आम्ही कोण?
ले 

अमेरिकेतला मराठी माणूस

  • सोनाली कुलकर्णी
  • 19.08.25
  • वाचनवेळ 11 मि.
sonali kulkarni theater experience in america

जी. ए. कुलकर्णी यांच्या एका पुस्तकात एक वाक्य आहे- ‘परागंदा झालेला माणूसच खऱ्या अर्थाने मातृभूमीत जगत असतो.' जीएंच्या अनेक वाक्यांप्रमाणेच इथेही क्षणभर थबकायला होतं. खूप सखोल अर्थ दडला आहे या वाक्यामध्ये...

मी नुकतीच माझ्या ‘व्हाइट लिली अँड नाइट रायडर' या नाटकाचा अमेरिका दौरा करून आले. नाटकाचा लेखक-दिग्दर्शक आणि माझा नाटकातला सहकलाकार मिलिंद फाटक, नाटकाचा तांत्रिक चमू आणि माझी छोटी कन्या कावेरी असे सगळे माझ्यासोबत होते. अमेरिकेतल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये आम्ही नाटकाचे प्रयोग केले. अनेक रसिक, नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या गाठीभेटी झाल्या. या सगळ्या काळात मला जीएंच्या या वाक्यातला गर्भित अर्थ हळूहळू उलगडत गेला.

आता अमेरिकेत राहणारी ही आपली मराठी मंडळी परागंदा नक्कीच झालेली नाहीत, शिक्षण-नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने स्वेच्छेने तिकडे गेलेली आहेत; पण मातृभूमीचा, आपल्या देशाचा, महाराष्ट्राचा, इथल्या नातेवाइकांचा आणि मित्रमंडळींचा विरह त्यांना मनोमन जाणवत असणार. इतकंच काय, पण मराठी भाषा, नाटक, गाणी, सण-उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे दररोजचे संवादही ते मिस करत असणार. त्यामुळेच मराठी सणवार, खाद्यसंस्कृती आणि सांस्कृतिक कार्यक्रम जपण्याची ते प्रचंड धडपड करताना दिसतात. मराठी संस्कृतीशी असलेली नाळ तुटू न देण्याची त्यांची असोशी पाहून मला राहून राहून आश्चर्य वाटत होतं.

sonali kulkarni theater experience in america

मी आजवर अनेक वेळा अमेरिकेला जाऊन आले आहे. पहिल्यांदा गेले ती माझ्या ‘मिशन कश्मीर' चित्रपटाच्या प्रीमियरसाठी. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांनिमित्ताने अमेरिका भेटी होत राहिल्या. वर्षातल्या सर्व ऋतूंमध्ये अमेरिकेला भेटी दिलेल्या असल्यामुळे तिथलं ऋतुचक्र मला अनुभवता आलं, तिथल्या माणसांच्या जीवनक्रमाचं निरीक्षणही करता आलं. या वेळच्या अमेरिका दौऱ्यात मला तिथली रामनवमी पाहायला मिळाली. या निमित्ताने लक्षात आलं, की रामनवमी, गणेशोत्सव आणि दिवाळीसारखे सण तिथे अतिशय उत्साहाने साजरे केले जातात. त्याविषयी आजवर ऐकून होते, पण या वेळच्या मुक्कामात ते जवळून पाहता आलं.

अमेरिकन वातावरणात राहून मराठी प्रथा-परंपरा सांभाळणं हे अजिबातच सोपं नसतं. तिथलं हवामान, कामाच्या वेळा, घर ते ऑफिस हे अंतर, सार्वजनिक ठिकाणचे रीतिरिवाज, शेजारपाजार आणि आसपास स्थानिक अमेरिकी माणसांचा वावर, या सगळ्याचं भान ठेवतच मराठी संस्कृतीचं जतन करणाऱ्या कृती कराव्या लागतात.

आता असे सण-समारंभ आणि त्या निमित्ताने साजरे होणारे सोहळे आपण भारतातही पाहतो, पण त्यांचं स्वरूप पूर्वीसारखं साधं, सोज्वळ आणि सात्त्विक उरलेलं नाही हेही जाणवतं. त्यामध्ये आंतरिक इच्छेपेक्षा प्रदर्शनाचा सोस वाटतो. त्यामागचा उत्स्फूर्त आनंद हरवला आहे की काय असं वाटतं. त्याउलट, आपल्याकडे परदेशी रेस्टॉरंटमध्ये जाणं, हॅलोविन आणि व्हॅलेंटाइन डे साजरे करणं, मॉल-पबमध्ये विरंगुळा शोधणं हे सारं वाढत चाललं आहे. म्हणजे अमेरिकेत राहणारी माणसं मराठी संस्कृतीचा जागर करत आहेत आणि महाराष्ट्रात राहणारी माणसं परदेशी होण्याच्या खटपटीत आहेत, असं म्हणायचं का? अर्थात हे माझं मत नसून मला पडलेला हा एक प्रश्‍न आहे.

आजवर जी अमेरिकन माणसं भेटली ती नक्कीच जास्त समतोल दृष्टिकोन घेऊन जगताना दिसली; पण त्यांच्याबरोबर बोलताना या वेळी असं फार जाणवलं की त्यांच्यासोबत सतत एक बॅगेज असतं. आपली जिवलग माणसं दूर भारतात आहेत आणि आपण इथे इतक्या लांब आहोत याची त्यांना काळजी वाटत असते. त्यामुळे हे सगळं कसं डील करायचं या विवंचनेत ते असतात. त्याचं त्यांना दु:ख होतं, अपराधी वाटतं. ही भावना इतकी प्रबळ असते, म्हणून ते भारतात आपल्या नातलगांसाठी जास्तीत जास्त सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. भारतात जवळच्या माणसांना अमुक गोष्ट मिळत नसेल तर काय करावं लागेल, याचा विचार ते तिथे राहून करत असतात.

sonali kulkarni theater experience in america

परदेशातल्या दीर्घ मुक्कामात, तेही कावेरी माझ्यासोबत असताना, हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा माझा आग्रह कोणाच्या तरी घरी राहण्याचा असतो. यामुळे तिथली जीवनशैलीही सहज कळते. या वेळी ज्यांच्या ज्यांच्याकडे मी राहिले तिथे लक्षात येत होतं, की पाहुणे आपल्याकडे येणार म्हणून ते अगदी सरबराई करत होते. एसी किंवा हीटर असो, नाही तर साधी टूथपेस्ट किंवा क्रीम असो, ज्या पद्धतीने ते गेस्टरूम तयार करत होते ते पाहून मला तर गहिवरूनच येत होतं. मात्र, तिथे असलेल्या एकाही माणसामध्ये मला ही प्रौढी जाणवली नाही, की आमचं सगळं कसं ग्रेट आहे बघा. कारण आपली माणसं भेटणं हे तिथे साजरं केलं जातं. इतरांच्या गरजांसाठी ही माणसं खूप दक्ष असतात. आपण थोडंसंही बरं नाही असं सांगितलं तर ते धावपळ करतात. डॅलसच्या माझ्या एका मैत्रिणीने कावेरीसाठी जॉन्सन बेबी ऑइल आठवणीने पाठवलं. कुठे कोणाला ब्रेकफास्ट नको होता, तर तत्परतेने फळं आणून दिली. हे बघताना असं जाणवतं, की आपली माणसं जवळ नसणं हे त्यांना खूप भोगावं लागलंय. आपल्या माणसांच्या सहवासासाठी ती आतून तहानलेली आहेत. त्यामुळे त्यांच्या वागण्यात प्रचंड माया असते.

मला आणखी एक जाणवलं, ते म्हणजे त्यांना एक चांगला पालक असण्याशिवाय पर्यायच नसतो. कारण ते मातृभूमीपासून खूप दूर राहत असतात. आपण भारतात राहणारे तुलनेने बऱ्यापैकी रिलॅक्स पेरेंटिंग करू शकतो. तिथे मात्र मुलांच्या शाळांच्या वेळांशी पालक बांधले गेले आहेत. आपल्याकडे स्कूल बस असते, शेजारी असतात, एकत्र कुटुंब अजूनही आहे, याचा खूप फायदा होतो. केवढी सोय होते! पण तिथे पार्टनर्सना हे काम वाटून घ्यावंच लागतं. तिथला महत्त्वाचा सामाजिक प्रश्‍न म्हणजे मुलांना खेळायला मित्र नाहीत, त्यामुळे मुलं कमी बोलतात, असा पालकांचा एक नाराजीचा सूर जाणवतो. शाळेतल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये मुलं सहभागी होतात, तिथे मित्रांशी बोलतील तेवढंच. पण ही मुलं अत्यंत विनयशील आहेत. हाक मारली की लगेच येतात, नम्रतेने ऐकतात; पण त्यांना ओघवतं मराठी बोलता येत नाही. पालक त्यासाठी आग्रह धरतात, वाईट वाटून घेतात. मुलांच्या मनात न्यूनगंड असतो. चारजणांत आपण मराठी बोललो तर आपण वेगळे तर वाटणार नाही ना, अशी भीती त्यांच्या मनात असते. तिथली प्रौढ मराठी माणसं मात्र स्वच्छ मराठी बोलतात- नाटकाची घोषणा असू दे किंवा गप्पा, नाही तर गाणी.

आपण आपल्या मुळांपासून तुटायला नको याची तिथल्या माणसांची लढाई गलबलून येण्याइतपत आहे. आपली भाषा, संस्कार आपल्या मुलांपर्यंत पोहोचवण्याची त्यांची धडपड आहे; पण ती मुलं प्रत्यक्षात वेगळं जग बघत आहेत. ती मुलं घरात पोळीभाजी किंवा वरणभात खातात तसं अन्न त्यांच्या अवतीभोवती असणारी अमेरिकन मुलं खात नाहीत; पण पालकांची तळमळ खूप असते. हे बघून असं वाटतं, की आपण मराठी भाषा, संस्कार जपण्यासाठी किती प्रयत्न करतो याचा भारतातल्या पालकांनी विचार केला पाहिजे. आपल्याकडे मराठी वाचन कमी होत आहे. मुलंच काय, मोठी माणसंसुद्धा पारंपरिक मराठी गोष्टी विसरत चालली आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर तिकडच्या लोकांची धडपड मनाला स्पर्शून गेली.

एक गमतीशीर निरीक्षण. तिथल्या भारतीय, मराठी लोकांनी आम्हाला बटाट्याची भाजी, जिलबी, मसालेभात असे पदार्थ आवर्जून करून खाऊ घातले. पाहुण्यांना मराठी पदार्थ खाऊ घालण्यात त्यांना आनंद वाटत होता. आम्हाला कधी कधी त्याचं हसू येतं होतं. खरं तर आम्हाला चेंज म्हणून पिझ्झा, सँडविच, सॅलड चाललं असतं; पण मराठी मनांची हौस!

sonali kulkarni theater experience in america

आता थोडं माझ्या नाटकाविषयी पण सांगते. कारण त्याचा संदर्भ देणं आवश्यक आहे. माझं नाटक ‘व्हाइट लिली आणि नाइट रायडर'. आणि त्याचा लेखक-दिग्दर्शक आणि हीरो आहे मिलिंद फाटक. अमेरिकेतल्या नाट्यगृहांचे नियम वेगळे असल्यामुळे माझ्या टेक्निकल टीमसमोर थोडे वेगळे प्रश्न आले. ते नियम समजून घेऊन टीमला काम करावं लागलं. ते आपल्या लोकांना त्यांच्या सिस्टीमला हातच लावू देत नव्हते. म्हणजे लाइट आणि साऊंड करणारे आपले टेक्निशियन्स सिस्टीम रूममध्ये पॅनेलसमोर येऊ शकत होते, पण त्यांना मशिन्सना हात लावण्याची परवानगी नव्हती. पॅनेलवर आवश्यक ती ऑपरेशन त्यांचाच माणूस करणार, आपल्या माणसांनी फक्त टायमिंग सांगायचं. हे फार अवघड होतं. त्यामुळे माझ्या टीमला खूप समजुतदार बनावं लागलं. पण काही ठिकाणी नियम बऱ्यापैकी आड आले. एसी कमी नाही होणार म्हणजे नाही. आमच्या लाइट इक्विपमेंट्सना हात लावायचा नाही म्हणजे नाही. त्यासाठी वाटाघाटी करायला आपले अमेरिकन मराठी शिलेदार नेहमीच सरसावलेले असायचे.

आम्ही पुरुषोत्तम किंवा महाविद्यालयीन एकांकिका करताना ज्या उत्साहाने, उत्कटतेने बॅक-स्टेज करायचो, तसं काम अमेरिकेतले सगळे ग्रुप करताना दिसले. तसंच प्रत्येकच ठिकाणी नाटक झाल्यावर सर्वांना नाटकाविषयी बोलायचं होतं. आम्ही नाटक सादर करत असताना कशाचीही कसर ठेवत नव्हतो. फिनिक्सच्या मराठी मंडळाने हिंदी, इंग्लिश, मराठी अशा तीनही भाषांत प्रयोग ठेवला होता त्याचं कौतुक वाटलं. का बरं फक्त मराठीच? बाकीची माणसंही येऊ देत की! त्यांचा हा व्यापक दृष्टिकोन मला आवडला.

प्रत्येक टीमने आमचा सेट उभा करायला, स्टूल नाही तर पडदे असं सेटचं साहित्य जमवायला खूप धडपड केली. काही ग्रुप्सनी तर सेट स्वत: बनवला होता. प्रत्येक आठवड्याला वेळ काढून, तीन-चार तास एकत्र बसून, लाकूड कापून त्यांनी सेट्स बनवले होते. हा चार तासांचाच खेळ आहे हे माहीत असूनही ते इतके परिश्रम घेत होते. या त्यांच्या सगळ्या प्रेमाची मी कधीच उतराई होऊ शकत नाही.

कुठल्याही शहरात बोलताना तिकडच्या प्रेक्षकांचे जे प्रश्‍न होते, त्यात एक वेगळी मॅच्युरिटी जाणवत होती. त्यांना नाटक समजून घ्यायचं होतं. ‘हुश्श, आमचं काम झालं' असा सूर कुठे दिसत नव्हता. ‘व्हाइट लिली' हे काळाला सुसंगत नाटक आहे. आता मिलिंद फाटकने या दशकातल्या तंत्रज्ञानाला, समाजमाध्यमांना अनुसरून त्यात काही बदल केले आहेत. दोन माणसांमधलं नातं दोन पावलं पुढे नेणारं हे नाटक आहे. त्याची समज, समज म्हणण्यापेक्षा शहाणपण, मला अमेरिकेतल्या भारतीय माणसांमध्ये दिसलं. यात भारताची आर्थिक, औद्योगिक भरारी विसरून चालणार नाही. म्हणजे क्वचित इथली भारतीय माणसं जराशी घाबरतात, की तिथे हे नाटक कसं रिसीव्ह होईल? पण मला तिथल्या माणसांचा स्वीकारही आवडला. ज्या बारकाईने ते नाटक पाहत होते, त्या नाटकाबद्दल बोलत होते, तो अभ्यासूपणाही मला आवडला. नाटक संपल्यावर आमच्याशी बोलायला किंवा आमच्याबरोबर फोटो काढायला माणसं वेळ काढत होती, त्याच्यासाठी तर त्यांना सलाम आहे.

sonali kulkarni theater experience in america

‘व्हाइट लिली' नाटकातला जो प्रश्‍न आहे तो त्यांच्यासाठीही तितकाच महत्त्वाचा सामाजिक प्रश्‍न आहे. सध्या सगळे आभासी पद्धतीने एकमेकांशी जोडलेले असतात, पण फेसबुक ग्रुपवर किंवा व्हॉट्स ॲप ग्रुपवर. भेटी, प्रत्यक्ष संवाद दुर्मिळ असतात. आपण जगातल्या कोणत्याही व्यक्तीसोबत दिवसातल्या कोणत्याही क्षणी संपर्क साधू शकतो इतकी बलवान उपकरणं आपल्या हातात आहेत. त्यातून आपण सगळे एकमेकांशी जोडलेले आहोत असा गैरसमज सर्वदूर पसरलेला आहे. पण जोडलेलो आहोत असं वाटणं आणि प्रत्यक्षात संवाद असणं यातला फरक फार कमीजणांच्या लक्षात येतो आहे. ‘आभास' आणि ‘वास्तव' यांच्या सीमारेषेवर बहुतेकजण आहेत. नेमक्या याच बिंदूवर बोट ठेवणारं आमचं नाटक आहे. आमच्या मुंबई-पुण्यातल्या प्रेक्षकांना हे नाटक जितकं भिडतं तितकंच अमेरिकेतल्या प्रेक्षकांनाही भिडत होतं. याचा अर्थ दोन्हीकडची दुखरी नस समान आहे. एरवी आपलं नाटक प्रेक्षकांना भिडल्याचा कोणत्याही कलाकाराला आनंदच होतो. पण या नाटकाच्या बाबतीत माझ्या कलाकार म्हणून असलेल्या आनंदाला कारुण्याची किनारही होती.

आणखी एक गंमत सांगते. अमेरिकेत मी माझ्या अनेक मित्र-मैत्रिणी आणि नातेवाइकांकडे राहणार होते. तर ते दोन-दोन महिने आधीपासूनच तुझं विमान कधी पोचणार आहे, तुझ्याकडे किती बॅगा आहेत, तुला खायला काय आवडेल, याची चौकशी करत होते. किंवा त्यांनी नाटकाची तिकिटं आधीच काढून टाकली होती. आणि मला असं झालं होतं, की अरे, मी काढते ना तुमची तिकिटं! मी या नाटकात काम करते, नाटकाची निर्माती मी आहे. पण ते अवलंबून राहणं त्यांना नको होतं. इथे बुकिंगलाइन ओपन झालीय तर आम्ही तिकीटं रिझर्व करतो, नंतर चांगली तिकिटं मिळणार नाहीत, असं त्यांचं म्हणणं. आणि माझ्याकडून त्यांची अपेक्षासुद्धा नव्हती की मी तिकीट फ्री द्यावं. हे माझ्या मनाला खूप स्पर्शून गेलं. आपल्याकडे फ्री पासेससाठी लोकांची जी धडपड चालते ती आठवली.

पण हे कळायचं नाही, की दोन महिने आधी मी कशाला सांगू माझं विमान कधी पोचतंय ते. पण नाही. त्यांना जय्यत तयारी करायची होती. तिथे त्या दिवशी त्यांना मुलांना सोडायला कुठे तरी जायचं असू शकतं, स्वत:चा कुठला क्लास असू शकतो, नोकरीतून अर्धा दिवस सुट्टी मागून घ्यावी लागणार असते. या सगळ्यासाठी दणदणीत नियोजन असावंच लागतं. नियोजनाशिवाय अमेरिकेत जगताच येत नाही. त्यामानाने भारतात बऱ्यापैकी ढिसाळ व्यवहार असतो. आयत्या वेळी जमलंच नाही, असं म्हटलं जातं. ऐन वेळेला चालढकल केली जाते. मला अजूनही आठवतंय, एकदा आम्हाला एकजण घ्यायला येणार होते; पण ते येऊ शकले नाहीत. तर त्यांनी आमच्यासाठी टॅक्सी बुक केली. तिथे राहणारी मंडळी स्वत:चं काम फारसं दुसऱ्यावर ढकलत नाहीत, जबाबदारी पूर्ण करतात. त्यांचा दृष्टिकोन चांगल्या अर्थाने प्रोफेशनल असतो.

sonali kulkarni theater experience in america

या वेळी आम्ही तिकडच्या वसंत ऋतूत गेलो होतो. फार छान मोसम. त्यामुळे आमचं तिथलं वास्तव्य छान झालं. अमेरिकेतला हिवाळा प्रचंड जीवघेणा असतो. मला असं ऐकायला मिळालं की हिवाळ्यात तिथे मैलोन्‌‍मैल माणसं दिसत नाहीत, फक्त बर्फ असतो आणि महिनोन्‌‍महिने आपण दुसऱ्या माणसाला भेटू शकत नाही, घराबाहेर निघू शकत नाही. म्हणजे लॉकडाऊनमध्ये भारतात आपण सर्वांनी जे अनुभवलं, आपल्याला ज्याचं प्रेशर आलं होतं, डिप्रेशन आलं होतं, तसं तिथे पांढरे हिमाच्छादित चादर घातल्यासारखे चार-सहा महिने गृहीतच धरलेले असतात. तो एक वेगळाच ऋतूंचा लॉकडाऊन त्यांना सहन करावा लागतो. माणसं घरीच असतात, मुलांचा अभ्यास घरून होणार असतो, ऑफिसचं काम घरातून होणार असतं. अशा वेळेला मनाचा ताजेपणा जपणं, नैराश्य झटकणं हा एक नुसता भौगोलिक प्रश्‍न आहे, हवामानाचा प्रश्‍न आहे असं नाही, तर मनःस्वास्थ्याचाही आहे. त्यावर मात करण्यासाठी सगळे झगडत असतात. त्यामुळे पुरेपूर फिट राहण्याचा प्रयत्न करतात. तिथे भेटलेली आपली माणसंही खूप छान तजेलदार आणि सुटसुटीत दिसली. स्वत:च्या तब्येतीची आणि मनाची काळजी घेणारी वाटली.

किती तरी मेसेज, खाऊ, भेटी, चिठ्ठ्या, फोटो, स्पर्श कायमचे मनावर कोरले गेले आहेत. अमेरिकेतला मराठी माणूस मला दिसला-भेटला तो हा असा, कौतुक करावंसं वाटेल असा. मराठी भाषेशी स्वत:ची नाळ घट्ट पकडून ठेवण्याचा प्रयत्न करणारा, मराठी खाद्यसंस्कृती जपण्याची धडपड करणारा, सण आणि रीतिरिवाज शक्य तितके पाळणारा आणि मराठी संगीत, सिनेमा, नाटकावर जिवापाड प्रेम करणारा. एक कलाकार म्हणून मला हा अनुभव नक्कीच सुखावणारा होता... जीएंच्या ‘त्या' वाक्याची अनुभूती देणारा!

(अनुभव, ऑगस्ट 2023च्या अंकातून साभार)

सोनाली कुलकर्णी







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 4

महेश प्र कुलकर्णी 22.08.25
एकंदरीत लेख छानच आहे... बर्‍याच मुद्याना स्पर्श करणारा देखील आहे..! पण तरीही हा लेख वाचल्यानंतर पुढील साधारणपणे १० - १५ वर्षातील परिस्थिती कशी असेल यांची शंका देखील येते..? (हल्ली तर दर पाच वर्षांनी पिढी बदलते आहे असं ऐकिवात आहे!) कारण हे पालक या सद्य परिस्थितीशी समतोल राखत नाळ जुळवून ठेवण्यात यशस्वी ठरले आहेत. पण जे जन्मतःच तेथील वातावरणाशी सुसंगत वागतील त्यांना हे सर्व प्राप्त परिस्थितीत पार पाडणे अवघड जाणार आहे.! मला आठवतयं याच विषयावरील एका लेखात नेमका वेगळाच सुरू आळवण्यात आला होता.. त्या लेखा नूसार जर परदेशात राहून महाराष्ट्र मंडळ आणि महाराष्ट्रीय संस्कृती, सणवार आणि ग्रुप्स जर तयार करायचा अट्टाहास असेल तर तुम्ही त्या परदेशा ची ओळख आणि नाळ तरी कधी आणि कशी जुळवून घेणार? दुसरा दृष्टिकोन किंवा निराळ्यां बाजूने मतं मतांतरे जाणून घेता येतील म्हणून या मुद्द्याचा उल्लेख केला आहे...! बाकी दुसरा कुठलाही हेतू नाही! सोनाली कुलकर्णी यांचा हा लेख ही "सो कूल" अर्थातच फॅन्टास्टिक वाटला..!

अस्मिता फडके20.08.25
छान लेख

prabha parkar19.08.25
Apratim khoop khoop chan lekh

विनायक पेडणेकर 19.08.25
सुंदर लेख!!! आमच्याविंगलंड मधल्या वास्तव्याची आठवण झाली. अगदी मनाला भिडला. 👍😊

See More
gangotree homes advertisement

Select search criteria first for better results