“हा संदेश मी ‘जनहितार्थ’ जारी करते आहे. ज्यांना इतरांचे वजन वाढल्याची चिंता वाटते आणि जे भेटताक्षणी इतरांना वजन कमी करण्याविषयी सल्ले द्यायला सुरुवात करतात अशा सर्वांसाठी दृक्संदेश. वजनाविषयीचा तुमचा फुकटचा सल्ला ना तुम्हाला शोभा देतो, ना तुम्ही ज्यांना हिणवता आहात त्यांना. तुझं वजन वाढलं आहे याविषयी तुम्ही त्यांना भेटताक्षणी सुनावता, त्यांना लगेच वेगवेगळे उपाय सुचवता म्हणजे जणू काही तुम्ही त्यांना ‘रिॲलिटी चेक’ देता आहात असं तुम्हाला वाटतं ते मला ठाऊक आहे. प्रत्यक्षात मात्र असे अनाहूत सल्ले देऊन तुम्ही फक्त स्वत:ची इज्जत घालवत असता हे कृपा करून लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगते, त्याऐवजी संभाषणाला चांगली सुरुवात कशी करायची ते. तू चहा घेणार का? बागेतले ताजे आंबे आले आहेत, खातोस का? तुझा गाण्याचा क्लास कसा चालू आहे?-असे काही प्रश्न चांगल्या, सुसंस्कृत संवादाची सुरुवात असू शकतात. त्याऐवजी भेटताक्षणी समोरच्या व्यक्तीच्या शरीरासंबंधी टोचून बोलणं बंद करा आणि स्वत:चा अपमान करून घेऊ नका.”
प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी यूट्यूबवर प्रसारित केलेला हा छोटेखानी व्हिडिओ. तीन कारणांनी तो महत्त्वाचा आहे. म्हणून तिथूनच लेखाची सुरुवात केली. समकालीन भारतातल्या आणि जगातल्याही मध्यमवर्गाचे स्वत:च्या शरीराशी, त्याच्या भरण-पोषणाशी आणि म्हणून अन्नाशी असलेले नाते कमालीचे विरोधाभासी बनले आहे. या विरोधाभासांची चर्चा पुढे करूच. परंतु त्या विरोधाभासी शारीर अस्तित्वाच्या परिणामी वर उल्लेखलेले संवाद सदासर्वकाळ सातत्याने सर्व गाठीभेटींमध्ये मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये घडत असतात, ही बाब आपल्या-तुपल्यांसाठी नवी नाही. या चर्चांमधून हडकुळी माणसंही सुटत नाहीत, तर मग वजन वाढलेल्यांची बातच सोडा. ‘बॉडी शेमिंग’ नावाच्या ‘पोलिटिकली करेक्ट’ शब्दाशी आपला परिचयही झालेला नसल्याने भेटल्याक्षणी समोरच्याच्या शरीराविषयीच्या टिप्पणीतूनच हल्ली आपल्या कौटुंबिक भेटीगाठी सुरू होतात आणि त्या निरनिराळ्या डाएटविषयक चर्चांच्या गुऱ्हाळात डुंबून राहतात. याविषयीची झणझणीत जाणीव या व्हिडिओत ऋजुता दिवेकरांनी करून दिली. त्यामुळे या ना त्या प्रकारे ‘बॉडी शेमिंग’ला सामोरे गेलेल्या सर्वांना थोडे बरे वाटेल यात शंका नाही.
दुसरे म्हणजे या संदेशात कोणताही आडपडदा नाही. मध्यमवर्गीय कुटुंबातले पुरुषसत्ताक व्यवस्थेतून निर्माण होणारे सत्तासंबंध लक्षात घेतले तर ‘बॉडी शेमिंग’मध्ये सहसा कोणाचा बळी जातो ही बाब सहजच स्पष्ट व्हावी. कुटुंबाची रचना रक्ताच्या नात्यातून येणाऱ्या जिव्हाळ्यावर आधारलेली असते असा आपला (गैर)समज असल्याने शरीराविषयीचे सल्ले, टिप्पण्या आणि बोचण्या हसत-खेळतच झेलल्या जाव्यात, अशी अपेक्षा या रचनेत आपोआप तयार होते. त्या पार्श्वभूमीवर ऋजुता दिवेकरांसारख्या कोणी ‘सेलिब्रिटी’ने आपल्या वतीने आपल्या आप्त-कुटुंबीयांना ठणकावल्याचे समाधान काहींना किंवा बऱ्याचजणांना मिळावे.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वजनाविषयी दुसऱ्यांना टोमणे न मारण्याचा सल्ला एका प्रथितयश आहारतज्ज्ञाकडून आला आहे. तोही अशा तशा, गल्लीबोळातल्या आहारतज्ज्ञाकडून नव्हे. ज्यांनी करीना कपूरची ‘झीरो फिगर’ घडवायला मदत केली आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली बॉलिवूडमधील अतिरथी-महारथींनी आणि मुंबईतल्या अभिजनांनी आपली हवीहवीशी काया घडवली त्या आहारतज्ज्ञाने दिलेला हा संदेश आहे. म्हणून त्याचे महत्त्व आगळेच. आणि त्या संदेशाविषयी, ऋजुता दिवेकरांच्या आहारविषयक दृष्टिकोनाविषयी उत्सुकता वाढवणारे.
परंतु ऋजुता दिवेकर या काही कोणी अप्रसिद्ध व्यक्ती नाहीत. विशेषत: समाजमाध्यमांवर त्यांचा दांडगा वावर असल्याने (तसेच भारतीय मध्यमवर्गाला डाएटचे वेड लागलेले असल्याने) त्यांच्याविषयी कुठे ना कुठे सतत काही तरी छापून येत असते, बोलले जात असते. त्या स्वत:देखील नवनवीन पुस्तके लिहीत असतात, आपल्या कामाला साजेसे भरभक्कम शुल्क आकारून सुदृढ जीवनाविषयीचे प्रत्यक्ष सल्ले देत असतात. हे शुल्क न परवडणाऱ्या आम जनतेसाठी त्या समाजमाध्यमांवर सतत सक्रिय असतात. त्यांच्या मुलाखती, त्यांच्याविषयीच्या बातम्या, त्यांच्यावरील टीका, असा सगळा माहोल सतत जिवंत असतो. त्यामुळे ऋजुता दिवेकर नावाच्या मराठी बाई केवळ महाराष्ट्रात आणि भारतातच नव्हे, तर जगात सर्वत्र जिथे जिथे भारतीय आहेत (आणि भारतीय तर जगाच्या कानाकोपऱ्यांत सर्वत्र आहेतच!) तिथे तिथे सर्वत्र प्रसिद्ध आणि दृश्यमान आहेत.
त्यांची ही दृश्यमानता आकर्षक बनते ती मात्र निव्वळ त्यांच्या डाएटविषयीच्या सल्ल्यांमधून नव्हे. किंबहुना, एक आहारतज्ज्ञ म्हणून त्यांच्याकडून भारतीय मध्यमवर्गाला अपेक्षित असणारे सल्ले त्या देत नाहीत म्हणूनच त्यांची सध्याची दृश्यमानता आकर्षक बनते. मधुमेहींनी आंबे खायला हरकत नाही, भाताने वजन वाढत नाही, गूळ आणि मधाइतकीच साखरही चांगली, सुदृढ आणि मजेत जगायचं असेल तर वजनाचा काटा फेकून द्या, अशी त्यांची चमकदार विधाने समाजमाध्यमांवर नेहमी चर्चिली जातात, वादग्रस्त बनतात. या वादांचे मुख्य कारण म्हणजे ‘डाएटग्रस्त’ मध्यमवर्गाचे अन्नाविषयीचे आणि अन्नातून होणाऱ्या भरणपोषणाविषयीचे एकारलेले आकलन. हे आकलन मध्यमवर्गात केवळ ‘डाएट’विषयी किंवा स्वत:च्या शारीरप्रतिमेविषयीचेच असते असे नव्हे. मध्यमवर्गाच्या एकंदर समाजव्यवहारांविषयीच्या, सामाजिकतेविषयीच्या आणि नैतिक-आध्यात्मिक भूमिकांविषयीच्यादेखील एकारलेपणाशी त्याचे नाते आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक स्थानातून मध्यमवर्ग नेहमीच स्वमग्न, स्वत:त मशगुल राहणारा सामाजिक गट म्हणून वावरत असतो. जागतिकीकरणानंतरच्या उन्मादी ग्राहकवादी विचारविश्वाचा भाग होताना मध्यमवर्गाची स्वमग्नता आणखी गडद बनते आणि त्याच्या जीवनव्यवहारात अनेक लहान-मोठे विरोधाभासही तयार होतात. याच विरोधाभासांचा एक आविष्कार म्हणजे खात्यापित्या मध्यमवर्गाची ‘डाएटग्रस्त’ता. स्वत:च्या शरीरात आणि शारीरप्रतिमांमध्ये त्याचे गुंतून पडणे आणि दीक्षित विरुद्ध दिवेकर अशा दोन गटांत मराठी मध्यमवर्गाची जणू काही विभागणी झाल्याच्या आविर्भावात समाजमाध्यमांवर हिरीरीने वाद-चर्चा घडवणे.
या बाबतीत स्वत: ऋजुता दिवेकर यांचे वेगळेपण मात्र उठून दिसते. करीना कपूरची आहारतज्ज्ञ, असे त्यांना मिळालेले बिरूद अभिमानाने मिरवताना आणि बॉलिवूड सेलिब्रिटींची आहारतज्ज्ञ म्हणून त्यांना मिळालेल्या पंचतारांकित वलयाचा पुरेपूर फायदा उठवतानाच त्या आपल्या लिहिण्या-बोलण्यातून मराठी मध्यमवर्गाला त्याच्या स्वमग्नतेची आणि त्याच्या जगण्यातल्या विरोधाभासांची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करताहेत असे दिसते. याविषयी, जरा जास्तच गंभीर उपमा वापरायची झाली, तर गांधी ज्याला परंपरेच्या आत वावरून तिच्यात क्रांती घडवण्याचे प्रयत्न म्हणतात, तसा काहीसा प्रकार ऋजुता जाणीवपूर्वक करताना दिसतात. अन्नाविषयीच्या मध्यमवर्गाच्या एकारलेल्या आणि विरोधाभासी विचारविश्वात आहारतज्ज्ञ म्हणून भरभक्कम स्थान मिळवतानाच या स्थानातून मिळालेला आत्मविश्वास वापरून मध्यमवर्गाला स्वत:च्या आत दडलेल्या विरोधाभासांची जाणीव करून देण्याचे काम (मर्यादित अर्थाने का होईना) ऋजुता यांनी आरंभलेले दिसते. या कामात त्यांनी ‘डाएटिंग’ नावाच्या अमानुष व्यापाराचा धागा अन्नग्रहणातील सामाजिकतेशी, सांस्कृतिकतेशी, नैतिकतेशी आणि प्रस्थापित राजकीय अर्थव्यवस्थेशी जोडण्याचे प्रयत्न केले आहेत.
आणि म्हणूनच ऋजुता दिवेकर आणि अभिजित बॅनर्जी यांचे एक अपूर्व योगायोगाचे म्हणू यात असे नाते जोडावेसे वाटते. अन्नाविषयीच्या त्यांच्या लिखाणाचा एकत्रित, समग्र विचार करावासा वाटतो. ऋजुता दिवेकर या आहारतज्ज्ञ, तर अभिजित बॅनर्जी हे प्रख्यात, नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ. बहुतेक मराठी मध्यमवर्गाला ऋजुता दिवेकरांचे फटकळ सल्ले जसे आवडत नाहीत तसेच अभिजित बॅनर्जींचे अर्थशास्त्रदेखील. अर्थात मराठी मध्यमवर्गाला त्यांचे (नोबेलमुळे) नाव माहीत असले तरी त्यांचे अर्थशास्त्र आणि ज्या कारणांमुळे त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले ते त्यांचे अर्थशास्त्रीय प्रयोग याविषयी हा वर्ग अनभिज्ञ असण्याचीच शक्यता जास्त. असो. अभिजित बॅनर्जी आणि ऋजुता दिवेकर यांचे शहाणे (wise या अर्थाने) विचारविश्व एकत्रित विचारात घेण्याचे कारण म्हणजे अभिजित बॅनर्जी यांनी लिहिलेली पाकशास्त्रासंबंधीची दोन पुस्तके. खरे म्हणजे निव्वळ पाकशास्त्राविषयीची पुस्तके म्हणून त्यांचा विचार करणे चुकीचे ठरावे. कारण अन्नाविषयीची, अन्नग्रहणाविषयीची आणि अन्नाच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक संदर्भांविषयीची एक समग्र धारणा, एक समग्र रसग्रहण त्यांच्या पुस्तकांमध्ये आविष्कारित होते. वाचनाचा, भोजनाचा आणि सामाजिकतेच्या चौकटीतच अपरिहार्यपणे जे बहरते अशा समृद्ध सांस्कृतिक जीवनाचा आनंद त्यांच्या पुस्तकांच्या वाचनातून मिळतो.
गेली काही वर्षे अभिजित बॅनजी ‘फुडोनॉमिक्स’ नावाचा एक स्तंभ नियमितपणे टाइम्स ऑफ इंडियात लिहीत आहेत. या सदरात ते वाचकांसाठी त्यांनी स्वत: रसिकतेने आणि निगुतीने रांधलेल्या एक किंवा दोन पाककृती सादर करतात. निवडक, बऱ्याचदा शेलक्या (पण त्या न मिळाल्यास कोणते पर्यायी घटक वापरता येतील याचा उल्लेखही प्रा. बॅनर्जी आवर्जून करतात.) वस्तूंच्या अचूक मोजमापाच्या आधारे स्वत:ला आणि आप्त-मित्र-कुटुंबीयांना रुचणाऱ्या, सुखावणाऱ्या पाककृती कशा रांधाव्यात आणि वाढाव्यात याचे एक दिलखुलास, तजेलदार वर्णन त्यांच्या स्तंभलेखनात आणि पुस्तकांमध्येही येते. या स्तंभलेखनाच्या निमित्ताने त्यांनी अलीकडे दोन पुस्तके लिहिली. एकाचे नाव ‘छौंक’ (हिंदीतला तडका किंवा आपली मराठी फोडणी.), दुसऱ्याचे नाव ‘कुकिंग टु सेव्ह युवर लाइफ’. करोना महासाथीच्या काळात सर्वजण घरातच अडकून पडले असतानाच्या काळातील स्वयंपाकघरातील त्यांचे प्रयोग या पुस्तकात त्यांनी समाविष्ट केले आहेत. करोनाच्या काळात (बऱ्याचदा नाइलाजाने) अनेक पुरुषांनी आपले लक्ष घरकामाकडे वळवले आणि लगेचच आपण जणू काही महान क्रांतिकारक काम करतो आहे असे स्वत:च स्वत:ला पटवून वर्तमानपत्रांत स्वत:चे घरकाम करतानाचे फोटोबिटो छापून आणले. (या फोटोंचे आणि घरकामातल्या त्यांच्या सहभागाचे करोनानंतर काय झाले हे त्या त्या घरातील स्त्रियांनाच विचारायला हवे, ही बाब अलाहिदा!) मात्र, या पार्श्वभूमीवर एक (भारतीय) पुरुष आणि तोही नोबेल पारितोषिक विजेता शास्त्रज्ञ वगैरे स्वयंपाकातल्या आपल्या प्रयोगांविषयीचे एक दिमाखदार आणि दिलखुलास पुस्तक लिहितो ही बाब अचंब्याचीच म्हणायला हवी. अभिजित बॅनर्जींची ही दोन्ही पुस्तके खवय्यांनी आणि खिलवणाऱ्यांनीही आवर्जून वाचायला हवीत अशीच आहेत, इतक्या नजाकतीने, बारकाईने त्यांनी ती लिहिली आहेत.
मात्र, आपला मुद्दा त्यांच्या पाककृतींपुरता, त्याविषयीच्या अचंब्यापुरता नाही. फुडोनॉमिक्सची चर्चा करताना प्रा. बॅनर्जी त्यांच्या अर्थतज्ज्ञाच्या भूमिकेतून अर्थकारणाच्या, राजकीय अर्थव्यवस्थेविषयीच्या चौकटीत सकस, सुग्रास आणि भरणपोषण करणाऱ्या अन्नग्रहणाचा विचार मांडताहेत. अर्थकारण-समाजकारण हा त्यांच्या विचारांचा आरंभबिंदू आहे. तिकडून ते तब्येतीने खाण्या-खिलवण्याच्या सुदृढ दृष्टिकोनापर्यंत येतात. एक आहारतज्ज्ञ म्हणून ऋजुता दिवेकरांनीही बरीच ‘बेस्टसेलर’ पुस्तके लिहिली आहेत. या पुस्तकांचा आरंभबिंदू ‘वेटलॉस’ हा मध्यमवर्गात सर्वदूर पसरलेला अग्रक्रम आहे. ऋजुता दिवेकर त्याला द ग्रेट इंडियन वेटलॉस तमाशा म्हणतात. परंतु या आरंभबिंदूपासून सुरुवात करून त्यांनी अन्नग्रहण नावाच्या क्रियेभोवतीची सामाजिकता, संस्कृती आणि अर्थकारण त्यांच्या वाचकांसाठी, दर्शकांसाठी पुढे मांडण्याचा, त्यांच्या पचनी पाडण्याचा प्रयत्न केला आहे. अगदी अलीकडे त्यांनी लिहिलेल्या ‘मिताहार’ या पुस्तकात हा प्रयत्न ठळकपणे साकारलेला दिसेल. अभिजित बॅनर्जी हे अर्थतज्ज्ञ आणि ऋजुता दिवेकर या आहारतज्ज्ञ यांच्या नात्याचा योगायोग जुळून येतो तो या पार्श्वभूमीवर. या दोन लेखकांचे आरंभबिंदू निरनिराळे असले तरी अन्न नावाच्या पूर्णब्रह्माची एक समकालीन, आगळी मांडणी त्यांच्या लेखनात व्यक्त होते आणि त्यांचे सूर जुळतात.
निव्वळ आहारतज्ज्ञांच्या बाबतीत बोलायचे झाले, तर आपल्या देशी परंपरेतदेखील अन्नग्रहणाविषयीची एक समग्र मांडणी कळकळीने करू पाहणाऱ्या ऋजुता दिवेकर या काही एकट्या किंवा पहिल्या नाहीत. चटकन आठवणारी नावे म्हणजे मालती कारवारकर आणि वसुमती धुरू. पाकशास्त्रासंबंधीची पुस्तके लिहितानाच खाद्यसंस्कृती कशी व का साकारते, अन्नाविषयीच्या निव्वळ श्रीमंती चोचल्यांमधूनच भरणपोषण होते असे नव्हे, तर कमीत कमी खर्चात भारतातील गरिबांनादेखील सकस अन्न मिळवण्यासाठी काय करता येईल, खाद्यसंस्कृतीच्या विकासात स्त्रियांच्या श्रमांचा कोणता व किती वाटा असतो याविषयीची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष चर्चा, टिप्पणी या काही स्त्री लेखिकांनी केली. प्रा. बॅनर्जींचा दाखला वापरायचा ठरवला तर त्यांच्याप्रमाणेच आपल्या मराठी (अभिजित बॅनर्जी हेदेखील अर्धे मराठीच. त्यांची आई प्रा. निर्मला बॅनर्जी याही प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ होत्या. त्यांच्या आईचा मराठी वारसा त्यांच्या अन्नविचारात ते अभिमानाने मिरवतात.) शास्त्रज्ञ डॉ. कमला सोहनींचे नावही आदराने घ्यावे लागेल. त्यांच्या भगिनी आणि प्रख्यात साहित्यिक दुर्गा भागवत यांनीही खाद्यसंस्कृतीशी संलग्न समाजकारणासंबंधी महत्त्वाचे विचार मांडले. तिकडे परदेशात प्रसिद्ध शेफ जेमी ऑलिव्हरसारख्या काहींनी ब्रिटनमधील शालेय मुलांच्या पोषण आहारासंबंधीची मोहीम तळमळीने अनेक वर्षे चालवली.
आताही जगभरातील अनेक ‘मिशेलिन स्टार’ मिळवणारे पाकतज्ज्ञ, स्थानिक पर्यावरणस्नेही आणि सावकाश व चवीचवीने रांधलेल्या पाककृतींचा पुरस्कार आपापल्या अतिश्रीमंत, मध्यमवर्गीयांना प्रवेश दुरापास्त असणाऱ्या रेस्टॉरंट्समध्ये करत आहेत. मात्र, अशा प्रकारचे पुरस्कार म्हणजे कधी कधी ‘गांधींना गरीब ठेवण्यासाठी बिर्लांना खर्च कराव्या लागणाऱ्या पैशां’सारखे वाटतात. त्याऐवजी ऋजुता आणि अभिजित हे दोघेही आपापल्या स्वतंत्र शैलीत आणि स्वतंत्र विचारचौकटीत अन्नग्रहणाभोवती निर्माण झालेल्या मध्यमवर्गीय विरोधाभासांचे सूचन आणि निराकरण करण्याचा प्रयत्न करताहेत. त्या दोघांची पुस्तके एकत्र वाचताना किती तरी एकसारखे युक्तिवाद, एकसारखी उदाहरणे समोर येतात आणि त्यातून त्यांचे एक एकत्रित चर्चाविश्व उभे राहते.
(संपूर्ण लेख वाचा, यंदाच्या अनुभव मासिकाच्या दिवाळी अंकात..)
अंक पुढील संकेतस्थळांवर उपलब्ध आहे-
१. इंस्टामोजो
२. बुकगंगा
३. ॲमेझॉन
राजेश्वरी देशपांडे
राजेश्वरी देशपांडे या राजकीय व सामाजिक घडामोडींच्या विश्लेषक असून राज्यशास्त्राच्या प्राध्यापक आहेत.
