आम्ही कोण?
लेखमालिका : स्मार्ट‘फोनी'करणाच्या नोंदी

बातम्यांचं अपचन

  • गौरी कानेटकर
  • 26.03.26
  • वाचनवेळ 4 मि.
smartphones

एखाद्या गोष्टीचा अतिरेक नेमका कधी होतो? अति म्हणजे नेमकं किती?

काळाच्या ओघात ‘हाऊ मच इज टू मच' हा प्रश्न माणसाला अनेक बाबींमध्ये स्वतःला विचारावा लागला आहे. पैशांपासून सत्तेपर्यंत आणि खाण्या-पिण्यापासून दारू किंवा अमली पदार्थांपर्यंत प्रत्येक गोष्टीचा अतिरेक करण्याचा आपला इतिहास आहे. सध्या हा ‘अतिरेक सिंड्रोम' आपण अनुभवतो आहोत तो आपल्या हातातल्या सर्वव्यापी-सर्वज्ञानी स्मार्टफोनमुळे. हा अतिरेक आहे माहितीचा, विशेषतः बातम्यांचा.

जगात काय घडतंय हे जाणून घेण्यासाठी पूर्वी बरीच खटपट करावी लागायची. राज्यातली मुख्य दैनिकंही अगदी जिल्ह्यांच्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी पोहोचायची. मग देशातल्या आणि जगातल्या बातम्या तर किती मजल-दरमजल करत पोहोचत होत्या हे आठवून बघा. टीव्ही आणि रेडिओवर मोजकाच वेळ बातम्यांसाठी असल्यामुळे अतिशय महत्त्वाच्या आणि आपल्या प्रेक्षक-श्रोत्यांशी निगडित तेवढ्याच बातम्या या माध्यमांमधून दिल्या जायच्या. त्या वाचून लोक पुढे त्यावर विचार करायचे-चर्वितचर्वण करायचे. तीनेक दशकांपूर्वी प्रणब रॉय यांचा ‘वर्ल्ड धिस वीक' हा कार्यक्रम त्या आठवड्यात जगभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा आणि त्यातून जगात काय चाललं आहे हे कळल्याचं समाधान प्रेक्षकांना मिळायचं. आणि आज?

हेही वाचा - मिशन फॉरवर्ड

आज दर क्षणाला जगाच्या कानाकोपऱ्यातल्या असंख्य बातम्या आपल्या फोनवर येऊन आदळत असतात. ट्रम्पपुत्राच्या रशिया संबंधांपासून ते हॉलिवूडमधल्या एखाद्या नटीने कोणत्या तरी समुद्रकिनारी घालवलेल्या निवांत सुटीपर्यंतच्या अनेक बातम्या. जगात प्रत्येक क्षणी काही ना काही घडत असतंच. कुठे भूकंप होतो, कुठे इमारतीला आग लागते. कुठे एखादा वंशभेदी बेछूट गोळीबार करतो, तर कुठल्या तरी आपण नावही न ऐकलेल्या शहरात झाडावर अडकलेल्या एखाद्या प्राण्याच्या बचावाची मोहीम सुरू असते. त्याशिवाय ज्यांना बातमीचा दर्जाही देता येणार नाही अशा ह्युमन इंटरेस्ट स्टोरीज तर असंख्यच. समोर टेस्टी चिवड्याचा डबा ठेवला की कसं तो रिकामा होईपर्यंत माणूस नकळत बकाणे भरतच राहतो, तसंच काहीसं या बातम्यांबाबतीतही आपलं झालंय.

जोपर्यंत आपण टीव्ही लावला तरच आपल्याला बातम्या कळतील अशी स्थिती होती तोवर बातम्यांना लगाम लावणं आपल्या थोडंफार तरी हातात होतं. पण आता? आपला फोन सतत अशा बातम्या ओकत राहत असल्यामुळे बोटाच्या एका स्वाइपसरशी आपण एका बातमीतून दुसऱ्या बातमीत आणि दुसरीतून तिसऱ्या बातमीत पुढे सरकत राहतो. कुठल्याच बातमीवर पुरता विचार करायला वेळही न देता.

अर्थात एकापरीने चांगलंच आहे की हे! जगभरात काय चाललंय ते आपल्याला घरबसल्या कळतं. देशाच्या कानाकोपऱ्यातली बित्तंबातमी कळत राहते. आपल्याला देशाचा, जगाचा आवाका येतो. पण इथे प्रश्न उभा राहतो, की हाऊ मच इज टू मच? जगात काय चाललंय हे कळण्यासाठी खरोखरच किती बातम्यांची गरज असते? घडामोडींचा आवाका येण्यासाठी बातम्या पुरतात की त्यावरचं विश्लेषण वाचणं आवश्यक असतं? की त्या बातम्यांवर विचार करणं गरजेचं असतं? बातमीवर विचार करता यावा यासाठी आपण किती बातम्यांवर थांबलं पाहिजे? अर्थात हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण आपण आता जागतिक झालेलो असल्यामुळे काही तसेच जागतिक दाखले दिले तर या प्रश्नाचं गांभीर्य जास्त चांगल्या रीतीने कळू शकेल.

हेही वाचा - मेंदूचं भिरभिरं

रॉल्फ डोबेली हे स्वित्झर्लंडमधील एक लेखक. त्यांचं ‘द आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली' हे पुस्तक सध्या जगभरात गाजतंय. त्यांनी काही वर्षांपूर्वी एका लेखाद्वारेच मांडणी केली होती, की बातम्या या आपल्या आरोग्यासाठी हानीकारक असून माणसांनी बातम्यांचं व्यसन सोडण्याचे प्रयत्न करायला हवेत. त्यांच्या या विधानावर त्या वेळी बरीच उलटसुलट चर्चाही झाली. पण आज अनेक अभ्यासक त्यांच्या विधानाला पुष्टी देऊ लागले आहेत. रॉल्फ यांचं म्हणणं असं, की जशी शरीराला अति साखर हानीकारक असते, तसंच फुटकळ बातम्यांचं अतिसेवन आपल्या मेंदूची विचारक्षमता कमी करतं. सीरियामध्ये काल कुठे बॉम्ब फुटला आणि आज कोणत्या तळावर हल्ला झाला हे कळून आपल्याला काहीच उपयोग नसतो. त्याऐवजी सीरियातली यादवी नेमकी कशामुळे आहे याची पार्श्वभूमी समजावून देणारा सविस्तर लेख किंवा पुस्तक वाचलं तर आकलनात भर पडू शकते. मात्र, आज लोक हजारो फुटकळ बातम्या वाचतील, पण एक सविस्तर लेख वाचण्याची तसदी घेणार नाहीत, असं निरीक्षण ते नोंदवतात.

दुसरा मुद्दा आहे तो आपल्या मेंदूच्या रचनेबद्दलचा. संशोधकांचं म्हणणं असं आहे, की मानवी मेंदूने अतिशय प्रगत असं तंत्रज्ञान तयार केलं असलं, तरी माहितीची संगती लावण्याची मेंदूची पद्धत आजही जवळपास आपल्याइतकीच पुरातन आहे. त्यामुळे मेंदूला त्याच्या क्षमतेपेक्षा अधिक उद्दीपनं किंवा पर्याय मिळाले तर तो भंजाळून जातो, हे सत्य आजही बदललेलं नाही. हे ज्यांच्या लक्षात येतंय त्या रॉल्फसारख्या काही मंडळींनी बातम्या आणि माहितीच्या इनकमिंगला चाळण्या लावायला सुरुवात केली आहे.

खरं तर आपल्या शरीराला अपचन होतंय हे पहिल्यांदा आपल्यालाच कळतं. मग इथे तसं का घडत नसावं?

(अनुभव २०१७ मधील लेखमालिका. माणसं फोनच्या आहारी जाऊ लागल्याची पहिली वहिली चिन्हं दिसू लागली तेव्हा लिहिलेली.)

गौरी कानेटकर | gauri.uniqueportal@gmail.com

गौरी कानेटकर या युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाच्या संपादक आहेत. मितानिन फाउंडेशनच्या `सलाम पुणे` या उपक्रमाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. उपेक्षितांचं जगणं, त्यांचे प्रश्न आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती-संस्था समाजासमोर आणण्याची त्यांना कळकळ आहे.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 1

सुचित्रा कुलकर्णी 26.03.26
अगदी खरं आहे. 2017 नंतर आता तर बातम्यांचा बजबजाट झाला आहे. खरं आणि खोटं काय हेही कळत नाही... डोकं भनभनायला लागतं.. पण आपल्या सवयीमुळे बातम्यापासून दूरही राहू शकत नाही

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results