राज कपूरच्या श्री ४२० सिनेमातलं ‘मेरा जूता है जापानी..’ हे गाणं आठवा. जुने विचार झटकून भारत नव्या जगाचा स्वीकार करायला तयार आहे, असा या गाण्यामागचा अर्थ. गाणं येऊन सत्तर वर्षांचा काळ लोटला. दरम्यानच्या काळात जेन एक्स आणि मिलेनियल या दोन पिढ्या घडून गेल्या. आत्ताच काळ आहे जेन-झी मंडळींचा. या पिढीच्या अंगावर गाण्यात सांगितल्याप्रमाणं विदेशी फॅशन ब्रॅण्ड्सचे कपडे आहेत, पण या पिढीने कोणत्या विचारांचा स्वीकार केलाय, ही पिढी ‘फिर भी दिल है हिन्दुस्तानी’ आहे का याबाबत आधीच्या पिढीला प्रचंड उत्सुकता आहे. सोशल मीडियावर सतत ॲक्टिव्ह असणारी, माहितीचा भडिमार सहन करणारी ही पिढी भारताच्या राजकारणाकडे कसं बघते, तिला कोणते बदल अपेक्षित आहेत, की या सगळ्या झंझटीतून काढता पाय घेण्याकडे त्यांचा कल आहे हे जाणून घेणंदेखील तितकंचं महत्वाचं आहे.
सध्याचा भारताच्या राजकारणात सुरू असलेले आणि माध्यमांमध्ये चर्चिले जाणारे मुद्दे डोळ्यांसमोर आणा. हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरण, मूळ उद्देशापासून दूर जात चाललेल्या निवडणुका, राजकीय पक्षांची आरोप-प्रत्यारोपांची मालिका यांनीच टीव्ही आणि मोबाईलची स्क्रीन व्यापलेली असते. या मुद्यांसमोर समाजासमोरील खऱ्या प्रश्नांचा टिकाव लागत नाही. जेन-झीला सतावणारे शिक्षण, आरक्षण, पेपरफुटी, बेरोजगारी असे प्रश्न तर बहुतेक वेळा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी येत नाहीत. अर्थातच जेन-झीच्या मनात याबद्द्ल छुपा आक्रोश आहे. सोशल मिडीयावर तो वेळोवेळी व्यक्तदेखील होतो. सध्या भारतात कॉक्रोच जनता पार्टीचं नाव गाजतंय. देशाच्या सरन्यायाधीशांनी इंटरनेटवरील काही तरुणांची तुलना झुरळ आणि परजीवी यांच्याशी केली. याविरोधात रस्त्यावर उतरून पारंपरिक पद्धतीने विरोध न करता त्यांनी सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टी नावाची डिजिटल चळवळ सुरू केली. अवघ्या एका आठवड्यात दोन कोटींपेक्षा जास्त तरुणांनी नोंदणी करून या चळवळीला पाठिंबा दिला. सोशल मीडियावर त्यांनी भाजप आणि काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षांना मागे टाकलं.
हेही वाचा - कॉक्रोच जनता पार्टी; 'झुरळां'ची पार्टी व्हायरल कशी झाली?
बांगलादेश, नेपाळमध्ये जेन-झी रस्त्यावर उतरली, तसं भारतात घडलं नाही. कारण सोशल मिडीयावर ही पिढी जितकी बेधडक आहे, तितकीच ती राजकारणाबाबत सावध आहे. मनातला रोष रस्त्यावर येऊन मांडण्यापेक्षा त्याला डिजिटल माध्यमांवर वाट मोकळी करून द्यावी असं आत्ताच्या जेन झी पिढीला का वाटलं असावं?
शेजारील देशाच्या राजकीय व्यवस्थेपेक्षा भारतीय लोकशाही जशी वेगळी ठरते तसंच जेन-झीचा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोनही इतर देशांतील जेन-झीपेक्षा वेगळा आहे. त्यांच्या मनात प्रस्थापित राजकीय पक्षांबद्दल आक्षेप आहे, काही प्रमाणात अविश्वासदेखील आहे. अलीकडच्या काळातील NEET परीक्षेचे पेपर फुटणं, स्पर्धा परीक्षांमधले घोटाळे हे तरुण पाहत आहेत. पण त्यांच्या आयुष्यावर प्रत्यक्ष परिणाम करणारे मुद्दे मात्र मुख्य प्रवाहात चर्चेत येत नाहीत. त्याऐवजी मेलोडी चॉकलेट डिप्लोमसी, धार्मिक ध्रुवीकरण असेच मुद्दे चघळले जातात. मुख्य प्रवाहातील समाजमाध्यमं आणि राजकीय पक्ष तरुणांच्या प्रश्नांना व्यासपीठ नाकारतात तेव्हा कॉक्रोच जनता पार्टीसारख्या डिजिटल चळवळीतून तो आक्रोश पुढे येतो. मीम्सचा वापर, उपरोधिक विनोद आणि थेट आरोप यांचं मिश्रण त्यांच्या डिजिटल चळवळीत दिसतं. हे खरं असलं तरी थेट विरोधाऐवजी डिजिटल बंडात सहभागी होणं त्यांना सोपं वाटतं. एका अहवालानुसार, जवळपास २९ टक्के तरुण राजकारणापासून पूर्णपणे दूर राहणे पसंत करतात. धक्कादायक बाब म्हणजे, २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीत १८ वर्षे वयाच्या एकूण पात्र तरुणांपैकी केवळ ३८ टक्के तरुणांनीच मतदार म्हणून नोंदणी केली होती.
बांगलादेश आणि नेपाळप्रमाणे भारतीय जेन-झी हा काही एकसंध गट नाही. तो प्रांत, भाषा, जातीच्या आधारावर मोठ्या प्रमाणावर विभागलेला आहे. पेपरफुटी, बेरोजगारीची समस्या समान असली तरी तरुणांचे स्थानिक मुद्दे वेगळे पडतात. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर एकत्र येऊन एक मोठी सामूहिक क्रांती घडवून आणणं त्यांच्यासाठी कठीण आहे. शिवाय, आजच्या राजकीय वातावरणात कोणत्याही प्रकारच्या असहमतीला किंवा सिस्टीमविरोधी आवाजाला लगेच देशद्रोही ठरवण्याची प्रवृत्ती वाढलीये. रस्त्यावर उतरून आंदोलन केलं तर कायद्याने कारवाई होईल आणि त्यामुळे करिअर उद्ध्वस्त होईल अशी भीती या तरुणांना सतावतेय. आधीच्या पिढीतली तशी उदाहरण त्यांनी स्वतः बघितली आहेत. त्यामुळे रस्त्यावर उतरण्याऐवजी डिजिटल पडद्याआड राहून व्यक्त होणं त्यांना कधीही सुरक्षितच वाटतं.
हेही वाचा - ‘कॉक्रोच जनता पार्टी’ – जेन झी म्हणतेय ग्राऊंडवर उतरा
स्वतःचे प्रश्न मांडण्यासाठी, विरोध दर्शवण्यासाठी हे तरुण डिजिटल माध्यमांचा वापर करत असले तरी त्यामुळे जमिनीवरील राजकारण बदलू शकेल का हा खरा प्रश्न आहे. खरंतर, जेन-झी च्या मूल्यव्यवस्थेत एक अनोखा विरोधाभास आहे. एकीकडे हा तरुण जागतिक स्तरावर एक्स्पोज झालेला आहे, मॉडर्न विचारांचा आहे, पण दुसरीकडे तो सहजतेने ‘भजन जाम’ सेशन्सना हजेरी लावतो, कुटुंबातील न पटणारे दाबही सहन करतो. आत्ताची जेन-झी पिढी रिस्क मॅनेजमेंट वर विश्वास ठेवणारी आहे. करियरच्या बाबतीत ते शाळा, कॉलेज अशा पारंपरिक संस्थांवर जास्त विश्वास न ठेवता पर्यायी करियरचा विचार करून बसलेले असतात. राजकारणाच्या बाबतीत व्यवस्थेशी थेट संघर्ष न निवडता त्या व्यवस्थेतून आपला वेगळा मार्ग काढण्याकडे त्यांचा कल आहे. त्यांना सिस्टीम बदलायची किंवा तोडायची नाहीये, फक्त तिच्यात न अडकता स्वतःचं भविष्य सुरक्षित करून वेगाने पुढे कसं जाता येईल याकडे त्यांचा कल आहे. काहीजण याला काढता पाय घेण्याची सवय म्हणू शकतात पण आजच्या डिजिटलच्या काळात ऑनलाईन अॅक्टिव्हिजम करून प्रत्यक्ष आयुष्यात राजकारणापासून दूर राहण्याची सोय जेन-झीला उपलब्ध आहे. त्यामुळे कॉक्रोच जनता पार्टीसारखी आणखी अनेक आंदोलनं भविष्यात पाहायला मिळू शकतात.
वरवर पाहता आपल्याला ही डिजिटल आंदोलनं आणि चळवळी नाविन्यपूर्ण वाटत असतील, काहींना हा शुद्ध वेडेपणा आहे असं देखील वाटू शकतं, पण प्रत्यक्षात तरुण पिढी सोशल मीडियाच्या पडद्याआड स्वतःची एक वेगळी, समांतर दुनिया तयार करतेय हे वास्तव आहे. प्रस्थापित राजकीय व्यवस्थेने या प्रॅक्टिकल आणि हुशार पिढीचा मूक संताप दाबून टाकण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्याची दाखल घ्यायला हवी नाहीतर भविष्यात हा वर्ग पारंपरिक लोकशाही प्रक्रियेपासून पूर्णपणे तुटू शकतो.
मन्सूर मुल्ला
मन्सूर युनिक फीचर्समध्ये संपादकीय विभागात कार्यरत असून डिजिटल मीडिया हा त्याचा आवडीचा विषय आहे.
