आम्ही कोण?
ले 

स्वामी विवेकानंद : आजही सुसंगत, आजही अप्राप्य

  • मुकुंद कुलकर्णी
  • 04.07.25
  • वाचनवेळ 14 मि.
swami vivekanand

हिंदू धर्मात मर्मज्ञ, ज्ञानी परिव्राजक संन्याशांची हजार वर्षांहून जुनी समृद्ध परंपरा आहे. ज्या वेदान्ती परंपरेचा वारसा स्वामी विवेकानंद अभिमानाने सांगत, त्याची सुरुवात आठव्या शतकात केरळमधील कालाडी गावातून आद्य शंकराचार्यांनी केली होती. भारतभर भ्रमण करून त्यांनी पंथांच्या बजबजपुरीत अडकलेल्या हिंदू समाजाला मुक्त करून धर्मस्थापना केली. एवढं करून ते थांबले नाहीत, तर देशाच्या चार कोपऱ्यांवर धर्मसंरक्षक नेमून धर्मध्वज रोवले. असं असूनसुद्धा हिंदू समाजाला विवेकानंद का महत्त्वाचे वाटतात?

सामान्य माणूस ते देशातील सर्व राज्य सरकारं यांच्या देणगीतून उभं राहिलेलं खऱ्या अर्थाने एकमेव असं राष्ट्रीय स्मारक म्हणजे भारताच्या सुदूर दक्षिण टोकावरचं विवेकानंद शिला स्मारक. अगदी डाव्यांचा लाल पश्चिम बंगाल असो की पेरियारच्या कट्टर ब्राह्मणी विरोधात रंगलेला तामिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कळघम असो, साऱ्यांनी विवेकानंद स्मारकाला हात दिला. द्रमुकने तर एका उच्चवर्णीय बंगाली हिंदू स्वामीला आपल्या घरातच आणून बसवला. कुठल्या नवलाईने विवेकानंद त्यांना एवढे महत्त्वाचे वाटले?

रंगतदार, वैचित्र्यपूर्ण निसर्गाच्या या भूमीत इंद्रधनूच्या सप्तरंगी विविधतेत नटलेल्या इथल्या समाजाने शतकांची ऊन-सावली झेलली. अनेकदा घायाळ होऊनही भिन्नतेत एकतेची धुगधुगी जपली. या परंपरांना उभा छेद देत एकरेषीय चाकोरीत समाजाला कोंबत सत्ता मिळवलेल्या सत्ताधाऱ्यांनादेखील आद्य शंकराचार्य नव्हे, तर स्वामी विवेकानंद आपल्या झेंड्या-अजेंड्यावर हवे असतात ते का म्हणून?

स्वामी विवेकानंद यांच्याबद्दलच्या अशाच अनेक ‘कां'चं उत्तर देण्याचा अनेकांनी आपापल्या परीने प्रयत्न केला. पण हे सोपं काम नाही. कारण विवेकानंद ही ‘दृष्टी' मानवाला आणि त्याच्या समुदायाला एकाच वेळी चहुबाजूंनी भिडते. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणायचे, ‘भारत समजून घ्यायचा असेल तर विवेकानंद वाचा!' कारण?

साऱ्या धर्मांच्या उपासना पद्धतींना तपश्चर्येने पचवून सर्वव्यापी एकतेचा उत्सव मनवणाऱ्या श्रीरामकृष्ण परमहंस यांचा हा शिष्य म्हणजे एक अजब रसायन होतं, आणि विशेष म्हणजे ते गुहेतील गूढतेने कधीच वेष्टित नव्हतं. विवेकानंद नितळ पारदर्शी आहेत. ते तत्त्ववेत्ते, दार्शनिक किंवा धर्मशास्त्री नाहीत, तर ‘बघणारे' द्रष्टे आहेत. वेद-उपनिषदांतील शाब्दिक ज्ञानाचे भारे डोक्यावर घेऊन तोंडाने त्याचा ऊहापोह व चर्चा ते करत नाहीत. ते ‘डोळे' उघडून भवताल बघायला सांगतात. ‘विचार, चिंतन म्हणजे ज्ञानाच्या धुरळ्यात लोळण घेणं होय. यात दृष्टी धूसर आणि कलुषित होते,' असं म्हणत विवेकानंद अशा कलुषित कल्लोळात बंद पडलेल्या डोळ्यांची चिकित्सा करतात. याबाबत ते बुद्धस्मरण घडवतात. गौतम बुद्ध स्वत:ला कधीच धर्मसंस्थापक वगैरे म्हणवून घेत नसत. ‘मी चिकित्सक आहे, वैद्य आहे, माणसाचं रोगनिदान व रोगनिवारण करणं हाच माझा सनातन धम्म आहे', असं म्हणत ते जगले. विवेकानंदही तसेच.

विवेकानंदांनी वृत्तींच्या साऱ्या भेदांना फटकारून ‘कोण'विरहित सर्वंकष दृष्टीची उपासना बांधली. विवेकानंद आंधळे पारंपरिक नाहीत. ते वर्तमानाचं मूल्य जाणणारे आहेत. प्राचीन वेद, ऋषी, पुराणं, धर्मग्रंथ आणि पंडित-पुरोहित म्हणतात म्हणून किंवा अगदी मी म्हणतो म्हणून ते मान्य करा, असं ते कधीही म्हणाले नाहीत. अगदी बोलण्यापुरतंदेखील त्यांनी ‘बाबा वाक्यं'ला आपल्या आसपास फिरकू दिलं नाही. उधारीच्या श्रद्धा या कवडीमोलाच्याच असतात. म्हणून ‘बघा, शोधा आणि जाणून घ्या' हेच त्याच्या जगण्याचं आणि शिकवणुकीचं अधिष्ठान राहिलं. विचार-आचारांची परंपरा असतेच; मात्र, वर्तमानाच्या प्रकाशात त्याची मौलिकता तपासून त्याला जीवनदायी करणं आपला धर्म ठरतो. विवेकानंदांनी परीक्षण आणि निरीक्षण या वृत्तींना माणसाच्या उन्नतीचं परिधान मानलं. त्यांनी आपल्या भारत भ्रमणात संन्यास धर्माची पारंपरिक बंधनं कालबाह्य आहेत म्हणून धुडकावली आणि निरलस दृष्टीने माणूस व समाज निरखला.

समस्त धार्मिक ग्रंथांना कोळून प्यायलेले स्वामी विवेकानंद निस्सीम विज्ञानपूजक होते. हिंदू धर्माला विज्ञानाची जोड मिळाली तर आपला धर्म गतिमान होऊन अधिक मानवीय होईल, असा त्यांचा दृढ विश्वास होता. ते म्हणायचे, ‘धर्म जीवनाचं परम सत्य आहे. मग त्यात नरकाचं भय, स्वर्गाचा मोह अन्‌‍ ‘वेगळ्या' समुदायांचा दुस्वास, ही लोढणी निरर्थक ठरत नाहीत का?' धर्माबाबत अशीच खमकी भूमिका आठव्या शतकातील बसरा येथील सुफी संत राबिया हिने घेतली होती. राबिया म्हणजे तुफान होतं. भविष्यातील भय दाखवून वर्तमानात माणसाला हतबल करणाऱ्या धर्माच्या नरकाला जाळायला आणि स्वर्गाला बुडवायला हाती मशाल आणि पाणी घेऊन बसरा शहराच्या बाजारातून धावत सुटली होती. जो धर्म असं नरकाचं भय अन्‌‍ स्वर्गाचा लोभ दाखवतो तो धर्मच नाही, असा त्या कलंदर वादळाचा हुंकार होता.

विवेकानंदांनी हिंदू धर्माच्या समस्त पारंपरिक माहितीचं ‘रूपांतरण' करून तो धर्मप्रवाह मानवीय केला. शास्त्री, पंडित किंवा अगदी संत-महात्मे धर्माच्या प्राचीनतेची अन्‌‍ रीतिभातींची महती कायम राखतात. फार तर ती अधिकाधिक रोचक करतात. विवेकानंदांनी याच बाबींचं स्थलकालानुरूप रूपांतरण केलं. याच प्रक्रियेतून त्यांनी संन्यासी संघटन उभं केलं होतं. काय होतं विवेकानंदांच्या मनात? ‘ओम भवति भिक्षांदेही' असा गजर करत हजारो वर्षांपासून कुटुंबांकडून अन्न घेऊन जगणाऱ्या संन्याशांनी बदल्यात काय दिलं, तर संसाराला शिव्याशाप. विवेकानंद म्हणायचे, ‘भिक्षा घ्या, संसारी लोकांच्या अन्नावर जरूर मस्त व्हा. मात्र बदल्यात त्यांना शिक्षण द्या. विज्ञानाची छोटी उपकरणं झोळीत ठेवून छोटे छोटे प्रयोग दाखवा. नकाशे दाखवून देशाची, जगाची समज द्या. आरोग्याचे आधुनिक नुस्खे सांगा.' कल्पना करा, विवेकानंदांच्या या ‘रूपांतरण' मंत्राला मस्तकी घेऊन साधू-संन्यासी समाजात फिरले असते तर शंभर वर्षांत भारत खरंच विश्वगुरूच्या योग्यतेचा झाला असता!

धार्मिक विधी, यज्ञयाग, पूजापाठ यामुळे विशेषाधिकार, भेदभाव उग्र होऊन, समाजात कर्कश्श कर्मठता वाढते. त्यात संवेदना व करुणा यांचा सपशेल बळी जातो हे विवेकानंदांनी बघितलं होतं. त्यामुळेच आजही आपला थरकाप होईल अशा आगबंबाळ भाषेत त्यांनी त्याबद्दलचं आपलं म्हणणं मांडलं आहे. त्यावेळच्या केरळ आणि मद्रास भागातला ब्राह्मणी अतिरेक बघून त्यांना तो ‘पागलखाना' वाटला होता. पूजेच्या हव्यासाचं रूपांतरण करत विवेकानंदांनी कर्मकांडी धर्माच्या कोरड्या मनोभूमीवर ‘शिव भावे जीव सेवा' या मंत्राचा शिडकावा केला. करुणेचा जागर केला. विवेकानंदांनी आपल्या धर्मजागराचा आदर्श मानलं होतं सेंट पॉल या ख्रिश्चन संताला. राजाच्या आज्ञेने नवख्रिश्चनांचे गळे चिरत फिरणारा रोमन अधिकारी सेऊल याला येशूने आपल्या करुणेच्या अनुभूतीने सेंट पॉल केला होता. हाच सेंट पॉल येशूच्या शिकवणुकीचा प्रसार-प्रचार करत रोमन छळात अखेर झिजत मेला होता. विस्मरणात गेलेली हीच करुणा बुद्धानंतर विवेकानंदांनी या भूमीतील धर्मविचारात गतिशील केली.

विवेकानंदांमध्ये स्वप्न आणि व्यवहार यांचा सयुक्तिक मेळ होता. ते अगम्य, आदर्शात रमणारे सिद्धांतवादी अजिबात नव्हते. जमिनीत पाय रोवून आकाशाला गवसणी घालण्याचा वस्तुपाठ त्यांनी स्वत: गिरवत लोकांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला. घरची आई उपाशी असताना ‘वसुधैव कुटुंबकम्‌‍'चा धोशा म्हणजे त्यांच्या दृष्टीने बेइमानी होती. केवळ स्वप्न देऊन ते थांबले नाहीत, तर जमिनीवर त्याचं काटेकोर नियोजन अन्‌‍ शिस्तबद्ध व्यवस्थापन आवश्यक असल्याचंही त्यांनी गिरवून घेतलं. १७ जानेवारी १८९६ला न्यूयॉर्कहून त्यांनी पाठवलेल्या पत्रात कलकत्त्यामधील कुण्या रामदयाळबाबूला तूर व मूग डाळीचा परदेशी व्यापार करावा आणि तो कसा, तर लहान लहान डब्यात डाळी घालून त्यावर मूगवडी वगैरे ‘रेसिपीं'ची माहिती द्यावी याबाबत सविस्तर कळवलं होतं. तूर, मूग या डाळी आणि मूगवड्या यांचा ‘त्रिगुणात' समावेश करण्याचं धाडस तोपर्यंतच काय पण त्यानंतरदेखील कुणी स्वप्नातही केलं नसेल.

विवेकानंदांची सारी कृती आणि उक्ती मानवीय होती. संन्यास स्वीकारूनही ते कधी विधिवादी झाले नाहीत. ‘विधिविधान' असं काहीच नसतं, बदल अटळ व आवश्यक असतो. म्हणून त्यांनी ‘सिद्धांतांच्या जोखडात माणूस नको, तर मानवाच्या सेवेत सिद्धांत हवेत,' हे आग्रही प्रतिपादन केलं. याचा अर्थ विवेकानंदांनी सारे धर्मसंकेत धाब्यावर बसवले असा नव्हे! विवेकानंद बोधवादी होते. हिऱ्याचे पैलू उजळ करावे तसं त्यांनी पुरोहितांनी सोईसाठी झाकलेल्या अनेक धर्मसंकेतांना नवीन उजाळा दिला. ‘अमृतस्य पुत्रा:' म्हणून मानवाला संबोधित करणाऱ्या उपनिषदीय ऋषीच्या आवाहनाचं विवेकानंदांनी जगासमोर आवर्तन केलं. धर्माकडे, त्याच्या धुरीणांकडे जागरुकतेने बघा, हे त्याचं सांगणं होतं. विवेकानंदांना बेहोशी मान्य नव्हती. बुद्धाने मूर्च्छेला पाप मानलं. याचाच निनाद विवेकानंदांच्या धर्म संकीर्तनात कायम निनादत असतो. अशा बोधपूर्ण जागरुकतेत विवेकानंदांच्या व्यक्तिमत्त्वाचा जाणवणारा एक विलोभनीय पैलू म्हणजे सहजता! अख्ख्या धर्मपरंपरेने कुठल्या भावनेची मुंडी पिरगाळली असेल तर ती म्हणजेच सहजता!

आजही ज्या मुद्द्यांवर माणसं उघडपणे बोलत नाहीत, त्या हिंदू-मुसलमान समन्वय आणि जातिभेद यावर विवेकानंद अगदी सहजपणे बोलत. मुस्लिम आणि ख्रिश्चन यांच्या जुलुमाने किंवा प्रलोभनाने भारतात धर्मांतरं झाली नसून, येथील उच्चवर्णीयांच्या अत्याचारामुळे झालीत, हे तोपर्यंत कुणीही धुरीण बोलला नव्हता, ते विवेकानंद बेधडक बोलले. त्यांनी डोळसपणे इतिहास अभ्यासला आणि मांडला. त्यात उगाच भुई थोपटणं नव्हतं. मोगलांच्या दरबारात जे बौद्धिक वैभव होतं त्याचा अंशमात्रसुद्धा पुणे दरबारात दिसत नाही, असं ते बिनधास्त सांगत. ‘मुसलमान राजवटीचे योगदान' विशद करताना मुसलमानी राजवटीत गरीब आणि दलितांची स्थिती सुधारली होती, कारण विशेषाधिकार संपवण्यात आले होते, असं तथ्यगत निरीक्षण त्यांनी नोंदवलं. विवेकानंद कुठल्याही क्षेत्रातील विशेषाधिकाराच्या कट्टर विरोधात होते. भारताची विविधता लोकशाही प्रणालीतच फुलेल, हा त्यांचा त्यावेळचा विश्वास स्तिमित करणारा आहे. हिंदू-मुसलमान यांच्यातील बंधुभाव व समन्वय देशाची प्रगती साधणारा ठरेल. कारण या दोन घटकांमुळे भारत बनला आहे, हे त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलं होतं. मुसलमान किंवा मोगलांना ते परकीय मानायला तयार नसत. शहजहान बादशहाला तुम्ही ‘बाहेरचा', ‘परका' म्हटलं तर कबरीमध्ये त्याची हाडं खडखडतील, असं ते म्हणायचे. त्या काळी अशा विषयांवर थेट बोलणं अजबच म्हणावं.

त्यांच्या आयुष्यातला आणखी एक भन्नाट प्रसंग. स्थळ : अमेरिका. समोर झाडून सगळे ख्रिश्चन, मंचावर पांढऱ्या झग्यातील ख्रिस्ती धर्मप्रचारक आणि वक्ता अगदी ‘ब्रँडेड' हिंदू; तोही संन्यासी आणि विषय : मोहम्मद पैगंबरांचं योगदान! पुन्हा केवळ बोलून, सांगून विवेकानंद थांबले नाहीत. आयुष्याच्या अखेरच्या दिवसांत आजाराने हल्लक झालेलं शरीर नाही म्हणत असतानादेखील त्यांनी अंबाल्याला जाऊन आर्यसमाजी आणि मुसलमान यांच्यातील दंगल शांत केली. दोन्ही समाजाच्या नेत्यांशी संवाद साधला. एवढंच नव्हे, तर हिंदू-मुसलमान मुलं एकत्र शिकत असलेल्या शाळेत जाऊन त्यांच्याशी गप्पागोष्टी केल्या. विवेकानंदांच्या स्वप्नातील भारतीय हा मुस्लिम शरीर आणि वैदिक मन असलेला होता. आज ही कल्पना म्हणूनसुद्धा पेलणार नाही.

दुसरा मुद्दा जातिभेदाचा. याबाबतदेखील विवेकानंद त्यांच्या ‘ट्रेड मार्क'नुसार सहज अन्‌‍ स्पष्ट बोलत आणि लख्ख कृती करत. गौतम बुद्धांवर विवेकानंदांचं विशेष प्रेम होतं, ते त्यांनी ‘भिक्कू' संघ वाढवले म्हणून नाही, तर या देशाच्या अवनतीला ‘जात' हे एकमेव कारण आहे हे बुद्धांनी सर्वप्रथम जाणलं म्हणून. राजर्षी शाहू महाराजांना कोल्हापूरात वेगवेगळ्या जातींसाठी वेगवेगळी वसतिगृहं ठेवणं गरजेचं वाटलं होतं. त्याआधी १० वर्षं विवेकानंदांनी आपल्या मठात ब्राह्मण, भंगी, मुसलमान ही सगळी मुलं एकत्र राहतील, एकत्र जेवतील अशी व्यवस्था लावली होती आणि ती पण ‘विरजाहोम' करून संन्यास घेतलेल्या मंडळींकडून.

विवेकानंद आपल्या १२ वर्षांच्या कार्यकाळात जातिभेदावर जेवढं बोलले तेवढं त्याआधी नक्कीच कुणी बोललं नव्हतं. त्यांचं बोलणं म्हणजे अंगार होता. समाजात हा रोगच इतका खोलवर गेला होता की केवळ गुदगुल्या करून तो जाणारा नव्हता. त्यावेळच्या मद्रास प्रांतातील कट्टर ब्राह्मणांनी त्यांच्या गौरवपर आयोजित केलेल्या सभेत हा माणूस त्याच्या पोकळ श्रेष्ठत्वाबद्दल आगपाखड करत म्हणतो, “मी तुमच्या ब्राह्मणपणाचं घटश्राद्ध करण्यास आलो आहे.” जातिभेदात भरडलेल्या समाजघटकांबद्दल विवेकानंदांना असीम करुणा होती. याबाबत ते कमालीचे संवेदनशील होते. पण त्यात डोळेगाळू कढ नव्हता. या समाजाच्या हीनदीन अवस्थेवर त्यांनी रोकडा विचार केला होता. जातिव्यवस्था पूर्णपणे मोडायची असेल तर भारतातील आर्थिक घडी आपल्याला पूर्णपणे मोडावी लागेल, अशी मांडणी ते करत. यासाठी सर्वप्रथम विज्ञान आणि तंत्रज्ञानावर बेतलेल्या शिक्षणाचा ते जोरकस आग्रह धरत.

विवेकानंद म्हणायचे, ‘विवाह, वेष, अन्न हे तुम्ही तुमच्यासाठी ठरवा. समाज आणि धर्म याचा त्यात काही संबंध नाही.' याबाबत कुणी त्यांना उपदेश केला तर स्वामी त्याची फिरकी घ्यायचे. इंग्लंडला असताना काही मंडळी त्यांना सतत भारतीय आहार घेण्याविषयी लिहीत. संन्याशाने सात्त्विक भारतीय आहार घ्यावा असा आग्रह करत. त्याला विवेकानंदांनी काय उत्तर द्यावं? ‘सात्त्विक भारतीय आचारी पाठवा, आणि हो, त्याच्याबरोबर सात्त्विक आहारासाठी पैसेही पाठवा!'

विवेकानंद आणि अर्थशास्त्र समीकरण किती विजोड वाटतं! मात्र अशा ‘विजोडां'चा देखणा मेळ या माणसात दिसतो. शिकागोतील सर्वधर्म परिषदेच्या आधीच्या आठवड्यात न्यूयॉर्क इथे ‘सोशल सायन्स असोसिएशन' या संस्थेच्या प्रतिष्ठित अशा वैचारिक उत्सवात विवेकानंदांनी दिलेल्या भाषणाचा विषय होता- ‘आजच्या घडीला सुवर्णमान पद्धती आणि रजतमान पद्धती यातला कोणता पर्याय अर्थव्यवस्थेला उपयोगी असेल?' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीदेखील १९२१मध्ये रुपयाच्या प्रश्नावर लंडनला निबंध सादर केला होता. जातिभेदावर आर्थिक स्वयंपूर्तता हा प्रभावी उपाय आहे हे त्यांनीदेखील जाणलं होतं. म्हणून अर्थशास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा होता.

मागासलेल्या गरीब आणि दलित समाजात आत्मविश्वास फुलवायचा असेल तर सर्वप्रथम शिक्षणात विज्ञान व तंत्रज्ञान पेरणं गरजेचं आहे. असं शिक्षण प्रसंगी त्यांच्या दारी उपलब्ध झालं पाहिजे यासाठी विवेकानंदांनी आयुष्यभर आग्रह धरला. शिका, वाचा, भाषा आत्मसात करा, विज्ञानाची कास धरा, हे त्यांनी अक्षरश: पदोपदी सांगितलं आहे. त्याचबरोबर भक्कम शरीरासाठीही त्यांचा अट्टहास होता. त्यांनी त्याबद्दल स्वानुभवाचे बरेच ‘डोस' दिले आहेत. ‘गीता वाचण्यापेक्षा फुटबॉल खेळा' असं ठासून सांगणारा हा एकमेव संन्यासी होता. फुटबॉलच्या ब्रँडिंगसाठी यापरतं स्फोटक बोधवाक्यं दुसरं नसावं. फक्त ‘गीते'ऐवजी कुठे ‘बायबल', तर कुठे ‘कुराण' हा बदल करावा लागेल! होईल कुणाची हिंमत?

विवेकानंदांना समाजात संपन्नतेची दिशा गिरवणारी संन्यासी संघटना उभारायची होती. प्रत्येक शहरात ज्ञान-विज्ञान, आरोग्य-अर्थ या शिक्षणाचा प्रसार-प्रचार करणारे १०-१२ संन्यासी उभे करायचे होते. यासाठी त्यांना देशात दमदार अशी ठळक ओळख आणि कार्यसिद्धीसाठी पैसा हवा होता. सर्वधर्म परिषद गाजवून त्यांनी दोन्ही गोष्टी मिळवल्या. मात्र या दोन्ही बाबतींत त्यांची सडेतोड वृत्ती दिसते. देशातील विदारक परिस्थितीबाबत त्यांनी सामाजिक नेत्यांची आणि सामान्य लोकांची कानउघाडणी करण्यात कुठलीच कसर ठेवली नाही. पैसा उभा करताना पश्चिमेत कधी लाचारी पत्करली नाही. भारताची हीन-दीन अवस्था सांगत, सहानुभूती म्हणून पैसा न मागता उलट हिंदू धर्माच्या सकस दृष्टीचा आणि व्यापक विचारांचा साक्षात्कारी प्रत्यय त्यांनी पाश्चिमात्य समाजाला करून दिला. ‘तुमच्या मानसिक व आध्यात्मिक प्रगतीकरिता तुम्हाला भारताला मदत करणं गरजेचं आहे', हे त्यांनी प्रसंगी शाब्दिक रट्टे लगावूनही ठणकावलं. यातून अगदी जॉन रॉकफेलरसारखा मुजोर धनाढ्यदेखील सुटला नाही. त्याची गळाभेट घेऊन नव्हे, तर कॉलर पकडून परोपकारासाठी पैसा देणं हे तुझ्याच भल्यासाठी आहे, असा सज्जड दम त्यांनी भरला. तणतण करत का होईना, रॉकफेलर साहेबाला ते मान्य करावं लागलं.

१८९७ मध्ये विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना करून आपले कार्यविचार जमिनीवर उतरवण्यास सुरुवात केली. तसंही ते सतत ‘मिशन-मोड'मध्येच जगत आले होते. दुर्दैवाने त्यांना त्यांच्या ‘मिशन'साठी केवळ पाच वर्षं मिळाली, तीही आजारपणाने डागाळलेली. देशविचारात मुरलेला मठ्ठपणा इतक्या कमी वेळात जाणं शक्यच नव्हतं, हे विवेकानंद पुरतं जाणून होते. पण निदान श्रीरामकृष्णांच्या शिष्यांना, आपल्या गुरुबंधूंना आणि अनुयायांना या ‘मिशन'मागील धगधगतं मन कळावं अशी विवेकानंदांना आस होती. ‘शिव भावे जीव सेवा' या ‘मिशन' भावनेचा प्रवाह सळसळता राहावा म्हणून त्यांनी रामकृष्ण मिशनचं माध्यम उभारलं होतं. मात्र, विवेकानंदांचं हे मिशन समजणं आणि ते कृतीत आणणं ही दोन्ही कामं सोपी नव्हती. देवपूजनासाठीची चेंगराचेंगरी किंवा अध्यात्माच्या नावावर होणारी उटपटांग अनुष्ठानं सगळ्यांना समजत होती व ठाऊकदेखील होती. शिवाच्या नावाने भांग झोकून ढेरपोटे साधू-संन्यासी देशभर ‘बम भोले'चा कल्ला करत फिरत होते. पंडित-पुरोहित मंगळ-शनीच्यावतीने लोकांना खोटी भीती घालत धनप्राप्तीसाठी लुबाडत होते. मात्र ‘शिवा'च्या भावनेने ‘जीवा'ची सेवा हे थोडं न पेलणारंच होतं. बरं, मातृसेवा, गोसेवा, हिंदुसेवा असलं काही असतं तर गल्लोगल्ली समित्या पाडून काम धकलं असतं. पण ‘जीव'सेवेत सारं चराचर येतं. हा अभेद व्यापकतेचा हुंकार उरात कसा धारण करायचा?

हिंदू धर्मात ‘मिशन' आणि ‘मठ' यांत कायम गफलत झाली आहे. ज्यू-ख्रिश्चन-इस्लाम या धर्मांत एक देव, एक प्रेषित आणि एक पुस्तक असा सारा एकरेषीय मामला आहे. तसा ज्याला ‘हिंदू धर्म' म्हणतात त्यात नाही. या मातीत फुलणाऱ्या फुलांमध्ये जेवढी विविधता आहे त्याच्याशी स्पर्धा करेल अशी भिन्नता धर्माबाबत आहे. फुलांमध्ये मातीचं तत्त्व एक आहे तसंच येथील समाजांमधील जीवनतत्त्व एक आहे. सर्वधर्म परिषदेच्या जागतिक व्यासपीठावरून विवेकानंदांनी याची ग्वाही दिली होती. खरं तर ती त्यांच्या ‘मिशन'ची जाहीर सुरुवात होती. ‘आकाशात्‌‍ पतितं तोयं, यथा गच्छति सागरम्‌‍। सर्वदेव नमस्कारं केशवं प्रति गच्छति।' या प्राचीन धर्मभावनेचा पुनरुच्चार त्यांनी अमेरिकेत केला होता. मात्र, जेव्हा जेव्हा या सहज लवचिकतेचं बीज इथल्या धर्मभूमीत अंकुरित करण्यात आलं, तेव्हा तेव्हा त्याभोवती कर्मठतेची तटबंदी उभारण्यात आली. या तटबंदीने त्या अंकुराची पूजा केली, त्याला गंध म्हणून कपाळी फासलं, मात्र आचरणात ते फुलू दिलं नाही. बुद्ध, आद्य शंकराचार्य, कबीर असे कित्येक ‘मिशन' मठात दफन करण्यात आले.

या ऐतिहासिक ‘रोगाची' आणि त्याचा प्रसार करणाऱ्या ‘बाधित' वर्गाची जाणीव विवेकानंदांना होती आणि ती फुंकर मारून जाणार नाही हे त्यांना पुरेपुर ठाऊक होतं. म्हणून त्यांनी जमेल तसं आणि दिसेल तसं या रोगवृत्तीला झोडपलं. त्यांची भाषणं, पत्रं, संवाद याचे साक्षीदार आहेत. पण त्याचबरोबर आपलं ‘मिशन' समाजच काय, पण आपला गुरुबंधू, शिष्यगण आणि अनुयायीदेखील पचवू शकणार नाहीत याची जाणीवही विवेकानंदांना होती. गर्दीचा ‘मठ' असतो, मात्र ‘मिशन' एकाचंच असतं, याच उमजेतून विवेकानंदांनी ‘वन लाइफ, वन मिशन' हे अभिनव ‘मिशन स्टेटमेंट' या भूमीला दिलं. या तत्त्वविधानाचं आपल्या जगण्यात विशुद्ध अनुसरण करणारे ‘जिवंत' समाजघटक या देशाचे, या धर्माचे पथदर्शी राहतील, याच सघन आशेत विवेकानंदांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या या पथावर चालणारे असे कोण ‘माई के लाल' आपल्याला आज दिसतात?

(अनुभव, जानेवारी २०२५च्या अंकातून साभार)

मुकुंद कुलकर्णी | mukund59@gmail.com

मुकुंद कुलकर्णी हे प्रदीर्घ पत्रकारी अनुभव असलेले माजी संपादक आहेत. मध्य भारतातील आदिवासी समाजाचे आणि त्यांच्या प्रश्नांचे ते अभ्यासक आहेत. शिवाय ईशान्य भारतातील समाज, तसंच विविध धर्म आणि त्यांचं तत्त्वज्ञान हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहे.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 1

किरिटी श्यामकांत मोरे 05.07.25
सर, मी तुमच्या लिखाणाचा एक चाहता आहे.आपली काही पुस्तके उपलब्ध असतील तर कृपया कळवा.

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results