आम्ही कोण?
माणसं आणि कामं 

इथे सॅनिटरी कचऱ्याबाबत ‘बदलाव’ घडत आहे....

  • योगेश जगताप
  • 26.06.25
  • वाचनवेळ 5 मि.
badlaav

राधिका धिंग्रा आणि रोजली श्रेष्ठा या दोघीही पर्यावरणशास्त्राच्या उच्च शिक्षणासाठी परदेशात गेलेल्या विद्यार्थिनी. दोघीही भारतातल्या कचरा प्रश्नाने अस्वस्थ होत्या. सॅनटरी नॅपकिन्स आणि डायपर्समुळे दररोज तब्बल ९०० टन कचरा तयार होतो. हा सॅनिटरी कचरा पर्यावरणासोबतच कचरावेचकांच्या आरोग्यासाठीही घातक असल्याने तो कमी करण्यासाठी आणि आहे त्या कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन करण्यासाठी काम करण्याचा निर्णय राधिका आणि रोजली यांनी घेतला. असं काही काम करायचं तर हाताशी संस्था पाहिजे. म्हणून त्यांनी ‘बदलाव सोशल रिफॉर्म फाऊंडेशन’ची स्थापना केली.

आकडेवारी असं सांगते, की आज भारतातील जवळपास १२ कोटी महिला सॅनिटरी पॅड्स वापरतात. त्यातून वर्षभरात तब्बल १ लाख १३ हजार टन एवढा सॅनिटरी कचरा तयार होतो. हा कचरा विघटनशील नसल्याने तो निसर्गात बराच काळ पडून राहतो. हा कचरा वातावरणात आणि पाण्याच्या स्त्रोतांत मिसळल्यानंतर पर्यावरणीय प्रदूषणही मोठ्या प्रमाणावर होतं. मायक्रोप्लास्टिकच्या रूपाने हा कचरा मानवी शरीरातही शिरकाव करतो. त्याचा सर्वाधिक फटका कचरावेचकांना बसतो. त्यांना सॅनिटरी कचऱ्यामुळे विविध आजारांना सामोरं जावं लागतं.

कचरा वेचकांना सॅनिटरी कचरा कोणता आहे हे कळावं, यासाठी पुणे महानगरपालिकेने एक उपाय काढला आहे. नागरिकांनी त्यांच्या घरातील सॅनिटरी कचरा एका कागदात गुंडाळून त्यावर लाल बिंदू (रेड डॉट) लावून दिला, तर त्यातून कचरा वेचकांची सोय होईल, अशी त्यामागील कल्पना आहे. ही कल्पना उपयुक्त असल्याने या रेड डॉटबद्दल जनजागृती करण्याचं ‘बदलाव’ने ठरवलं आणि प्रामुख्याने वस्ती पातळीवर प्रसार करण्याचं काम हाती घेतलं.

रेड डॉटबद्दल वस्तीतल्या महिलांशी बोलताना हळूहळू त्यांच्याशी संवाद होऊ लागला. सॅनिटरी पॅडच्या वापरामुळे काय प्रश्न येतात हे कळू लागले. सॅनिटरी पॅडच्या वापराने शरीराच्या नाजूक भागात खाज सुटणे, रॅश येणे, छोट्या जखमा होणे अशा समस्या उद्भवतात, असं बायका सांगू लागल्या. त्यावर उपाय म्हणून ‘बदलाव’ने बाजारातल्या सॅनिटरी पॅडला पर्याय असलेली आणि पुनर्वापरास योग्य अशा साधनांबद्दल सांगायला सुरुवात केली. ही साधनं माफक दरात महिलांपर्यंत पोहोचवण्याचं कामही त्यांनी हाती घेतलं.

सॅनिटरी पॅडला पर्याय म्हणजे कापडी पॅड. एकदा वापरलेलं कापडी पॅड धुवून, स्वच्छ करून वापरता येतं असल्यामुळे त्यात धोका काही नसतो. शिवाय त्यात रासायनिक घटकांचा वापरही केलेला नसतो. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माणच होत नाहीत. त्याबरोबरच ‘बदलाव’ने या महिलांना मेन्स्ट्रुअल कपचीही ओळख करून द्यायला सुरुवात केली. हा कप आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित असून दीर्घकाळ वापरता येतो. हा पर्याय वस्तीतल्या महिलांसाठी नवा होता. पण तरीही कमी वयोगटातील मुलींनी तो स्वीकारायला सुरुवात केली. ‘बदलाव’ने सुचवलेल्या दोन्ही पर्यायांमुळे पैशांची बचत होत असल्याने ते स्वीकारण्याकडे महिलांचा कल दिसू लागला. ‘बदलाव’तर्फे कापडी पॅड आणि कपचं वाटपही केलं गेल्यामुळे स्वीकारार्हता आणखी वाढली. ‘बदलाव’च्या प्रयत्नांशी जोडलेल्या एक ताई म्हणाल्या, की “घरची परिस्थिती गरीबीची असल्याने मासिक पाळीच्या दिवसांत आम्ही कधी सॅनिटरी पॅड वापरलेच नाहीत. जशी पाळी सुरू झाली तशी कापड वापरू लागले. आजूबाजूच्या पोरी-बायकाही तेच वापरायच्या. पण ‘बदलाव’च्या ताईंनी मेन्स्ट्रुअल कपची माहिती दिली आणि आम्हाला ते वापरायला शिकवलं, तेव्हापासून कापड बंद झालं. ‘बदलाव’ने कपही मिळवून दिले, त्यामुळे तेही पैसे वाचले. आता इतर बायकांनाही मी हा कप वापरण्याचा सल्ला देते.”

वस्तीतील महिलांपर्यंत पोहोचायचं तर त्यासाठी स्वयंसेविका हव्यात. त्यादृष्टीने ‘बदलाव’ने वस्तीतल्या इच्छुक महिलांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. या महिलांनी वस्तीतील इतर महिलांपर्यंत ही माहिती पोहोचवावी आणि या उपक्रमात त्यांनाही सहभागी करून घ्यावं, असा प्रयत्न सुरू केला. जागरूकता निर्माण करण्याचं हे काम दोन स्तरांवर होतं. पहिला स्तर म्हणजे स्वयंसेविका घरोघरी जाऊन, तर कधी महिलांचे गट करून मासिक पाळी आणि आरोग्य याविषयी माहिती देतात. दुसरी पायरी म्हणजे, या स्वयंसेविका इच्छुक मुली आणि महिलांना कापडी पॅड आणि मेन्स्ट्रुअल कप अगदी कमी किंमतीत उपलब्ध करून देतात.

‘बदलाव’च्या माध्यमातून आजपर्यंत पुण्यातील मंगळवार पेठ, कसबा पेठ आणि गाडीतळ, जनता वसाहत, मीनाताई ठाकरे वसाहत, रामनगर (वारजे), लक्ष्मीनगर (येरवडा), हडपसर रेल्वे स्टेशन या वस्त्यांमधील तब्बल २५ हजार किशोरवयीन मुली आणि महिलांना मासिक पाळी व्यवस्थापनाची माहिती दिली गेली. किशोरवयीन मुली आणि महिलांना हजारहून अधिक कापडी पॅड, तर शंभरपेक्षा अधिक महिलांना मेन्स्ट्रुअल कप दिले गेले आहेत. पुणे शहरापलीकडे बारामतीमधील वाघाळवाडी या ग्रामीण भागातही ‘बदलाव’ने हेच काम सुरू केलं आहे. हे काम वाढावं यासाठी अशा वस्त्यांमध्ये काम करणाऱ्या ‘आशा’ सेविका आणि महापालिकेच्या समूह संघटिकांसाठी एक दिवसीय प्रशिक्षणही घेतलं जातं.

वस्ती पातळीवर काम करत असतानाच ‘बदलाव’मार्फत मागील काही वर्षांपासून शाळा आणि कॉलेजमधील मुला-मुलींसाठी मासिक पाळीविषयी जागृतीपर सत्र घेतली जाऊ लागली आहे. वयात येताना होणारे शारीरिक आणि भावनिक बदल, मासिक पाळीची शास्त्रीय माहिती, मासिक पाळीत वापरता येणारी साधनं आणि वैयक्तिक स्वच्छता या विषयांची माहिती दिली जाते; त्यावर चर्चा केली जाते. आतापर्यंत पाचशेहून अधिक सत्रं आयोजित केली गेली असून २० हजारहून अधिक किशोरवायीन मुला-मुलींना या प्रयत्नांत सहभागी करून घेतलं गेलं आहे.

‘बदलाव’तर्फे असे सारे प्रयत्न चालू असतानाच आता पुढचं पाऊल टाकण्यात येणार आहे. वस्तीतील महिलांना अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळण्यासाठी ‘स्वास्थ्य सखी' नावाचा फिरता दवाखाना लवकरच सुरू करण्यात येणार आहे. मोबाईल व्हॅन असं या दवाखान्याचं स्वरूप असून ती स्त्रीरोगतज्ञ, परिचारिका आणि औषधांनी सुसज्ज असेल. याचा फायदा वस्तीतील गरीब आणि गरजू किशोरवयीन मुली आणि महिलांना होईल असा विश्वास ‘बदलाव'ला वाटतो आहे.

आपल्या शिक्षणाला कृतीची जोड देण्याचा प्रयत्न केल्यामुळे ‘बदलाव’सारखी संस्था उभी राहिली आणि त्यातून हजारो महिलांच्या आयुष्यात एक छोटासा पण महत्त्वाचा बदल होतो आहे, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. शिवाय त्यातून सॅनिटरी कचरा कमी होऊन त्यातून पर्यावरण रक्षण होणं हा संस्थेचा मूळचा हेतूही साध्य होत आहेच.

योगेश जगताप | 9561190500 | yogeshjagtap8819@gmail.com







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results