
पर्यावरण संतुलनासाठी, विविध पक्षी-कीटकांच्या अधिवासासाठी वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन गरजेचं असतं, इतपत माहिती आपल्याला असते. पण विशिष्ट कीटकांना, पक्ष्यांना अधिवासासाठी काही विशिष्ट वनस्पती, वृक्षच गरजेचे असतात हे किती जणांना माहिती असतं? संभाजीनगर इथली ‘जनसहयोग संस्था’ असा विचार करून झाडं लावते, त्यांची जोपासना करते. या संस्थेने आतापर्यंत किमान एक लाख पंधरा हजार झाडं लावलेली आहेत. मराठवाड्यात वृक्ष संवर्धनाचं काम सोपं नाही. पण या संस्थेने ते करून दाखवलं आहे.
प्रशांत गिरे आणि त्यांच्या आठ मित्रांनी २००९ साली ‘जनसहयोग’ची सुरूवात केली. आपापल्या नोकरी-व्यवसायात स्थिरस्थावर झाल्यावर आपण समाजासाठी काही केलं पाहिजे या विचारातून त्यांनी काही झाडं लावली, उत्साहात त्याचं जोरदार फोटोसेशन केलं. मात्र दोनेक वर्षांतच ते काम थंडावलं.
पुढे काही वर्षं प्रशांत गिरे यांनी उच्च पदावर नोकर्या करून मग स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर मधल्या काळात हाताशी रिकामा वेळ होता. आपल्या तब्ब्येतीकडे लक्ष द्यायला हवं असं त्यांच्या मनाने घेतलं. आपलं वाढलेलं वजन कमी करण्यासाठी करण्यासाठी त्यांनी एक वेगळा मार्ग निवडला.
मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात डोंगराच्या पायथ्याशी एका ठिकाणी त्यांनी वृक्षारोपणासाठी स्वतःच खड्डे खणायला सुरूवात केली. हे ठिकाण त्यांना अनपेक्षितपणे गवसलं. विद्यापीठ परिसरात ये-जा करताना त्यांना ‘सोनेरी महाल’ नावाची पुरातत्त्व विभागाची एक इमारत दिसत असे. ही इमारत म्हणजे पहाडसिंग नावाच्या पूर्वीच्या एका राजाचा महाल होता. इमारत अगदी भकास, उजाड होती. प्रशांत यांनी त्याच आवारात खड्डे खोदायला सुरुवात केली. आधी पुरातत्त्व विभागातल्या कर्मचार्यांनी हरकत घेतली खरी, पण प्रशांत यांच्याशी चर्चा केल्यावर तिथल्या अधिकार्यांनी सहकार्य करण्याचं कबूल केलं.
३ जुलै २०१६ या दिवशी त्या आवारात वृक्षारोपण झालं. त्यासाठी दोनशे लोक जमले होते. तिथे जवळच असलेल्या विहीरीतून पाणी आणून प्रशांत यांनी ती झाडं जगवली. आता प्रशांत यांचे मित्रही त्यासाठी मदतीला यायला लागले. बघता बघता शंभरएक लोकांची टीम झाली. मग अनेक ठिकाणी झाडं लावायला सुरुवात झाली.

२०१८ साली छावणी परिसरात एका मोठ्या ग्राउंडवर एकाच दिवशी ६२०० झाडं लावली गेली. या कामासाठी जवळजवळ ५००-५५० माणसं आली होती. त्यानंतर त्या झाडांची जबाबदारी छावणीचे लोक घेतील असं वाटलं होतं. पण तसं झालं नाही. त्यावर्षी मराठवाड्यात पाऊसही फारसा पडला नाही. त्यातली निम्मी झाडं करपून गेली. पुन्हा डिसेंबरमध्ये ‘जनसहयोग’च्या टीमने तिथे २५०० झाडं लावली. त्यानंतर पुढचे ४-५ महिने दर रविवारी तिथे २५०-३०० झाडं लावायला त्यांनी सुरूवात केली.
‘जनसहयोग’ने अगदी कडक उन्हाळ्यातही झाडं लावली. आणि त्यातून लक्षात आलं, की उन्हात लावलेली झाडं चांगली वाढतात, त्यांनी एक पावसाळा बघितला की ती सशक्त होतात. अनुभवातून असे एकेक धडे मिळायला लागले. कारण वृक्ष लागवड आणि संवर्धन याचा आपल्याकडे काहीच अभ्यासक्रम नाहीये. त्यामुळे या विषयात काम करणार्या व्यक्ती अनेक चुका करतात. अनेक प्रयोग करावे लागतात, त्यातले कित्येक फसतात. वाया जातात.
असंच चुकतमाकत आणि शिकत ‘जनसहयोग’चं काम पुढे जात राहिलं. पढेगाव येथे या मंडळींनी ४०० प्रजातींची २२ हजार झाडं लावली आणि जगवली आहेत. त्यासाठी वेळोवेळी स्वत:च्या खिशातून पैसे खर्च केले आहेत. प्रशांत सांगतात- “कारवी नावाचं झुडूप जे कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात उगवतं, फुलतं ते आम्ही संभाजीनगरला लावलं. असंच सोनघंटा नावाचं झाड, जे फक्त चार जिल्ह्यांत फुलतं, ते आता मराठवाड्यातही फुलत आहे.”

संभाजीनगरमध्ये त्यांनी एका एकरमध्ये झाडांपासून भारताचा नकाशा तयार केला आहे. प्रत्येक राज्याची खासियत असणारे वृक्ष त्या-त्या ठिकाणी लावून राज्यं वेगळी दाखवली आहेत. तसंच त्यांनी तीर्थंकर वाटिका तयार केली आहे. जैनांच्या २४ तीर्थंकरांच्या नावाने एकेक झाड लावलं आहे. जैनांचं पवित्र चिन्ह अडुळसा वनस्पती लावून तयार केलं आहे. अशीच बोधीवाटिकाही तयार केली गेली आहे. त्यात औषधी वनस्पतींपासून धम्मचक्र तयार केलेलं आहे. त्याचप्रमाणे कुराणवाटिका, शीखवाटिका, पंचवटी, तयार करण्यात आल्या आहेत. पक्ष्यांसाठी ज्युस बार सेंटर आहे- म्हणजे पक्ष्यांना आवडतील अशी झाडं लावण्यात आली आहेत. मधुमक्षी वाटिका, बांबूवन, कृष्णतुळस मंदिर अशा इतरही २१ प्रकारच्या वाटिका त्यांनी केल्या आहेत.
२००१ साली वटपौर्णिमेदिवशी त्यांनी ३५० महिलांच्या हस्ते २२१ वटवृक्ष लावण्यात आले. ते सगळे आता १५-२० फूट वाढले आहेत. रामवड, कृष्णवड, कबीरवड अशा वडाच्या विविध प्रजाती इथे लावण्यात आल्या आहेत. असंच दसर्याच्या दिवशी आपट्याच्या वृक्षांच्या बाबतीतही केलं जातं. हजारो फुलपाखरं, नानाविध पक्ष्यांची घरटी, विविध प्रकारची फुलं-फळं यांनी मराठवाड्याचा काही भाग आता समृद्ध झालेला आहे.
मराठवाड्यातलं पहिलं बायोडायव्हर्सिटी प्रोजेक्ट म्हणून छावणी परिषद, डम्पिंग ग्राउंड इथल्या कामाची ओळख झालेली आहे. या ठिकाणी २५० हून अधिक प्रजातींची लागवड करण्यात आलेली आहे. वेगवेगळ्या ४५ ठिकाणी लावलेल्या या झाडांना ‘जनसहयोग’चे सदस्य उन्हाळ्यात दररोज पाणी देतात. मार्च, २०१६ पासून संस्थेचे स्वयंसेवक सातत्याने दररोज श्रमदान करतात. अगदी कोविड काळातही त्यात खंड पडला नाही.
हे काम बघून कोणाला त्यात सहभागी व्हायचं असेल किंवा आपल्या भागात अशा स्वरूपाचं काम करायचं असेल तर इथे दिवसभराचा नेचर वॉक आयोजित केला जातो. तिथे झाडांचं निरीक्षण करत त्याबद्दल हवी ती माहिती दिली जाते. मात्र इथे ‘फोटो, सेल्फी काढून, दंगामस्ती करून या जागेचा पिकनिक स्पॉट होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या’ कठोर सूचना दिलेल्या असतात. पर्यावरण संतुलन राखायचं असेल तर अशा गोष्टींची आपल्याला सवय करून घ्यायला हवी, या विषयातलं आपलं ज्ञान आणि योगदान वाढवायला हवं, हेच ‘जनसहयोग’च्या कामातून सिद्ध होतं.
वृषाली जोगळेकर | joglekarvrushali.unique@gmail.com
वृषाली जोगळेकर युनिक फीचर्समध्ये कार्यरत असून समाजाच्या विविध क्षेत्रांतील कर्तुत्ववान आणि धडपड्या व्यक्तींबद्दल लिहिण्यात त्यांना विशेष रस आहे.