आम्ही कोण?
काय सांगता?  

आपल्याच पहिल्यावहिल्या पुस्तकाची प्रतही या लेखिकेला घेता आली नव्हती..

  • प्रीति छत्रे
  • 02.05.25
  • वाचनवेळ 3 मि.
  • Share on Tweeter
  • Share on Whatsapp
  • Share on Facebook
salma

रजथी समसुदीन हे नाव आपल्याकडे कुणाला माहिती असायचं कारण नाही.

रजथी समसुदीन या तामिळ लेखिका आहेत. ‘सलमा’ या टोपणनावाने त्या लिहितात. लेखकांनी टोपणनाव घेणं यात काही फार नवल नाही. पण सलमा यांना टोपणनाव घ्यावं लागलं याचं कारण इतकं सहजसोपं नव्हतं.

तामिळनाडूतल्या ग्रामीण भागात एका कर्मठ मुसलमान कुटुंबात त्या वाढल्या. त्यांच्या घरात मुलगी वयात आली की घरातल्या पुरुषांशिवाय इतर कुणाचीही तिच्यावर नजर पडू नये म्हणून तिचं घराबाहेर पडणं बंद केलं जात असे. अगदी तिचं शाळाशिक्षणही अर्धवट बंद होत असे. तिचं लग्न झालं की मगच तिची त्यातून सुटका होत असे. सलमा यांच्यावरही ती वेळ आलीच. त्यांना घराबाहेर पडण्यास बंदी घातली गेली. त्यांनी विरोध करून पाहिला. पण उपयोग झाला नाही. पुढे ८-९ वर्षं त्यांनी अशी घराच्या चार भिंतींतच काढली.

त्यांना लहानपणापासून वाचन, कविता यांची आवड होती. घरातल्या घरात त्यांनी मिळेल त्या कागदावर, जमेल तशा कविता करायला सुरुवात केली. ते कागद घरच्या मोठ्यांच्या दृष्टीस पडू नयेत म्हणून त्या कागदांच्या बारीक घड्या घालून लपवून ठेवत असत. काही काळाने त्यांच्या आईला हे समजलं. आईने या बाबतीत मुलीच्या मागे उभं राहण्याचं ठरवलं आणि लपूनछपून ते कागद कुणा ओळखीच्यांकडे सोपवले. त्यांनी आणखी कुणा जाणकाराला ते दाखवले. त्या कविता पठडीबाहेरच्या, वेगळ्या असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. करता करता त्या कवितांचा एक संग्रह प्रकाशित करण्याचं ठरलं.

दरम्यान इकडे सलमा यांचं लग्न झालं. त्यांच्या सासरी सुद्धा तसं कर्मठ वातावरणच होतं. त्यांनी लेखन करणं सासरच्यांना अजिबात मंजूर नव्हतं. स्वतःच्याच कवितासंग्रहाच्या प्रकाशनाला जाण्यासाठी त्यांना नाना खटपटी कराव्या लागल्या. गर्भाशयाचं दुखणं आहे असं त्यांनी घरी खोटंच सांगितलं. उपचारांसाठी चेन्नईला जाण्याची घरून परवानगी घेतली. आणि आईसोबत त्या चेन्नईला गेल्या.

पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाच्या जागी त्यांनी आपली ओळख जाहीर केली नाही. प्रेक्षकांमध्ये मागे कुठेतरी बसून कार्यक्रम पाहिला. आपल्याच पहिल्यावहिल्या पुस्तकाची नवीकोरी प्रतही त्यांना घेता आली नाही. त्या गुपचूप घरी निघून गेल्या.

त्यांची खरी ओळख उघड झाली तेव्हा त्यांना आधी घरच्यांचा प्रचंड विरोध सहन करावा लागला. पुढे हा विरोध मावळला. त्या स्थानिक राजकारणात उतरल्या. गावच्या सरपंच झाल्या.

सलमा यांनी लघुकथा, कविता, कादंबरी असं बरंच लेखन केलं आहे. त्यांच्या लेखनाला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. देशा-परदेशांत त्यांच्या साहित्यावर परिसंवाद आयोजित केले गेले आहेत. त्यांच्या आयुष्यावर आधारित ‘सलमा’ हा इंग्रजी लघुपट २०१६ साली सनडान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सादर झाला. पुढे या माहितीपटालाही आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले.

पारंपरिक घरातल्या दमनकारी चालीरीतींविरुद्ध सलमा यांनी बंडखोरी केली नसती तर रजथी समसुदीन हे नाव आपल्याकडे कुणाला माहिती होण्याचं काही कारण नव्हतं.. 

प्रीति छत्रे | preeti.chhatre22@gmail.com

प्रीति छत्रे 'युनिक फीचर्स पोर्टल'च्या सहसंपादक आहेत. अनुभवपर ललितलेखन आणि अनुवाद यात त्यांना विशेष रस आहे.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 1

अस्मिता फडके02.05.25
छान लेख
See More

Select search criteria first for better results