झुरळ जनता पार्टी (झु.ज.पा.)
जाहीरनामा
“टिकून राहा, खा, फोफावा आणि सत्ता घ्या!”
प्रिय मानव बांधवांनो, नमस्कार! आम्ही झुरळ जनता पार्टीचे अध्यक्ष, महासचिव, कोषाध्यक्ष आणि सर्व कार्यकर्ते (एकत्र मिळून सुमारे ३० लाख) तुम्हाला अभिवादन करतो.
तुम्ही आम्हाला “शीsss!” म्हणता, चप्पल उगारता, “हाण” म्हणजे हिट फवारता, तरीही आम्ही तुमच्या स्वयंपाकघरात, फ्रिजच्या मागे, बाथरूमच्या कोपऱ्यात आणि सत्तेच्या खुर्चीखाली सहज पोहोचतो. हेच आमचे राजकारण!
तुम्ही आम्हाला घाणेरडे म्हणता? हसू नका. आम्ही निसर्गाचे खरे स्वच्छता कर्मचारी आहोत. सडलेला कचरा, मृत प्राणी, भ्रष्टाचाराचे कागद, खोट्या वचनांची पाकिटं — सगळं खाऊन मातीला पोषक बनवतो. तुम्ही मात्र भ्रष्टाचार खाल्ल्यानंतरही फक्त “पुढच्या वेळी” म्हणून पुन्हा त्याच कचऱ्यात बसता. आम्ही डिकम्पोजर, तुम्ही रिकम्पोजर!
विकिरण प्रतिकारशक्ती आमची जगप्रसिद्ध आहे. अणुबॉम्ब पडला तरी आम्ही एक लाख रॅड सहन करून दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा फुटपाथवर “मिटींग” घेतो. तुम्ही? एखाद्या स्कॅमचा एक हजार रॅडही सहन करू शकत नाही, लगेच “मला काहीच माहित नाही” म्हणून बाहेर पडता.
हेही वाचा - कॉक्रोच जनता पार्टी; 'झुरळां'ची पार्टी व्हायरल कशी झाली?
अहो, आमचा शिरच्छेद केला तरी आम्ही काही दिवस चालतो. तुम्ही एक ट्वीट, एक ईडी नोटीस आली की “मला हार्ट अटॅक आला” म्हणून हॉस्पिटलमध्ये लपता. कोण टफ? आम्ही की तुम्ही? टिकाऊपणा ही आमची मुख्य निवडणूक घोषणा.
आम्ही झुरळं एक महिना उपाशी राहू शकतो. तुम्ही? सत्तेवर नसाल तर तीन दिवसात पक्ष बदलता. आम्ही पाण्यात ४० मिनिटांपर्यंत राहू शकतो. तुम्ही मात्र एखाद्या घोटाळ्यात बुडालात की लगेच “मी निर्दोष” म्हणत पुढच्या पक्षात पोहत जाता. आम्ही फटीतून २.५ मिलिमीटर उंचीवर संकुचित होऊन पळतो. तुमचे नेते? ६ फूट उंचीचे असूनही भ्रष्टाचाराच्या ६ फूट भोवऱ्यात अडकून बसतात!
आम्ही झुरळे प्रोटीन सम्राट आहोत. १०० ग्रॅममध्ये ६५% प्रोटीन. तुम्ही मात्र ६५% भ्रष्टाचार, २०% खोटे वचन आणि १५% “जनतेची सेवा” या मिश्रणाने बनलेले आहात. चीन-थायलंडमध्ये आम्हाला तळून खातात. तुमचे काय? तुम्ही फक्त “झुरळ्या” म्हणून कोणाकोणाला हिणवता, आणि “साहेब नमो नमो” म्हणून चापलुशी करत राज्यसभेचे सभासदत्व मिळायची आस धरून बसता!
आमचे औषधी गुण तर अफलातून आहेत. होमिओपॅथीमध्ये ब्लाटा ओरिएंटालिस Blatta orientalis हे भारतीय झुरळापासून बनलेले औषध दमा, ब्राँकायटिस बरे करतात. तुमचे नेते? त्यांचे भाषण ऐकलं की सामान्य माणसाला धाप लागते. आमचा अर्क जखमा भरतो, तुमचे आश्वासन जखमा करतात. आम्ही कॅन्सर संशोधनात मदत करतो, तुम्ही मात्र लोकांना “कॅन्सरी” जगणे देऊन हैराण करून टाकता.
रोबो इन्स्पिरेशन आमच्याकडून आले आहे महाराजा! हार्वर्ड-बर्कलीत CRAM रोबो बनवला गेला तो आमच्या हालचालींवरून. तो झुरळगुणी रोबो ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांना शोधतो. तुमचे नेते? भ्रष्टाचाराच्या ढिगाऱ्यात अडकलेले लोक सोडवण्याऐवजी शोधतात आणि स्वतःचा ढिगारा वाढवतात तरीही “मी तर बाहेर आहे” म्हणतात.
हेही वाचा - ‘कॉक्रोच जनता पार्टी’ – जेन झी म्हणतेय ग्राऊंडवर उतरा
प्रिय मानवांनो,
तुम्ही आम्हाला मारता, पण आम्ही कधीही तुम्हाला “मानव” म्हणून हिणवत नाही. उलट, आम्ही तुम्हाला शिकवतो — कठीण परिस्थितीत टिकून राहा, कचरा खाऊनही उपयोगी पडा, आणि फटीतूनही सत्ता मिळवा.
आम्हाला खात्री आहे की तुम्ही आम्हाला मोठ्या प्रमाणात निवडून आणणार कारण तुमच्यात आमचे दोन गुण मोठ्या प्रमाणात आहेत.
१) आम्ही प्रकाशापासून लांब जातो तर तुम्ही ज्ञानप्रकाशापासून दूर जात आहात आणि
२) आम्ही अस्वच्छतेचे चाहते आहोत तर तुम्हीही घर वगळता जगभर प्रदूषण करता.
आमचे निवडणूक चिन्ह आहे — चप्पल (कारण तुम्ही जेव्हा मारता तेव्हा आम्ही पळतो, पण पुन्हा येतो).
आमचे घोषवाक्य आहे—
अब की बार झुरळेच जिंकणार!
“एक झुरळ, दोन झुरळ, प्रत्येक झुरळ जग रुळव!”
हेही वाचा - जेन-झी ची कॉक्रोचगिरी काय सांगतेय?
येत्या निवडणुकीत आम्हाला वोट द्या. आम्ही तुमच्या घरात, कार्यालयात, विधानसभेत आणि संसदेत सहज घुसू. स्वच्छता ठेवा, आम्हाला मारू नका. कारण.. आम्ही कचरा खाऊन पर्यावरण वाचवतो, आमचे विरोधक कचरा निर्माण करून देश बिघडवतात!
झुरळाचा महिमा वर्णावा किती...
झुरळ.जनता.पार्टी.
— टिकणारी, खाणारी, फोफावणारी आणि जिंकणारी!
जय झुरळ! जय जनता!!
