आम्ही कोण?
मुलाखत 

शाळांसाठी स्कूटीवरून फिरणारा सोशल मीडिया स्टार

  • योगेश जगताप
  • 15.10.25
  • वाचनवेळ 6 मि.
siddhesh lokare

सिद्धेश लोकरे हा तरुण सोशल मिडियाच्या प्रभावी वापरातून हजारो गरजूंना वेगवेगळ्या प्रकारची मदत करत असतो. त्याने सध्या महाराष्ट्रातील दुरवस्थेतील ३० शाळांसाठी ३ कोटी रुपये उभे करण्याच्या उद्देशाने दौरा काढलेला आहे. त्याच्याशी साधलेला संवाद.

तुझ्या कुटुंबाविषयी आणि कंटेंट क्रिएशनपर्यंतच्या प्रवासाविषयी थोडक्यात सांग.

मुंबईतल्या लोअर परेल भागातील एका चाळीत माझं बऱ्यापैकी आयुष्य गेलं. माझे वडील भाजीविक्रेते तर आई मुंबई महानगरपालिकेत कामाला होती. माझं बारावीपर्यंतचं शिक्षण मराठी माध्यमात झालं. पुढे मी ग्रॅजुएशन आणि नंतर एमबीए केलं. नंतर प्रायव्हेट कंपनीत जॉब करत होतो. पण त्यात मला समाधान नव्हतं. काहीतरी वेगळं करावं असं वाटायचं. सोशल मीडियावर काही विधायक कामांसाठी कंटेंट क्रिएशन होताना बघत होतो. आपणही असं काही करावं असा विचार केला आणि पडलो या क्षेत्रात. त्याआधी मी या क्षेत्राचा, त्याच्या आर्थिक गणिताचाही अभ्यास केला. फक्त मराठीत कंटेंट केला तर त्याला मर्यादा येतील म्हणून मी हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषा चांगल्या शिकून घेतल्या. पूर्ण तयारीनिशी या क्षेत्रात उतरलो त्यामुळे तगून राहिलो आहे.

सामाजिक दृष्टिकोन असणारेच व्हिडिओ करायचे, असं तू का ठरवलंस?

मी लहानपणापासून जे जगणं अनुभवलं होतं तेच मी माझ्या व्हिडीओमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. चाळीत राहत असताना लोकांना येणाऱ्या अडचणी, मुलांच्या शिक्षणाची परिस्थिती, व्यसनामुळे बरबाद होणारी कुटुंबं, घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळूनही उपेक्षित राहिलेल्या महिला, निराधार अनाथ मुलं, अपंग माणसांचा रोजच्या जगण्यातला संघर्ष, तृतीयपंथी लोकांना मिळणारी वागणूक, हातावर पोट असलेल्या लोकांचं धडपडीचं जगणं हे मी जवळून पाहिलं होतं. आपण यांचं जगणं लोकांसमोर आणू, शिवाय त्यात बदल आणण्याचा आपल्या परीने प्रयत्न करू, असं मी ठरवलं.

siddhesh lokare

पण ते करायचं कसं असा विचार करत असताना सोशल मीडियावरच मला अमेरिकेचा एक युट्युबर दिसला. रायन तऱ्हाण त्याचं नाव. तोसुद्धा अशाच प्रकारचे व्हिडीओ बनवायचा. त्याचा पॅटर्न थोडा वेगळा होता, पण भावना माझ्यासारखीच होती. त्याच्यापासून प्रेरणा घेऊन पण माझ्या पद्धतीने मी व्हिडीओ करायला सुरुवात केली.

व्हिडीओमध्ये काहीतरी नावीन्य असेल, तो लोकांच्या उपयोगाचा होईल असं मी बघतो. आतापर्यंत मी जवळपास ४५० व्हिडिओ बनवले आहेत. यामध्ये वंचित, ज्येष्ठ नागरिक, भटके आणि असहाय प्राणी, दुर्गम गावांतील आणि आदिवासी पाड्यांतील लोक, कष्टकरी महिला, तरुण-तरुणींच्या जिव्हाळ्याचे विषय, शाळा-कॉलेजमधील लैंगिक शिक्षण असे विषय मी केले आहेत.

व्हिडिओ बनवण्यासाठी काय तयारी करतोस?

कुठलाही व्हिडिओ करण्याआधी त्यासंबंधित बातम्या, लेख पाहतो. तिथल्या लोकांशी बोलतो. मी स्वतःला त्या लोकांच्या जागी ठेवून बघतो. त्यामुळे व्हिडिओ करण्यात सहजपणा येतो. शिवाय आमची आठ-एक लोकांची टीम आहे. यामध्ये डायरेक्टर, व्हिडिओ एडिटर, मॅनेजर, अकाऊंटंट, सीएसआर ॲक्टिव्हिटी पाहणारे आणि रिसर्च करणारे सहकारी आहेत.

siddhesh lokare

सध्याच्या तुझ्या शाळा दौऱ्याविषयी सांग.

गेली तीन वर्षं आम्ही महाराष्ट्रातल्या शाळांची पाहणी करत होतो. साधारण २२ हजार शाळांची स्थिती फारशी बरी नसल्याचं आमच्या लक्षात आलं. ही संख्या याहूनही जास्त असू शकते. आता या सगळ्याच शाळांसाठी काही आम्ही पुरे पडणार नाही. पण आपल्याला शक्य ते आपण करू, या विचाराने आम्ही काम सुरू केलं. आम्ही बिकट अवस्थेतल्या ३० शाळा निवडल्या. यांपैकी काही शाळांची इमारत धोकादायक स्थितीत आहे, काही शाळांमध्ये टॉयलेटची सोय नाही, काही शाळांपर्यंत पोचण्यासाठी चांगला रस्ता नाही, या आणि अशा बऱ्याच अडचणी आहेत. आम्ही या शाळांमधल्या शिक्षकांशी संपर्क साधला. या शाळांमधल्या विद्यार्थ्यांनाही भेटायचं होतंच. या शाळांना नेमकी कशाची गरज आहे हे समजून घेऊन त्यांना आमच्या परीने मदत करण्यासाठी आम्ही 'मिशन ३०३०३ वन कम्युनिटी वन ड्रीम' या नावाने यात्रा सुरू केली. ३० दिवसांत महाराष्ट्रातील अशा ३० शाळांपर्यंत पोहचून त्यांच्यासाठी ३ कोटी रुपयांची मदत उभी करण्याचं काम आम्ही सध्या करतो आहोत.

siddhesh lokare

या दौऱ्यात तुझ्यासोबत आणखी कोण कोण आहे? कसा प्रवास करताय?

मी माझ्या स्कूटीवरून या ३० शाळांपर्यंत जातोय. माझ्या स्कूटीला मी प्रेमाने सकू म्हणतो. माझे चार सहकारीही या दौऱ्यात माझ्यासोबत आहेत. शूटचं काम ऋग्वेद मोरे बघतो. सोशल मीडियावर कुठला कंटेंट कशा प्रकारे जायला हवा हे प्रतीक जोशी पाहतो. डॉक्युमेंटेशन आणि लोकांशी बोलण्याचं काम दीपक विश्वकर्माकडे आहे. शोन हा सहकारी प्रवासाचं नियोजन आणि दौऱ्यात लागणाऱ्या इतर मदतीची जबाबदारी पार पाडतो. ते चौघंजण कारमधून प्रवास करतात. रायगड जिल्ह्यातल्या कर्जतच्या मतिमंद मुलांच्या शाळेपासून आम्ही प्रवासाला सुरुवात केली आहे. त्यानंतर मागच्या दोन आठवड्यांत पेण, मुरबाड, त्र्यंबकेश्वर, नाशिक, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, घडीवाट, गंगापुर, अहिल्यानगर असा प्रवास करत आता आम्ही बीडमधल्या शाळांपर्यंत पोहोचलो आहोत.

मागील १७-१८ दिवस मी सतत प्रवासात आहे. कितीही ऊन-वारा-पाऊस असला तरी प्रवास चालूच आहे. कधीतरी दोन मुक्कामातील अंतर कमी असतं, कधीतरी ते दीडशे किलोमीटरपर्यंतही असतं. एवढा प्रवास करून शाळेतल्या शिक्षकांना, मुलांना, त्यांच्या पालकांना आणि शक्य तसं गावकऱ्यांना भेटत राहतो.

siddhesh lokare

मिळालेल्या आर्थिक मदतीची नोंद कशी ठेवता?

आर्थिक व्यवहार पारदर्शक असला की लोक जोमाने मदत करतात हे आम्ही अनुभवलं आहे. आधीच्या काही केसेसमध्ये लोकांना किंवा संस्थेला थेट मदत मिळावी म्हणून आम्ही kindly.club नावाने वेबसाईट तयार केली. त्या ठिकाणी आमच्या संपर्कात आलेले लोक आणि त्यांना नेमकी काय मदत हवीय याविषयीचे डिटेल्स असतात. या वेबसाईटवर तुम्ही एखाद्या गावात शौचालय बांधायला मदत करू शकता, मुलींना सॅनिटरी पॅड आणि मेनस्ट्रुअल कपसाठी मदत देऊ शकता, एखाद्या वंचित समाजातील महिलेला व्यवसाय चालू करण्यासाठी हातभार लावू शकता, गरजूंच्या एका दिवशीच्या जेवणाचा खर्च उचलू शकता, गरजू आणि गरीब मुलांना लॅपटॉप देऊ शकता किंवा एखाद्या विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा खर्चही उचलू शकता. ज्यांना हा प्लॅटफॉर्म कसा वापरायचा हे माहीत आहे ते इथूनच मदत करतात. बाकी लोकांसाठी स्कॅनर, यूपीआय आयडी, फोन पे नंबर देण्याची सोयही सोशल मीडिया पोस्टमधून केली जाते. आम्हाला केलेल्या प्रत्येक मदतीची नोंद आमच्याकडे असते. आम्ही त्याची रीतसर पावतीही देतो. शिवाय या मदतीसाठी तुम्हाला इन्कम टॅक्समध्ये 80G ची सवलतही आहे. मोठमोठ्या कंपन्याही त्यांच्या सीएसआर फंडातून आम्हाला मदत करतायत.

दौऱ्याला लोकांचा प्रतिसाद मिळतोय का?

आम्ही ज्या उद्देशाने यात्रा काढली होती तो सफल होताना दिसतोय. आम्ही जाऊ त्या ठिकाणी लोक उत्साहाने यात सहभागी होतायत. शाळेचे शिक्षक, गावकरी मदत करतायत. सोशल मिडियावरचा रिस्पॉन्सही तगडा आहे. जवळपास १५ दिवसांतच आमच्याकडे दीड कोटी रुपयांची मदत गोळा झाली आहे. शाळांच्या डागडुजीसाठी, विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी हजारो लोक उभे राहिलेत. आमचा प्रवासाचा रस्ता आम्ही सोशल मिडीयावर शेअर करतो. त्यामुळे तिथे फॉलो करणारे लोक रस्त्यात मध्येमध्ये भेटायला येतात. त्यांच्याशीही गप्पा होतात.

siddhesh lokare

नंदुरबारमधल्या विनोदच्या दोन्ही पायांत व्यंग आहे. तो रोज दोन किलोमीटर चालत शाळेत जातो. त्याचा व्हिडिओ आम्ही शेअर केला. तो बघून त्याच्यावर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर पुढे आले आहेत. लवकरच विनोदच्या पायांवर इलाज केला जाईल. त्या त्या जिल्ह्यांतल्या शाळांची परिस्थिती व्हिडीओमध्ये बघून नागपूर, सोलापूर, नाशिक आणि नंदुरबार इथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी अशा शाळांकडे लक्ष देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. विनोद शिकत असलेली शाळा दत्तक घेण्याचा निर्णय नंदुरबारच्या जिल्हाधिकार्यांनी घेतला आहे. The Souled Store आणि Pongs या ब्रँड्सनी प्रत्येकी दहा लाखांची मदत केलीय. प्रसाद लेंडवे यांनीही दहा लाख रुपयांची मदत केली आहे. मागील काही दिवसांत मनोज वाजपेयी, झाकीर खान, रणवीर अलाहाबादिया या कलाकारांनीही मदत करण्यासाठी संपर्क केला आहे. अजून निम्मा दौरा बाकी आहे. अजून बरीच मदत लागणार आहे. या मुलाखतीच्या निमित्ताने मी तुमच्या वाचकांना यथाशक्ती मदत करण्याचं आवाहन करतो.

सिद्धेश आणि सहकाऱ्यांच्या उपक्रमाला मदत करण्यासाठी फोन पे/गुगल पे नंबर – 8898477016

आर्थिक मदतीसाठी वेबसाईट – www.kindly.club

सिद्धेशच्या एकूण कामाविषयी जाणून घेण्यासाठी लिंक - https://www.instagram.com/sidiously_?igsh=bzF6cWg2bnZla3Jy

योगेश जगताप | 9561190500 | yogeshjagtap8819@gmail.com







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 3

दिनु 10.10.25
योगेश सर्वप्रथम तुझे आभार की सिद्धेशची स्टोरी समोर आणली. आणि खूप आनंद झाला की जे करण्याची खूप ईच्छा होती, ते सिद्धेश प्रत्यक्ष जगतोय. नक्कीच मी माझ्यापरीने मदत करतोय. सिद्धेश आणि त्याच्या चमूला विधायक कामासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. विनोदवर उपचार करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या डॉक्टर द्वयींना मानाचा मुजरा

Mayura Bijale 10.10.25
Great job!

एम.बी.अलमेल 09.10.25
Sundar upakram 👍

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results