आम्ही कोण?
आमची शिफारस 

कोट्टूक्काली : गोष्ट आडमुठ्या पोरीची

  • प्रथमेश हळंदे
  • 21.03.25
  • वाचनवेळ 6 मि.
  • Share on Tweeter
  • Share on Whatsapp
  • Share on Facebook
kottukkaali

दक्षिण भारतात आणि विशेषतः तमिळ संस्कृतीत स्त्रियांच्या मासिक पाळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुलीची पहिली मासिक पाळी इथे मोठ्या समारंभासारखी साजरी केली जाते. या समारंभाला वेगवेगळी नावं आहेत. त्यापैकी उत्तर तमिळनाडूच्या ग्रामीण भागात प्रचलित असलेलं एक नाव म्हणजे ‘परुवंमडईतल विळ्ळा’. ‘परुवंमडईतल’ म्हणजे तारुण्य, तर ‘विळ्ळा’ म्हणजे समारंभ. वास्तविक, या समारंभात स्त्रीत्वाचा आदर किंवा स्त्रीसन्मान ही गौण बाब असते. कारण आपली मुलगी आता प्रजननयोग्य (आणखी सभ्य भाषेत सांगायचं तर, विवाहयोग्य!) झालीय हे समाजाला कळवणं, हाच या समारंभाचा मूळ हेतू असतो. मग समारंभासाठी लग्नाचा हॉल बुक केला जातो. आपल्या जवळच्या आणि लांबच्याही सग्यासोयऱ्यांना पत्रिका पाठवून बोलावून घेतलं जातं. नेत्यांनाही लाजवेल अशी बॅनरबाजी करून स्थानिकांना सूचित केलं जातं. जेवणावळी झडतात. अर्थात, हे सगळं ज्याच्या-त्याच्या ऐपतीनुसार होत असलं, तरी त्या समारंभात एकप्रकारची भव्यताच आढळून येत असते. जवळपास लग्नच म्हणावं असा खर्च त्यासाठी केला जातो.

पण हे लग्न नाही, तर लग्नाची पूर्वतयारी असते. कारण, या संपूर्ण कार्यक्रमात सगळ्यात महत्त्वाची भूमिका ही त्या मुलीच्या महिला नातेवाईकांची किंवा मैत्रिणींची नसून, ती तिच्या मामाकडच्या लोकांची असते. हा मामा मुलीसाठी आपल्या ऐपतीनुसार भेटवस्तू आणतो. या भेटवस्तूंमध्ये मुख्यतः कपडे, सौंदर्यप्रसाधनांचाच समावेश असतो. भारतभर होतात तसेच तमिळनाडूतही आजही काही जातींमध्ये, विशेषतः ग्रामीण भागात, मामा-भाची आणि आते-मामे भावंडांमध्ये विवाह होतात. एका अर्थाने, त्या विवाहांची सुपारी अशा समारंभांमध्येच फोडली जाते. मामाने दिलेली भेटवस्तू म्हणजे ‘आजपासून तुमची मुलगी माझी झाली’ याची जणू पोचपावतीच मानली जाते. त्यानंतर जवळपास प्रत्येक भेटीत अशा भेटवस्तू दिल्या जातात. त्यासोबत इतरही लहानसहान खर्च उचलले जातात. प्रत्येक भेटीगणिक त्या मुलीवर मामाचा मालकी हक्क बळावू लागतो.

अशावेळी त्या नुकत्याच वयात आलेल्या मुलीच्या मनःस्थितीबद्दल, तिच्या जोडीदारनिवडीच्या स्वातंत्र्याबद्दल विचार करावा, हे तिथे जमलेल्या कुणाच्याही गावी नसतं. तिच्या आईवडिलांनी ही सोयरीक परस्पर ठरवलेली असते. तर पलीकडच्या ‘भावी’ वरपक्षानेही तिला सून म्हणून गृहीत धरलेलंच असतं. त्यामुळे भविष्यात जर त्या मुलीने दुसऱ्या कुणाला आपला जोडीदार म्हणून निवडलंच तर दोन्ही घरांचं कुरुक्षेत्र बनायला वेळ लागत नाही. त्यात जर त्या मुलीने निवडलेला मुलगा परजातीतला असला तर ही लढाई आणखीनच बिकट होऊन जाते.

याच लढाईचं नेमकं चित्रण दाखवणारा ‘कोट्टूक्काली’ हा तमिळ सिनेमा ऑगस्ट २०२४ मध्ये रिलीज झालाय.

‘कोट्टूक्काली’चा लेखक-दिग्दर्शक आहे पी. एस. विनोदराज. ‘कुळंगल’नंतरचा हा त्याचा दुसरा सिनेमा. ‘कोट्टूक्काली’ या शब्दाचा अर्थ होतो, एक आडमुठी मुलगी. या कथेची नायिका, अर्थात ती आडमुठी मुलगी आहे मीना. मीनाचं एका परजातीतल्या मुलावर प्रेम जडतं. हे तिच्या मामाला अर्थात पांडीला कळतं, तेव्हा तो आकांडतांडव करतो. त्याच्या गळ्यावर लावलेला लेपच सांगतोय, की गेले कित्येक दिवस पांडीने आरडाओरड करत दोन्ही घरं डोक्यावर घेतलीयत. इतर पात्रांच्या बोलण्यातून हेही कळतं, की मीनाला गेले १५ दिवस मारहाण केली जात असूनही तिने आपला हट्ट सोडलेला नाही. याच कारणामुळे पांडीची बहीण तिला ‘कोट्टूक्काली’ असं म्हणते.

पांडी आणि मीनाच्या घरचे मीनाला घेऊन एका मांत्रिकाकडे जातात, जो अशी ‘बाहेरची बाधा’ उतरवण्यासाठी प्रसिद्ध असतो. या प्रवासात बऱ्याच गोष्टी घडतात, ज्या समाजातल्या वेगवेगळ्या घटकांचं प्रतिनिधित्व करताना दिसतात. सिनेमाचा शेवट थेट प्रेक्षकांच्या हातात पुढचं कथन देतो. हा शेवट दुर्बोध नसला तरी अंतर्मुख करणारा आहे.

विनोदराजच्या दोन्ही सिनेमांमध्ये प्रवास हा घटक कथेचा गाभा आहे. ‘कुळंगल’मध्ये बेवड्या, भांडकुदळ बापासोबत आईला शोधायला निघालेला लेक आहे, तर ‘कोट्टूक्काली’मध्ये लेकीच्या प्रेमावर आणि पर्यायाने स्वातंत्र्यावर बंधन घालण्यासाठी तिला मांत्रिकाकडे नेणारे नातेवाईक आहेत. ‘रोड जर्नी’ ही एक लोकप्रिय सिनेशैली हाताळताना विनोदराज संवादांपेक्षा त्यातल्या दृश्यांवर अधिक भर देताना दिसतो. पात्रांचे चेहरे, आजूबाजूची परिस्थिती आणि निसर्गाच्या माध्यमातून तो एकेक प्रसंग बोलका करत नेतो. रुपकं आणि प्रतीकांचा मेळ घालून फार काही न बोलता समाजाचं सटीक विश्लेषण करण्यात विनोदराजला यश आलंय.

पात्रांचे संवाद बहुतांशी भूतकाळात काय घडलं याभोवतीच रचले गेले असून, सद्य आणि भविष्यकालीन परिस्थितीचं आकलन दृश्यरूपात प्रेक्षकांना होत राहतं. हे दृश्यजगत आपल्या कॅमेऱ्यात टिपणाऱ्या सिनेमेटोग्राफर बी. सक्तीवेलचं कौतुक नक्कीच करायला हवं. मोक्याच्या प्रसंगी पात्रांना बंदिस्त चौकटीत टिपत त्यांचं संकुचित भावविश्व मांडणारा त्याचा कॅमेरा शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.

पांडीची भूमिका साकारणारा सूरी हा खरं तर एक लोकप्रिय विनोदी तमिळ अभिनेता. पण २०२३च्या वेट्रीमारन दिग्दर्शित ‘विडुतलै भाग १’मध्ये त्याला पहिल्यांदाच नायक साकारण्याची संधी मिळाली. त्याने त्या संधीचं सोनं केलं. त्यानंतर काही महिन्यांत आलेल्या ‘गरुडन’मध्येही सूरीने साकारलेल्या सोक्कन या प्रमुख भूमिकेचं कौतुक केलं गेलं. ‘विडुतलै’च्या दोन्ही भागांमध्ये सूरीने एक अभिनेता म्हणून दाखवलेली चमक ‘कोट्टूक्काली’मध्येही दिसून येते.

सूरीची ही सेकंड इनिंग प्रचंड प्रॉमिसिंग वाटते. मीनाच्या पहिल्या मासिक पाळीनंतर आयोजित केलेल्या समारंभात उसने पैसे घेऊन पांडीने खर्च केलेला असतो. तेव्हाच त्याची मीनाशी लग्नगाठ बांधली गेलेली असते. त्यानंतर कर्ज फेडण्यासाठी तो परदेशात काम करायला जातो. त्याला मीनाच्या प्रेमप्रकरणाबद्दल कळतं, तेव्हा साहजिकच तो चिडतो. पांडीची ही चीड, मनःस्ताप, अविश्वास उत्तमरीत्या दर्शवण्यात सूरीला यश आलंय.

मीनाची भूमिका साकारणाऱ्या ॲना बेन या मल्याळम अभिनेत्रीचं विशेष कौतुक वाटतं. एका प्रसंगात गाणं गुणगुणणं आणि एका प्रसंगात प्रार्थना पुटपुटणं सोडल्यास संवाद म्हणून फक्त एकच ओळ तिच्या वाट्याला आलीय. ती ओळही अर्थातच तितक्या ताकदीची असून, तेवढ्या एका प्रसंगातही ॲना आपली छाप पाडते. क्वचित प्रसंगी तिच्या ओठांवर येणारं हसू आणि तिचे निस्तेज पण सदैव रोखलेले डोळे अस्वस्थ करत राहतात.

पुरुषसत्ताक विचारसरणीला सरावलेल्या बायांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला नातेवाईकांच्या गराड्यात मीना उठून दिसते. तिच्यावरचं बंधन प्रतिकात्मक पद्धतीने विनोदराज दाखवत राहतो. आईकडून केसांची वेणी घालून घेताना मीनाच्या नजरेसमोर दोरीने बांधलेला बळीचा कोंबडा फडफडताना दिसतो. रस्ता अडवून थांबलेल्या मुजोर बैलाला सहज चुचकारत नेणाऱ्या लहानग्या मुलीचे मोकळे केस असोत, की दृष्ट न लागण्यासाठी किंवा लागलेली दृष्ट अर्थात बंधन उतरवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लोकदैवताच्या मुखवट्यावर रुळणारे केस असोत, बंधन आणि स्वातंत्र्य या परस्परविरोधी भावनांना मिळणारं हे असं दृश्यस्वरूप अबोल मीनाच्या वतीने बोलत राहतं.

सिनेमात गाणी नाहीत, त्याऐवजी आहे तो फक्त सभोवतालचा आवाज. एका प्रसंगात या आवाजातच दोन गाणी ऐकू येतात. हा प्रसंग प्रवासात आडव्या येणाऱ्या एका मिरवणुकीतला आहे. ही मिरवणूक वर उल्लेख केलेल्या ‘परुवंमडईतल विळ्ळा’ या समारंभाचाच एक भाग आहे. पहिल्यांदाच मासिक पाळी आलेल्या मुलीला मामाकडून मिळणार्या भेटवस्तू मिरवणुकीतून मिरवत आणल्या जातात. मीना आणि तिचे कुटुंबीय रिक्षातून जात असताना ही मिरवणूक त्यांना आडवी येते, तेव्हा स्पीकरवर ‘किळक्कू चीमाईलं’ या सिनेमातलं ‘मानुत्तू मंदाईलं’ हे गाणं वाजत असतं. आजही तमिळनाडूतल्या खेडोपाडी ‘परुवंमडईतल विळ्ळा’च्या वेळी हे गाणं वाजवलं जातं. जशी आई, वडील आणि भावंडांसाठी समर्पित सिनेगीतं असतात, तसंच हे गाणं मामासाठी समर्पित असल्याची भावना लोकांमध्ये अजूनही आहे.

हे गाणं संपताच ‘कना’ या सिनेमातलं ‘ओतायाडी पादाईलं’ हे गाणं सुरू होतं. याही गाण्यात ‘परुवंमडईतल विळ्ळा’चं चित्रण आहे, पण गाण्याचे बोल प्रेमगीतासारखे आहेत. आपल्या भाचीवर भाळलेला मामा, त्याच्याबद्दल तीव्र नापसंती मनात असलेली भाची आणि तिच्यावर भाळलेला गावातला तरुण, या तिघांवर हे गाणं चित्रित झालंय. नेमक्या याच गाण्याच्या ओळी मीना गुणगुणते आणि इतका वेळ धुसफुसत राहिलेल्या पांडीच्या रागाचा उद्रेक होतो. हा एकमेव प्रसंग सगळ्या पात्रांची मनःस्थिती एकाचवेळी व्यवस्थितपणे मांडू पाहतो.

दिग्दर्शक विनोदराजने अशाच लहानसहान सूचक प्रसंगांतून मांडलेली ही एका आडमुठ्या मुलीची गोष्ट बरंच काही शिकवून जाते. गेल्या वर्षभरात आलेल्या कमर्शियल सिनेमांच्या गर्दीत हा सिनेमा आपल्या नजरेतून सुटणं साहजिकच आहे. सध्या तो ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तमिळ भाषेत इंग्लिश सबटायटल्ससह उपलब्ध आहे.

प्रथमेश हळंदे

प्रथमेश हळंदे हे सिनेरसिक असून दाक्षिणात्य चित्रपटांविषयी ते सातत्याने लिहीत असतात







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 2

Ayshwarya Revadkar23.03.25
खूपच छान लिहिलं आहे परीक्षण. वाचून सिनेमा पाहू वाटला लगेच.
NATU VIKAS S.22.03.25
छान लेख
See More

Select search criteria first for better results