आम्ही कोण?
ले 

मी पाहिलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

  • मुकुंद कुलकर्णी
  • 02.10.25
  • वाचनवेळ 8 मि.
rss

मी नागपुरात जन्मलो आणि वाढलो. माझं घर असलेला मोहल्ला, घरचा शेजार, शेजारी, नंतर शाळा, वर्गमित्र, त्यांची कुटुंबं अशा सगळ्यांत ठसठशीतपणे संघ असायचा. याला अपवाद होतं फक्त माझं घर. आई अधूनमधून राष्ट्र सेविका समितीच्या कार्यक्रमात भाग घ्यायची. अधेमधे संघाच्या काही कामासाठी घरून पोळ्या असलेला डबादेखील जायचा. वडील मात्र अलिप्त असायचे.

माझी शाळा संघाची होती. बरीच वर्षं प्रचारक म्हणून संघविस्ताराचं काम केलेले, खास संघीय असं चापून चोपून पांढरं शुभ्र दुटांगी धोतर नेसणारे आणि सदोदित गंभीर चेहऱ्याने वावरणारे तेलंग सर आमचे मुख्याध्यापक. शिक्षक तर बऱ्याचदा प्रभात शाखा (किंवा कसलसं एकत्रीकरण) आटपून घाईघाईने ‘गणवेशात’च शाळेच्या प्रार्थनेला हजर असत. शाळेत असताना १९७०-७१ सालातील दसऱ्याच्या शस्त्रपूजन सोहळ्याला मी प्रथम गोळवलकर गुरुजींना बघितलं. त्यांचं भाषण ऐकलं. गोळवलकर गुरुजींच्या मानेवर रुळणारे केस आणि छातीवर झुलणारी दाढी मला लय भारी वाटली होती. कार्यक्रम संपल्यावर शाखेच्या त्या शिक्षकाला हे भारीपण सांगितलं, तेव्हा गंभीर चेहरा करून ‘त्यांच्या बाह्य पेहरावाने प्रभावित होण्यापेक्षा त्यांच्या विचारांसाठी आयुष्य दे’, असा सल्ला त्याने मला दिला होता. आणखीही तो बरंच काही बोलला. मला फक्त ‘आयुष्य दे, आयुष्य दे’ हेच लक्षात राहिलं. हेच वाक्य मी नंतर अनेकदा संघाशी संबंधित निरनिराळ्या लोकांकडून वेगवेगळ्या काळांत आणि परिस्थितींत ऐकलं.

कला महाविद्यालय तर जणू संघ-शाखांचं एकत्रीकरण किंवा संघ निष्ठावंताचा मेळावा होता. त्यामुळे मी त्या कॉलेजमध्येही रमलो नाही. नाही म्हणायला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने निवडणूक लढवली आणि जिंकलीदेखील. मला आठवतं, तेव्हा आम्हा ‘विजयी’ मंडळींची एक बैठक रेशीमबाग इथे झाली होती. रेशीमबाग हे संघाचं माहेरघर. ते कार्यालय, तिथल्या बसक्या इमारती आणि डॉ. हेडगेवारांचा भक्कम, भारदस्त गंभीर पुतळा, सावलीगत मूक मौनात संथपणे वावरणारी तिथली माणसं, हे सारं गूढ वाटायचं. या ‘रेशीमबागेत’ नेमकं काय ‘विणकाम’ चालतं याचं जबर कुतूहल वाटायचं. ही माणसं अशी का? नक्की काय करतात ही मंडळी? पटकन बोलत का नाहीत? असे प्रश्न स्वाभाविकपणे पडत. ते मी आसपासच्या संघजनांना विचारलेही. पण उत्तर एकच मिळे- ‘आधी शाखेत नियमित जा!’

घराशेजारी पातुरकर कुटुंब राहायचं. भले लोक होते. त्यांचे एक भाऊ पंजाब ‘प्रांता’मध्ये बऱ्याच वर्षांपासून प्रचारक होते. अधूनमधून ते घरी भावांकडे यायचे. एकदा त्यांना बराच मस्का लावत ‘तुम्ही पंजाबमध्ये संघकार्य करता म्हणजे नक्की काय करता? पंजाबमध्येच का? पंजाबनंतर तुम्ही कुठे जाणार?’ असे प्रश्न मी विचारले. त्यावर त्यांनी मख्खपणे “शाखेत जातोस? गणपती अथर्वशीर्ष पाठ आहे? संध्या करतोस की नाही?” अशा त्रिफळा उडवणाऱ्या गुगल्या टाकल्या होत्या. पुढे खूपच टोकल्यावर काहीसं वैतागूनच त्यांनी उत्तर दिलं होतं, “अरे, हिंदू धर्म, संस्कार आणि संपर्क हेच माझं जीवितकार्य. आदेश मिळेल तिथे जातो, आदेशाप्रमाणे काम करतो. मग पंजाब असो राजस्थान. का, कशाला असे प्रश्न आम्ही विचारत नसतो.”

संघाचा हा रतीब मला नकोसा वाटे. पण माझ्या सभोवती मला संघानेच घेरलेलं होतं. त्यामुळे इकडे नको म्हणून तिकडे जावं, तर तिकडेही संघच भेटे. त्याच सुमारास मला विवेकानंद केंद्राबद्दल समजलं. नुकतंच मी विवेकानंदांचं साहित्य वाचलं होतं आणि त्याने भारावून गेलो होतो. हा माई का लाल म्हणजे वेगळंच पाणी आहे, असं त्या वेळी कॉलेज वयात, बंडखोरीची खुमखुमी असलेल्या मला जाणवलं होतं. त्यामुळे मी विवेकानंद केंद्राकडे ओढला गेलो.

नागपुरात विवेकानंद केंद्राची शाखा होती. अभियांत्रिकीची पदवी घेऊनही केरळ प्रांतात २५-३० वर्षं प्रचारक राहिलेले शंकर शास्त्री नागपूर शाखेचं काम बघायचे. हसरा आणि गमतीजमती करणारा हा माणूस मला पटला. तोपर्यंत रस्त्यावरच्या छुटपुट नोकऱ्या आटपून मी ‘नागपूर टाइम्स’ या जुन्या दैनिकात शिकाऊ पत्रकार म्हणून रुजू झालो होतो. हाताशी वेळ होता. पाहता पाहता तिथे मी रमलो. केंद्रांचे कार्यक्रम घेऊ लागलो. काही ‘दायित्व’देखील स्वीकारलं होतं.

दरम्यान १९७९च्या सुमारास विवेकानंद केंद्र कन्याकुमारी येथे २१ दिवसांचं योग शिबिर भरणार असल्याचं कळलं. महत्त्वाचं म्हणजे हे सारं गणित केवळ १७५ रुपयांत बसणार होतं. मन हुरळून गेलं. कन्याकुमारी गाठावीच, असं सांगू लागलं. ठरवलं आणि गेलो.

नंतर नागपुरात मला विवेकानंद केंद्राचे संस्थापक एकनाथ रानडे भेटले. मी तोवर पाहिलेल्या संघजनांपेक्षा रानडे मला खूपच वेगळे वाटले. त्या वेळी ते अरुणाचल प्रदेशात विवेकानंद केंद्राच्या शाळा उभारणीत गुंतले होते. अरुणाचली मुला-मुलींना धर्म (अर्थात हिंदू धर्म) आणि संस्कार (खान-पान-रहनसहन वगैरे) यांचे ‘डोस’ पाजण्याची गरज नाही, असं ते ठामपणे सांगत. ‘उन्हें धर्म की जरूरत नहीं, चुनाव एवं सोचने की आजादी देने की आवश्यकता है’ असं ते म्हणत. ‘फक्त तिथे त्यांच्यासोबत राहा, त्यांच्यात मिसळा, आपलंसं करा. याच उपायांनी त्यांच्यात भारताविषयी भरोसा निर्माण होईल,’ असं त्यांचं म्हणणं होतं. मला हे मनापासून पटलं होतं. वाटलं, की अरुणाचलला जाऊन यायला हवं.

एकदा मनात आल्यावर वाट कशाला बघायची? मी जुळवाजुळवीला लागलो. अरुणाचलमधील उपक्रमाला ‘संस्कारित’ शिक्षकांची गरज होतीच. त्यामुळे मी शिक्षक म्हणून आणि डॉक्टर पत्नी पूनमसह लवकरच रुजू झालो. तिथे जाऊन बघतो तर काय, रानडे यांच्या दृष्टीच्या संपूर्ण विपरीत असा उद्योग चालला होता. ६-७ वर्षांच्या गोंडस-गोबऱ्या मुलांना भल्या पहाटे उठवून गीतापाठाचा ‘डोस’ ढोसला जात होता. ऐन कडाक्याच्या थंडीत चटका बसेल अशा थंड पाण्याने तोंड धुऊन, गुरुवंदना घालून गीता सुरू केली जात असे. अशी जबरदस्ती केली तर श्रीकृष्ण आणि त्याच्या अद्भुत गीतेबद्दल कायमची अढी मनात जाऊन बसेल, असं मला वाटायचं.

खान-पान, राहणीमान आणि मनोरंजन याबाबत तर जणू मिरच्यांच्या धुरीगत ठसका उठायचा. चिकन-मटन सोडाच, पण अंडीदेखील चालत नसत. कुत्रा-डुक्कर-गाय यांचं भक्षण कल्पनेलासुद्धा आचके आणणारं. प्रत्येक प्रांताची चव वेगळी, आवड वेगळी असते. ज्यांचं अन्न तुमच्यापेक्षा वेगळं ते संस्कारहीन आणि रानटी कसे ठरतात आणि तुम्ही ‘संस्कारी’ श्रेष्ठ कसे ठरता? त्यांच्या घरी जायचं अन्‌ त्यांनाच घाणेरडं म्हणत झिडकारायचं, ही कुठल्या समन्वयाची रीत? हा कुठला संस्कार?

मी दोन वर्षं अरुणाचलमध्ये राहिलो. मग नागालँडमध्ये मुक्काम पडला. नागालँड मुक्कामाच्या चार वर्षांत अनेक मान्यवरांच्या भेटीचा योग आला. नंतर सरसंघचालक झालेले के. सुदर्शन, मणिपूरचे अधिकारी भास्कर कुलकर्णी अशा मंडळींसोबत बोलता-वावरता आलं. तिथल्या वास्तव्यात जीव ओवाळावा आणि जीव विटाळावा, असा दोन्ही टोकांचा संघ दिसला.

मी ईशान्येचा मुक्काम आटपून नागपुरात परतलो त्यानंतरची ही गोष्ट. नागपूरच्या राष्ट्र सेविका समितीच्या मुख्यालयात नागालँड आणि आसाममधल्या करबी-अनलांग भागातल्या २०-२५ मुली शिक्षणासाठी राहत होत्या. चांगला उपक्रम होता तो. पण सारंच नवखं आणि वेगळं असल्याने या मुली अस्वस्थ असत, ‘होमसिक’ होत. मला त्या मुलींची बोलीभाषा चांगली अवगत आहे आणि मी त्या भागात होतो, हे ठाऊक असलेल्या एका ज्येष्ठ ताईने मला ‘जरा मुलींशी गप्पा मारायला ये’ असा आदेश पाठवला. मी गेलो, आणि ‘ऐ लुआरी लगा किनेका असे दे’ (मुलींनो, कशा आहात?) असा खास त्यांचा हेल काढून विचारलं. त्याबरोबर मुली अक्षरशः किंचाळत आपल्या रांगा मोडून माझ्याभोवती रेटून गर्दी करत्या झाल्या. (तिथल्या ताईंची भुवई तेव्हाच मस्तकात गेली. शिस्तभंगाची नोंद झाली!) गप्पांच्या ओघात मुली म्हणाल्या, ‘इथे बाकी तसं ‘ठीक’च आहे, पण एक्कीपारे मास ना पाबो दे’ (इथे अजिबात मांसाहार मिळत नाही). ‘संस्कारी’ नियमामुळे तिथे ‘मांस’ देणं शक्यच नव्हतं. तसं मी मुलींना समजावून सांगितलं. पण मी ताईंसमोर प्रस्ताव ठेवला. आठवडा-पंधरवड्यामधून एकदा या मुलींना माझ्या घरी घेऊन जातो. त्यांच्या इच्छेचं जेवू घालतो, तुम्हाला कुठलीच तोशिस पडू देणार नाही. त्या वेळी आम्ही नागपूरपासून ३० किमीवर प्रशस्त घरात राहायचो. गाड्यांची सोय होती. कुणाला कानोकान कळलं नसतं या मुलींचं ‘मांस’ खाणं. पण मी तसं सुचवताच जणू धरणीकंप झाला. परिवाराच्या छावणीत राहून आलेला हा ‘जीव’ असा संस्कारहीन बोलू तरी कसा शकतो, अशा नजरेने ताईंनी माझ्याकडे पाहिलं आणि मला कायमचं बेदखल केलं. बरं, त्या मुली इतर ‘हिंदू संस्कार’ पाळत होत्या. एरवी आपापल्या घरी स्कर्ट-फ्रॉक घालून बिनधास्त वावरणाऱ्या या मुली इथे पांढरा सलवार-कुर्ता किंवा साडी नेसत. म्हणजे अंगभर कपडे! केसांना तेल चोपडून घट्ट वेण्या घालत. वरून कपाळी कुंकू! एवढंच काय, एकादशी, हरितालिकाही करत. या बदल्यात एखाद्या वेळी चिकन खाल्लं तर काय बिघडणार होतं, असा माझा साधा प्रश्न होता. पण एवढीशी गोष्टही नाकारली गेल्यामुळे या मुली दिवाळीच्या सुटीत घरी गेल्या, त्या परतून आल्याच नाहीत. समिती मुक्कामाची कडवट चव मात्र त्यांच्या मनात कायम राहिली असेल. आणि इकडे समितीच्या ताई काय म्हणणार? ‘हे लोक असेच! त्यांच्यासाठी इतकं झिजलं तरी कदरच नाही या लोकांना!’ निव्वळ हताश तडफड!

संघ परिवारातली अशी ‘कडवट’ आणि ‘हताश’ माणसं पुढे मला मध्य प्रदेश-महाराष्ट्रातल्या आदिवासी पट्ट्यात ठिकठिकाणी भेटली. मांसाहार घ्यावा की नाही हा तसा वरवरचा प्रश्न, पण त्याचं मूळ माणसा-माणसांमधली विविधता स्वीकारायची की नाही यात आहे. लोक-समाज ‘जसे आहेत तसे’ स्वीकारण्याऐवजी ते ‘कसे असायला हवेत’ किंवा ‘ते आमच्यासारखेच कसे होतील’ यासाठी ही माणसं आदळआपट करताना दिसायची. खान-पान, राहणीमान, जगण्या-मरण्याची रीतभात किंवा मनोरंजनाची मस्ती वेगळी आहे म्हणून ती ‘अस्वीकार्य’ कशी ठरू शकते हे मला समजायचं नाही. कदाचित मी स्वतः त्या संस्कारी पठडीत बसू शकत नसल्याने संस्काराच्या त्या आंधळ्या अतिरेकाने माझं डोकं भणाणून जायचं.

(संपूर्ण लेख वाचा, यंदाच्या अनुभव मासिकाच्या दिवाळी अंकात..)

अंक पुढील संकेतस्थळांवर उपलब्ध आहे-

१. इंस्टामोजो

२. बुकगंगा

३. ॲमेझॉन

मुकुंद कुलकर्णी | mukund59@gmail.com

मुकुंद कुलकर्णी हे प्रदीर्घ पत्रकारी अनुभव असलेले माजी संपादक आहेत. मध्य भारतातील आदिवासी समाजाचे आणि त्यांच्या प्रश्नांचे ते अभ्यासक आहेत. शिवाय ईशान्य भारतातील समाज, तसंच विविध धर्म आणि त्यांचं तत्त्वज्ञान हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहे.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 7

Sharadchandra 15.12.25
i welcome a rare insider report. honest, bold नानाजी देशमुख declined केंद्रीय मंत्रीपद and quit राजकारण, Delhi in 77 heyday, amidst आनंदोत्सव.

सुरेश दीक्षित 17.10.25
खूप सुंदर, vastavwadi, परखड, स्पष्टपणे मनस्वी लेखन...

कबिर09.10.25
लेख आवडला

प्रा.डॉ. सुधीर यशोदा भगवान भटकर 05.10.25
संपूर्ण लेख द्यायला हवा होता.
↳   युनिक फीचर्स टीम07.10.25
संपूर्ण लेख अनुभव मासिकाच्या दिवाळी अंकात वाचायला मिळेल.

दिनु 04.10.25
मी संघात बऱ्याच वरिष्ठ दायित्वांचा अनुभव घेऊनही त्यात का रमू शकलो नाही, त्याचं यथार्थ वर्णन. अजून बरंच काही जोडू शकतो, पण अजून कार्यात असल्याने बुद्धीला पटत नाही.

एम.बी.अलमेल 03.10.25
अपेक्षा पेक्षा जास्त माहिती मिळाली..🙏

Atul02.10.25
केवळ अप्रतिम.... आपल्या निर्भिडतेला सलाम सर.!!

See More
gangotree homes advertisement

Select search criteria first for better results