अहिंसक मार्गाने लढूनच भारताने स्वातंत्र्य मिळवायला हवं, असा गांधीजींचा ठाम आग्रह होता. त्यामुळेच एखादं आंदोलन अहिंसेपासून ढळलं, तेव्हा ते मागे घेण्यासाठी गांधीजी कचरले नाहीत. पण गांधीजींपेक्षा वेगळ्या मार्गाने जाणारे स्वातंत्र्यसैनिकही देशात होते. सशस्त्र क्रांतिकारकांचा हा प्रवाह १८५७ पासून भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या पद्धतीने काम करत होता. १९२०च्या दशकात चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुखदेव थापर आणि शिवराम राजगुरू अशा अनेक क्रांतिकारकांनी ब्रिटिशांना हैराण करून सोडलं होतं.
यातील भगतसिंग-सुखदेव-राजगुरू यांना पकडून, त्यांच्यावर खटला चालवून फाशीची शिक्षा सुनावली गेली. हे तिघेही केवळ बावीस-तेवीस वर्षांचे तरुण होते व त्यांना फाशीची शिक्षा जाहीर केल्याने देशभर संताप व्यक्त केला जात होता. या तिघांना मृत्युदंड देऊ नये व शिक्षेत माफी मिळावी यासाठी गांधीजींनी प्रयत्न करावेत, असंही जिकडून तिकडून म्हटलं जात होतं.
ब्रिटिश अधिकाऱ्यांवर हल्ले करणं, गोळीबार किंवा बाँबस्फोट करणं किंवा कोणतीही हिंसक कृती करणं गांधीजींना मान्य नव्हतं. हिंसेने प्रश्न सुटत नाहीत, अशी त्यांची ठाम भूमिका होती. पण त्याचवेळेस हिंसक मार्गाने जाणाऱ्या क्रांतिकारकांच्या देशभक्तीविषयी त्यांच्या मनात अजिबात शंका नव्हती. ‘देशासाठी प्राण देणारे हिंमतवान बहादूर लोक' असं त्यांचं वर्णन गांधीजी करत. या तीन तरुणांना फाशीची शिक्षा देऊ नये, असंच त्यांनाही वाटत होतं. ही गोष्ट १९३०-३१ सालची. तेव्हा गांधीजींच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंगाचं आंदोलन चालू होतं. या अहिंसक आंदोलनात देशभरातील ६० हजार सत्याग्रही तुरुंगात शिक्षा भोगत होते. देशातही असंतोष खदखदत होता. त्या पार्श्वभूमीवर गांधीजी आणि व्हाइसरॉय आयर्विन यांच्यात करार झाला व मिठाच्या सत्याग्रहाची यशस्वी सांगता झाली. सत्याग्रहींची सुटका करण्यावरही सहमती झाली; मात्र ही सहमती फक्त अहिंसक सत्याग्रहींबाबतच झालेली होती. फाशीची शिक्षा झालेले क्रांतीकारक या निकषांत बसणारे नव्हते.
तरीही या तिघांची शिक्षा रद्द करण्याची मागणी गांधीजींनी आयर्विन यांच्याकडे केली. शिक्षा माफ केली तर देशात वातावरण अनुकूल बनेल, असंही गांधीनी सांगून बघितलं. पण आयर्विन यांनी जुमानलं नाही. आयर्विन यांचं मत वळवण्यासाठी त्यांनी एकूणात सहा वेळा प्रयत्न केले. शिवाय पत्र लिहून ते मागणी करत होतेच. मात्र '४ मार्च १९३१ मध्ये झालेल्या करारानुसार आपण याबाबत काही करू शकणार नाही', असं गांधीजींना सांगण्यात आलं.
फाशी देण्याआधी भगतसिंगच्या कुटुंबीयांनी माफीची मागणी करणारा अर्ज तयार केला होता. तो अर्ज गांधीजींना दाखवला गेला होता. मात्र त्यातली विनंतीपर भाषा गांधीजींना खटकली. (स्वत: भगतसिंगानेही माफी मागायला नकार दिला होता.) ‘भगतसिंगाच्या वीरश्रीला हा अर्ज शोभणारा नाही,' असं ते म्हणाले आणि त्यांनी स्वत: नवा अर्ज तयार केला. कुटुंबियांनी त्याला मान्यता दिल्यावर तो अर्ज स्वत:च्या शिफारसीसह गांधीजींनी आयर्विन यांच्याकडे पाठवला. पण त्याचा उपयोग झाला नाही आणि २३ मार्च १९३१ रोजी या तिघा क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली.
क्रांतिकारकांना फासावर लटकवल्याच्या घटनेनंतर गांधीजी कराचीला गेले होते. तिथे भगतसिंगाच्या समर्थकांनी काळ्या कापडाचं फूल देऊन गांधीजींचा निषेध केला. गांधीजींनी भगतसिंगाचे प्राण वाचवले नाहीत, असा त्यांचा आरोप होता. हा निषेध गांधीजींनी शांतपणे पचवला. ‘त्यांनी मला दगड न मारता फूल दिलं हा त्यांच्या मनाचा मोठेपणाच आहे', असं या निदर्शकांबद्दल गांधीजींचं म्हणणं होतं. आपण प्रयत्न केले पण त्यास यश मिळालं नाही, याची खंत त्यांच्याही मनात होती. त्यामुळे ‘हिंसा सोडा व अहिंसेची आराधना करा', असं ते क्रांतिकारक तरुणांना सतत सांगत राहिले.
गांधीजी आफ्रिकेत असताना त्यांनी झुलू बंडखोर आणि इंग्रजांमधील संघर्ष बघितला होता. या संघर्षात जखमी झालेल्यांची सेवा करण्याच्या तुकडीत गांधीजी सहभागी झाले होते. त्या संघर्षात ब्रिटिशांनी जो नरसंहार केला तो पाहून त्यांच्याविरोधात सशस्त्र संघर्ष यशस्वी होऊ शकत नाही, असं गांधीजींचं मत बनलं होतं. सैन्याच्या पाशवी शक्तीचा मुकाबला सशस्त्र संघर्षाने न करता अहिंसेच्या, शांततेच्या, हृदयपरिवर्तनाच्या मार्गानेच होऊ शकतो, याची जाणीव त्यांना तेव्हा झाली होती. त्याप्रमाणे ते आयुष्यभर चालले आणि इतरांनाही सांगत राहिले. सगळ्यांनी त्यांचं ऐकलं असं नव्हे, पण त्यांचा मार्ग अमान्य असूनही गांधीजी त्यांच्या मदतीला धावून जात राहिले.
(समकालीन प्रकाशनाच्या 'असे होते गांधीजी' या पुस्तकातून साभार)
सुहास कुलकर्णी | uniquefeatures.portal@gmail.com
सुहास कुलकर्णी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. गेली तीन दशकं ते राजकीय प्रक्रियांचं विश्लेषण करत आले आहेत.
