
३० जानेवारी १९४८ रोजी संध्याकाळी दिल्लीत बिर्ला हाऊसमध्ये सायंकालीन प्रार्थनेच्या वेळी गांधीजींची हत्या झाली. पण हा त्यांच्या हत्येचा पहिला प्रयत्न नव्हता. त्या आधीही त्यांची हत्या करण्याचे अनेक प्रयत्न झाले होते.
१९४७ मध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं ते फाळणीची जखम उराशी घेऊनच. फाळणीवेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक करार झाला होता. त्यानुसार भारताने पाकिस्तानला 55 कोटी रुपये द्यायचे होते. पण पाकिस्तानने काश्मीरमध्ये सैन्य घुसवल्यामुळे करारभंग झाल्याने भारत सरकारने ठरलेली रक्कम द्यायला नकार दिला होता. पण असं केल्यास जगात नवस्वतंत्र भारताची प्रतिमा डागाळेल, असं गांधीजींचं म्हणणं होतं. पण गांधीजींनी पाकिस्तानला 55 कोटी रुपये देण्याचा हट्ट धरणं अनेकांना आवडलं नव्हतं. त्यात नथुराम गोडसे हाही होता, आणि त्यामुळेच त्याने गांधीजींची हत्या केली, असं सांगितलं जातं.

पण प्रत्यक्षात 55 कोटींचा प्रश्न निर्माण होण्याआधीही गांधीजींवर जीवघेणे हल्ले झाले होते. स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासून त्यांना मारण्याचा सहा वेळा प्रयत्न केला गेला होता. कधी त्यांच्या गाडीवर बॉम्ब टाकण्यात आला, तर कधी प्रार्थनास्थळी बाँबस्फोट करण्यात आला. कधी ते प्रवास करत असलेली ट्रेन उलटवण्याचा कट केला गेला, तर कधी सुरा घेऊन खुनी त्यांच्यापर्यंत पोहोचला. पण या प्रयत्नांनी गांधीजी खचले नाहीत. त्यांच्या सुरक्षिततेची काळजी म्हणून सरकारने त्यांना पोलिस सुरक्षा पुरवली. गृहमंत्री या नात्याने गांधीजींची सुरक्षा ही सरदार पटेलांची जबाबदारी होती. त्यामुळे ते आग्रही होते. पण गांधीजींनी सुरक्षा नाकारली.
‘मी बिछान्यावर पडून मृत्यू पावलो तर हा माणूस महात्मा नव्हता असं समजा. पण प्रार्थनेला जाताना कुणी छातीवर गोळ्या झाडल्या, तर मरताना माझ्या मुखातून राम नाम यावं' असं गांधीजी वर्षभरापूर्वी मनूला म्हणाले होते. आणि घडलंही तसंच.
गांधीजींच्या हत्येनंतर देशाला उद्देशून केलेल्या भाषणात नेहरू म्हणाले, “आपल्या जीवनातील प्रकाश निघून गेला आहे आणि सर्वत्र अंधार पसरला आहे. पण प्रकाश निघून गेला आहे असं म्हणणंही चुकीचं ठरेल, कारण गांधीजींनी या देशाला दाखवलेल्या प्रकाशात केवळ वर्तमानच नव्हे, तर आपला भविष्यकाळही उजळून निघणार आहे.”
गांधीजींची हत्या झाल्याची बातमी जगभर पसरल्यानंतर जिकडून तिकडून शोकसंदेश येऊ लागले. युनायटेड नेशन्सने आपल्या कार्यालयावरील झेंडा अर्ध्यावर उतरवून संपूर्ण जगाच्या वतीने गांधीजींना श्रद्धापूर्वक मानवंदना दिली.
सुहास कुलकर्णी | uniquefeatures.portal@gmail.com
सुहास कुलकर्णी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. गेली तीन दशकं ते राजकीय प्रक्रियांचं विश्लेषण करत आले आहेत.