आम्ही कोण?
माणसं आणि कामं 

शेती, पाणी, लाईट, शाळा: या गावात आता सगळंच आहे

  • सोमिनाथ घोळवे
  • 12.08.25
  • वाचनवेळ 6 मि.
chikhalgaon sarpanch kiran fale

पुणे जिल्ह्यातील, मुळशी तालुक्यातील चिखलगाव. गावाच्या पश्चिमेकडे हाकेच्या अंतरावर मुळशी धरण, तर उत्तर दिशेला देखील हाकेच्या अंतरावर पवना धरण आहे. तरीही पावसाळ्याचे चार-पाच महिने वगळता गाव पाणीटंचाईग्रस्त असतं. अगदी पिण्याचं पाणी देखील पुरेसं मिळत नाही. गावाचा शिवार खडकाळ, डोंगराळ आणि तीव्र उताराचा असल्याने शेतीतून मर्यादित आर्थिक उत्पन्न मिळतं. परिणामी गावातली अंदाजे ५० टक्के कुटुंबं रोजगारासाठी पुणे, मुंबईसारख्या शहरांत स्थलांतर झालेली. एकूणच रस्ते, पाणी, शेती, उद्योग-व्यवसाय विकासापासून वंचित राहिलेलं असं हे गाव होतं.

मात्र, गावाला तीन–चार वर्षांपूर्वी एक तरुण सरपंच लाभले- ३२ वर्षीय किरण राम फाले. त्यांनी ग्रामस्थांना बरोबर घेत विकास कामांद्वारे गावाचा चेहरा बदलून टाकला. प्रामुख्याने गावाला जोडणारा दोन साकव पूल बांधणं, गावात सिमेंट रस्ते, पाणंद रस्ते बांधणं, दलित वस्तीत सभामंडप उभारणं, सांडपाणी व्यवस्थापन, सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम इत्यादी कामं तर त्यांनी केलीच. शिवाय विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातून नवीन पाईपलाईनद्वारे डोंगरावरील नैसर्गिक पाणीस्त्रोतातून आणि नदीकाठावरील विहिरीतून पिण्याचं पाणी गावात आणणं, पाण्याची टाकी बांधणं, पाणी फिल्टर बसवणं, शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पनाचे स्रोत वाढवण्यासाठी फळझाडं लागवड, पडीत क्षेत्रावर वृक्षलागवड, मुलांच्या दर्जेदार शिक्षणासाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून देणं, रस्त्यावर सौरदिवे बसवणं, शेतकऱ्यांना सौर पॅनल आणि पंप मिळवून देणं अशी अनेक विकासात्मक भरीव कामं त्यांनी केली आहेत.

मुळशी तालुक्यातील कोळवण खोऱ्यात २५०० ते ३००० मिमी पाऊस पडतो. मात्र मोजक्या पाझर तलावांचा अपवाद वगळता सर्व पाणी वाहून जातं. त्यामुळे डिसेंबरनंतर पाण्याचा तुटवडा जाणवू लागतो. या परिसरात पर्यटनाला चालना देण्याची संधी आहे. किमान हिवाळा हंगामात जमीन ओलिताखाली आणता येईल अशीही स्थिती आहे. मात्र आजवर या परिसराकडे विकासाच्या नजरेतून पाहिलं गेलेलं नाही. यास चिखलगाव अपवाद नाही.

chikhalgaon sarpanch kiran fale

गावाचं ८० टक्के क्षेत्र हिवाळा-उन्हाळ्यात कोरडवाहू असतं. पावसाळ्यात भात पिक घेतल्यानंतर दुसरं पीक पाण्याअभावी घेता येत नाही. गावाच्या शिवारात पडणारा जास्तीचा पाऊस आणि खडकाळ क्षेत्र यामुळे पाणीसाठे क्षेत्र वाढवण्यास मर्यादा आहेत. तरीही किरण राम फाले यांनी ग्रामविकासाची वाट स्वीकारली.

सरपंच किरण राम फाले अगदी सामान्य कुटुंबातील आहेत. त्यांनी मुंबईत आयटीआयमध्ये शिक्षण घेतलं. कंपनी कामगार म्हणून नोकरी सांभाळत गावासाठी काहीतरी करायचं या भावनेतून त्यांनी प्रथम ग्रामपंचायत निवडणूक लढवली. त्यात ते निवडून आले.

पुढे त्यांना केवळ तीन वर्षं सरपंचपद मिळालं. मात्र या अल्प कालावधीत त्यांनी गावात शासनाच्या विविध योजनांतून ९५ लाख रुपयांची आणि विविध कंपन्यांच्या सीएसआर निधीतून ६५ लाख रुपयांची, अशी तब्बल १.६ कोटी रुपयांची विकासकामं केली आहेत.

गावाला कोणत्या कामांची गरज आहे याचा त्यांनी प्रथम शोध घेतला. त्यानुसार प्राधान्यक्रम ठरवला. जिल्हा परिषदेतून आणि सीएसआर निधीतून अनुक्रमे कोणकोणती कामं करवून घ्यायची याची विभागणी करून आराखडा तयार केला आणि प्रत्यक्ष कृतीत उतरवला.

गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होता. ४० वर्षांपूर्वी नदीच्या काठावरील विहीरीतील पाणी पाईपलाईनद्वारे गावात आणलं गेलं होतं. मात्र ते पाणी अशुद्ध असल्याने गावातले लोक सतत आजारी पडत होते. संरपंचांनी हा प्रश्न तीन टप्प्यांत सोडवला.

chikhalgaon sarpanch kiran fale

पहिला टप्पा पूर्णतः नैसर्गिक पाणीस्त्रोतावर आधारित आहे. गावशिवारात २ किमी उंच डोंगरावर नैसर्गिक झरा आहे. या झऱ्याला ८ महिने २४ तास पाणी असतं. पण इतकी वर्षं ते वाया जात होतं. हे पाणी गावातील लोकांपर्यंत पोहोचलंच पाहिजे असा निश्चय सरपंचांनी केला. मात्र डोंगराच्या तीव्र उतारामुळे पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेने या कामाला नकार दिला. मात्र सरपंच फाले यांनी हार न मानता विविध कंपन्यांचे सीएसआर निधी मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यात तीन-चार कंपन्यांना गावाची पाहणी केली. मात्र निधी देण्यास नकार दिला.

अखेर सरपंचांनी ते जिथे काम करतात त्या फिनिक्स मेकॅनो (इं) प्रा. लि. या कंपनीशी संपर्क साधला. कंपनीच्या अधिकारीवर्गाने गावात येऊन प्रत्यक्ष पाहणी केली. पुढे त्यांणी निधी उपलब्ध करून दिलाच. शिवाय कामांमध्ये पुढकार घेत सहा महिन्यांत काम पूर्णही केलं. परिणामी गावाला ८ महिने वीजवापराविना पाणी मिळू लागलं. आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या ग्रामपंचायतीला असं २४ तास नळाद्वारे नैसर्गिक स्त्रोताचं शुद्ध पाणी मिळणं ही खूप मोठी बाब आहे.

दुसऱ्या टप्प्यात गावापासून २ किमी अंतरावर असलेल्या सार्वजनिक विहिरीतून मार्च ते मे या तीन महिन्यांसाठी पाणी मिळवण्याचं काम केलं गेलं. ४० वर्षांपूर्वीची जीर्ण झालेली पाईपलाईनचे नव्याने टाकण्यात आली. पाण्याच्या शुद्धीकरणाची यंत्रणा बसवली गेली. तसंच पाण्याच्या टाकीजवळ देखील वीजेवर चालणारा पाणीफिल्टर बसवला गेला.

chikhalgaon sarpanch kiran fale

तिस-या टप्प्यात गावातली नळकोंडाळ्याची व्यवस्था बदलून प्रत्येक घरी स्वतंत्र नळ देण्यात आला.

वरील तिन्ही टप्प्यांतील कामासाठी फिनिक्स मेकॅनो कंपनीकडून ३० लाखांपेक्षा जास्त सीएसआर निधी उपलब्ध झाला असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं.

गावातील रस्त्यांवर एकूण ५६ पथदिवे आहेत. सरासरी एका दिव्यासाठी ५०० रुपये खर्च या हिशोबाने हे दिवे वर्षातून एकदा बदलले तर एकूण २८ हजार रुपये खर्च येत होता. त्याऐवजी सीएसआर निधीतून प्रथम २५ सौरदिवे बसवले गेले. त्यानंतर आता आणखी ३० सौरदिवे बसवण्याचं काम प्रस्तावित आहे. यामुळे दरवर्षीचा २८ हजार रुपयांचा खर्च तर वाचलाच. शिवाय गावातील धनगर समाजाची ८ कुटुंबं डोंगरावर वर्षानुवर्षं अंधारात राहत होती, त्यांच्या वस्तीवरही प्रथमच सोलर दिवे बसवले गेले.

प्राथमिक शाळेसाठी लागणाऱ्या उपकरणांसाठीच्या वीज पुरवठ्यासाठीही शाळेच्या छतावर सोलर पॅनेल बसवण्यात आले. याशिवाय कुसुम योजनेअंतर्गत गावातल्या १३ शेतकऱ्यांनी विहीर आणि बोअरवेलवर सौरपंप बसवले. एकूणच गावात सौरऊर्जेचा पुरेपूर वापर करून घेतला जात आहे.

chikhalgaon sarpanch kiran fale

गावातील दर्जेदार शाळाशिक्षणासाठी सरपंचांनी शिक्षक कुंडलिक कांबळे यांच्याकडून आराखडा बनवून घेतला. त्यानुसार लहान मुलांसाठी खेळाचं सर्व साहित्य आणलं. शाळेची इमारत सुसज्ज केली. इमारतीची रंगरंगोटी केली. शाळेत तीन संगणक आणले, एक प्रिंटर आणला. विजेसाठी सोलर पॅनेल बसवले. मुलांसाठी पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था केली. स्वच्छतागृह बांधलं. पोषण आहारासाठी किचनशेड बनवलं. तसंच मुलांना प्रशिक्षण आणि माहितीसाठी गांडूळ खत केंद्रही उभं केलं. याशिवाय जपानी तंत्रज्ञानाची ‘मियावाकी’ बाग उभारली. मियावाकी बाग उभारणारी ही जिल्ह्यातील पहिली शाळा आहे.

गावात आर्थिक स्त्रोत खूपच मर्यादित असल्याने इथे स्थलांतराचं प्रमाण जास्त आहे. मात्र गावात जी कुटुंबं तगून राहिलेली आहेत, त्यांना योग्य उत्पन्न मिळावं यासाठीही सरपंचांनी प्रयत्न केले. त्यासाठी दुग्ध उत्पादन वाढवणं, पशुधन वाढवणं आणि फळबाग लागवड, असे तीन पर्याय होते. त्यातील फळबाग लागवडीचा पर्याय निवडण्यात आला. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे, त्यांना हापूस आंब्याची रोपं वाटण्यात आली. अशी १७०० कलमी रोपं रत्नागिरी येथील नर्सरीतून आणली गेली. याशिवाय शिवारातील डोंगरावर बरीज उजाड, पडीक जमीन होती. तिथे चिंच, आवळा, करंजी, कडुलिंब अशी कमी पाण्यावर तग धरून राहू शकणारी १२०० झाडं लावली गेली. त्यांची रोपं वनविभागाच्या नर्सरीकडून घेतली गेली. वृक्ष लागवडीचा दुसरा टप्पा केसर आंबा लागवडीचा आहे. ही सर्व कामं देखील फिनिक्स मेकॅनो कंपनीच्या सीएसआर निधीतून केली गेली.

chikhalgaon sarpanch kiran fale

याशिवाय शासकीय योजनांच्या निधीतून गावातील सिमेंट रस्ते, समाज मंदिर, सभा मंडप, ग्रामपंचायत इमारत, गावांना जोडणारे दोन साकव पूल, शोषखड्डे, सांडपाणी व्यवस्थापन, गावक-यांची आरोग्य तपासणी इ. कामं केली गेली. यासाठी गावाला एकूण ९५ लाखाचा निधी मिळाला. त्यामुळे इथे आता स्थलांतराचं प्रमाण बऱ्याच अंशी कमी झाल्याचं ग्रामस्थ सांगतात.

एकंदर, कोणत्याही गावाच्या विकासात सरपंचाची भूमिका किती महत्वाची असते ते सरपंच किरण फाले यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं. 

सोमिनाथ घोळवे | 9881988362 | sominath.gholwe@gmail.com

सोमिनाथ घोळवे हे ग्रामीण समाज व्यवस्थेचे अभ्यासक आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 11

Shobha Srikanth 24.01.26
Very inspiring story.. Hope all villages in India get such motivated Sarpanch like Kiran Fake.. All the best for your future endeavours . We from Palavi Nurturing Minds And Beyond Foundation would like to work with you for your Village .

विजय hibare13.08.25
एक नेता चांगला मिळाला तर खुप काही चांगले बदल होऊ शकतात. एक चांगला सरपंच गावाला मिळाला तर अख्ख गाव सुधारू शकतो. तसंच एक चांगला आमदार मिळाला तर जवळपास एक तालुका व एक चांगला खासदार मिळाला तर जवळपास एक जिल्हा सुधारू शकतो. म्हणून आपण यांना नेता म्हणतोत. पण आपले आमदार, खासदार नेता या शब्दाला खरे उतरणारे राहिले आहेत का?

प्रा. भरतकुमार पवार, ऊस तद्न ,पुणे13.08.25
मा. सरपंच आपल हार्दिक अभिनंदन आणि प्रयत्नास सलाम.

ललिता13.08.25
छान परिचय. वेगवेगळ्या गावांमधल्या चांगल्या कामांचा असा परिचय वाचायला आवडतो.

Santosh Baburao Nikam13.08.25
खूपच कौतुकास्पद कार्य.. प्रत्येक गावातील सरपंच यांनी आदर्श समोर ठेवून वाटचाल केली पाहिजे..

Sanjyot Raut13.08.25
ग्रामपंचायती मार्फत चांगले काम केले आहे.

संजय ज्ञानोबा शिंदे 12.08.25
सरपंच यांनी जे गावासाठी काम केलेलं ते आदर्श आहे. असे लोक राजकारणात खूप कमी आहेत. अशा लोकांनी स्वतः होवून राजकारणात येऊन नेतृत्व करावे.

रविंद्र शिंदे 12.08.25
खूप छान सर, असा सरपंच प्रत्येक गावाला मिळाला पाहिजे तरच गावचा विकास होऊ शकतो, खूप छान माहिती मिळाली, thanku सर. 🙏🙏🙏🙏

Prasad 12.08.25
अशा प्रामाणिक लोकांची देशाला गरज आहे चॅनल वाले यांनी अशा बातम्या दाखवून अशा लोकांना प्रेरणा द्यावी र

विलास दौलतराव आवारी12.08.25
खरे तर असे सरपंच गावागावात झाले पाहिजे निस्वार्थीपणे केवळ गावचा विकास करावा या हेतूने सरपंच पद स्वीकारून आणि त्याला न्याय देण्यात यावा फालेंनी नेमके हेच काम केले त्यामुळे निश्चितच गावच्या दृष्टीने ते त्यांचे दैवत झाले

किरण राम फाले 12.08.25
खुप खुप धन्यवाद सर तुमच्या माध्यमातून आमच्या सारख्या सामान्य नागरिकांना तुमच्या लेखणीतून वेगळ्या प्रकारे गावातील विकास कामंसंदर्भात समाजात ओळख निर्माण करून दिली त्याबद्दल आम्ही व संपूर्ण चिखलगाव तुमचे अगदी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो...! 🙏🏻🙏🏻🙏🏻

See More
gangotree homes advertisement

Select search criteria first for better results