विविध मुद्द्यांमागील सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्वरूप समजून घेण्यासाठी आकडेवारी अनेकदा महत्त्वाची ठरते. अर्थात, 'आकडेवारी' म्हटलं की काहीतरी किचकट आणि तांत्रिक गोष्ट डोळ्यासमोर येतं. पण, डेटा पत्रकारितेतील एक महत्त्वाचं नाव असलेल्या रुक्मिणी एस. यांचे डेटा विश्लेषणावर आधारित रिपोर्ट वाचताना हे काम सोपं वाटायला लागलं. त्यांच्या लिखाणामुळे आकडेवारीकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून कसं पाहता येतं, हे समजतं.
रुक्मिणी एस. या एक डेटा पत्रकार आहेत. त्यांचा जन्म पुण्याचा. शिक्षण मुंबई आणि लंडनमध्ये झालं. २००४ साली त्यांनी 'टाईम्स ऑफ इंडिया'च्या मुंबई ब्युरोमध्ये इंटर्न म्हणून कामाला सुरुवात केली. पुढे 'द हिंदू' आणि 'हफपोस्ट इंडिया' यांसारख्या प्रसिद्ध माध्यम संस्थांमध्ये त्यांनी डेटा संपादक म्हणून काम पाहिलं. तब्बल १४ वर्षं पत्रकारिता केल्यानंतर त्यांनी असमानता, लैंगिकता, जात आणि राजकारण अशा विविध विषयांवर सातत्याने लिखाण केलं. गुंतागुंतीचे अनेक सामाजिक आणि आर्थिक प्रश्न एक डेटा विश्लेषक म्हणून सोपे करून सांगण्याचं काम त्या करतात.
रुक्मिणी यांनी स्थापन केलेला 'डेटा फॉर इंडिया' हा प्लॅटफॉर्म चार्ट आणि डेटाच्या स्वरूपात आरोग्य, लोकसंख्या, अर्थव्यवस्था आणि राहणीमान अशा अनेक विषयांवरील माहिती लोकांपर्यंत पोहोचवतो. 'डेटा साक्षरता' हे या प्लॅटफॉर्मचं महत्त्वाचं ध्येय असून भारतीयांमध्ये डेटाविषयीची समज निर्माण करणे, हा त्याचा मुख्य उद्देश आहे.
मी वर्षभरापूर्वी रुक्मिणी यांचं २०२१ मध्ये प्रकाशित झालेलं 'Whole Numbers & Half Truths: What Data Can and Cannot Tell Us About Modern India' हे पुस्तक विकत घेतलं. डेटा स्वरूपातील माहिती वाचण्यात थोडाफार रस असल्याने पुस्तक चाळल्यावर लगेचच मी ते उचललं. त्यावेळी त्याची अनुक्रमणिका वाचून मला त्या पुस्तकाविषयी उत्सुकता वाटली होती.
या पुस्तकात रुक्मिणी एस. यांनी आकडेवारी आणि मुलाखतींच्या आधारे भारतातील लोकांचे जीवन, त्यांच्या सवयी, शहरीकरण, लोकसंख्या, लिंगभेद, जातीय राजकारण आणि गुन्हेगारी याबद्दल अतिशय रोचक माहिती दिली आहे. इतकंच नाही, तर भारतात डेटा नेमका कसा काम करतो, तो कसा गोळा केला जातो आणि सामाजिक-राजकीय प्रभाव समजून घेऊन त्याचं विश्लेषण कसं केलं जातं, हेसुद्धा त्यांनी नेमकेपणाने सांगितलं आहे.
या पुस्तकात एकूण १० प्रकरणं आहेत. यामध्ये एखाद्या गुन्ह्यासंदर्भातील पोलीस आणि मीडियाचं रिपोर्टिंग, न्यायालयं, भारतातील पारंपरिक आणि आधुनिक मूल्यं, भारतीय मतदार, आपले खानपान आणि जात-धर्म, प्रेम-लग्न-लैंगिक संबंधांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, भारतीय किती पैसे कमावतात व कुठे खर्च करतात, प्रदेशानुसार आपल्या कामाचे बदलणारे स्वरूप, लोकसंख्यावाढ आणि त्यातून निर्माण झालेले प्रश्न, शहरीकरण, स्थलांतर, आपले आजार आणि उपचारांवरील खर्च (विशेषतः कोरोनाच्या संदर्भात) या विषयांचा समावेश आहे.
थोडक्यात, आपण कसे जगतो, काय खातो, कसे प्रेम करतो, मतदान कसे करतो, पैसा कसा कमावतो आणि कसा खर्च करतो, या सगळ्याचा शोध म्हणजे हे पुस्तक. या सगळ्याच्या केंद्रस्थानी भारतीय जनमानस आहे. त्यामुळे भारतीय नेमका काय विचार करतात हे तुम्हाला आकडेवारीचं अचूक आकलन करून समजून घ्यायचं असेल, तर हे पुस्तक नक्की वाचा.
एखादी आकडेवारी देताना कोणते (आणि महत्त्वाचे म्हणजे विश्वसनीय) संदर्भ वापरले आहेत, हे तटस्थपणे विषय समजून घेणाऱ्यासाठी महत्त्वाचं असतं. या पुस्तकात त्याचे पुरेपूर दाखले दिलेले आहेत. हे विश्लेषण करताना रुक्मिणी यांनी राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण (NSSO), राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (NFHS), भारत मानव विकास सर्वेक्षण (IHDS), राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो (NCRB), नागरी नोंदणी प्रणाली (CRS), सेंटर फॉर मॉनिटरिंग ऑफ द इंडियन इकॉनॉमी (CMIE) आणि लोकनीती-सीएसडीएस अशा अनेक संस्थांची आकडेवारी वापरली आहे.
ही आकडेवारी देताना ज्या माहितीत काही त्रुटी आहेत, त्याचा स्पष्ट उल्लेखही त्यांनी योग्य ठिकाणी केला आहे. यामुळे त्या आपल्या मर्यादांची कल्पनाही वाचकाला देतात. म्हणूनच, त्यांनी कोणत्याही प्रकारची छेडछाड न करता अत्यंत पारदर्शीपणे विश्लेषण केलं आहे, असं म्हणता येईल. महत्त्वाचं म्हणजे हे पुस्तक २०२१ मध्ये प्रकाशित झाल्याने तोपर्यंतची सर्वात अद्ययावत आकडेवारी यात वापरली गेली आहे.
अनेकदा 'अकादमिक व्यक्ती' म्हटलं की, ती बोजड भाषेतच विश्लेषण किंवा मांडणी करेल, असा एक समज असतो. अनकांच्या बाबतीत ते खरंही ठरतं. पण या पुस्तकात आकडेवारीच्या आधारे मांडलेले मुद्दे सर्वसामान्य वाचकांना सहज कसे समजतील यावर अधिक भर दिल्याचं ठळकपणे जाणवतं. लेखकामधला 'फील्ड रिपोर्टर' इथे पुरेपूर दिसतो.
आपल्या भारतीय समाज आणि संस्कृतीबद्दल अनेक मिथके तयार झाली आहेत. आधुनिकता आणि उदारमतवादाविषयी काही ठोकताळे आपल्या डोक्यात पक्के बसलेले आहेत. मात्र, आपण आपलाच (उदा. लग्न, जात व्यवस्था) जो 'गुडीगुडी' समज करून घेतलेला आहे तो किती अर्धवट आहे, हे पुस्तक वाचताना योग्य उदाहरणं आणि सामाजिक-राजकीय संदर्भांसहित आपल्या लक्षात येऊ लागतं. नकळतपणे आपण स्वतःचंच आत्मपरीक्षण करू लागतो.
या पुस्तकाचं मुखपृष्ठही खूप बोलकं आहे. अनेक गोष्टी लपवण्यासाठी आणि सत्य मांडण्यासाठी डेटा कसा वापरला जातो, याची मानवी प्रतिकृती तुम्हाला या मुखपृष्ठावर दिसेल.
एकंदरीत, हे पुस्तक अनेक अर्थांनी महत्त्वाचं आहे. हे केवळ आकडेवारीतून आलेलं कोरडे विश्लेषण नाही, तर त्या तुमच्या-आमच्यासारख्या भारतीयांच्या रोजच्या जगण्याच्या कथा आहेत.
