नाशिक हे खरं तर गंगापूर धरण परिसर, ब्रह्मगिरी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरीसारख्या निसर्गरम्य ठिकाणांनी वेढलेलं थंड हवेचं शहर. मात्र या शहराचा विस्तार होऊ लागल्यापासून रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या झाडांच्या कमानी कमी होऊ लागल्या. गारवा देणारी झाडंच नसल्यामुळे उन्हाची काहिली वाढली. सिमेंटचं जंगल वाढलं, नैसर्गिक जंगलं कमी झाली तसे पक्ष्यांचे अधिवास नाहीसे होऊ लागले. वन, झाडं, पशू-पक्षी, कीटक यांची जैवसाखळी तुटू लागली. उन्हाळ्याच्या काळात जंगलांतले पाणवठे आटल्यानं बिबट्यांसारखे वन्य पशू खाद्याच्या शोधार्थ शहरात येऊ लागले. या समस्यांवर नुसती चर्चासत्रं घडवून किंवा गप्पा मारून मात करता येणार नाही तर त्यासाठी कृतीतून प्रयत्न करावे लागतील, हे शेखर गायकवाड यांनी मनावर घेतलं आणि कामाला सुरुवात केली. पेशाने मेकॅनिकल इंजिनिअर असले तरी त्यांना पर्यावरण, निसर्ग या विषयांमध्ये विशेष रुची आहे.
सुमारे २८ वर्षांपूर्वी नाशिक मनपानं रस्त्याच्या कडेला झाडं लावली होती. पण नुसती झाडं लावून उपयोग नाही, तर त्यांना जगवण्यासाठी पाणी घालावं लागतं, ही गोष्ट गायकवाड यांना जाणवत होती. त्यांनी त्यावर उपाय म्हणून पाच पाच लीटरचे पाण्याचे सत्तावीस कॅन विकत घेऊन या झाडांना पाणी घालायला सुरुवात केली. सुरुवातीला ते पाण्याचे कॅन हातगाडीवरून घेऊन जायचे. इतकंच नाही, तर मोकळ्या जागी खड्डे करून झाडं लावणं, त्यांना पाणी घालणं, हे कामही त्यांनी सुरू केलं. लहानपणापासून डोंगरदऱ्यांत फिरणारे, झाडं-वनस्पतींमध्ये रमणारे गायकवाड फावल्या वेळात निसर्गाचं निरीक्षण करायचे. त्यात कोणत्या झाडांवर कोणते पक्षी येतात, निसर्गातल्या या घटकांचं एकमेकांशी पूरक नातं कसं असतं, निसर्गात काही बदल होणार असतील तर त्याची चाहूल पशू-पक्ष्यांना आधी कशी लागते, त्यांचे आवाज कसे बदलतात… अशा अनेक गोष्टी ते टिपत असत.
शहरात एखादी जागा फक्त देशी झाडं, झुडपं, वेलींसाठी राखीव असायला हवी, असं त्यांना वाटायचं. त्यासाठी काहीतरी करायचं त्यांच्या मनात होतं. नाशिकमधल्या सातपूर परिसरातला फाशीचा डोंगर त्यांच्या डोळ्यांसमोर होता. या परिसराबद्दल लोकांच्या मनात भीती होती. तिथे जायलाही लोक घाबरायचे. 'फाशीचा डोंगर' हे नाव ऐकलं तरी काही वर्षांपूर्वीपर्यंत लोक चळाचळा कापत, इतकी बदनाम जागा होती ती. इथं अनेक वर्षांपूर्वी इंग्रजांनी एका माणसाला फाशी दिल्याची घटना घडली होती, असं लोक सांगतात. हा परिसर तसा मोठा. इथं सार्वजनिक वनीकरण केलं गेलं होतं, पण पटापट वाढणारी एकही पक्षी न फिरकणारी ग्लिरिसिडियाची उंच झाडं लावलेली होती. या ग्लिरिसिडियामुळे उंदीर येत नाहीत, पण त्यांच्याबरोबर पर्यावरणाच्या साखळीतला दुसरा कुठलाही पशू-पक्षी-कीटकही फिरकत नाही. साधा कावळाही येत नाही. या झाडांमुळे जैविक साखळीच तुटलेली! पर्यावरणाचा समतोल बिघडलेल्या याच जागेवर देशी झाडं लावून ती जगवायची, असं गायकवाड यांनी ठरवलं.
हा भाग मुख्य नाशिक शहरापासून वीस किलोमीटर लांब आहे. गायकवाड यांची पर्यावरणविषयक धडपड बघून नाशिक वन विभागाने २०१५ मध्ये त्यांना फाशीच्या डोंगरावर झाडं लावून तो पुन्हा जिवंत करण्याची परवानगी दिली. त्या वर्षी ५ जून, जागतिक पर्यावरण दिनी, त्यांनी नाशिककरांना आवाहन केलं, की 'पर्यावरणप्रेमी लोकांनी या ओसाड जमिनीवर पाण्याची बाटली घेऊन झाडं लावायला या.' त्यांच्या आवाहनाला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या कामासाठी सोशल मीडियाचा वापरही महत्त्वाचा ठरला. प्रत्येकाने एक स्थानिक झाडाचं रोप आणि पाण्याची बाटली आणली. त्या दिवशी ९५ एकराच्या डोंगरावरच्या ४० एकर जमिनीवर ११२ जातींची ११ हजार झाडं लावण्यात आली. गेल्या दहा वर्षांच्या काळात एकदाही या झाडांना पाणी घालण्यात किंवा त्यांची काळजी घेण्यात खंड पडलेला नाही.
गायकवाड यांनी तिथे अनेक ठिकाणांहून देशी झाडं शोधून आणून लावली. वडासारख्या झाडांना 'जमिनीतील नैसर्गिक पाईपलाईन' म्हणतात. या झाडांमुळे टेकड्यांवर पाणी टिकून राहतं आणि जमिनीत पाणी मुरायला मदत होते. त्यामुळे गायकवाडांनी भोकर, मोह, पळस, कदंब, करमळ, वरस, सलई, कोशिंब अशा दुर्मिळ झाडांसोबतच चिवट लाकूड असलेला काळा पळस, वड, पिंपळ, जांभूळ, आवळा, कडुनिंब, बकुळ असे वृक्ष इथं लावलेत, जे आज बघायला मिळतात. २०१८ मध्ये ग्लिरिसिडियाच्या झाडांशेजारी एक हजार जंगली वेली लावल्या गेल्या. या वेली त्या झाडांच्या आधाराने वाढल्या आहेत. त्यात बोगनवेलीबरोबरच तोरणवेल, गारंबी, पळसवेल, चामेल, कांचनवेल, पंखपऱ्या, लोखंडी, शतावरी, समुद्र अशोक, कुसर, वेल देवचाफा अशा अनेक दुर्मिळ वेली दिसतात. २०२० मध्ये चारशे देशी रोपं लावली गेली. २०२१ मध्ये कंदमुळांसोबत घनवन तयार करायला सुरुवात झाली. देवराईत आता बांबूचं बन आहे आणि तिथं ३२ प्रकारच्या बांबूच्या जाती बघायला मिळतात. तसंच तिथे एक आमराई असून आंब्याचे १६ प्रकार पाहायला मिळतात. ४८ प्रजातींची झुडुपं आहेत. जंगल वाढलं तसा इथला पशू-पक्ष्यांचा वावरही वाढला. आता इथे ३ बिबटे, १ तरस, मोर, दक्षिण युरोपातलं घुबड (युरेशियन स्कॉप्स) असे कितीतरी प्राणी दिसतात. साप-नागांचाही इथे मोठा वावर आहे. घोणस-नागासारखे विषारी साप तर भरपूर आहेत. परदेशातले स्थलांतरित पक्षीही हजारो किलोमीटरचा प्रवास करून या देवराईत आलेले दिसतात.
'एक घास चिऊचा', असं म्हणायला शहरात चिमण्याच उरलेल्या नाहीत. खरं तर चिमण्यांना माणसांच्या जवळ घर करायला आवडतं. पूर्वीच्या घरांना कौलं, पडवी, झरोके असायचे. तिथं चिमण्या घरटी करायच्या. मोठ्या झाडांच्या ढोलीतही अशी घरटी असायची. पण चिऊताईच्या घरट्यांना आता तशा जागाच उरल्या नाहीत. गायकवाड यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय असल्यानं त्यांनी लाकडी कृत्रिम घरटी तयार केली, ज्यात फक्त चिमणीच जाऊ शकेल. चिमण्यांची संख्या वाढावी म्हणून त्यांनी अशी १५ हजार घरटी फुकट वाटली आहेत. त्यांच्या या कामामुळे त्यांना 'विप्रो' आणि 'नेचर फॉरएव्हर सोसायटी'चं 'स्पॅरो ॲवॉर्ड' मिळालं आहे. ‘या चिमण्यांनो, परत फिरा रे घराकडे आपुल्या’, हे इथं खरं ठरलेलं दिसतं.
फाशीच्या डोंगराला 'देवराई' हे नाव का दिलं असं विचारल्यावर गायकवाड सांगतात, ‘‘देवराई म्हणजे देवाच्या नावानं राखून ठेवलेलं जंगल. माणसाच्या मनात देवाविषयी भीतीयुक्त आदर असतो, त्यामुळं 'देवराई' हे नाव दिलं. जंगलतोड होऊ नये हा खरा उद्देश. खरं तर देवराई ही एक परिपूर्ण परिसंस्था असते. पारंपरिक पद्धतीनं जपलेली नैसर्गिक वनस्पतींची जागा म्हणजे देवराई. जंगलात कधी जायचं, कोणत्या ऋतूत कोणती जागा टाळायची, याबद्दल देवराईचे कडक नियम असतात. म्हणूनच, दुर्मिळ झाडं, वनस्पतींच्या मौल्यवान प्रजाती इथं जपलेल्या असल्यानं देवराईतल्या झाडांना हात लावायची हिंमत कुणी करत नाही. इथं जंगल सुरक्षित राहतं.’’
ही देवराई उभी करायची तर त्यासाठी मोठा पैसा लागणार होता. राज्यभरातल्या कितीतरी लोकांनी पैसे देऊन तिच्या उभारणीला हातभार लावला. तसंच जंगलाची काळजी घ्यायलाही मदत केली आणि अजूनही करत आहेत. या आणि अशा पर्यावरणीय कामासाठी गायकवाड यांनी 'आपलं पर्यावरण नाशिक देवराई फॉरेस्ट' ही संस्था सुरू केली.
'आपलं पर्यावरण'मार्फत दर शनिवारी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत झाडांना पाणी घालायला येण्याचं व्हॉट्सॲपवरून आवाहन केलं जातं. त्यानुसार, इथं न चुकता पाणी घालायला येणारेही खूप लोक आहेत. गायकवाड स्वतः रोज सकाळी जवळजवळ वीस किलोमीटरवरून इथं येतात आणि परिसराची पाहणी करतात. देवराईच्या पर्यटक आणि स्वयंसेवकांसाठी नाशिक देवराई फक्त शनिवार-रविवारी उघडी असते. इतर दिवशी वनस्पती आणि वन्यजीवांसाठी एक शांत जागा मिळावी म्हणून ती बंद असते. कारण सतत माणसांचा वावर या जैवसाखळीसाठी धोकादायक असतो.
या जागेच्या नियमित देखभालीसाठी लोकांमधून स्वयंसेवकही तयार झाले. देवराई सुरू झाल्यापासून तीन वर्षांत झाडांची संख्या तिपटीनं वाढली. जंगलात जमिनीवर गवत, झुडपं आणि वेलींचा दाट थर तयार झाला. पक्षी परत आले. त्यांचा किलबिलाट ऐकू येऊ लागला. प्राणीही परत आले. नैसर्गिक जंगलांसारखंच या मानवनिर्मित पवित्र जंगलांनाही रोग, लाकूडतोड आणि अतिक्रमणासारख्या धोक्यांना तोंड द्यावं लागतं. “लोकांनी दिलेल्या देणग्या आणि कंपन्यांकडून मिळालेल्या पैशांतून आम्ही आता जंगलात गस्त घालण्यासाठी दोन सुरक्षा रक्षक ठेवले आहेत,” असं ते सांगतात.
या परिसरात जाताना झाडांनी वेढलेलं एक सुंदर तळं दिसतं. त्यात बदकंही दिसतात. 'फोटो काढायला मनाई आहे' असं इथं लिहिलेलं आहे. हा तसा निर्मनुष्य भाग. त्याच्याजवळच ही देवराई आहे. अलीकडे या परिसरात बिबट्यासारखे प्राणी फिरायला लागल्यानं संध्याकाळी अंधार पडल्यावर इथं फारसं कुणी जात नाही. गेल्या दहा वर्षांत मृत जंगल जिवंत झाल्याचं हे लक्षण आहे! ही देवराई आता हिरवीगार झाली आहे. आता इथे २७५ स्थानिक प्रजातींची ३३ हजारांहून अधिक झाडं आहेत. ७० हून अधिक जातींची फुलपाखरं आणि शंभरहून अधिक जातींचे पक्षी, प्राणी इथे येतात. त्यात, मोर, साळींदर, तरस आणि बिबटेही आहेत.
प्रत्येक झाडाची ओळख व्हावी, या उद्देशानं गायकवाड यांनी इथल्या ९० झाडांना क्यूआर कोड लावले आहेत. क्यूआर कोड स्कॅन केला की त्या झाडाची सगळी माहिती नावासकट मिळते. ही झाडं, त्यांचा उपयोग या गोष्टी नव्या पिढीलाही कळायला हव्यात, असं त्यांना वाटतं, म्हणून त्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. इतर सगळ्या झाडांच्या क्यूआर कोडचं काम सुरू आहे. तसंच, ते आता दुर्मिळ झाडांच्या बिया तयार करून रोपवाटिकांना देतात. म्हणून त्यांनी इथं एका पत्र्याच्या शेडमध्ये वाचनालय सुरू केलं आहे, ते सकाळी ९ ते १२ सुरू असतं. इथं २०० पेक्षा जास्त निसर्गावरची पुस्तकं आहेत. पर्यावरणप्रेमींना निसर्ग वाचायची सवय लागावी हा उद्देश. गायकवाड या सगळ्या कामासाठी दर महिन्याला स्वतःच्या खिशातून १० हजार रुपये खर्च करतात. त्यांनी वैयक्तिक पातळीवर आजवर एक लाखाहून जास्त झाडं लावली आहेत.
देवराईनंतर त्यांनी म्हसरूळ भागातल्या ओसाड जमिनीवर 'वनराई' तयार करायचं ठरवलं. हाही एक ओसाड भूभाग होता. निसर्गप्रेमी नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या मदतीनं त्यांनी २०१९ साली इथं सुंदर वनराई फुलवली. इथे त्यांनी वेगळे प्रयोग करायचं ठरवलं. ४५ एकर जागेत ही सुंदर वनराई आहे. इथली जमीन मुरमाड आणि खडकाळ असल्यानं इथे कमी पाण्यात tag धरू शकणारी पर्यावरणपूरक झाडं लावायचं त्यांनी त्यांनी ठरवलं. वड, पिंपळ, कडुनिंब, काटेसावर, काहोळ, पापडा, पळस, भोकर, जंगली बदाम यांची लागवड केली. रोपांची देखभाल 'आपलं पर्यावरण' संस्थेतर्फे केली जाते. रोपांना तिथं तयार केलेल्या वनतळ्यातलं पाणी घातलं जातं आणि बोअरवेलचं पाणीही वापरलं जातं. त्यासाठी उंच जागेवर टाक्या बांधून ठिबक सिंचनाची सोय केली गेली आहे.
वनराईत ७५ कमळकुंडं तयार करून त्यात ७५ वेगवेगळ्या जातींची कमळं लावलेली आहेत. तसंच इथं जखमी वन्यजीवांसाठी उपचार केंद्रही सुरू केलं गेलं आहे. या परिसरात ५ हजार कुटुंबांनी मिळून ५ हजार झाडं लावली. २७ प्रकारच्या दुर्मिळ झुडपांची लागवड केली. याचा परिणाम असा झाला की, इथं गिधाडं सहज फिरायला लागली.
गायकवाड आणि त्यांचे सहकारी अलीकडे इथे येताना पूर्ण बाह्यांचे कपडे आणि उंच बूट घालतात. कारण इथं आता घोणससारखे विषारी साप मोठ्या प्रमाणात दिसायला लागले आहेत. देवराई, वनराईसारख्या ठिकाणी असे प्राणी-पक्षी येणं हे जंगल जिवंत असल्याचं लक्षण आहे, असं ते मानतात. शेखर गायकवाड यांनी आपल्या प्रयोगांमधून पर्यावरण संतुलन काय असतं ते खऱ्या अर्थाने दाखवून दिलं आहे.
शिल्पा दातार | 7020659314 | mrs.shilpapankaj@gmail.com
शिल्पा दातार या मुक्त पत्रकार आहेत.
