदृष्ट्या योग्य न्यायदान असते का? आणि या प्रक्रियात्मक न्यायाच्या पलिकडे खऱ्या न्यायाचा (म्हणजेच गांधींच्या भाषेत सत्याचा!) शोध घ्यायचा तर तो कसा? याविषयीचे पेच पॉयरॉ; मार्पल आणि अगाथाला नेहमीच पडलेले आढळतील.
याबाबतीतली आणखी उदास बाब म्हणजे भांडवलशाहीच्या सर्वव्यापी पोलादी चौकटीत नैतिकता सर्वस्वी लोप पावते आणि त्यामुळे ‘खऱ्या’ न्यायदानाच्या शक्यता सर्वस्वी दुरापास्त बनतात याविषयीची दुखरी जाणीव अगाथाच्या वाङ्मयात सर्वत्र आढळेल. कादंबरीच्या शेवटी; त्याच्या गुंतागुंतीच्या, चिवट आणि काटेकोर तपासाचा परिणाम म्हणून पॉयरॉला नेहमी गुन्हेगार सापडतो खरा; परंतु त्यासाठी आधी कादंबरीच्या शंभर-दोनशे पानांत मृत्यूचे तांडव घडते. पॉयरॉ काय किंवा मार्पल काय-त्यांचा गुन्हेगार पहिल्या गुन्ह्यात कधीच त्यांच्या हाती लागत नाही. त्याच्या शोधासाठी; त्यांच्या गुन्ह्याचा ‘पॅटर्न’ समजून घेण्यासाठी कित्येक निष्पाप जीव बळी पडतात आणि आपण महामूर्ख असल्याचा साक्षात्कार पॉयरॉला प्रत्येक कादंबरीत होतो. कादंबरीच्या शेवटी गुन्हेगाराला शिक्षा घडते याचे समाधान अगाथाच्या वाचकांना मिळते खरे; परंतु त्या समाधानावर मृत्यूची; विषण्णतेची काजळी मात्र कायम राहते.
अगाथाच्या समकालीन भांडवली समाजात घडत असणाऱ्या अविरत स्थित्यंतराची ही काजळी आहे. या काजळीवर; भांडवलशाहीच्या क्रूर खेळातील स्थूल आणि सूक्ष्म अन्यायावर मात करण्याविषयीचा चिवट आशावाद अगाथामधे आणि तिच्या कादंबऱ्यांमधेही जिवंत होता. याबाबत, अगाथा, ऑर्वेल आणि अल्डस हक्सले यासारख्या समकालीन लेखकांमध्ये पुष्कळसे साधर्म्य आहे. भांडवलशाहीतील अन्यायांचे, विषमतांचे आणि क्रौर्याचे आकलन आपापल्या परीने करून घेताना अभिजात उदारमतवादातून निर्माण होणाऱ्या विवेकी आशावादावरही या सर्व लेखकांची निष्ठा होती. ब्रिटिश वर्गरचनेत झालेल्या मोडतोडीचे, सरमिसळीचे स्वागत अगाथा आपल्या कादंबऱ्यांमध्ये करते; संपत्ती वाटपाच्या नव्या रचनेत स्त्रियांच्या स्वायत्त कर्तबगारीला संधी मिळते/ मिळावी या विषयीचा आशावादही तिच्या कादंबऱ्यांमधे येतो. ब्रिटिश राजकारणातल्या स्थितीवादी हुजूर पक्षाची भलामण विशेषत: राष्ट्रवादाच्या संदर्भात तिने केलेली आढळली तरी तरुणांच्या भविष्यवेधी स्वप्नातून एक नवा (लोकशाही) समाजवादी समाज अवतरेल याविषयीचे सूतोवाचही तिच्या काही -विशेषत: दुसऱ्या महायुद्धानंतरच्या कादंबऱ्यांमधे आढळते.
या सर्वांहून महत्वाची आशादायी बाब म्हणजे रहस्यकथांची एक अनभिषिक्त सम्राज्ञी म्हणून अगाथाचा पन्नास-पाऊणशे वर्षांचा आत्मविश्वासपूर्ण सार्वजनिक वावर. पुरुषांची/पुरुष लेखकांची मक्तेदारी मानल्या गेलेल्या वाङ्मयीन क्षेत्रातील हा वावर होता ही बाब देखील अतिशय महत्त्वपूर्ण आहे. परंतु त्याहीपेक्षा विलक्षण बाब म्हणजे तिच्या सर्व कथा-कादंबऱ्यांतून तिने समकालीन जागतिक वास्तवाचा घेतलेला सविस्तर, काटेकोर आणि मती गुंगवणारा वेध. या वेधातून वाचकांचे ‘शर्करावगुंठित’ रंजन घडवत असतानाच अगाथा ख्रिस्ती नामक या सर्जनशील विदुषीने समकालीन भांडवलशाही नामक एका भयस्वप्नाचा; त्या भयस्वप्नाच्या नियमितीकरणाचा एक तरल परंतु भयावह पटही तिच्या वाचकांसमोर मांडला होता. शंभर वर्षांनंतरही हा भयपट अद्याप सुरूच असल्याने अगाथाची लोकप्रियतादेखील अबाधित राहिली आहे.
(प्रा. सुहास पळशीकर यांचे विशेष आभार. भांडवलशाही आणि अगाथा ख्रिस्ती, दोन्हीचीही ओळख त्यांनी करून दिली.)
(अनुभव, दिवाळी २०२१च्या अंकातून साभार.)
राजेश्वरी देशपांडे
राजेश्वरी देशपांडे या राजकीय व सामाजिक घडामोडींच्या विश्लेषक असून राज्यशास्त्राच्या प्राध्यापक आहेत.
