
राजवैभव शोभा रामचंद्र. वय वर्ष 32. कोल्हापूर जिल्ह्यातल्या सोन्याची शिरोली गावचा हा तरुण कार्यकर्ता. त्याचे वडील स्टॅम्पविक्रेते. गावचे सरपंच राहिलेले. राजवैभवचं शिक्षण इंजिनिअरींग मधलं. स्वतःचं सगळं सुरळीत चालू असूनही समाजातील विसंगत-विपरीत परिस्थिती बघून तो अस्वस्थ झाला आणि समाजात उतरून काम करू लागला.
काही वर्षांपुर्वी कोल्हापुरात रस्त्यांवर सामाजिक स्वास्थ्य बिघडेल असे फलक लागले होते. कित्येक जणांनी येता जाता ते पाहून सोडून दिले असतील. पण राजवैभवने त्या विरोधात आवाज उठवला. त्या फलकांमुळे लोकांची दिशाभूल होत असल्याचं सांगितलं. एका दिवसात त्याने प्रशासनाला चुकीचे फलक दुरुस्त करण्यास भाग पाडलं. पोलीस प्रशासनाला संविधानिक मूल्यांच्या प्रशिक्षणाची गरज असल्याचं मत त्याने वरिष्ठांकडे मांडलं. ते त्यांनाही पटलं. आता राजवैभव पोलिसांचे संविधान प्रशिक्षण वर्ग घेतो.
घटना दुसरी; कोल्हापूर भागातील काही एसटी चालक आणि वाहक गाड्यांमध्ये भोंदू बुवा-बाबांचे फोटो लावत असलेले त्याला आढळून आलं. ही कृती आक्षेपार्ह आहे असं राजवैभव आणि सहकाऱ्यांना वाटलं. त्यांनी आगारप्रमुखांना भेटून तशी कल्पना दिली. श्रद्धा आणि उपासनेच्या स्वातंत्र्याचं पालन वैयक्तिक पातळीवर करणं ठीक आहे, त्याचं प्रदर्शन सार्वजनिकरित्या करणं चुकीचं आहे, ही बाब त्यांनी समजावून दिली. इचलकरंजीमधल्या एसटी बसेसमध्ये भोंदू बाबांच्या जाहिराती लागल्या तेव्हाही त्याविरोधात या कार्यकर्त्यांनी आवाज उठवला.
घटना तीन; सावंतवाडी तालुक्यातील बांद्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सत्यनारायण महापूजेचं आयोजन केलं जात होतं. यादिवशी चक्क सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली जायची. शासकीय ठिकाणी असे धार्मिक कार्यक्रम करण्याला प्रतिबंध घालण्याविषयी राजवैभव आणि सहकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन दिलं. त्यानंतर कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामकाज करण्याचे आदेश वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले.
गेल्या दहाएक वर्षातल्या अशा अनेक घटना सांगता येतील. पण या सगळ्या कामाची सुरूवात कशी झाली?
२०१२ साली राजवैभवची गारगोटीला डॉ. नरेंद्र दाभोलकरांशी भेट झाली. तेव्हा तो जेमतेम १७-१८ वर्षांचा होता. डॉ. दाभोलकरांच्या कामाने प्रभावित होऊन तो अंधश्रद्धा निर्मूलन समितीत सामील झाला. पण पुढच्याच वर्षी दाभोलकरांचा खून झाला. पुढे कॉ. गोविंद पानसरे यांचाही खून झाला. या घटनांनी राजवैभव प्रचंड हादरला. इथूनच त्याने सामाजिक कामाचा विडा उचलला. आता समाजात उतरून काम करायचं असं त्याने ठरवलं. त्यासाठी त्याने खासगी नोकरी सोडली आणि संविधान जागृतीचं काम हाती घेतलं.
संविधान जागृतीचं काम करतो म्हणजे काय करतो?

तो आता 'संविधान संवादक' म्हणून काम करतो. त्यामध्ये तो चार सूत्रांवर काम करतो. संविधानाचा प्रसार व प्रचार करणं, दैनंदिन जीवनात संविधानाचा अंगीकार करणं, अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणं आणि संविधान विरोधी घटना-घडामोडीत विधायक हस्तक्षेप करणं. महिला, युवक, विद्यार्थी, कामगार, आदिवासी, शेतकरी, शिक्षक अशा वेगवेगळ्या समूहांसोबत गप्पा मारत त्यांच्याच भाषेत त्यांना संविधान समजावून सांगण्यावर तो भर देतो.
२०१६ मध्ये त्याने मुंबई ते महू अशी संविधान जागर यात्रा काढली. २०१७ मध्ये अशीच कोल्हापूर जिल्ह्यात ११ दिवसांची यात्राही आयोजित केली. यात्रेदरम्यान ५२ ठिकाणी संविधान संवाद साधला. २०१८ मध्ये महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, पोंडेचरी, केरळ, कन्याकुमारी या राज्यांत त्याने संविधान जनजागृतीसाठी प्रवास केला. संविधानाला ७० वर्ष पूर्ण झाली त्या निमित्ताने त्याने २६ नोव्हेंबर ते २६ जानेवारी या दोन महिन्यांत ७० संविधान संवादशाळा, कार्यशाळा घेतल्या.
दोन वर्षांपूर्वी राजवैभवने समविचारी मित्रमंडळींसह 'लोकराजा शाहू संविधान संवाद समिती'ची स्थापना केली. या समितीच्या माध्यमातून 'संविधान संवादक' हे ४० दिवसांचं ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येतं. यातून पुढे आलेले ७० कार्यकर्ते आज संविधान जनजागृतीचं काम पुढे नेत आहेत. हे कार्यकर्ते रेल्वे, बसस्थानक, रोजच्या वर्दळीच्या ठिकाणी संविधानाविषयी नागरिकांशी चर्चा करतात. संविधानाची अंमलबजावणी होत आहे का ?, आजूबाजूला जे घडतंय ते संविधानाची अंमलबजावणी होत नाही म्हणून तर नव्हे ना ?, असे प्रश्न उपस्थित करुन ते लोकांना विचार करायला भाग पाडतात. संविधानावरील अभंग, पोवाडा, भारुड, ओव्या, बडबड गीतं, नाटक, चित्रपट अशा विविध माध्यमांतून राजवैभव व त्याची टीम संविधान साक्षरतेची विचारधारा समाजाला देण्याचा प्रयत्न करतात.
राजवैभवने आतापर्यंत महाराष्ट्रातील २८ जिल्ह्यांत संविधान प्रसार-प्रचार व अंमलबजावणीचं काम करताना १२०० च्या वर कार्यशाळा, संविधान संवाद, व्याख्याने घेतली आहेत. सुनिल स्वामी, कृष्णात स्वाती, शितल यशोधरा, संजय रेंदाळकर ,रेश्मा खाडे, हर्षल जाधव वगैरे संविधानी कार्यकर्ते त्याच्यासोबत आहेत.
या कामासोबत राजवैभव आणखी काय काम करतो?
जोडीदाराची विवेकी निवड, मासिक पाळी, लिंगभाव समानता अशा विषयांवर किशोरवयीन मुलं, तरुणांशी संवाद साधत राजवैभवने महाराष्ट्रभर दौरा केला आहे. 'निळू फुले फिल्म सर्कल'चा समन्वयक म्हणून विविध ठिकाणी संविधानिक मूल्यांवर आधारित चित्रपट, लघुपट प्रदर्शन आणि चर्चा, परिसंवाद घडवून आणले.
राजवैभवने अलिकडेच २०२२ साली 'राजगृह प्रकाशन' सुरू केलं आहे. संविधानिक मूल्यांना पुढे घेऊन जाणारी पुस्तकं तो प्रकाशित करतो. 'इन्कलाब जिंदाबाद' या भगतसिंगावरील पुस्तकाचं लेखनही राजवैभवने केलं आहे.
२६ जून २०२४ म्हणजेच शाहू महाराज जयंती पासून १००० दिवस महाराष्ट्र पिंजून काढायचा, संविधानाचा जागर करायचा, संविधान संवादक निर्माण करायचे, हा संकल्प त्याने केला आहे. २०२५ हे संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष. यानिमित्ताने महाराष्ट्रात संविधानाच्या व्यापक लोकजागरासाठी तो फिरतो आहे.