
कुठल्याही अनोळखी गावात आल्यानंतर एक अस्पष्ट भावना मनात उमटून जाते- ‘अरे! मी पूर्वी इथे कधी तरी आलो होतो.' त्या भावनेचं वर्णन करण्यासाठी फ्रेंचांनी जगाला दिलेला शब्द म्हणजे देजा-वू. वाईच्या कृष्णेच्या छोट्या दगडी पुलावर मी उभा होतो त्या वेळी हीच भावना मला स्पर्शून गेली होती. समोर उन्हात चकाकणारं कृष्णेचं वाहतं पात्र, त्यातली सुबक धाटणीतली देवळं, पाण्यातली त्यांची तरंगती प्रतिबिंबं, प्रपोरशनेट रेखीव दगडी घाट, त्याला लागून शंभर-दीडशे फूट उंच चिरेबंदी आणि सडपातळ विटांची अनेक खिडक्यांना- कौलांच्या छपरांना तोलून धरणारी तटबंदी. घाटावर उघडणारी दगडी प्रवेशद्वारं. दुरून ये-जा करताना दिसणारे स्त्रिया, माणसांचे तुरळक ठिपके. देवळांतून पाण्यावरून वाहत येणारे घंटानाद.. आणि पलीकडच्या झाडीवरून उतरत सर्वांवर पसरलेली सोनेरी उन्हं!
ढोल्या गणपती मंदिराला वळसा घातला की रस्ता थोडा चढणीचा लागतो. उजव्या बाजूला दिसतं हिरवी चादर घातलेलं छोटं टेकाड. त्यावर पांढऱ्याशुभ्र भिंती, तीन पायऱ्यांचा इदगाह. डाव्या बाजूला गेलेला उतार विश्वकोशाच्या पिवळ्या इमारतीपाशी वळून जातो तो थेट गंगापुरी घाटाच्या भव्य कमानीच्या वेशीपाशी. खाली उतरलं की घाटाच्या पायऱ्या उतरून कृष्णेच्या पाण्यात पाय सोडता येतात. पाय धुऊन माघारी वळता, परत वेशीतून आत शिरल्यावर लागूनच असलेल्या लाकडी जुन्या दरवाज्यातून आत आलात की लागते ती प्राज्ञ पाठशाला!
पाठशालेत शिरल्यावर प्रथम लागतो तो चौक. तिथल्या आजूबाजूच्या खोल्यांत, बाहेरच्या पडव्यांमध्ये दिसतात ते परदेशी, भारतीय अभ्यासक. समोरच्या भक्कम दरवाज्यावर आहे केवलानंद सरस्वती गुरुजींचा फोटो. उजव्या बाजूला लोटलेल्या दरवाज्याच्या आत आहे अभ्यासिका. जाळीच्या दरवाज्यातून पुढे गेलं की दिसतो दगडी चौक, त्यातलं मोठं झाड, रहाटवाली विहीर, त्याला लागून मुंढारं असलेली भिंत. भिंतीपाशी उभं राहिलं की खाली खोल कृष्णा नदी, देवळं, त्यावरचं पसरलेलं पिवळं ऊन, पसरणी घाटापर्यंत पसरलेली शेती, दाट झाडी. त्यापलीकडच्या डोंगररांगा आणि खोऱ्यातून येणारं मनमोकळं वारं.
अभ्यासिकेचं लोटलेलं दार उघडलं की दिसतात ग्रंथ, पोथ्या, हस्तलिखितं. पुस्तकांनी तयार झालेल्या भिंतीमधल्या टेबलावर रचून ठेवलेली असंख्य पुस्तकं. घाटाकडे उघडणाऱ्या खिडक्या. समोरच एका मोठ्या टेबलावर रचलेल्या पुस्तकांमध्ये पांढरी टोपी, धोतर, कुडता आणि चष्मा घातलेले आबा दिसतात. त्यांच्यासमोर उघडे ग्रंथ असतात. बाजूला नेहमी एक नोटपॅड असतं. या अभ्यासिकेतल्या ज्ञानाचे हे गुरुजी म्हणजे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी. घरच्यांसाठी आणि आप्तांसाठीचे ‘आबा'!
“या अवचट!” चष्म्यातून पाहत ते म्हणतात. त्यांच्या आवाजाला थोडी खर्जातली किनार असते.
माझी आणि आबांची पहिली भेट अगदी अनपेक्षित होती. श्रीराम पुजारी हे कॉलेजमधील शिक्षक आणि संगीतातले जाणकार होते. ‘१०२, रेल्वे लाइन्स, सोलापूर' हा त्यांचा पत्ता. भीमसेन जोशी, कुमार गंधर्व अशा अनेक महान गायकांची, अनेक लेखकांची तिथे ऊठबस असायची. आम्ही त्यांना ‘रामकाका' म्हणत असू. माझाही त्यांच्याकडे अनेकदा मुक्काम असे. त्यांच्या भावाने रामदासांवर पुस्तक लिहिलेलं. त्याचं मुखपृष्ठ मी केलं होतं. ‘कॉन्टिनेंटल'ने ते प्रकाशित केलेलं. प्रकाशन समारंभ सोलापुरात होता. मला निमंत्रण होतंच.

एका सकाळी एक छोटी व्हॅन माझ्या मित्रमंडळातल्या घरापाशी आली आणि आम्ही त्या सोहळ्यासाठी सोलापुरास निघालो. व्हॅनमध्ये पाच-सहा लोक होते. त्यात कॉन्टिनेंटल प्रकाशनचा अनिरुद्ध कुलकर्णी पुढे बसला होता. बाकी कर्मचारी असावेत. मागे एक ज्येष्ठ गृहस्थ बसले होते. त्यांच्या बाजूच्या रिकाम्या सीटवर मी बसलो. त्यांच्याकडे पाहिलं, तर खादीचं जाकीट, टोपी, धोतरातले गृहस्थ माझ्याकडे शांतपणे पाहत होते. प्रवासात त्यांनी मला विचारलं, “तुम्ही कोण?” मी म्हणालो, “माझं नाव सुभाष अवचट. मी चित्रकार आहे.”
“आपण कोण?” मीही त्यांना विचारलं, तसा अनिरुद्ध एकदम उचकलाच. मान वळवून मला म्हणाला, “ही काय मोठ्या माणसाला विचारायची पद्धत झाली?”
मी म्हणालो, “अरे, मला काय माहीत हे कोण आहेत?” व्हॅनमधील इतर लोकही माझ्याकडे पाहू लागले. वातावरण गंभीर झालं आणि मी थोडा अस्वस्थ झालो. माझं काही तरी चुकलं याचा अंदाज आला, तसे ते टोपीवाले गृहस्थ म्हणाले, “कुलकर्णी, तुम्ही जरा शांत व्हा. आम्ही दोघं आमचं काय ते बघू.” मग माझ्याकडे वळून ते म्हणाले, “मी जोशी.. लक्ष्मणशास्त्री जोशी.”
मी म्हणालो, “काय करता तुम्ही?”
“मी वाईला असतो,” असं ते म्हणाल्यावर मी म्हणालो, “ओके- ओके” एवढं बोलणं होऊनही माझ्या डोक्यात काही प्रकाश पडलेला नव्हता.
व्हॅनने हडपसर पार केलं आणि शास्त्रीजींनी जाकिटातून बेन्सन अँड हेजेसचं पाकीट बाहेर काढलं. माझ्यापुढे करून म्हणाले, “घ्या. सिग्रेट ओढता ना?” मी लगेच म्हणालो, “हो. पण तुमच्यासमोर नको. आणि गाडीत तर नकोच.” हे गृहस्थ कोणी मोठे शास्त्री असावेत, तर त्यांचं वर्तन मात्र त्या प्रतिमेशी विसंगत दिसत होतं. बऱ्याच वेळानंतर शास्त्रीजींनी मला विचारलं, “अवचट, पिकासोबद्दल तुमचे काय विचार आहेत?” हे ऐकून मी येडाच व्हायची वेळ आली. जाकीट, टोपीतले हे शास्त्री आणि पिकासो हे समीकरणच मला कळलं नाही. मी म्हणालो, “चांगला विषय आहे. आपण बोलत जाऊ या.”
मग त्यांनी हळूहळू रेनेसान्स ते ॲबस्ट्रॅक्ट, पाश्चिमात्त्य कला ते भारतीय लोककलांतील शैली यावर गप्पा चालू केल्या. माझा शास्त्रींबद्दलचा आदर वाढत होता, कारण ते माझ्याशी चित्रकलेबाबत बोलत होते. चहासाठी गाडी थांबली. खाली उतरल्यावर अनिरुद्धने मला झाडापलीकडे नेलं आणि झापायला सुरुवात केली. “तुला माहिती आहेत का ते कोण आहेत? ही वागण्याची पद्धत झाली का?” मी म्हणालो, “उगीच आगाऊपणा करू नकोस. मी त्यांचा अनादर केलेला नाही. ते माझ्याशी छान गप्पा मारत आहेत. ते आणि मी पाहून घेऊ.” भडकलेला त्याचा राग शांत झाला नाही.
सोलापूर जसं आलं तसं शास्त्रीजी म्हणाले, “आमचं ‘नवभारत' नावाचं मासिक आहे. त्यात चित्रकलेवर लिहिणार का?”
मी म्हणालो, “अहो, मी समीक्षक नाही. मला लिहिता येणार नाही.”
“येईल, येईल. प्रयत्न करा.” शास्त्रीजी हसून म्हणाले. संध्याकाळी शास्त्रीजींनी पुस्तकाचं प्रकाशन केलं. रामदासांवर त्यांच्यासह अनेक मान्यवर वक्त्यांची भाषणं झाली. मला एक शालही मिळाली. कार्यक्रम संपला. रामकाकांच्या घरी मैफल सजली. त्यांचे मित्र, प्राध्यापक, गायक, लेखक, सोलापुरातले काही प्रतिष्ठित लोक जमले होते. सोलापूरचे प्रसिद्ध कबाब आणि उंची मद्यही होतं. पण तिथे शास्त्रीजी नव्हते. गप्पा सुरू झाल्या अन् तेवढ्यात कोठारी नावाचे रामकाकांचे मित्र जिना चढत धापा टाकत आत आले. त्यांचं मोठं मुद्रणालय होतं. ते घाईतच म्हणाले, “शास्त्रीजींनी बोलवलंय.” हे ऐकताच अनिरुद्ध उठला. म्हणाला, “मी जाऊन येतो.” तर कोठारी म्हणाले, “तुम्हाला नाही, सुभाष अवचटांना बोलवलंय.”
मला का बोलावलं हे मला कळलं नाही. मी नेहमी म्हणतो- कधी काय घडेल याचा भरवसा नाही!
कोठारी गाडी चालवत होते. संध्याकाळ सरली होती. विरळ वस्तीतल्या एका बंगल्याच्या गेटमधून गाडी आत आली. आवारातल्या वाळूवर गाडी तिरकी उभी राहिली. मी पाहिलं, छोट्या व्हरांड्यात शास्त्रीजी एका लाकडी बाकड्यावर बसले होते. त्यांनी टोपी काढून समोरच्या टेबलावर ठेवली होती. वर लोंबकळणाऱ्या दिव्याचा प्रकाश समोरच्या वाळूवर सावल्या घेऊन पसरलेला होता. व्हॅनमध्ये सकाळी ओळख झालेल्या या अनोळखी विद्वानासमोर मी बसणार होतो. माझ्यावर दडपण नव्हतं. कारण त्यांना पिकासो माहीत होता. पायजम्यातल्या एका सुकड्या नोकराने माझी बॅग आत नेली. कोठारी अवघडून बसले. मद्याची बाटली, बर्फ, ग्लासेसचा ट्रे घेऊन नोकर आला आणि टेबलावर ठेवून आत गेला. कोठारी म्हणाले, “जेवणाची व्यवस्था आहे. मी येतो.” कोठारी गेल्यावर मला शास्त्रीजी म्हणाले, “दुपारी सिग्रेट ओढायला लाजलात.. आता ओढा आणि ड्रिंक घ्या. मला तुमच्याबरोबर गप्पा मारायच्या आहेत!”
गप्पा सुरू झाल्या. शास्त्रीजी एकच पेग अत्यंत संयमाने, चवीने घेत राहिले. मी बोलत असताना त्यांचे डोळे एकाग्र होत होते. ते मला ‘अहो-जाहो' करत होते. मी म्हणालो, “शास्त्रीजी..” मला अडवून म्हणाले, “मला तुम्ही ‘आबा' म्हटलं तरी चालेल.” परंतु त्यांनी कधीही मला एकेरी नावाने हाक मारली नाही.
आबा रात्री जेवत नसत. त्या रात्री काय गप्पा झाल्या मला आठवत नाहीत. मी काय जेवलो, झोपलो कधी, आठवत नाही. एका दिवसात काहीही घटना घडू शकतात, एवढं मला कळलं. जसे द्वैत-अद्वैताचे घड्याळाचे काटेच निसटतात. त्या रात्री एका विद्वानाच्या संवादात मी गाढ झोपलो. आणि पहाटे पाहतो तर आबा माझ्या खोलीबाहेर मॉर्निग वॉकसाठी तयार होते. सोलापुरातल्या त्या कोरड्या सकाळी परतताना आबा म्हणाले, “मी पुण्यात येत असतो. मला तुमच्या घरी यायचं आहे. तुमच्या कुटुंबाला भेटायचं आहे. आणि रात्री तुम्ही प्रॉमिस केलं आहे की आमच्या वाईतल्या प्राज्ञ पाठशाळेत तुम्ही येणार आहात! आठवतं का?”
पुण्यात माझ्या घरापाशी सोडायला व्हॅन थांबली. फ्रंट सीटवर अनिरुद्ध अजून रागावून बसलेला होता. निघताना आबांना पाया पडायला मी वाकलो तसे ते म्हणाले, “अवचट, वाईला या. श्रद्धा असेल तर वाका, पाया पडा. हे तुमच्यावर सोडलं.”
पुढे मी ते निमंत्रण विसरून गेलो. अचानक एके दिवशी फोन वाजला. “मी राम कोल्हटकर.” पलीकडून आवाज आला- “मी आबांचा सेक्रेटरी. आबा पुण्यात आहेत. तुम्हाला भेटू इच्छितात.” त्या संध्याकाळी आबा, त्यांचा मुलगा वासुदेव आणि कोल्हटकर माझ्या घरी आले. माझ्या टेरेस गार्डनमध्ये बैठक जमली. माझा मुलगा ध्रुव आबांबरोबर खेळत होता. जाताना आबा मला म्हणाले, “वाईला कधी येताय?”
नंतर मी वाईला पोहोचलो तेव्हा सूर्य बुडाला होता. वाड्याच्या चौकात आबा, मे. पुं. रेगे आणि दोन-चार बुजुर्गांची बैठक जमली होती. कुठल्या तरी विषयावर चर्चा सुरू होती. जेवणानंतर मला वरच्या मजल्यावरची खोली वासुदेवने दाखवली. घाटाकडे उघडणारी खिडकी, स्वच्छ चादर, उशीचा पलंग. मला वाटलं, इथे सर्व आहे. खाली कृष्णा वाहते आहे. खिडकीतून पाचगणीच्या खोऱ्यातून येणारी औषधी हवा आहे. काठावरच्या देवळांतून उंचावर पोहोचणाऱ्या घंटांचा मंद, धार्मिक-तरंगता ध्वनी आहे. मध्येच घाटाअलीकडच्या अंधाऱ्या रस्त्यावरून गेलेल्या बुलेटचा त्रासदायक आवाज सोडला तर सारं शांत आहे. उशीवर डोकं टेकवताना विचार आला, अजून खोलवर मला काही तरी शोधायचं आहे.
पहाटेच आबांनी मला उठवलं. “अवचट, तयार व्हा. खाली या.” मी तयार होऊन खाली आलो. आबा स्वयंपाकघरात काही तरी करत होते. एका बशीत तव्यावर भाजलेल्या लसणाच्या पाकळ्या आणून त्यांनी टेबलावर ठेवल्या आणि म्हणाले, “हा लसूण नेहमी अनशेपोटी खात जा.” बहुतेक माझी शिकवणी सुरू झाली होती.
आम्ही चालायला निघालो. आबांनी धोतर कसून बांधलं होतं. कॅनवासचे शूज आणि मोजे घालून चालताना ते मजेशीर दिसत होते. वाईतील वाडे, रस्ते पेंगुळलेले होते. कृष्णेच्या पात्रावर धुक्याची हलकी चादर होती. देवळंदेखील आरत्या, पूजेसाठी वाट पाहत उभी होती. आम्ही चालत पसरणीच्या घाटाकडे निघालो होतो. मध्येच आबा म्हणाले, “जरा पायवाटेवरून जाऊ. तुम्हाला मला काही दाखवायचं आहे!” शेतातून गेलेल्या पायवाटेवरच्या झाडीत ते थांबले आणि म्हणाले,“ही बघा वाई!” मी बघतच राहिलो. नदीच्या पात्रावरच्या धुक्याच्या एका रेघेवर समोरचं सुबक प्राचीन गाव तरंगत होतं. घाटावरच्या त्या तटबंदी वेशीतून उतरलेले रस्ते, अलीकडचे देवळांचे कळस, मध्ये उभं असलेलं झाड!
“ती बघा, प्राज्ञ पाठशाला आणि ती उंच, वरची तुमच्या खोलीची खिडकी!”
“हे पेंटिंगच आहे!” मी म्हणालो. त्यावर ते उत्तरले, “एकदा दुपारी मी तुम्हाला वाईतले वाडे दाखवणार आहे.”
“येस! मजा येईल.” मी म्हणालो.
येताना रस्त्यावरच्या भाजीवाल्याकडून निवडून आबांनी भाजी घेतली. घरी परतल्यावर मला म्हणाले, “स्नान करा. आपण वरच्या खोलीत भेटू.”
थोड्या वेळाने मी तिथे गेलो तेव्हा आबा योगसाधना करत होते. “चला! सुरू करा.” मीही योग सुरू केला. मधूनच ते माझी पोझिशन नीट करत. त्यांनी मला ताडासन परफेक्ट शिकवलं आणि प्राणायामातली श्वासांची गणितंही.
ब्रेकफास्ट टेबल हे नेहमी मे. पुं. रेगे, कधी विश्वकोशातले समीक्षक, रिसर्च करायला आलेला एखादा फिरंगी, भेटायला आलेली विद्वान मंडळी यांनी भरलेलं असे. तिथेही चर्चा असेच. दुपारच्या जेवणालाही हाच सीन. हे घर सतत पाठशालेसारखंच वाटायचं. ब्रेकफास्टनंतर मात्र आबा तरातरा अभ्यासिकेत जात. दुपारच्या जेवणानंतर तक्क्याला टेकून पंधरा-वीस मिनिटं डोळे मिटून बसत. दुपारी आडवं पडायचं नसतं हे मी तिथे शिकलो खरा; पण जमलं नाही.
आबांची अभ्यासिका हा वाड्याचा गाभारा! मोठा ग्रंथ वाचत असताना ते शेजारच्या वहीत काही तरी लिहीत असत. मी विचारल्यानंतर म्हणाले, “ज्या शब्दांचे अर्थ कळले नाहीत किंवा महत्त्वाचे आहेत, ते लक्षात ठेवण्याची ही सोपी युक्ती आहे.” ती त्यांना विनोबा भाव्यांनी शिकवली होती. विनोबांनीच त्यांना इंग्रजी या पद्धतीने शिकवलं. आबांनीही मला ‘ट्रान्सडेंटल' शब्दाचा उच्चार आणि अर्थ कसा लक्षात ठेवायचा असे शब्द स्मरणात कसे ठेवायचे ते शिकवलं. ते सांगत- उच्चार घोळवायचा! आबा हे शास्त्री, तर्कतीर्थ होते. पठण हा त्यांच्या अभ्यासाचा गाभा होता. त्यांनी मला ‘क्रिटिकल आय' नावाचं पुस्तकही भेट दिलं होतं.
या अभ्यासिकेने मला आबांच्या थोर कामाची साक्ष दिली. धर्मकोश- विश्वकोशातील संपादित अमूल्य ग्रंथसंपदा, हिंदू धर्माची समीक्षा, त्यांचे लेखसंग्रह, इंग्लिश भाषा, आधुनिक पश्चिमी ज्ञान-विज्ञानाचा सखोल अभ्यास, शुद्धि सर्वस्वयं-आनंद मीमांसा, ज्योती निबंध, वैदिक संस्कृतीचा विकास, राजवाडे- टिळक यांचे लेखसंग्रह हे सर्व तिथे होतं. पण गंमत अशी, की आबांनी पॅरिसला वाचलेला ‘द कॉस्मिक स्टेट ॲण्ड कलेक्टिव्ह किंगशिप ऑफ वैदिक गॉड्स' हा शोधनिबंध मला आधीच वाचायला दिला होता! मानवेन्द्रनाथ रॉय, महात्मा गांधींबरोबर पद्दलितांसाठी त्यांनी केलेलं काम, त्यांची शेकडो भाषणं, त्यांना चळवळीत झालेला तुरुंगवास, त्यांचं ‘पद्मविभूषण' या साऱ्यांनी ही अभ्यासिका भारलेली होती. त्यात न मावणारी एकच गोष्ट म्हणजे आबांची समाजाकडे, धर्माकडे पाहावयाची आधुनिक, व्यापक, मोकळी दृष्टी. अशा या माझ्या आजोबांच्या वयाच्या प्रगल्भ पंडितापुढे मी बालिश लुडबूड करत होतो. त्यामुळेच तर मे. पुं. म्हणायचे, “तू म्हणजे प्राज्ञ पाठशाळेतला विरंगुळा आहेस!”
आबांनी मला वाईच्या वाड्यांचीही सफर करवली. भालू, बेनोलीकर, फडणवीसांचे वाडे त्यांनी दाखवले. काही ठिकाणी मोरांची भित्तिचित्रं होती. या वाड्यांमध्ये विटांचं इन्ट्रिकेट काम कसं केलं आहे हे आबा मला दाखवत. लाकडी खांब, तुळया, खिडक्यांचे आकार, घडीव दगडांचे चौक, पाण्याच्या विहिरी, घरातली प्रकाशयोजना, पडव्या, बैठकीच्या जागा, कोनाडे, देवघरं दाखवत.
आबा वयाच्या चौदाव्या वर्षी या प्राज्ञ पाठशाळेत शिकायला आले होते. १९१४ साली ही वाई कशी असेल? हे प्राचीन विद्यापीठच होतं. कृष्णेकाठी कुणी हे गाव वसवलं? ही जागा शोधणं, त्याची रचना, त्यातलं प्लॅनिंग आणि गाव वसवणारी जाणती माणसं कोण असतील? कोण असावेत हे आर्किटेक्ट्स, इंजिनियर्स? कृष्णेला धक्का न लावता, तिचा मान राखत बांधलेले हे घाट, त्यावर बांधलेली सुबक तटबंदी हे वसवलेलं ज्ञानी गाव कसं वसलं असेल?
नदीकाठी, कालव्यापाशी वसलेली अशी अनेक नगरं मी युरोपात पाहिली आहेत. त्यात चर्चेस आहेत. त्यांचे घंटानाद आहेत. हवामान लक्षात घेऊन बांधलेली मोहक घरं, कॉबल स्टोन्सचे उतरते रस्ते आहेत. राखलेल्या जागा, फुलांचे बहरलेले वृक्ष आहेत. सारी छोटी गावं त्यांनी प्रेमाने जपली आहेत. त्या गावांत जन्माला आलेले अनेक अलौकिक चित्रकार, शिल्पकार, विचारवंत, लेखक, कवी या जगाला मिळाले आहेत. आपली वाई नगरीही अशीच आहे. पण ती भारतीय आचार, विचार, आकारात घडून गेली आहे. इथे चर्चेस नव्हे तर तितकीच कलात्म हेमाडपंती देवळं, घरं आहेत. उतरते, चढते रस्ते आहेत. देवळातल्या घंटांचे, आरत्यांचे सूर आहेत. इथे ज्ञान आहे, चिंतन आहे... आणि विश्वकोश आहे.
ज्या दिव्य शक्तीने पर्वत, समुद्र आणि तारकामंडळं निर्माण केली, त्या शक्तीला तर्कतीर्थांकडे पाहताना ‘तुम्हीही या जगासाठी आवश्यक आहात' असं वाटावं, हे किती सुंदर आहे!
वाईच्या या वाड्यांची त्या काळी मी मोठी पेंटिंग्ज केली. त्याचं प्रदर्शन झालं. ‘टाइम्स ऑफ इंडिया'च्या कलेक्शनमध्ये त्यातली काही आहेत. पण त्यामागचं मोटिव्हेशन आबांचं असावं. एके दिवशी आबा कृष्णेच्या उगमापासल्या त्यांच्या घरी गेले. झोपेतच त्यांनी आपली यात्रा शांतपणे संपवली.
सोलापुरातल्या त्या कोरड्या संध्याकाळी त्यांनी मलाच का बोलावलं, याचं उत्तर आजही माझ्याकडे नाही!
(समकालीन प्रकाशनाच्या 'रफ स्केचेस' या पुस्तकातून साभार)
सुभाष अवचट
सुभाष अवचट हे ख्यातनाम चित्रकार आहेत.