मागे एकदा दिल्लीला एका अभ्यासकाला भेटण्याचा योग आला. त्याच्या संशोधनाचा विषय वेगळाच होता. पण त्याने एक छोटा अभ्यास म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांवरही निबंध लिहिला होता. त्यात त्याने शिवाजी महाराजांची तुलना अलेक्झांडर आणि नेपोलियनशी केली होती. महाराजांच्या बऱ्याच जमेच्या बाजू आणि काही मर्यादा दाखवल्या होत्या. त्याने मांडलेल्या मतावर त्याने मला माझं मत विचारलं. मी विचारात पडलो. म्हणालो, "मला नाही बुवा असं काही सांगता येणार. कारण शिवाजी हा इतका माझा आहे, की त्याविषयी मला क्रिटिकली, टीकाकाराच्या दृष्टीतून काही विचारच करता येणार नाही.” माझ्या या म्हणण्याचं त्याला खूप आश्चर्य वाटलं. पण खरंच आहे ना ते. माझी सगळी लहानपणाची घडण शिवाजीबरोबरच नाही का झाली? वाचता येऊ लागलं तेव्हापासून ब. मो. पुरंदऱ्यांची वेगवेगळ्या गडांची नावं असलेली पुस्तकं अधाशासारखी रंगून रंगून वाचली होती. शिवाजीच्या धैर्याचा, शौर्याचा, सगळ्याचा आपल्यावर केवढा खोलवर परिणाम झाला ते विसरणं शक्य आहे का?
अलीकडे त्याचे अभिमानी लोक जागोजाग दिसतात. ते ‘शिवाजी महाराज' म्हणावं असा आग्रह धरतात. काही तर ‘छत्रपती शिवाजी महाराज' म्हणतात. ते आपले छत्रपती शिवाजी महाराज होते हे खरंच, पण मला मात्र प्रेमाने ‘तो शिवाजी' म्हणायला आवडतं. कृष्णाला आपण श्रीकृष्ण महाराज म्हणतो का? संतांनी विठ्ठलाला विठ्ठलेश्वर नाही केलं. ते त्याला ‘विठ्ठला', 'विठोबा', ‘विठुराया' अशी एकेरी हाक मारतात, तर कोणी आपुलकीने ‘विठ्या'ही म्हणतात. तर, म्हणून माझा शिवाजी. शिवबादादा.
लहानपणी शिवाजी माझ्या स्वप्नातही यायचा.
आमच्याकडे दीनानाथ दलालांनी काढलेलं शिवाजीचं चित्र फ्रेम करून लावलेलं होतं. ते धारदार नाक, त्या डौलदार मिश्या, ती टोकदार दाढी...पण त्याचं समोरून काढलेलं एकही चित्र मी पाहिलं नव्हतं. त्या काळात मी पाटीवर सारखं शिवाजीचंच चित्र काढायचो. तसंच नाक, मिशी, दाढी...कपाळावर शिवाचं आडवं तीन पदरी गंध...डोक्यावर मागे वळ्यावळ्यांनी बनलेला शिरेटोप. तसाच मागे जाणारा तुरा, खाली लोंबणारा मोत्यांचा झुपका...त्यातला मोती न्मोती मी मन लावून काढायचो. आमच्या घरासमोर एक देऊळ होतं. ते माझं विश्वच जसं! तिथल्या दारांवर मी खडूने शिवाजी काढायचो. तुळयांवर ऐतिहासिक काव्यांच्या ओळी लिहून ठेवायचो. त्यांतलं एक आठवतंय- ‘मुक्या मनाने किति उडवावे शब्दांचे बुडबुडे, तुझे पवाडे गातिल पुढती तोफांचे चौघडे.' आणि हो, मी पोवाडेही म्हणायचो. डोक्याला फेट्यासारखं एखादं फडकं बांधून. मी एकटाच नाही, सगळी दोस्तमंडळीच इतकी शिवाजीमय, की एक थोडासा गोलाकार खड्डा असलेल्या दगडाला आम्ही शिवाजीच्या घोड्याच्या पायाचा ठसा म्हणूनच दाखवायचो.
अलीकडे एका राजकीय पोस्टरवर शिवाजीचं डोळे वटारलेलं चित्र पाहिलं. मनात म्हणालो, ‘नाही, नाही. असा तो उग्र नव्हता रे, भाऊ. तो शांत, संयमी, माणुसकीचा जिव्हाळा असलेला होता. प्रसंगी तो रागावतही असेल, पण लोकांना त्याच्या जवळ जावंसं वाटायचं, मनातलं बोलावंसं वाटायचं. मनात आलेला नवा डावपेच निर्भयपणे शिवबादादाला सांगता यायचा.' निदान माझा शिवाजी तरी असा होता. अलीकडे काहीजणांनी त्याला मुस्लिमविरोधी भावनांचंही प्रतीक केलंय. शिवाजीदादा, सांग रे या लोकांना, की तू नव्हतास तसा. तू देवळांबरोबर किती मशिदींना अनुदानं दिलीस. तुझ्या सैन्यात किती मुस्लिम सैनिक, सरदार होते. आणि ते केवढे तुझ्या जिवाभावाचे होते. अंगरक्षक, हेर, किती किती सांगावं..
तर ते जाऊ द्या. लहानपणी शिवाजीवरची दोन पुस्तकं अगदी लाडकी होती. आधी पुरंदऱ्यांचा ‘राजा शिवछत्रपती' हा मोठा ग्रंथ आणि नंतर रणजित देसाईंची ‘श्रीमान योगी' ही कादंबरी. दोन्हींतलं उजवं-डावं कसं सांगणार? कुठलंही पान उघडून वाचत बसावं आणि शिवाजीचं बोट धरून लहान होऊन जावं. तसा शिवाजी लहानशा जहागिरीचा जहागीरदार. वडील मोठे सरदार असले, तरी ते कुठे तरी लांब, धावपळीत. तरी या पोराने स्वराज्याचा डाव मांडला. सवंगडी जमवले, सगळ्या पोरांनी स्वराज्याची शपथ काय घेतली, सगळंच अजब. हे राज्य आपलं नाही हे त्याला कसं कळलं असेल? त्याला त्याची जहागीर हेच राज्य का नाही वाटलं? हे त्याचं स्वप्न उपजतच होतं की काय? मग लक्ष जातं जिजाबाईंकडे. काय म्हणावं तिला? शिवबाची आई ती आपली आज्जीच, नाही का? तर त्या आज्जीने कसं घडवलं असेल त्याला? शहाजीराजाने ही फार जोखमीची जबाबदारी सोपवली. ती आपल्या आज्जीने मागे राहून किती शांतपणे निभावली! आजीचा चेहराच येत नाही डोळ्यांसमोर. ती असणार मध्यम वयातली. तिचा चेहरा सुंदर नसणार, पण त्यावर शहाणपणाचं तेज असणार. कणखरपणा असणार. पण शिवाजी स्वारीवर गेल्यावर त्याची काळजी करत बसणाऱ्या या आज्जीचा चेहरा कसा असेल? आणि शिवाजी तिच्या लाडक्या नातवासह आग्ऱ्याला गेला तेव्हा तिच्या हृदयाचं पाणी पाणी झालं असेल...तेव्हा तर वार्धक्याने तिचा चेहरा सुरकुतलेला असणार. पुढे राज्याभिषेकासाठी आजीने जसा जीव धरून ठेवला होता! राज्याभिषेक झाला आणि केवळ १५ दिवसांत संपलंही ते कृतार्थ जीवन. या मायलेकरांचं काय नातं असेल नाही? घरचा कारभार बघणं, सुनांना आपलंसं करणं, मुलाच्या परोक्ष राज्यकारभार सांभाळणं, बापाचा सहवास मिळत नाही म्हणून रुसलेल्या नातवाला माया लावणं... किती गुंतागुंतीचं जीवन होतं आपल्या या आज्जीचं!
शिवाजीचा जन्म झाला तो शिवनेरी गड आमच्या ओतूरजवळच आहे. शाळेत असताना अनेकदा तिथे सहली गेल्या होत्या. सिंहगडही पुण्याच्या परिसरातला. त्यामुळे तिथेही बऱ्याचदा जाणं-येणं व्हायचं. पण इतरांना अशा ठिकाणी गेल्यावर जशा वेगळ्याच संवेदना होतात तशा मला कधी झाल्या नाहीत. दोन-चार पडके दरवाजे पाहून काय वाटणार? मला या किल्ल्यांची अशी दुर्दशा करणाऱ्या ब्रिटिशांचा संताप येतो. आश्चर्यही वाटतं. इतकं जुनं जपणारे लोक ते. त्यांना म्हणे परत या गडांच्या आधाराने बंड होईल अशी भीती होती, म्हणून त्यांनी ते उद्ध्वस्त केले! फार तर काही ठिकाणी तटबंदी पाडली असती. पण आतल्या सगळ्या इमारती, घोड्यांच्या पागा, तलाव, रस्ते, बाजार...यांनी त्यांचं काय वाकडं केलं होतं?
लहानपणी शिवाजीच्या पराक्रमांमधला एक प्रसंग वाचायला मला फार आवडायचा. रायबागन आणि कारतलबखानाला कोकणात जाणाऱ्या खिंडीत गाठल्याचा प्रसंग. त्या रायबागनचा तोराच उतरवला शिवाजीने. शाहिस्तेखानाच्या छावणीत, पुणे शहरात काही निवडक स्वारांसह शिवाजीने जाणं हे केवढं धाडस! कोणता राजा असं करू शकेल, हो? पण शाहिस्तेखानाला असा काही मानसिक झटका बसला की पूछो मत. औरंगजेबाचा तो मामा. म्हणजे धक्का थेट दिल्लीपर्यंत पोहोचला असणार. शाहिस्तेखान चंबूगबाळं उचलून चालताच झाला दिल्लीला.
पण यापेक्षाही अफजलखानाच्या वधाची हकीकत माझी सर्वांत आवडती आहे. किती वेळा वाचली असेल, पण तरी कंटाळा म्हणून येत नाही. ते ‘थ्रिल' आजही सोडून गेलं नाही. तो खान विजापूरहून निघाला- मंदिरं फोडत, वगैरे. तो डिवचत होता शिवबाला. पण संयम बघा याचा. तो प्रतिकार करायला, वीरश्री गाजवायला बाहेर पडला नाही. नको ते साहस त्याने केलं नाही. इतका हाहाकार कानावर येऊनही शिवाजी शांत कसा राहिला? आणि ते घाबरल्याचं नाटक? खूप वर्षांपूर्वी वसंत व्याख्यानमालेत आचार्य अत्र्यांचं भाषण होतं. अध्यक्षस्थानी दत्तो वामन पोतदार. अत्र्यांनी त्या दिवशी अफजलखानाच्या वधाचं जसं आख्यानच लावलं. खानाला कसा खेचून आणला...शेवटी त्यांनी सांगितलं, ‘शिवाजीने वाघनखांनी खानाचा कोथळा बाहेर काढला हे खरं नाही. त्याने कट्यार लपवून नेली होती. त्या कट्यारीने पोट फाडलं'...वगैरे. दत्तो वामन अध्यक्षीय भाषणात मिश्कीलपणे म्हणाले, ‘‘त्याने वाघनखं चालवली की कट्यार हे मला सांगता येणार नाही कारण ते पाहायला मी तिथे नव्हतो!” हास्यकल्लोळ थांबल्यावर म्हणाले, ‘‘खानाला मूर्ख समजू नका. त्याला तो प्रदेश चांगला माहीत होता. किती तरी वर्षं तो वाई प्रांताचा सुभेदार होता.” (आणि नंतर सदाशिव आठवल्यांनी सांगितलं, की आपण कदाचित परत येणार नाही म्हणून खानाने आपल्या सर्व बेगमांचा वध केला. त्यांच्या कबरी आजही तिथे आहेत.)
या वाक्याने माझं विश्वच जसं हललं. मी वाचलेल्या कथांपेक्षा, पुस्तकांपेक्षा हे वेगळंच काही तरी होतं. थोडं अधिक समजून घ्यायची जबाबदारी आली आता. खान शिवबाच्या हातात कसा सापडला, हे माझं कुतूहल शमवलं पाचगणीच्या दीक्षित सरांनी. डॉ. नलिनी गितेंबरोबर त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांनी ब्रिटिशकाळापासून आजवर अनेकांना तो परिसर हिंडवून आणलाय. ते म्हणाले, ‘‘शिवाजीचे डावपेच अभ्यासावर आधारलेले होते. खान येणार, कळल्यापासूनच त्याचा अभ्यास शिवाजीने सुरू केला. मागे कुठे तरी खानाने असाच वेढा घातला होता. आतल्या राजाला त्याने वाटाघाटीसाठी बोलावलं. त्याला अभय दिलं, शब्द दिला. म्हणून तो राजा गडाबाहेर भेटायला आला. आणि त्याला खानाने मारून टाकलं. असं आणखी एका ठिकाणीही त्याने केलं होतं हे कळल्यावर शिवाजीने डावपेच आखले. ज्या ‘मोडस ऑपरेंडी'ची खानाला सवय होती, तीच शिवाजीने मुद्दाम वापरली. मनुष्यस्वभावाचा कसा अचूक अंदाज होता त्याला!”
तो राजा असला तरी इतर राजांसारखा नव्हता. सैन्याला हुकूम देऊन स्वत: मागे सुरक्षित राहणारे राजे अनेक होते, पण हा आघाडीवर राहणारा राजा होता. सर्वांत जास्त धोका पहिल्या फळीला. तिथेच हा, अगदी पुढे. त्याच्या या गुणांवरच त्याचे सहकारी, सैनिक फिदा असले पाहिजेत. हा फक्त जहागीर वाढवायचा उद्योग नाहीये, हे सर्वांना शिवाजीच्या या ‘धडक' कृतींमधून कळत असावं. अशी जिवाला जीव देणारी किती माणसं मिळवली असतील त्याने! इतिहास फक्त काही निवडकांची आठवण ठेवतो. पण इथे तेही इतके भरभरून आहेत की बस्स!
ओतूरच्या शाळेच्या स्नेहसंमेलनात आम्ही ‘गड आला पण सिंह गेला' या नाटकातला प्रवेश केला होता. (किंवा त्यावरची एकांकिका असेल.) त्यात तानाजी झालेला पोरगा ‘आधी लगीन कोंढाण्याचं, मंग रायबाचं!' हे वाक्य इतकं जोरात ठासून म्हणायचा की अंगावर शहारे यायचे. तानाजीचं बलिदान काय जिव्हारी लागलं असेल शिवाजीला! सुख निर्भेळ मिळूच नये का? नेत्रदीपक यशात काही जिवाभावाचे सहकारी, सवंगडी गमावणं, हा काय योग आहे?
पण काय वातावरण निर्माण केलं असेल शिवबाने! सर्वसामान्य माणसं जिवाला जपतात आणि शूर वीर प्राणांची आहुती देतात, असं नेहमीच ऐकलेलं. पण जेव्हा सर्वसामान्य माणसंच अशी आहुती द्यायला उठतात तेव्हा? काय म्हणायचं त्याला? बाजीप्रभूचं बलिदान कोरलं गेलंय इतिहासात, आपल्या मनात. शत्रूला फसवून बुचकळ्यात टाकण्यासाठी शिवाजीसारख्या दिसणाऱ्या काही शिपायांना पालखीत बसवून त्या वेढ्यात पाठवल्या गेल्या. ते पकडले गेले. पुढे काय होणार ते या शिपायांना ठाऊकच होतं. तरीही ते शिवाजीसारखे सजून पालखीत बसले. का बरं? तसंच आग्ऱ्याहून सुटकेच्याबाबत. शिवाजीच्या जागी कोण पडून राहिला? आपल्या स्वराज्यातला कोणी साधा शिलेदार. काय अभिनय वठवला असेल त्याने!
मला संभाजीबाळाचंही नवल वाटतं. आग्ऱ्यात ते पोर घाबरलं नाही. पळून जाताना हूं की चूं केलं नाही. उरलेला प्रवास वडलांविना, अनोळखी भागात, रानावनातून कसा केला असेल त्याने? संभाजीला समजून घेण्यात आपण सगळे कमीच पडलो. शिवबाने आपल्या राज्याभिषेकाबरोबर त्याचा युवराज्याभिषेक करूनही त्या सगळ्या अमात्य मंडळींनी गृहकलह सुरू करावा? मध्यंतरी वाचलं, की सोयराबाईला त्याने भिंतीत चिणून मारलं, याला काही पुरावा नाही. त्यानंतर दीड वर्षाने विष खाऊन किंवा विषप्रयोग होऊन ती गेली. ज्या अमात्यांना देहान्त सजा दिली त्यांच्याच मुलांना त्याने परत मंत्रिमंडळात घेतलं. याहून त्याच्या शहाणपणाचा, समतोल बुद्धीचा काय पुरावा पाहिजे? घरावर रुसून दिलेरखानाला मिळाला, हा त्याच्यावरचा मोठा डाग. पण पुढे त्याने खानाच्या फौजेचं गाव लुटणं पाहिलं, एका स्त्रीस खानाने मुसलमान करून जनानखान्यात ठेवली ते पाहिलं. मग मात्र तो स्वत:हून परत घरी निघून आला. चूक झाली. ती त्याने सुधारली. वडलांनंतर त्याला जेमतेम सात-आठ वर्षंच मिळाली, पण तो त्यात सतत लढायाच करत राहिला. पोर्तुगीज, मोगल, खाली थेट कर्नाटकात जिंजीपर्यंत, तिकडे मराठवाड्यात. अशा नुसत्या लढायांत वेळ गेला. तो व्यसनाधीन आणि लंपट असता तर हे जमलं असतं?
तो संस्कृतमधला इतका जाणकार, की त्याने संस्कृतात काव्यग्रंथ लिहिलाय. उन्मत्त वतनदारांना जरब बसवणारी त्याची आज्ञापत्रं पाहिली की थेट शिवबादादाचीच आठवण यावी. आणि मरण? मरणातच तो असा जगला की अंगावर शहारेच येतात. ते नुसतं युद्धातलं मरण नव्हतं, ते विटंबना करून दिलेलं मरण होतं...काय त्याची ती धिंड...छे छे! वाचवत नाही तो भाग. त्याच्या गुणांमध्ये, व्यक्तिमत्त्वात, निष्ठेमध्ये जरा कमतरता असती, तर तो अशा वेळी पिचला असता आणि औरंगजेबाला शरण गेला असता. पण त्या मरणात तो असं जगला की सर्व मराठी शिपायांच्या डोक्यावर जसा स्वार झाला. आणि तिथून सुरू झालं एक विलक्षण, निर्नायकी युद्ध. त्या निनावी शिपायांना प्रोत्साहन द्यायला, डावपेच आखायला, पाठ थोपटायला शिवाजी-संभाजी नव्हते. राजाराम दूरस्थ. कोणी श्रेयासाठी हे करत नव्हतं की इनाम, वतनासाठी. शांत, अविरत, निश्चयी लढाई. आपण असू तेच रणांगण. आपण एकटे असलो तरी तीच फौज. शत्रूचं बळ किती का असेना! अखेर औरंगजेबाला दिल्ली सोडून इकडे यावं लागलं. तरी त्याला हे थैमान आवरेना. शेवटी इथेच त्याचा मृत्यू झाला.
एक संताजी, धनाजी सोडले तर त्या लढाईतल्या विलक्षण वीरांची नावंही माहीत नाहीत आपल्याला. या अनामिक वीरांचं एखादं चांगलं स्मारक का असू नये? संभाजीच्या मृत्यूनंतरच्या या लढ्याची चांगली आठवण का असू नये? व्हिएतनाम युद्धात मरण पावलेल्यांचं अमेरिकेत वॉशिंग्टनमध्ये एक स्मारक आहे. तिथे कुठलाही पुतळा नाही. तिथे आहे लांबलचक ग्रॅनाइटने मढवलेली एक भिंत. त्यावर त्या सैनिकांची नावं कोरली आहेत. त्यांचे नातेवाईक, मित्र येऊन त्यापुढे फुलं ठेवतात. हृदय गलबलतंच आपलं तिथे. आपल्याकडे स्मारक म्हटलं, की ते एकसुरी, तलवार उपसलेले पुतळे आठवतात. पण आपणा सगळ्यांना आपला हा शिवाजी किती बहुपदरी होता, तो किती वेगवेगळ्या प्रकारे मोठा होता हे का नाही समजू शकत?
तो नुसता गनिमी काव्याने लढू शकत होता असं नाही. (डॉ. श्रीनिवास सामंत यांच्या पुस्तकात) साल्हेरच्या लढाईचा वृत्तान्त वाचला. शिवाजीने फौजेचे वेगवेगळे भाग करून ती सपाटीवरची, समोरासमोरची लढाई अशी काय जिंकलीय की बस्स! कोणी म्हणू शकणार नाही, की तो फक्त सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत लढू शकत होता. आपण कशासाठी लढतोय याचं ज्याला अचूक भान आहे, शत्रूच्या कमतरतांचा ज्याने अभ्यास केलेला आहे आणि स्वबळाची ज्याला वास्तव कल्पना आहे असा तो शिवाजी. थंड डोक्याने वेगळ्याच कल्पना शोधणारा शिवाजी. सतत ‘प्रो-ॲक्टिव्ह'. शत्रूंच्या डावपेचांमागे तो फरफटत गेला नाही. शत्रूला कल्पना यायच्या आत त्याच्यावर झडप घालून शत्रूच्या मर्मावर हल्ला करायचा. असा तो शिवाजी!
शिवाजीच्या बाजू तरी किती! प्रत्येक बाबतीत त्याने कसं लक्ष घातलं? इंग्रज, पोर्तुगीजांचं आरमारी बळ पाहून त्याने स्वत:चं आरमार बनवायचं ठरवलं. हीच एक क्रांतिकारक कल्पना. त्या वेळच्या समाजात समुद्रपर्यटन निषिद्ध होतं. बंदी होती धर्माची. ती शिवबाने सहज ओलांडली. पण त्याने इंग्रजांच्या, पोर्तुगीजांच्या गलबतांची नक्कल नाही केली. त्यांची जहाजं मोठी, खाली ‘व्ही'च्या आकाराची, निमुळती होत गेलेली. लांबच्या प्रवासाला ती उपयुक्त. पण शिवबादादाने इथला विचार केला. आपली गरज काय हे ओळखून सपाट तळाच्या छोट्या होड्या बांधल्या. त्या छोट्या होड्या मोठ्या गलबतांवर हल्ले करून नाहीशा होत. एका पोर्तुगीज पत्रात असं म्हटलं आहे, की ‘हा सीवा कुठून येतो आणि हल्ले करून कुठे गडप होतो ते कळतही नाही.'
शिवाजीने जमिनीवरच्या लढाईत जो गनिमी कावा वापरला तोच आरमारी युद्धातही. बघा, किती शिकायचंय आपल्याला शिवबादादाकडून! त्याने नुसत्या अनुरूप बोटी बांधल्या नाहीत, तर समुद्री किल्ले बांधले, सुधारले. उदय संखे यांच्या लेखात शिवबाराजाला दुर्ग-बांधणीची किती नवी दृष्टी होती हे कळतं. शत्रूच्या बोटी विजयदुर्गच्या आसपास फुटत. कारण पाण्यातच शिवबाने भिंत बांधली होती. ती वरून कुणाला दिसत नसे, पण गलबतं त्यावर फुटत असत. ती भिंत बंदरापासून १५० ते २०० मीटर अंतरावर होती. आणि किती लांब? तर साडेचार किलोमीटर! संरक्षणाची साधी पण किती परिणामकारक युक्ती! किल्ल्याभोवतीचे समुद्रातले खडक तो तसेच ठेवायचा. ‘व्ही' आकाराच्या मोठ्या बोटी त्या उथळ पाण्यात, खडकाळ भागात येऊ शकत नसत, पण सपाट तळाच्या छोट्या बोटी सरासरा जायच्या. त्याने या बांधकामात शिसं आणि चुना वापरला. चुना करण्यात शिवबाचे लोक इतके पुढे गेलेले, की पाण्याने किल्ल्याच्या तटांचे दगड झिजले, पण चुना जसाच्या तसा. बोला!
खांदेरीची लढाई हे तर अप्रतिमच नाट्य. हे बेट मुंबईच्या तोंडावर असलेलं. इंग्रजांना चाप बसवण्यासाठी त्याचा चांगला वापर करता येणार होता. ते ताब्यात घेऊन शिवबाच्या लोकांनी बांधकाम सुरू केलं. ते इंग्रजांनी उधळून लावलं. पण आपला शिवबादादा किती संयमी! सहा वर्षं थांबला. ‘ठंडा करके खाओ' ही म्हण त्याच्यात मुरलेली होती. सहा वर्षांनंतर त्याने परत काम सुरू केलं. पण मधल्या काळात इंग्रजांनी बेटावर तोफा चढवून नाकेबंदी केली. शिवबाचे सैनिक तोफांच्या माऱ्यामुळे जवळ जाऊ शकत नव्हते. तरी बिघडलेल्या हवेचा, वादळाचा फायदा घेऊन वेढा तोडून ते आत जात आणि रसद पुरवत. इंग्रज काहीच करू शकत नसत. मग शिवबाने आवई उठवली (त्याही तंत्रात तो वाकबगार), की ‘पनवेलहून मराठा सैन्य मुंबईवर चाल करून येतंय.' मग घाबरून इंग्रजांनी मराठ्यांकडे तहाची बोलणी केली, आणि त्यात शिवबाने खांदेरी बेट मिळवलंच.
या लढाईत किती विशेष गोष्टी आहेत बघा. खांदेरी बेटाची अचूक निवड, संयम, छोट्या होड्यांची करामत. त्यातला गनिमी कावा. आवई उठवून शत्रूला संभ्रमात टाकणं आणि तहात हवं ते मिळवणं. एरवी भारतीय सैन्य युद्धात जिंकतं पण तहात हरतं असं म्हणतात. इथे आपला शिवबादादा युद्धात जिंकलेला नसूनही तहात जिंकला.
इतर ठिकाणी शिवबाचे पुतळे उभारण्यापेक्षा अशा एका खांदेरीवर त्याचं योग्य स्मारक का होऊ नये? तिथे त्याच्या होड्या, पडाव, गलबतांचं प्रदर्शन का भरवू नये? खांदेरीच्या लढाईचं शूटिंग करून संध्याकाळी त्याचा दृक्श्राव्य कार्यक्रम का करू नये?
लहानपणी शिवबावरची गोष्टीरूप पुस्तकं वाचली होती. नंतर प्रत्यक्ष इतिहासावरची वाचू लागलो. त्यातून माझा शिवबादादा आणखी उलगडत गेला. त्याची काही आज्ञापत्रं वाचली. ती तर ‘अहाहा'च आहेत. त्यात त्याचं शहाणपण आहे, बारीकसारीक पाहण्याची बुद्धी आहे. एका आज्ञापत्रात तो म्हणतो, ‘गडावर तुम्ही शेकोट्या पेटवता, त्या नीट विझवा. एखाद्या ठिणगीने हाहाकार होईल. तेलाच्या पणत्या विझवून मग झोपा. उंदीर तेलाची जळती वात घेऊन जातील, आणि ती जळती वात गवताच्या गंजीपाशी नेऊन टाकली की गडावरच्या गवताच्या गंजी जळून खाक होतील...' अनवधानाने असं गवत जळालं तर करणार काय? अन्नसाठा भस्मसात झाला तर? पण शिवाजीच तो, ज्याने गडांचा इतका नेमका उपयोग करून घेतला, त्याचं हे मुलखावेगळं ‘लॅटरल थिंकिंग'!
आपल्या शिवाजीदादाचं आणखी एक आज्ञापत्र मला फार आवडतं. आंबे, फणस अशी लाकडं आरमारासाठी म्हणजेच स्वराज्यासाठी आवश्यक. ‘परंतु त्यास हात लावू न द्यावा' अशी शिवाजीची आज्ञा होती. तो नुसती आज्ञा देत नाही, तर त्याचं कारणही सांगतो- ‘काय म्हणोन, की ही झाडे वर्षा दोन वर्षांनी होतात असे नाही. रयतेने ही झाडे लावून लेकरासारखी बहुत काळ जतन करून वाढवली. ती झाडे तोडलीयावरी त्यांचे दु:खास पारावार काय?' पुढे तो त्याचंही कारण देतो : ‘येकास दु:ख देऊन जे कार्य करील म्हणेल ते (कार्य) करणारासहित स्वल्पकाळे बुडोन नाहीसे होते. धन्याचे पदरी प्रजा पीडण्याचा दोष पडतो. या वृक्षांच्या अभावी हानीही होते.' हे चिंतन त्या काळामधलं. बरं, मग स्वराज्याची आरमाराची गरज भागवावी कशी? तर शिवाजीचं म्हणणं असं, की ‘एखादं झाड, जे बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असेल, तर धन्यास राजी करून, द्रव्य देऊन, त्याचा संतोष करून तोडून न्यावे. बलात्कार सर्वथा न करावा.' बोला आता!
शिवबादादाच्या आज्ञापत्रात तो आज्ञा करताना समजावूनही सांगतो. ‘तुम्ही निष्काळजीपणा केलात तर वैरण पेटल्याने नष्ट होईल. मग चाऱ्याअभावी घोडे मेले तर तो दोष तुमच्यावर लागेल. तुम्ही त्यासाठी रयतेचं धान्य लुटू लागाल. मग रयत म्हणेल, त्या मोगलांमध्ये आणि यांच्यात फरक काय? आणि लोकांचा आधार तुटला तर राज्यच कोसळेल...' असं बरंच. एका पत्रात तर ‘कुणा शत्रूचं सैन्य या मार्गाने येत आहे. गाव उठवा आणि लोकांना घाटात सुरक्षित ठिकाणी लपवा' असं लिहिलं आहे. मला वाचल्याचं आठवतंय, नेपोलियनने रशियात धडक मारली होती तेव्हा गावकऱ्यांनी पलायन केलं होतं. जाताना आपापली गावं पेटवून दिली. त्यामुळे पुढे हिवाळ्यात तो तिथे सापडला, आणि गावंच अस्तित्वात नसल्याने त्याला माघारी फिरावं लागलं. त्या गावकऱ्यांचं वागणं शिवबादादाच्या माणसं हलवण्याच्या युक्तीशी किती मिळतं-जुळतं आहे! त्यात परत घरं पेटवून देणं ही भानगड नाही. शत्रू पुढे गेला की परत गाव जसंच्या तसं.
इतिहासाच्या पुस्तकांमध्ये सेतुमाधवराव पगडींनी लिहिलेलं छोटं आणि छान शिवचरित्र आहे. गजाजन मेहेंदळ्यांचे दोन ग्रंथही छान आहेत. शिवाय सामंतांचं ते फक्त लढायांवरचं पुस्तक. ते तर अप्रतिमच. अ. रा. कुलकर्णी आणि ग. ह. खऱ्यांनी संपादित केलेले ‘मराठ्यांचा इतिहास'चे दोन खंडही ग्रेटच! पण त्र्यं. शं. शेजवलकरांच्या पुस्तकांनी माझे सगळ्यात डोळे उघडले. त्यांच्या लेखसंग्रहात ‘रियासत'कार सरदेसाईंच्या ‘नानासाहेब पेशवे' या पुस्तकाला त्यांनी लिहिलेली प्रस्तावना आहे. त्या लेखाने मला हादरवलंच. पुढे मी त्यांचं बरंच लिखाण वाचलं. पण जमलेला लेख हाच. त्यांच्या आयुष्याच्या सर्व आकलनाचं गाळीव रूप त्यात आलं आहे. त्या लेखात पेशव्यांच्या उणिवा, कमतरता सांगताना समोर शिवाजी आरशासारखा धरला आहे. त्यामुळे पेशवे बाजूलाच राहिलेत. सरदेसाईंचं मोठेपण हे, की त्यांच्या पुस्तकाला ही प्रस्तावना सर्वस्वी प्रतिकूल असूनही त्यांनी ती छापलीय. शिवाजीने दिल्ली सत्तेला आव्हान देऊन नवं स्वतंत्र राज्य स्थापन केलं, तर पहिल्या पेशव्यांनी दिल्लीला जाऊन अधिकाराची वस्त्रं आणली. थोडक्यात, मांडलिकत्व पत्करलं. शिवाजीने आपल्या अर्थव्यवहारासाठी स्वतंत्र चलन निर्माण केलं, नाणी पाडली. ‘मुद्रा भद्राय राजते'- आठवतंय ना? ते नुसतं नाणं नाही. एका भूमिपुत्राने आक्रमक सत्तेला दिलेलं ते आव्हानच आहे. या उलट, पेशव्यांनी ती नाणी रद्द करून दिल्लीश्वरांचं चलन स्वीकारलं. शिवाजीने मराठी राजभाषा बनवली. त्यासाठी राज्यव्यवहारकोश लिहून घेतले. पण पेशव्यांनी ते परत फारसीवर आणले. आपल्याला आता पेशव्यांविषयी काही म्हणायचं नाही. पण हे खरं, की पेशव्यांनी शिवाजीला एक ‘कॉन्ट्रास्ट' पुरवला आहे. थोरले बाजीराव आणि थोरले माधवराव हे चमकून गेले आणि त्यांनी त्यांच्यात भिनलेलं शिवाजीचं स्फुल्लिंग दाखवलं. पण ते तितकंच. शेजवलकरांनी लिहिलेला ‘पानिपत' हा तर युद्धशास्त्रावरील अप्रतिम ग्रंथ. आपला मुख्य शत्रू अब्दाली आहे, तर पेशव्यांनी उत्तरेकडे जाताना इतर सर्व छोट्या सत्तांशी तह करत जावं ना... तर त्याऐवजी त्यांना दुखवतच हे पुढे गेले. यमुनेला पूर येण्याआधी अब्दालीला गाठायचं होतं, तरी पेशवे ठिकठिकाणी तीर्थक्षेत्री होमहवन करत राहिले. इतक्या लांबचा पल्ला, तरी सर्व कुटुंबकबिला घेऊन सगळे निघाले. आणि व्हायचं तेच झालं. किती मोती गळाले आणि किती खुर्दा सांडला याचे हिशोब करणं नशिबी आलं.
शिवाजी किती वेगळा होता! त्याच्या हल्ल्यात किती आश्चर्याचे धक्के असायचे. शत्रूपेक्षा तो किती पुढचा विचार करायचा! शेजवलकर लिहितात, ‘अब्दाली हा अफगाणिस्तानातला शिवाजीच. थोड्या पण चपळ फौजेनिशी हल्ले करून पळून जाणारा,' म्हणजे बघा. काळचक्र कसं उलटं झालं! शिवाजीने सुस्त व प्रचंड मोगल फौजेस हल्ले करून जेरीस आणलं. आता शिवाजीच्या जागी अब्दाली आणि मोगलांच्या जागी पेशवे, म्हणजे आपणच. काय हा योग म्हणायचा!
शेजवलकरांचं अखेरचं कार्य होतं शिवचरित्र लिहिण्याचं. त्यासाठी त्यांनी आयुष्यभर अभ्यास केला, साधनं जमवली; पण शेवटी तब्येत साथ देईना. त्यांचे एक विद्यार्थी मला सांगत होते, की ‘ते म्हणायचे, थोडा काळ मिळाला तर हे काम पुरे होईल.' त्या आजाराशी झगडत त्यांनी शेकडो पानांची प्रदीर्घ प्रस्तावना लिहिली, प्रत्येक प्रकरणाचा आराखडा लिहिला आणि प्राण ठेवला. नंतर मराठा मंदिर संस्थेने त्यांचा ‘राजा शिवछत्रपती' हा ग्रंथ छापून प्रसिद्ध केला. काय प्रस्तावना आहे ती! जसा एक प्रबंधच. शिवाजीच्या वेळची भारतातली परिस्थिती, जगातली परिस्थिती, इथली सामाजिक स्थिती, इथला तोपर्यंतचा इतिहास, इथले फसलेले प्रयोग...काय नाही त्यात! हे वाचलं तेव्हा वाटलं, आयुष्य दुसऱ्याला द्यायची सोय असती तर मी शेजवलकरांना माझी दहा निरोगी वर्षं देऊन त्यांचं ऋण थोडं तरी फेडलं असतं. एवढ्या समग्रपणे पाहणारा इतिहासकार मला दुसरा अजून सापडला नाही.
शिवाजीने आधीच्या वतनदारांना बाजूला सारून सर्वसामान्यांतली फौज जमा केली. अगदी अठरापगड जातींची. कसलीही प्रतिष्ठा नसलेली, पण जिवाला जीव देणारी. त्या अस्थिर जमान्यात लढाया होत्याच; पण तरीही शिवाजीने शेतकऱ्यांना स्थैर्य दिलं, प्रोत्साहन दिलं. अकबराला जसा राजा तोरडमल किंवा औरंगजेबाला मलिक अंबर मिळाला, तसा शिवाजीला एखादा प्रतिभावान सहायक मिळायला हवा होता. मग त्याने महसुलाची योग्य पद्धत बसवून त्याच्या स्वप्नातला महाराष्ट्र निर्माण केला असता. पण शिवाजीचं सगळं आयुष्य धावपळीचं. एकूण जेमतेम पन्नास वर्षं. त्यात एका संकटाशी दोन हात करावे तो दुसरं संकट उभं, ही परिस्थिती. पण त्याही परिस्थितीत त्याने व्यवस्था बसवली, लोकांना स्थैर्य दिलं.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या काळातही त्याच्या पायाशी बसून धडे घ्यावेत असा त्याचा धर्मविषयक दृष्टिकोन. इतर धर्मांचा द्वेष न करता आपला धर्म पाळता येतो, हे त्या वेळच्या मुस्लिम सत्तांना त्याने दाखवून दिलं.
मोगलांच्या प्रभावळीत अकबर असा होता.
कधी वाटतं, अकबर आणि शिवाजी एकाच काळात असते तर? किती फायदा झाला असता आपल्या सगळ्यांचाच! पण अकबरानंतर अकबराने तयार केलेलं वातावरण विरून गेलं आणि त्याबरोबर उलट्या वृत्तीचा औरंगजेब निर्माण झाला. आणि शिवाजीची प्रेरणा दुसऱ्या बाजीरावापर्यंत पूर्ण लयाला गेली. हे महापुरुष एकत्र आले असते तर न पुसता येणारी संमिश्र संस्कृती उदयाला येऊन टिकलीही असती. त्या काळात लोकांमध्ये ती होतीच. सूफी संत, भक्ती संप्रदायातले आपले संत यांत विरोध नव्हता, तर आदानप्रदान होतं. काही संत, त्यांचे गुरू यांना हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही नावांनी ओळखलं जायचं. काही मुस्लिम संत तर अगदी भागवत संप्रदायी होते. तसं वातावरण मीही माझ्या लहानपणी अनुभवलंय. आमच्या लहानपणी मुस्लिमांचे डोले नाचत यायचे. माझी आई हातात पाण्याचा तांब्या घेऊन दारात उभी राहायची. डोले जवळ आले की त्यांच्या स्वागताला घरापुढे रस्ताभर पाणी शिंपायची. असं प्रत्येक घराच्या दारात त्यांचं स्वागत व्हायचं. गणेशोत्सवाची सजावट मुस्लिमांकडे असलेलीही मी अनेक ठिकाणी पाहिली आहे. अनेक गवय्ये खानसाहेब देवीचे भक्त होते. त्यांनी देवाच्या वर्णनाच्या चीजा बांधल्या. त्यांच्या हाताखाली अनेक हिंदू गवई शिकले.
मग कधी लयाला गेलं हे सगळं? आधी देशाचे दोन तुकडे झाले. जो मिळाला त्यातही अशांतता, एकमेकांविषयी संशय, दंगली, बाँम्बस्फोट...वगैरे. आम्ही वारसा सांगतो शिवाजीचा आणि त्याच्याकडून शिकत नाही काही, याला काय म्हणावं?
कधी कधी वाटतं, लोक खऱ्या शिवाजीला ओळखतील. शिवाजीला लढाया कराव्या लागल्या सन्मानाने राहण्यासाठी, आपली जागा तयार करण्यासाठी. ती जागा आधीच उपलब्ध असती, तर त्याने छान, एकोप्याने नांदणारं सुखी राज्य निर्माण केलं असतं. मग करू या का सुरुवात? आपल्या राजकारण्यांनी, धुरीणांनी शिवाजीकडून थोडं शिकावं आणि एक भव्य स्वप्न उराशी घेऊन उतरावं या गरिबीविरुद्धच्या लढ्यात. अन्नावाचून, औषधावाचून कुणी मरताच कामा नये, अशी करू या का आपण प्रतिज्ञा? गुंडगिरी, झुंडशाहीला फाटा देऊन आपण होऊ या सर्वसामान्यांचे, निसर्गाचे रक्षक?
तसंच मला कर्नाटकमधल्या विजयनगरच्या कृष्णदेवरायाची आठवण होते. कसला पराक्रमी होता तो! शिवाजीने जसं शून्यातून स्वराज्य उभं केलं, तसं त्याचं नव्हतं. त्याच्याआधी दीडेकशे वर्षं ते साम्राज्य चालूच होतं, पण ते मोडकळीला आलेलं होतं. विजापूर, गुलबर्गा इथल्या मुस्लिम सत्तांनी लचके तोडणं, अंतर्गत कलह, हे सगळं चालू होतंच. त्याची कारकीर्द ती केवढीशी...फक्त वीस वर्षांची. तो वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी गेलाच. (त्याला ‘राया' म्हणायचे. ते मला फार आवडलं.) पण त्या वीस वर्षांत कसले पराक्रम केलेत! खरंच वाटत नाही. आदिलशाही, कुतुबशाही सगळ्यांना त्याने सपाटून मार दिला. एकदा नव्हे, तर अनेकदा. शिवाय त्या काळात राज्य समृद्ध, सुसंस्कृत केलं. संगीत, काव्य, शिल्पकलेला प्रोत्साहन दिलं, वगैरे वगैरे...आपल्या शिवबाच्या शंभरेक वर्षं आधी हे घडलं.
आणि हो, तोही शिवबासारखाच. सर्व धर्मांचा आदर करणारा. सगळ्या देवस्थानांना अनुदानं देणारा. मुस्लिम आपल्याला समजावेत म्हणून आपल्या राज्यात मुस्लिम वसाहतच वसवली त्याने. त्याचे कित्येक सरदार, अगदी अंगरक्षकही मुस्लिम होते.
कधी वाटतं, या काळाच्या प्रवाहात खोडरबराने काही खाडाखोड करावी, किंवा इकडून तिकडे बाण काढून घटनांचा क्रम बदलावा आणि रायाला जरा पुढे ओढावं. म्हणजे तिकडून रायाने आणि इकडून शिवबाने त्या आक्रमक मुस्लिम सत्तांना असा काही मार दिला असता की पळता भुई... त्यातून रायाने शिवबाला जरा शांत वेळ मिळू दिला असता. त्याच्या राज्यातलं संगीत ऐकवलं असतं, शिल्पं दाखवली असती...
इतिहास हा कुणाच्या इच्छेचा प्रश्न नसतो हे माहीत आहे मला, पण सदिच्छेने मनाचे खेळ खेळायला बंदी आहे का? राया, शिवबा, अकबर यांच्यात समान धागा दिसला म्हणून हे स्वप्न पाहिलं.
मला तर शिवाजी आणि गांधीजी हे दोघंही जवळचे वाटतात. एक युद्धवीर आणि दुसरे अहिंसावीर. वरकरणी विरोध वाटेल, पण भव्य स्वप्न तेच. त्यासाठी जिवाची पर्वा न करता झोकून देणं, सर्व तसंच.
शिवाजीच्या काळातल्या लढायांचं आजच्या जीवनात स्थान नाही, पण गांधीजींचा मार्ग मात्र आजही अनुसरता येईल. मग असं करू या का, शिवबाचं स्वप्न आणि गांधीजींचा मार्ग एकत्र केला तर? पण त्यात हवी त्या दोघांची सर्वसामान्यांविषयीची कळकळ, त्यात हवी आयुष्यभराची अखंड तपश्चर्या, त्याला हवी पुढचं पाहणारी दृष्टी. वा...वा...मी आणखी एक स्वप्न पाहू लागलो रे, शिवबादादा...हसतोस काय मिशीत? तूच नाही का शिकवलंस मला स्वप्नं पाहायला?
(अनिल अवचट यांच्या समकालीन प्रकाशित ‘जवळचे' या पुस्तकातून साभार)
