आम्ही कोण?
ले 

शिकागो सर्वधर्म परिषदेत विवेकानंद नेमकं काय बोलले?

  • मुकुंद कुलकर्णी
  • 12.09.25
  • वाचनवेळ 7 मि.
swami vivekanand speech

अमेरिकेत भरलेली ही सर्वधर्म परिषद एक अवाढव्य उपक्रम होता. आज सव्वाशे वर्षं होऊन गेलेली असूनही सर्वधर्म परिषद आणि स्वामी विवेकानंद या दोघांची जादू कायम आहे.

कोलंबसाने अमेरिकेचा शोध लावला त्याला ४०० वर्ष झाल्यानिमित्ताने १८९३ मध्ये अमेरिकेत एक महोत्सव आयोजित केला गेला होता. त्यासाठी जागतिक महत्त्वाच्या तेरा विषयांवर चर्चेचं नियोजन केलं गेलं तेव्हा धर्म हा विषय त्यात अंतर्भूत नव्हता. व्हॅटिकन सिटीमधील सर्वोच्च ख्रिश्चन धर्मगुरू पोपचं म्हणणं होतं,‘अमेरिका ही ख्रिश्चन धर्माची भूमी आहे. बाकी सारे धर्म पाखंडी आहेत. त्यांना या पवित्र भूमीवर त्यांचे पापी विचार मांडायला बोलावणं हे महापाप ठरेल.' मात्र चार्लस कॅरॉल बॉनी या विचारवंताचं वेगळं मत होतं. जगात विभिन्न धर्म आहेत. मात्र मानवाचं भलं करण्यासाठी जन्माला आलेल्या या धर्मांमुळे भेदभाव आणि रक्तपातही भरपूर झाला आहे. त्यामुळे सर्वधर्म परिषद घ्यावी आणि सर्व धर्माची मूळ तत्त्वं समजून घ्यायला हवीत. जेणेकरून वेगवेगळे समाज एकत्र नांदतील, असं बॉनी यांचं म्हणणं होतं. त्यांच्यामुळे ही सर्वधर्मपरिषद पार पडली.

११ सप्टेंबर १८९३ रोजी सकाळी १० वाजता शिकागो येथील आर्ट इन्स्टिट्यूटच्या आवारात ही जागतिक सर्वधर्म परिषद सुरू झाली. त्यादिवशी पारशी, यहुदी, इस्लाम, हिंदू, बौद्ध, शिंतो, ब्राह्मो, ताओ, कन्फ्युशियसचा पंथ आणि ख्रिस्ती अशा प्रमुख दहा धर्मविचारांचे प्रतिनिधी व्यासपीठावर होते. कॅथलिक, प्रोटेस्टंट आणि ग्रीकमधील एक वेगळी शाखा अशा ख्रिस्ती धर्माच्या तीन शाखांचे प्रतिनिधीही होते. जैन धर्म आणि थिऑसॉफी संप्रदायाचा परिषदेत अधिकृतपणे समावेश नव्हता, मात्र त्यांचे प्रतिनिधी होते. हिंदू धर्माचाही अधिकृत प्रतिनिधी असा नव्हता; मात्र विवेकानंदांना प्रो. जॉन हेन्री राईट यांच्या आग्रहावरून निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यामुळे ते व्यासपीठावर उपस्थित होते.

पहिल्या दिवशी एकूण २४ भाषणं होती. पण उद्घाटन, ओळख व सत्कार या उपचारांमध्येच बराच वेळ गेला त्यामुळे प्रत्येक वक्त्याला जेमतेम ५-१० मिनिटं मिळणार होती. सर्व धर्माच्या प्रतिनिधींनी उत्तम तयारी करून भाषणं लिहून आणलेली होती. व्यासपीठावर वक्त्यांच्या तीन रांगा होत्या. विवेकानंद मधल्या रांगेत बसले होते. विवेकानंद भाषणासाठी उठले तेव्हा भाषणाचा कुठलाही कागद त्यांच्याजवळ नव्हता. प्रेक्षकांकडे चौफेर बघत त्यांनी सुरुवात केली. भाषणाची सुरुवात त्यांनी ‘माय सिस्टर्स ॲण्ड ब्रदर्स ऑफ अमेरिका.' या वाक्याने केली आणि शरीरातून विजेचा प्रवाह जावा, तसं सारं सभागृह थरारून गेलं. कानठळ्या बसवणारा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट दोन मिनिटं सुरू राहिला.” (विवेकानंदांचं तेव्हाचं हे भाषण त्यांच्याच आवाजात युट्यूबवर उपलब्ध आहे. ते ऐकणं हा अनुभवच आहे.)

त्या दिवशी विवेकानंद जेमतेम १० मिनिटं बोलले असतील. त्या १० मिनिटांत त्यांनी हिंदू धर्माचा मूळ स्वभाव साध्या आणि सहज शब्दांत लोकांसमोर मांडला. “ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्मांप्रमाणे एक देव, एक ग्रंथ, आणि एक प्रेषित असं हिंदू धर्माचं स्वरूप नाही. इथे विविधतेतून एकाच तत्वाची पूजा करण्यात येते. आकाशातून पडणारं पाणी वेगवेगळ्या नद्यांमध्ये, ओहोळांमध्ये सामावलं जात असलं, तरी अखेर ते एकच असतं आणि या साऱ्या नद्या शेवटी समुद्राला जाऊन मिळतात. त्याप्रमाणे तुम्ही कोणत्या धर्मात जन्माला आलात हे अजिबात महत्त्वाचं नाही. वेगवेगळे धर्म म्हणजे त्या परमेश्वराकडे घेऊन जाणारेे विभिन्न मार्ग आहेत. दोन नद्यांमध्ये भांडण झाल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? मग दोन मार्ग वेगळे म्हणून त्यात भांडणं का?” असा सवाल त्यांनी केला. ते पुढे म्हणाले, “ही सर्वधर्म परिषद सर्व धर्मांना सांगते आहे, की हातात हात घालून आनंदाने सहकार्य करत राहा. हे आज फार गरजेचं आहे. कारण आज ही आपली सुंदर पृथ्वी गरीबी आणि पिळवणूक यामुळे विद्रूप झाली आहे. तुमच्या-माझ्यासारखी लाखो-करोडो माणसं यातना भोगताहेत. या पृथ्वीवर रक्ताचे पाट वाहिलेत. समृद्ध राष्ट्रं, समृद्ध संस्कृती कायमची लयाला गेली आहे. हे सर्व मानवाचं मंगल करण्यासाठी निर्माण झालेल्या आणि, तुमच्या-माझ्या जीवनाचा आधार असलेल्या धर्मांनी केलं आहे का, याचा विचार करायला हवा. हे सर्व राष्ट्रप्रेम, धर्मप्रेम, पंथप्रेम या शब्दांमुळे झालंय. हे प्रेम नाही, हे वेड आहे; माणसातलं माणूसपण संपवणारं वेड!”

आपल्या भाषणात विवेकानंद धर्मांना दोष देत नाहीत. ते धर्मवेडाला, मतांच्या आंधळ्या अतिरेक्यांना माणसाच्या दु:खाचं कारण मानतात. परिषदेचं उद्घाटन होताना जगातील प्रमुख दहा धर्मांची आठवण म्हणून दहा घंटानाद करण्यात आले होते. त्याचा उल्लेख करून विवेकानंद म्हणाले, “सकाळी जे घंटानाद झाले त्याचा अर्थ समजून घ्या. सर्वधर्म परिषद धर्मवेडेपणाची मृत्युघंटा आहे. तलवार आणि लेखणी यांच्या साहाय्याने माणसाच्या केल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या छळांचा अंतिम क्षण जवळ आलाय.”

विवेकानंदांच्या वाक्यावाक्याला श्रोते टाळ्या वाजवून दाद देत होते. भाषण संपले पण टाळ्यांचा कडकडाट थांबला नाही. या एका भाषणाने विवेकानंद अमेरिका आणि भारतातही सगळ्यांना माहीत झाले. त्यांच्यामुळे साऱ्यांना खऱ्या हिंदू धर्माचं मर्म कळलं.

परिषदेचे ‘स्टार' वक्ते

सर्वधर्म परिषदेतलं विवेकानंद यांचं हे भाषण खूप गाजलं. पण या भाषणाव्यतिरिक्त याच परिषदेत त्यांची आणखी सहा भाषणं झाली. काही भाषणांवेळी त्यांनी अध्यक्षपद भूषवलं, तर काही परिसंवादांत त्यांनी भाग घेतला. या सर्व वेळी विवेकानंद परिषदेचे ‘स्टार' वक्ते होते. ते इतके लोकप्रिय बनले होते, की विवेकानंद व्यासपीठावर नुसते इकडून तिकडे गेले, तरी श्रोत्यांमधून आनंदांच्या लहरी उठत. इतरांची भाषणं ऐकून श्रोते कंटाळून सभागृह सोडून जायला लागलेत असं वाटलं, तर संयोजक सांगत, “आता यानंतर लवकरच स्वामी विवेकानंद बोलणार आहेत.” मग श्रोते पुन्हा आपल्या आसनांवर येऊन बसत.

या परिषदेदरम्यान त्यांनी जी भाषणं दिली त्यात ते काय बोलले पाहा.

२० सप्टेंबर १८९३ : त्या दिवशी खरं तर विवेकानंद वक्त्यांच्या यादीत नव्हते. ते सभागृहात श्रोत्यांमध्ये बसून इतरांची भाषणं ऐकत होते. मात्र विषयच असा होता, की श्रोत्यांच्या जोरदार आग्रहावरून ते बोलायला उभे झाले. त्या दिवशी आणि आधीच्या आठवड्यात हिंदू, बौद्ध आणि इस्लाम या धर्मांवर घणाघाती टीका करत ख्रिश्चन धर्म कसा सर्वश्रेष्ठ आहे, त्याचं सेवाकार्य किती महान आहे यावर दणकून भाषणं झाली होती. त्या भाषणांच्या वेळी ख्रिश्चन श्रोत्यांनी जल्लोष केला होता.

या पार्श्वभूमीवर विवेकानंद बोलणार होते. ते म्हणाले, “अमेरिकेतील माझ्या बहिणींनो आणि भावांनो, केवळ तुमच्या विनंतीवरून पुन्हा एकदा मला तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली आहे. तुमचा ख्रिश्चन धर्म आणि तुम्ही स्वीकारलेली लोकशाही यांनी तुम्हाला विरोधी मतांचा आदर करायला शिकवलं आहे. त्यामुळे माझ्या मनातल्या काही शंका तुमच्यासमोर ठेवतो.” अशी धडक सुरुवात करून ते म्हणाले, “काल एक श्रेष्ठ धर्मगुरू म्हणाले, ‘चिनी आणि भारतीय जनतेच्या आत्म्याचा उद्धार व्हावा, यासाठी मिशनरी तिथे जातात! त्यांना आणि तुम्हालाही मला असं सांगायचंय की, क्षणभर त्यांचा आत्मा बाजूला ठेवा. ते अर्धनग्न आणि अर्धपोटी आहेत. ते भुकेनं मरू नयेत म्हणून तुम्ही काय करणार आहात ते सांगा. ‘त्यांनी धर्म बदलला, तरच त्यांना मदत करा' असं येशूने म्हटल्याचं मी कुठेही वाचलेलं नाही. कुणीतरी तो संदर्भ काढून दाखवा आणि मला खोटं ठरवा. हे मी तुम्हाला नम्रपणे दिलेलं आव्हान आहे असं समजा.”

२६ सप्टेंबर १८९३ : त्या दिवसाचा विषय होता, बौद्ध धर्म : या परिसंवादावेळीही विवेकानंदांचं नाव वक्त्यांमध्ये नव्हतं. पण धर्मपाल या वक्त्याने भाषण संपवताना, ‘विवेकानंदांनी माझ्या मांडणीवर आपली प्रतिक्रिया द्यावी' असं सांगितल्याने विवेकानंदांना बोलावं लागलं. गौतम बुद्धांच्या शिकवणुकीचं मर्म सांगताना विवेकानंद म्हणाले, “आमचे बुद्धदेव हिंदू धर्माचा नाश करण्यासाठी आले नव्हते, तर हिंदू धर्मातली कालबाह्य तत्त्वं, रुढी आणि काळाच्या प्रवाहात त्यात आलेले दोष दूर करण्यासाठी आले होते. जातिव्यवस्था ही कालबाह्य सामाजिक व्यवस्था आहे. कोणत्याही समाज रचनेत आणि धर्मात तिला स्थान असता कामा नये. जातिव्यवस्था म्हणजे काहीजणांना विशेषाधिकार देणं. आणि नीतीमत्त्वावर आधारलेल्या धर्माचं प्रमुख उद्दिष्ट सर्व प्रकारचे विशेषाधिकार नाहीसे करणं, हे आहे.

२८ सप्टेंबर १८९३ : सर्वधर्म परिषदेचा हा समारोपाचा दिवस होता. त्या दिवशी दिलेल्या भाषणात त्यांनी एक गोष्ट ठासून सांगितली, की “एक धर्म स्वीकारलात तर तुम्हाला सारे धर्म स्वीकारावे लागतील; आणि एक धर्म नाकारलात तर तुम्हाला सारे धर्म नाकारावे लागतील. आणि कोणताही धर्म न मानणारी पण खऱ्या अर्थाने धार्मिक माणसं आपल्या भोवती असतात, हे आपल्याला ओळखावं लागेल.”

सर्वधर्म परिषदेच्या पहिल्या भाषणात विवेकानंदांच्या पहिल्याच वाक्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला होता. तर समारोपाच्या भाषणातील शेवटच्या शब्दांवर सारं सभागृह टाळ्यांनी दणाणून सोडलं होतं. विवेकानंद म्हणाले होते, ‘मी सांगतो ते नीट ऐका. कुणी कितीही अडथळे आणले तरी तो दिवस फार दूर नाही, ज्यावेळी प्रत्येक धर्माचा ध्वज वर जाईल. संघर्ष नको, सहाय्य हवं, कलह नको, मैत्री हवी हा माझा मंत्र आहे.'

( मुकुंद कुलकर्णी लिखित ‘असे होते विवेकानंद' या समकालीन प्रकाशनाच्या आगामी पुस्तकातून)

मुकुंद कुलकर्णी | mukund59@gmail.com

मुकुंद कुलकर्णी हे प्रदीर्घ पत्रकारी अनुभव असलेले माजी संपादक आहेत. मध्य भारतातील आदिवासी समाजाचे आणि त्यांच्या प्रश्नांचे ते अभ्यासक आहेत. शिवाय ईशान्य भारतातील समाज, तसंच विविध धर्म आणि त्यांचं तत्त्वज्ञान हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहे.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 3

गीता अरविंद कोठावळे12.09.25
फारच छान..मागे लहानपणी आणि मोठेपणीही तुकड्या तुकड्यातून हे विचार वाचले होते.आता हे परत सगळ्यांनी वाचावेत ही वेळ,आली आहे

उमेश वाघेला 12.09.25
अप्रतिम लेख! स्वामी विवेकानंदांचे विचार आजही समकालीन वाटतात.

Santosh Dalvi12.09.25
Khup wastav aslele bhashan

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results