आम्ही कोण?
ले 

ओतूरचं जग

  • अनिल अवचट
  • 27.01.26
  • वाचनवेळ 19 मि.
anil awachat otur

लहानपणी मला केस वाढवून भांग पाडायची खूप हौस होती; पण त्याला वडिलांची बंदी होती. खरं तर त्यांना आमचा चमनगोटा करायची इच्छा असायची; पण डोक्यावरून वस्तरा फिरताना रडारड. त्यामुळे अस्थिर डोकं, त्यातून रक्तपात. यामुळे त्यांनी तडजोड म्हणून 'पहिलवान कट' स्वीकारला होता. संपूर्ण डोकं मशिनने भादरायचं, फक्त पुढे म्हणजे कपाळावर थोडे, उगाच झुंजूमंजू केस ठेवायचे. त्याही बाबतीत वडिलांनी बऱ्यापैकी तडजोड केलेली होती. कारण त्या वेळी मुलांचा बिस्किट कट करायची फॅशन होती. म्हणजे डोकं मशिनने भादरून टाळूवर थोड्या लांब केसांचा छोटा चौकोन ठेवायचा. अशी मुलं पळू लागली की ते केस उचलले जाऊन उडू लागत, की इतर मुलं 'बिस्किट, बिस्किट' म्हणून ओरडत. त्या वेळी कटिंग हा एक छळवादच असे. कारण कटिंग करून आलेल्या पोरांच्या मानेवर इतर पोरं 'ताजी ताजी' म्हणून चापट्या मारत. ताजी म्हणजे ताजी कटिंग. प्रत्येकाला कधी तरी या चापट्या बसत. त्यामुळे नवीन कटिंगवाल्या पोराला 'ताजी' मारण्यात इतरांना खूपच उत्साह असे. गावठी वस्तरा फिरवल्याने मान आधीच हुळहुळी झालेली असायची. त्यावर चापट फार लागत असे; पण इथे दयामाया नसे. चमन करून आलेल्या पोरांच्या डोक्यावर इतर मुलं बोट वाकडं करून मागच्या बाजूने 'खारका' मारत असत.

वर्गातल्या काही मुलांना त्यांच्या घरून केस वाढवून 'गोल' कटिंग करायची मुभा असे. गोल कटिंग म्हणजे वर केस वाढवून कानावरून व मानेवरून फक्त मशिन आणि वस्तरा मारायचा. त्यांना भांग पाडता येत असे. काही भाग्यवान तर केस थेट मागेपर्यंत फिरवत असत. ते सुवासिक तेलं लावत. त्या तेलाचे ओहोळ कपाळावर, कानामागे ओघळताना दिसत. त्यांचा अधिकच हेवा वाटायचा. त्यांच्या जवळ बसलं की सुगंध, ते जवळून गेले तरी सुगंध. याउलट आमच्या घरात खोबरेल तेलाला पर्याय नसे.

महिन्याकाठी की पंधरवड्याकाठी ज्ञानू आमच्याकडे यायचा. एक पोतं झटकून अंथरायचा आणि बसायचा. काळी टोपी, जाकीट, धोतर. टोपीतून वक्राकार बाहेर डोकावणारे केस. तोंडात कायम बिडी. आमच्या घरी येताना तो बिडीचं थोटूक बाहेर फेकून यायचा; तरी तोंडाला तो वास असायचाच. तो धोतर गुडघ्यापर्यंत वर सारून उकिडवा बसून दोन गुडघ्यांत डोकं पकडायचा. एका हाताने दोन बोटांत डोकं पकडून दुसऱ्याने मशिन चालवायचा. त्याची पकड म्हणजे लोखंडी पकडीसारखीच. त्या जागी नंतरही दुखत राहायचं. त्या बोटांनाही तंबाखूचा वास. मशिनलाही कसले कसले वास असत. नीट चालली नाही की मोठा स्क्रू पिळून तो उघडून आत रॉकेलचे थेंब टाकायचा, त्याचा वास. शिवाय, त्याच मशिनने तो आधी म्हशी भादरून आलेला असला तर त्यांचाही वास.

जरा केस वाढले की मी भांग पाडायचा प्रयत्न करायचो. त्याच सुमारास ज्ञानूचं आगमन व्हायचं आणि त्याची मशिन माझा भांग पाडायचा बेत उधळून लावायची. नंतर मोठा झाल्यावर अमेरिकेतही मोठमोठ्या शेतांमधल्या पिकांची कापणी करणारी प्रचंड मोठी यंत्रं पाहिली तेव्हा मला ज्ञानूच आठवला. तोच उत्साह, तोच झपाटा. मी ज्ञानूला खूण करून सांगायचो, थोडे मोठे केस ठेव ना. पण तिथे वडील देखरेखीला बसलेलेच असत. तो त्यांच्याकडे बघून माझ्याकडे बघायचा आणि गालातल्या गालात हसायचा. मशिन काढत असलेल्या प्रत्येक पटानिशी मी निराश, निराश होत जायचो. नंतर मानेवर, कानामागे वस्तरा फिरवणं हा दुःखान्त असे. त्याची चामड्याची उभट धोपटी असे, तिच्यातून गावठी वस्तरा काढून तो सगळ्या नाट्याचा शेवट करायचा.

ज्यांची कटिंग झाली त्या एकेका पोराला आत पाठवत. आम्हाला कशाला शिवायला बंदी होती. आई, आजी कोणी तरी वरून डोक्यावर खोबरेल तेल ओतत असे. आम्ही हाताने ते पसरवत असू. चौकात बंब पेटलेला असे. गरम पाणी काढलेलं असे; पण आधीचे काही तांबे वरून टाकून झाल्यावर आम्ही 'शुद्ध' व्हायचो. मग हाताने अंघोळ करायची परवानगी. पण सुरुवातीला वरून घातल्या जाणाऱ्या पाण्याची अक्षरशः भीती वाटायची. कारण जितकं गरम तितकं चांगलं, असा सगळ्या मोठ्या माणसांचा समज. आधीच केस गमावल्याचं दुःख, त्यात वरून हुळहुळ्या मानेवर अन् डोक्यावर पडणारं चटकेदार पाणी. अंघोळ आटोपली की वडील आरसा घेऊन उभेच असायचे पडवीत. "बघा चिरंजीव, किती निर्मळ दिसतोय चेहरा; नाही तर झाला होता बोकड!" ते 'निर्मळ' रूप बघून आतल्या आत रडू यायचं. त्यानंतर भय असायचं ते शाळेत पोरांची 'ताजी' खाण्याचं !

हेही वाचा - मुक्तांगणची गोष्ट

याउलट वर्गातली वाण्या-गुजराथ्यांची पोरं. ऐटीत बाजारपेठेतल्या सलूनमध्ये जाऊन गोल कटिंग करून घ्यायची. ती उंच लाकडी खुर्ची, समोरचा आरसा, उतरते होत जाणारे कंगवे, बाटलीत खाली दाबलं की फुस् फुस् करत पाणी उडणारे फवारे.. अहाहा! सलूनमधला शंकर मुंबईला काम करून परत आलेला. तो तिथल्या (खऱ्या-खोट्या) गमती सांगायचा. मी कित्येकदा अशा मित्रांची कटिंग पाहायला उभा असायचो. कुणाच्या दाढीच्या वेळी खुर्चीच्या पाठीकडे, वर- खाली करता येणारा दांडा वर करून खालच्या भोकात खिळा बसवायचा. वडीच्या आकाराच्या लाकडावर त्या माणसाला मान ठेवायला सांगायचा. कधी मी त्याचं मशिन हातात घेऊन दाबून बघायचो. शंकर ज्ञानूसारखा हेकट नव्हता. तो हात लावू द्यायचा, खोलून पाहू द्यायचा. मोठं झाल्यावर आपण ही मशिन घ्यायची असं तेव्हा मी ठरवलंही होतं; पण तसं घेण्याचं अजून धाडस झालं नाही, लोक हसतील या भीतीने.

आमच्या वर्गात जवळच्या गावातल्या टिनूशेट व्यापाऱ्याचा शांतिलाल नावाचा मुलगा होता. त्या गावची इतर मुलं तिथून पायी किंवा सायकलवर येत; पण याच्यासाठी वडिलांनी गावात खोली घेऊन दिलेली. त्याच्या हातात कायम पैसे असत. त्या काळी आमच्या गावात मोठ्या माणसाच्या हातातही फार थोडे रोख पैसे असत, पण धान्यधुन्य चांगलं असल्याने पोट भरायची चिंता नसे. त्या गावात, त्या काळात शांत्यासारखा पोरगा वाटेल तेवढा पैसा उधळत असे. शांत्याला जाड भिंगाचा चष्मा होता. भिंगं खूपच जाड. इतकी की मधला भाग अगदी पातळ होत तुटलेला असे. तो वाचताना पुस्तक अगदी जवळ घेऊन वाचत असे. पण व्यंग असलं तरी त्याचा हेवा करणं थांबलं नव्हतं. तो गोल कटिंग करायचा. सलूनमध्ये जाऊन जास्त पैसे टाकून खूप गोष्टी करून घ्यायचा. शंकर त्याचं खास तेल, खास फवारे, खास पावडरी काढायचा. शांत्या हॉटेलात जाऊन भजी खाऊ शकत असे. आम्हाला हॉटेलाकडे फिरकायचीही परवानगी नसे. बरोबर पोरांना घेऊन तो त्यांच्यावर खर्च करायचा. त्यामुळे त्याच्याभोवती काही पोरांचं कोंडाळं जमलेलं होतं. त्याचं अनेक दुकानांत खातं असे. तो मोठ्या माणसासारखी तपकीर ओढायचा. मास्तर ओरडले तरी त्याला काही वाटत नसे.

एकदा टिनूशेटना हे कळलं आणि ते ओतूरमध्ये आले. शांत्याला फटकावत त्यांनी रस्त्यातून जशी वरातच काढली. तपकिरी व्यापारी टोपी, मलमलचा शर्ट, धोतर असा वेष. आपल्याच मुलाला आईमाईवरून शिव्या द्यायला त्यांना काही गैर वाटत नव्हतं. "आणखी कुठे खातं आहे भेंचोत?" शांत्या त्यांना दुकान दाखवत असे. टिनूशेठ त्यांचे पैसे चुकते करत आणि वर त्यांना सांगत, "या आयघाल्याला पुन्हा दारात नका उभं करू !"

शेवटी ही मिरवणूक शंकरच्या दुकानात आली. मिरवणूकच म्हणायची. कारण त्या खेड्यात हा करमणुकीचा कार्यक्रमच. शंकरची बाकी चुकती करून टिनूशेटने शांत्याला खुर्चीत बसवलं आणि शंकरला त्याची हजामत करायला लावली- अगदी वस्तऱ्याने. सुगंधी तेलं, ब्रिल्क्रीम असं काय काय खाल्लेले ते लाडाचे केस शंकरच्या वस्तऱ्यापुढे शरीर आडवं टाकत होते. खालचं गोरं हिरवट डोकं उघडं पडत होतं. शंकर घाबरत टिनूशेटना म्हणाला, "शेंडी ठेवू ना?"

"काही ठेवू नको. लोकांनी विचारलं तर सांगेल हा, माझा बाप मेला!" शांत्याची खोली बंद झाली. आता तो मान खाली घालून इतरांसारखा सायकल मारत येऊ लागला. पैसे खिशात नसल्याने कंपू फुटला आणि शेवटी शांत्या आमच्यासारखा झाला.

त्या वेळी पहिल्यांदा माझी 'पहिलवान कट'ची खंत निघून गेली.

मधल्या काळात मी जरा मोठा झालो होतो. आईकडे भुणभुण करून गोल कटिंगची परवानगी काढली, तसं ज्ञानूने माझ्या डोक्यावर पहिल्यांदाच कात्री चालवली. त्याच्या कंगव्यात तो केस उचलून धरायचा. (उचलून धरायचं खरं तर कारण नव्हतं, कारण ते कायम साळिंदरासारखे ताठ उभेच असत.) कात्रीने ते कापलेच जाईनात. कापता कापता तो इतका रागावला की त्याने त्याच्या कंगव्यावर कात्री मारली आणि तो कंगवा तुटलाच. मग तर चिडून तो म्हणाला, "अन्या, पुढच्या वेळेपासून केस कापायला सुताराकडे जात जा. तो करवतीने कापू शकेल!" नंतर सरळ मशिन घेऊन पहिलवान कट करून टाकली. बाजारात तो बसायचा. तिथून मला जाताना बघितलं की जवळच्याला सांगायचा, "च्यायला, या पोरापायी माझी फणी तुटली !"

anil awachat otur

पुण्याला आल्यावर हे सगळंच सुटलं. इथल्या आरसे महालातल्या जपानी खुर्चीत ऐटीत बसून कटिंग चालू असताना राजासारखा झोपून जाऊ लागलो. पुण्याच्या हवापाण्यात काही तरी वेगळं असणार. पण केस थोडे वळू लागले आणि नंतर नंतर तर भांगही पडू लागला.

*

आपल्याकडची प्रसिद्ध म्हण 'मुलाचे पाय पाळण्यात दिसतात' ही ऐकली की लहानपणी जशी गंमत वाटे तशी ती आजही वाटते. एक तर या म्हणीचा अर्थ कोणी नीट समजावून दिलेला नाही. तसा अर्थ माहीत आहे. माणूस पुढे काय होणार हे लहानपणच्या वागण्यावरूनच दिसतं वगैरे.. एवढा अर्थ लिहून मला पासाइतके मार्क मिळतीलही; पण प्रश्न उरतोच : पायच का ? मुलाच्या पाळण्यात सगळं मूलच दिसतं. शिवाय, पाळण्यात झोपू शकेल इतक्या तान्ह्या मुलावरून पुढचं काय समजणार? ते रडकं असलं तर जन्मभर तो रडका माणूसच राहणार? मग आपण सगळे रडकेच असायला हवेत.

ते जाऊ द्या. आज मला हे आठवायचं कारण मी जो आत आहे, म्हणजे माझ्यातले गुण, दोष, मर्यादा, सगळं धरून, तो मला माहीत आहे. ते वास्तव आहे. माझ्या आठवणीतली सुमारे पन्नास-पंचावन्न वर्ष माझ्या डोळ्यांसमोर आहेत. त्यामुळे मी पुढे काय होणार हा आता प्रश्न नाही. झालेलोच आहे, तर त्याची काही चिन्हं माझ्या त्या पाळण्यातल्या लहान पायांमधे दिसतात का ?

चांगलं चांगलं ते लगेच आठवलं. मी शांत होतो. कुणाला त्रास द्यायचो नाही, मस्ती करायचो नाही. भजन, कीर्तन, प्रवचनं अगदी लहान वयापासून मोठ्या माणसासारखी ऐकत बसायचो. माझी आजी मला 'तुकारामबाबा'च म्हणायची. मी तेव्हा छोटंसं कीर्तनही करायचो. मंत्र पाठ होते. शाळेत आलेल्या पाहुण्यांसमोर धीटपणे म्हणून दाखवायचो आणि शाबासकी घ्यायचो. वडलांची पूजाअर्चा होईपर्यंत दवाखान्यात बसून पेशंटना थोपवून धरायचो. असं एकेक करत बरंच आठवू लागलं. म्हणजे ज्या अर्थी तेव्हा मी असा होतो, त्याचा अर्थ आताही चांगलाच असणार. हा निष्कर्षही मनाला सुखावणारा होता.

पण सुख अंगी लागू देईल तर ते मन कसलं ? स्मृतीची लॉकर्स उघडू लागली ती थांबतात काय ? मग पुढे येऊ लागलं ते जरा लाजिरवाणंच होतं. त्यातला एकच कप्पा बघितला आणि पळालोच तिथून.

काही बाबतींत मी अगदी 'शहाणं बाळ' असलो तरी मला अनेक गोष्टींचं आकर्षणही वाटे. महादेवच्या स्टेशनरीच्या दुकानात जाऊन उभं राहायला मला आवडे. ओतुरात कुठेही नव्हतं तसं काचेचं काउंटर आणि आत ठेवलेल्या वस्तू तिथे होत्या. नव्या डिझाइनच्या पेन्सिली आल्या की त्या घेऊन मी हाताळत असे. त्यांचा वासही घेत असे. पेन्सिलीला टोक करायचं यंत्र म्हणजे तेव्हा चमत्कारच वाटायचा. तिथे काम करणारा भगवान आलेल्या गिऱ्हाइकांना पेन्सिल त्या यंत्रातून साळून देत असे. पेन्सिल हाताने फिरवत असताना तिकडून लाकडाचे सुंदर पातळ आकार बाहेर पडत. तसंच पेन. आम्हा मुलांना शाळेत दौत-टाक वापरावा लागे. लाल व निळ्या शायांच्या दौती दप्तरात न ठेवता दोरीच्या शिंकाळ्यात घालून आम्ही हातात स्वतंत्रपणे घेऊन जायचो. टाकांची निफं मोडायची. त्यांची टोकं वरच्यावर घासायची. अशा बऱ्याच भानगडी. त्यामुळे पेन ही आम्हाला जादूच वाटे. हात भरणं नाही. सरळ खिशाला लटकवावं की चालले कुठेही. पण ते सुख कुठलं आलंय मिळायला ! गुरुजी सांगायचे, “पेनने अक्षर बिघडतं." पुढे काही वर्षांनी बॉलपेनं आली, तेव्हा त्यावेळच्या गुरुजींनी विद्याथ्यांना सांगितलं असणार, शाईचं पेन वापरा, बॉलपेन नको. कारण त्याने अक्षर बिघडतं. आणि आता सगळं कॉम्प्युटरवर टाइप करणाऱ्या पोरांना आई बाप सांगतात, "अरे, हाताने लिहा काही तरी, नाही तर कॉम्प्युटर नसला तर निरक्षर व्हाल रे!"

हेही वाचा - झपाटलेले बाबा

तर सांगायचा मुद्दा, की या वस्तूंच्या मोहाने मी चोऱ्या करायला लागलो. काय म्हणता ? एवढा शहाणा मुलगा चोऱ्या करायला लागला? अहो, काय करता ! हा मोह मोठा वाईट. भल्याभल्यांनाही नाही चुकला. तर मी काय, सामान्यच. पण चोरी करायची म्हटली तरी करता यायला हवी ना! धैर्य हवं. कौशल्य हवं. ते मी केलं हळूहळू अवगत. माझी प्रतिमा त्यासाठी उपयोगी पडली. अन्या आहे तो, असलं काही करणार नाही, याची सगळ्यांना खात्री होती.

घरात माजघराला लागून असलेली एक अंधारी खोली होती. ती बाळंतिणीची खोली. तिला एकच दार. तेही कमी प्रकाशाच्या अंधाऱ्याच म्हणा- माजघरात उघडायचं. त्यामुळे त्या खोलीत मिट्ट अंधार. खोलीच्या एका टोकाला भिंतीतलं फडताळ होतं. एका फुलपात्रात आई पैसे ठेवायची. पैसे म्हणजे नाणीच. या खोलीत जाऊन पैसे घेऊन येणं धोकादायक होतं. माजघरापलीकडे परसाची ओसरी आणि स्वयंपाकघर होतं. तिथे आई, आजी स्वयंपाक व इतर कामं करत असायच्या. आईचे कान खूप तिखट. एक तर मला त्या खोलीत जायचं कारणच काय? खोलीचा दरवाजा लोटताना, खोलीत चालताना, फडताळ उघडताना, भांड्यातून नाणी उचलताना बारीक-मोठे आवाज होणार. त्याचं काय ? पण मी हुशारीने या सगळ्यावर मात केली. येता-जाता दार लोटून उघडूनच ठेवायचं. मांजरपावलाने चालायचं, फडताळाचं न वाजणारं दारच उघडायचं. दुसऱ्याला कडी लटकलेली असायची. वरच्यावर एक-दोन नाणी उचलायची. म्हणजे कमी झाल्याचं लक्षात येऊ नये, म्हणून.

मग काय, पैसे हातात खेळू लागले. महादेवकडून ज्या वस्तू खरेदी करायचो त्या गुप्त ठेवायचो. भावंडांच्या लक्षातही येऊ द्यायचो नाही. देवळात एकटा बसून त्या हाताळून बघायचो. पुढे मग महादेवकडे खातंच काढलं. उधारी वाढत जायची. मग तो हळूच म्हणायचा, “काकाच्या (वडिलांच्या) कानावर जाईल हां..." की मग कशीबशी पूर्तता.

पैशाला इतरही वाटा होत्या.

वर्गातली इतर मुलं हॉटेलात शेव-चिवडा खाऊ शकायची; पण आम्हाला ती परवानगी नसे. मग एका पोराला हाताशी धरून चिवडा आणवायचो. मी लपून लाब राहायचो. मग आम्ही दोघं मिळून तो चिवडा खायचो. त्यात तळलेले लसूण घातलेले असत. त्याच्यापुढे आमच्या घरचा चिवडा फारच सपक वाटायचा. पैशाने अशा काही पोरांना अंकित करून ठेवून मी माझा दोघा-तिघांचा छुपा गटच केला होता. तो वर्गातल्या दांडग्या पोरांपासून कुणाला कळणारही नाही अशा बेताने माझं संरक्षण करायचा.

बाप रे! दमलो सांगून. असं सांगताना धाप लागते हो. तुम्ही विचाराल, मग ते सोज्वळ मुलाचं रूप हे आवरण होतं का? तसंही नाही. मला या छुप्या जीवनाचा इतका ताण पडायचा, इतकं अपराधी वाटायचं, की एका क्षणात ते सगळं मी सोडून द्यायचो आणि खरोखरच एक चांगला, बावळट मुलगा व्हायचो. केलेल्या प्रत्येक चोरीचा पश्चात्ताप व्हायचा तितका मी भजनात रंगून जायचो. देव्हाऱ्यातल्या देवीसमोर बसून राहायचो. पितळेची अनेक हातांची देवी, समईच्या प्रकाशात तिचं जवळपास गुळगुळीत झालेलं तोंड पाहायचो. त्यात मला कधी उग्र भाव दिसत, तर कधी 'जा पोरा, यापुढे असं करू नको'चे भाव असत. असा काही काळ लोटला की कधी तरी मोहाचे विचार वर डोकं काढू लागत. त्यांना आवरण्याचा मी प्रयत्न करत असे. एखाद्या क्षणी परत सगळं झुगारून मोहाच्या गर्तेत.

काय निदान करणार माझं ?

कडक वडील, मारकुटे मास्तर. त्यामुळे खोटं बोलायची सवय लागली ती लहानपण संपलं, लग्नानंतर काही काळपर्यंत रेंगाळली. सुनंदाने माझी ती सवय अक्षरशः मोडून काढली. चोरी तर शाळेतच संपून गेली. आज मी बरा माणूस आहे. तोंडून असत्य गेलेलं मला आठवत नाही. घरातल्यांनाही नाही. 'राग येण्याचं बाबाच्या डोक्यात केंद्रच नाही' असं माझ्या दोन्ही मुली म्हणतात. मग 'त्या' घटना हा माझ्या स्वभावाचा भाग होता की अभावातून निर्माण झालेल्या होत्या? की आपल्या बहुतेकांच्या लहानपणात अशा काही घटना असतातच ? आणि त्याही घटना शिकवत असतात, कसं जगायचं नसतं ते !

महात्मा गांधींची आत्मकथा वाचली. तिच्यात त्यांनी सोन्याचं कडं चोरल्याची हकीगत आहे. ती वाचून मला खूप हायसं वाटलं. अरेच्या, एवढे मोठे, विश्वव्यापी गांधीजी, तेही लहानपणी माझ्यासारख्या चोऱ्या करत होते ?

पण पुढे विचार लकाकला, त्यांनी चोरी केल्यावर त्यांना पश्चात्ताप झाला आणि वडलांपाशी जाऊन ती चूक कबूल केली. स्वतः होऊन. चोरी पकडली गेली नसताना. आपल्याला ते करायला पन्नास वर्ष जावी लागली. अच्छा, म्हणून गांधीजी हे गांधीजी झाले, आणि आपण आपण राहिलो.

असेना का. त्या चुका हातून झाल्या हे एका दृष्टीने बरंच झालं. आता मी अशा मुलांकडे, एवढंच काय, गुन्हेगारांकडेही वेगळ्या दृष्टीने बघू शकतो.

आणि हेही कळलं, की चुका झाल्या तरी त्यातून सावरण्याचं आणि चांगल्या रस्त्याला येण्याचं भान आपल्यात आहे. त्या भानामुळेच मी त्या चुका परत परत करत राहिलो नाही. मग हे भान माझ्यात मुळातलंच असेल का?

त्याला माझे पाळण्यातले पाय म्हणायचं का?

*

जे करायला हवं वेळच्या वेळी ते करायचं नाही आणि नंतर वेळ निघून गेल्यावर हळहळत बसायचं, असा नियमच झालाय मनाचा. या हळहळण्याला तरी काय अर्थ आहे? पण ठीक आहे. या हळहळण्याकडे नीट पाहू या आता. कदाचित होईलही त्यातून चुकीची थोडी भरपाई.

बेल्हेकर सरांनी कुणाच्या हाती निरोप पाठवला होता, मी सध्या पुण्यातच असतो. येऊन भेट. त्यांना भेटून आलेला माझा वर्गमित्र सांगत होता, की 'ते तुझी आठवण काढत होते.' नेहमीच्या कामांनी आयुष्य भरलेलं. म्हणजे फार काम करतो असं नाही; पण अंगात कार्यक्षमता नसल्याने उरक नाही. आणि दुसरं म्हणजे विसराळूपणा. त्या वेळी वाटलंही होतं, सरांचा फोन नंबर मिळवू या कुठून तरी आणि पत्ता समजावून घेऊन जाऊ या. ठरवायचो आणि नंतर त्या धो-धो प्रवाहात विसरून जायचो. पुढे सर गेलेच.

एका दुपारी बंगलोरला राहणारा सुरेश उदास हा शाळासोबती आला. गप्पा निघाल्या. त्यात बेल्हेकर सरांची आठवण निघाली. ते गेल्याचं मला आधीच माहीत होतं. त्यांच्या मुलाचा त्या वेळी फोन आला होता. त्याच्याबरोबर सरांविषयी भरभरून बोललोही होतो. पण सुरेशच्या एका वाक्याने अस्वस्थ केलं. तो म्हणाला, "मी मागच्या वेळी आलो होतो, त्या वेळेस भेटायला गेलो होतो. ते कंबरेत अगदी काटकोनात वाकलेले होते, पण त्यातही त्यांनी काढलेली चित्रं दाखवली. सगळ्यांच्या आठवणी काढत होते."

पूर्ण वाकलेले बेल्हेकर सर? मला कल्पना करवेना. शाळेत यायचे तेव्हा पांढऱ्या शुभ्र कपड्यांत यायचे. तेवढे शुभ्र कपडे आमच्या शाळेत कुणाही शिक्षकाचे नसत. मुलांची तर गोष्टच सोडा. पांढरा स्वच्छ इस्त्रीचा नेहरू शर्ट आणि खाली तलम दुटांगी धोतर. तसं धोतर ओतूरमधे कोणीच नेसलेलं पाहिलं नव्हतं. ते रंगाने काळे होते. टक्कल पडत चाललेलं. टाळूवरचे मागचे केस मागे उडत असायचे. चेहऱ्यावर थोडे देवीचे व्रण असावेत. त्यांचा ड्रॉइंगचा तास म्हणजे मजा वाटायची. एक तर तो अभ्यास वाटत नसे. मुख्य म्हणजे तिथे काही लक्षात ठेवायची भानगड नव्हती. बेल्हेकर सर सौम्य प्रकृतीचे होते. आम्ही कितीही गडबड करत असलो, तरी वळून फक्त 'आपापसात बोलू नका' एवढं वाक्य उच्चारायचे आणि परत फळ्यावर चित्र काढू लागायचे. हातात खडू घेऊन एखादी डौलदार रेषा काढत, तेव्हा हाताची हालचालही डौलदारच असे. त्यांनी काढलेल्या माणसाच्या विविध हालचाली आठवतात. नुसता उभा, एक पाय पुढे टाकून चालायला सुरुवात करणारा ते थेट जोरात पळणाऱ्यापर्यंत. पायाच्या बदलल्या हालचालीबरोबर हातही कसे त्याला अनुरूप हालचाली करतात ते त्यांनी दाखवलेलं.

ते एकेका वर्गावर एकेक तास घेत, त्यांचं काम संपवत, घरी जात, की मग त्यांचं दुसरं आयुष्य सुरू व्हायचं. त्यांची पिठाची गिरणी होती. दर बुधवारी ते शाळेत येऊन तास संपवून जात. बाकी जेव्हा पाहावं तेव्हा ते गिरणीत पिठाने भरलेले दिसत. त्यांच्या केसांवर, डोक्यावर, चेहऱ्यावर पीठ. अगदी भुवयांवरही. प‌ट्ट्याप‌ट्ट्याचा नाइट पायजमा आणि हात असलेली बनियन, ते सगळं पीठमय, असा त्यांचा अवतार असे. मी दळण घेऊन गेल्यावर संध्याकाळच्या अपुऱ्या प्रकाशात, त्या बायकापोरांच्या, डब्यांच्या गर्दीतही ते माझ्याकडे बघून स्मित करत.

सुरेश म्हणाला, "त्यांची जागा केवढी मोठी होती! एक मुख्य मोटर, त्यावरून पट्टे चढवून चालणारी दोन पिठाची यंत्रं."

मी म्हटलं, "आणि पलीकडे तेलाचा घाणा."

सुरेश म्हणाला, "तो कोण काम करायचा रे त्यांच्याकडे?"

मी अचानक आठवून म्हणालो, "फक्कड!"

दोघंही खूप हसलो. आपल्याच आळीत राहणारा शुक्लांचा फक्कड ! असं कसं नाव ठेवलं होतं, की पडलं होतं, कोण जाणे. तोही कायम पिठानेच भरलेला असायचा. आमच्या घरी त्याला दर अमावस्या-पौर्णिमेला ब्राह्मण म्हणून जेवायला बोलवायचे. तेव्हा तोही स्वच्छ अंघोळ करून, कद नेसून उघड्या अंगाने जेवायला यायचा. एरवी पिठातच. ती यंत्रं पिठांनी भरलेली, तसेच हे दोघंही, तशीच पायाखालची जमीनही. रात्री बत्ती लावली की बत्तीच्या प्रकाशात तिथली हवाही तशीच दिसायची.

आम्हा पोरांकडे दळण आणायचं काम असे. रॉकेलचा डबा वरून कापलेला. त्यात धान्य भरून, पोर कडेवर घ्यावं तसं कडेला घेऊन दळणाला जायचो. तिथे फळ्यांनी आडोसा करून एक मांडणी केलेली होती त्यावर डबा ठेवायचा आणि वाट पाहत बसायचं. इथे रांगेचा नियम नसे. कारण बाजरीवर बाजरी, ज्वारीवर ज्वारी असं टाकावं लागे. एक प्रकारचं धान्य संपलं, की शेवटच्या डब्याला जिथून पीठ बाहेर येतं, त्या लोखंडी भागाला ठोका मारत खाली लोंबणाऱ्या फडक्यातून हात घालून सगळं उरलंसुरलं पीठ खाली ओढायचं. त्या धान्याबाबतीत ज्याचा डबा शेवटचा त्याला हे पसाभर पीठ जास्त मिळायचं. आपल्याला तसं मिळावं असं वाटे.

त्या वेळी मुलांना खर्चाला पैसे द्यायची पद्धत नव्हती. गिरणीत जायला आम्ही उत्सुक असायचो, कारण तिकडे आम्हाला अधूनमधून एक पैसा मिळण्याची शक्यता असायची. 'पायली' सांगितलं की एक आणा द्यावा लागे. मधूनच आपण तीन शेर म्हटलं की एक पैसा परत मिळे. तीन शेर आणि चार शेर यांत दिसायला फार फरक नसे; पण ही युक्ती रोज रोज करून चालायची नाही.

दुपारी ती गिरणी आणि त्यामागचं घर निवांत असे.

त्या वेळी मी कधी कधी बेल्हेकर सरांकडे जायचो. मागे एका बाजूला गुरांचा गोठा होता त्यात चार-सहा तरी गायी-म्हशी असत. सर चांगले शेतकरीही असावेत. त्यांना मी काढलेली चित्रं दाखवायचो. एकदा मला रंगपेटी मिळाली होती, वॉटरकलरच्या वड्या असलेली. मी मनानेच शिवाजी काढून रंगवला होता. त्यांनी मग पाणी, ब्रश घेऊन माझ्याच रंगांनी त्याच्या समोरच्या पानावर मावळा काढला. पहिल्यांदाच मी माझ्या समोर होत असलेलं एक चांगलं चित्र पाहत होतो. चेहऱ्याचा रंग आधी गुलाबीसर, नंतर त्यात एका बाजूने निळसर असे रंग मिसळत त्यांनी तो निमगोरा-सावळा चेहरा काढला. त्यापूर्वी मी चेहऱ्याला एकच रंग फासत असे. त्याच्या झुपकेदार मिश्या, कल्ले. त्यातल्या वेगवेगळ्या छटा... शेवटी पगडी काढली. मावळी पगडीतल्या एकेक वळीला ते छटा देत उठावदार करत चालले होते.

त्यांच्याच समोरच्या पानावर मी काढलेलं शिवाजीचं चित्र अगदीच बेंगरूळ वाटू लागलं. आतल्या आत मला खूप लाज वाटत होती. तेवढ्यात त्यांच्या पत्नी तिथे आल्या. त्यांनी सरांच्या मावळ्याकडे पाहिलं. माझा शिवाजी पाहिला. तसं म्हणाल्या, "हा शिवाजी तू काढला आहेस ? छान आहे." तसे सर म्हणाले,

"अनिल चांगली चित्रं काढतो."

बस्स, या एका वाक्यावर माझी पुढची चित्रकलेची इमारत उभी राहिली. खरं तर ते चांगलं नव्हतं, आणि त्यात शेजारी त्यांचा सुरेख मावळा... तरीही ते असं का म्हणाले असावेत ? पण अशा वेळी शंकाकुशंका न काढता मी नाचतच घरी गेलो.

सुरेशच्या त्या एका वाक्याने केवढं सगळं आठवत गेलं! ती गिरणी, तिच्यावरची धुराची चिमणी, त्यावर बांधलेलं उलट मडकं, गिरणी सुरू झाल्यावर येणारा पुक पुक. आवाज... तो तेलाचा घाणा, त्यातून शेंगदाण्याचं तेल काढताना पडणाऱ्या जाड वक्राकार पेंडी... त्याची खरपूस चव घेऊन पाहावं....

सर गेले. खूप खूप गोष्टी जाणून घ्यायच्याच राहिल्या. ते शहरात शिकून आले असणार. त्यांना आपल्या गावी परत यावं लागलं. ते इच्छेने की अनिच्छेने? त्यांना चित्रकार व्हायचं होतं का? मग ही गिरणी कशी आली मध्येच ? त्यांच्यासारख्या चित्रकार माणसाला असं सकाळ-संध्याकाळ (रात्रीपर्यंत) पिठात उभं राहणं कितपत मानवलं असेल? त्या धूळभरल्या चेहऱ्यावरचं स्मित, ते बुधवारी स्वच्छ, पांढऱ्या कपड्यांत येणं आणि डौलात एखादी डौलदार रेषा काढणं..

याविषयी बोलायचं आणि शिकायचं राहूनच गेलं, सर !

(समकालीन प्रकाशनाच्या अनिल अवचट लिखित 'अनवट' या पुस्तकातून साभार. )

अनिल अवचट







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results