नेताजी सुभाषचंद्र बोस म्हटलं की आपल्याला त्यांची आझाद हिंद फौज आठवते आणि 'तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा' हे त्यांचं आवाहन आठवतं. 'चलो दिल्ली'चा नारा देत नेताजी सुभाषचंद्र यांनी आपल्या हजारो शूर सैनिकांसमवेत सिंगापूरहून कूच केलं होतं. भारत ब्रिटिशांच्या पारतंत्र्यात असताना त्यांनी भारत स्वतंत्र झाल्याची घोषणा केली होती आणि ब्रिटिशांना भारतातून हुसकावून लावण्यासाठी सशस्त्र लढाई सुरू केली होती. जपानसह जर्मनी, चीन, इटली, कोरिया या देशांनी या सर्व प्रयत्नांना पाठिंबाही दिला होता.
गांधीजी देशात अहिंसक लढा देत असताना सुभाषचंद्र बोस यांनी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र युद्ध पुकारलं होतं. त्यामुळे सुभाषचंद्रांना गांधीजींचा अहिंसक मार्ग आणि त्यांचं नेतृत्व मान्य नव्हतं असं अनेकांना वाटतं. प्रत्यक्षात ते अजिबातच खरं नाही. सुभाषचंद्र हे गांधीजींपेक्षा तब्बल २८ वर्षांनी लहान होते आणि गांधीजींसाठी ते मुलासारखे होते. त्यामुळे अनेकांना वाटतं तशी त्या दोघांमध्ये नेतृत्वावरून स्पर्धा वगैरे अजिबात नव्हती. उलट गांधीजींनीच स्वतः ठराव मांडून १९३८सालच्या काँग्रेस अधिवेशनात नेताजींना काँग्रेसचं अध्यक्ष बनवलं होतं. तेव्हा सुभाषबाबू फक्त ४१ वर्षांचे होते. त्यापूर्वी १९३०मध्ये सुभाषबाबूंनी पर्यायी समांतर सरकार स्थापन करण्याची भूमिका घेतली होती. त्या मुद्यावर त्या दोघांत मतभेदही झाले होते. पण तरीही सुभाषबाबूंमधील बुद्धिमत्ता आणि समर्पणवृत्ती बघून गांधीजींनी त्यांच्यावर काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती.
हेही वाचा - भगतसिंग आणि गांधीजी
तरुण सुभाषबाबू अध्यक्ष झाल्यामुळे देशभरातील तरुणांमध्येही उत्साह संचारला होता. त्यामुळे १९३९च्या अधिवेशनात आपणच पुन्हा अध्यक्ष व्हावं, असं सुभाषबाबूंना वाटत होतं. पण सुभाषबाबूंऐवजी दुसऱ्या नेत्याला हा मान द्यावा असा विचार काँग्रेस कार्यकारिणीमध्ये होता. या गटाचं नेतृत्व सरदार पटेलांकडे होतं. त्यांनी पट्टाभी सितारामय्या यांना उभं केलं. या निवडणुकीत पट्टाभी सितारामय्या पराभूत झाले आणि सुभाषबाबू पुन्हा निवडून आले. या निवडणुकीच्या प्रक्रियेत गांधीजींचा सहभाग नव्हता, कारण तेव्हा ते एका उपोषणाला बसले होते. मात्र निवडणुकीत पट्टाभी सितारामय्या हे अहिंसावादी नेते पराभूत झाल्यामुळे 'त्यांचा पराभव म्हणजे माझा पराभव' असं गांधीजी म्हणाले. ही भूमिका सुभाष बाबूंविषयीच्या वैयक्तिक आकसातून आलेली नव्हती. पुढे काँग्रेसचे अन्य नेते आणि नेताजी यांच्यात कार्यपद्धतीवरून वाद झाले व त्यातून मार्ग निघत नाही असं पाहून नेताजींनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. या विषयातही गांधीजींचा संबंध नव्हता. तरीही गांधीजी आणि नेताजी यांचं जुळत नसल्याचं चित्र रंगवलं गेलं.
हे सगळं चालू असतानाच जगावर दुसऱ्या महायुद्धाचे ढग जमू लागले होते. इंग्रजांविरुद्ध अनेक देश एकवटू लागले होते. त्याचा फायदा घेऊन इंग्रजांविरुद्ध सैनिकी फळी उभी करण्याचा निश्चय नेताजींनी केला. आधी जर्मनीत आणि नंतर जपानमध्ये जाऊन त्यांनी आपल्या कल्पनेला आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. या मार्गाने गेलो तर इंग्रजांना भारतातून लवकर हुसकावून लावू, असं त्यांना वाटत होतं. त्या भूमिकेतूनच त्यांनी 'आझाद हिंद फौज' उभारली आणि ४ फेब्रुवारी १९४४ला इंग्रजी सैन्यावर हल्ला चढवून कोहिमा वगैरे प्रांत ताब्यात घेतला. या चढाईनंतर त्यांनी रंगून रेडिओवरून देशवासीयांशी संवाद साधला होता. या भाषणात त्यांनी गांधीजींचा उल्लेख 'राष्ट्रपिता' असा केला होता. 'भारताच्या स्वातंत्र्यासाठी चाललेल्या या पवित्र युद्धात आम्हाला तुमचे आशीर्वाद हवे आहेत', असंही ते गांधीजींना उद्देशून म्हणाले होते. एवढंच काय, सुभाषबाबूंनी आपल्या फौजेत चक्क महात्मा गांधींच्या नावाने एक ब्रिगेडही तयार केली होती. आपला मार्ग गांधीजींना मान्य नाही हे माहीत असूनही सुभाषबाबू गांधीजींचं बोट सोडायला तयार नव्हते.
हेही वाचा - आधीही झाले होते गांधीजींच्या हत्येचे प्रयत्न
सुभाषबाबूंचं जर्मनी आणि जपानला जाणं आणि त्या देशांच्या मदतीने इंग्रजांविरुद्ध सशस्त्र युद्ध करणं, हे गांधीजींना मान्य नव्हतं. देशाच्या स्वातंत्र्यासाठी परदेशांची मदत घेतली तर आपण परावलंबी बनू व एकाऐवजी अनेक देशांच्या गुलामगिरीत फसू, असं गांधीजींना वाटत होतं. ही गोष्ट त्यांनी सुभाषबाबूंनाही सांगितली होती. पण त्यांना ती पटली नव्हती.
पुढे जपानने विश्वासघात केल्याने सुभाषबाबूंची फौज एकाकी पडली आणि त्यांचं बंड अपयशी ठरलं. १९४५मध्ये एका विमान अपघातात नेताजी बेपत्ता झाले आणि देश एका क्रांतिकारकाला मुकला. गांधीजीही त्यामुळे दुःखी झाले. 'सुभाषबाबू मला मुलासारखे होते', अशी त्यांची प्रतिक्रिया होती. 'मी सुभाषचंद्रांच्या विचाराशी सहमत नसलो, तरी त्यांची देशभक्ती कुणापेक्षा तसूभरही कमी नव्हती. त्यांच्यापेक्षा प्रखर राष्ट्रभक्त कुणी नाही', असंही ते म्हणाले होते.
हेही वाचा - गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहात व्हॉईसरॉय आणि भारतीय नेत्यांना दम वाटला नव्हता
'सुभाषबाबू लढाईत जरी अपयशी ठरलेले असले तरी त्यांच्या फौजेत त्यांनी भारतातील सर्व धर्मांच्या आणि विचारांच्या लोकांना एका झेंड्याखाली जमा केलं. त्यांच्यात ऐक्याची भावना रुजवली. संकुचित आणि जातीय भावना दूर सारून साऱ्यांना एकत्र आणण्याची महान गोष्ट त्यांनी घडवून आणली,' असे गौरवोद्वार गांधीजींनी नंतर काढले होते.
विचारांची भिन्नता असली तरी एकमेकांविषयी आदर आणि प्रेम टिकवून ठेवण्याचं मोठेपण या दोघांमध्येही होतं, हे सारा घटनाक्रम बघितला की आपल्याला कळून येतं.
(समकालीन प्रकाशनाच्या 'असे होते गांधीजी' या पुस्तकातून साभार)
सुहास कुलकर्णी | uniquefeatures.portal@gmail.com
सुहास कुलकर्णी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. गेली तीन दशकं ते राजकीय प्रक्रियांचं विश्लेषण करत आले आहेत.
