आम्ही कोण?
ले 

अमेरिकेतल्या परसबागेत

  • अश्विनी भावे
  • 18.09.25
  • वाचनवेळ 13 मि.
ashwini bhave

सिलिकॉन व्हॅलीतल्या हारकर हायस्कूलमध्ये आम्ही माझ्या पुतण्याच्या पदवीदान समारंभाला जमलो होतो. शाळेचं आवार, कार्यक्रमातली शिस्त हे सगळं मी निरखत होते. पदवीदान समारंभानंतर त्या वर्षीच्या सर्वोत्तम ठरलेल्या विद्यार्थ्याने निरोपवजा भाषण करण्याची तिथली पद्धत. या भाषणाचा आशय प्रेरणादायी आणि पुढच्या प्रवासासाठी मार्गदर्शक असतो. तर त्या वर्षीची अशी वॅलेडिक्टोरियन पोडियमसमोर आली. ती भारतीय वंशाची होती, म्हणून उत्साहात मी जरा सरसावून बसले. तिच्या भाषणात तिची हुशारी पुरेपूर दिसत होती, आणि तिने सांगितलेली एक गोष्ट मला खूप प्रभावित करून गेली. ती सांगत होती,“लहान असल्यापासून दोन गोष्टींवर माझं जिवापाड प्रेम होतं (पॅशन्स). एक म्हणजे गणित आणि दुसरं म्हणजे व्हायोलिन वादन. जसजशी मी मोठी होत गेले तसतसं माझं गणिताशी असलेलं नातं बदलत गेलं. आता त्या प्रेमाची जागा स्पर्धेने घेतली आहे आणि त्याला यशाचे मापदंड चिकटले आहेत. गणित हे प्रेम न उरता यशाची पायरी बनलं आहे फक्त! पण माझं व्हाययोलिन वादनावरचं प्रेम मात्र टिकून राहिलंय. त्याला कोणत्याच परिमाणांनी स्पर्श केला नाही. इट स्टेड अनडल्टरटेड अँड प्युअर अँड इट विल ऑलवेज स्टे प्युअर.” तिने पुढे आवाहन केलं- “मला कल्पना आहे की तुमच्यातल्या प्रत्येकाला यापुढे स्पर्धात्मक जगाला तोंड द्यायचं आहे. त्याकरता आपण सगळे समर्थ आहोतच. पण मी कळकळीची विनंती करते, की या स्पर्धात्मक जगामध्ये उंच झेप घेताना अशी एखादी कला, असा एखादा छंद, जो तुम्हाला निखालस आनंद देऊन जातो, तो तुम्ही जिवापाड जपा.”

तिचं बोलणं ऐकून मी विचारात पडले- मला निखालस आनंद देणारी गोष्ट कोणती? माझ्यापुरतं सांगायचं झालं, तर एका दशकापासून अधिक वर्षं माझ्या परसबागेने, बागकामाने त्या निखळ आनंदाची वाट मला मोकळी करून दिली आहे. या आनंदाचं बीज नक्की कुठे बरं पेरलं गेलं असेल?

मी चाळीत वाढले. मोठा असला तरी आम्हाला कॉमन वऱ्हांडा होता. आमच्या वाटच्या कोपऱ्यात एक निवडुंग, एखादंच फुलझाड आणि बाबांनी रंगवलेल्या एका टीपॉयवर मनी प्लांट असायचं. त्याचं प्रत्येक पान आई पुसून स्वच्छ ठेवायची. कधीतरीच ती आम्हाला गाजराची कापलेली डोक्याकडची चकती बशीमध्ये पाण्यात ठेवायला द्यायची. त्याला हिरवा फुटवा आणि तुरे आलेले बघून आम्हाला गंमत वाटायची, इतकाच माझा बागकामाशी संबंध होता.

पण सगळ्यात जादुई गंमत वाटायची एका वेगळ्याच गोष्टीने. हवा पावसाळी झाली की आई एका गोल टोपलीत माती भरून आम्हाला त्यात वालाचं बिरडं पेरायला द्यायची आणि झाकायला ओलं केलेलं पातळ घोंगडं. माती जराशी ओलसर करून आम्ही त्यात वाल पेरायचो नि त्यावर घोंगडं टाकून टोपलं बाल्कनीत कॉटखाली सारून ठेवायचो. आईने हात लावू नको, असं बजावलं तरी दिवसातून दहा वेळा तिचा डोळा चुकवून मी काही उगवलंय का ते पाहायचे. काही दिवसांनी आपण काही तरी पेरलंय हे आम्ही विसरूनदेखील जायचो. मग दहा-पंधरा दिवसांनी कोंब फुटले की घोंगडं वर आल्याचं दिसायचं. पुढच्या आठ दिवसांत त्या कोंबांनी प्रकाशाच्या शोधात ते सगळं घोंगडं डोक्यावर उचललेलं असायचं. हनुमानाने द्रोणागिरी उचलावा तशी ताकद या इवल्या रोपात आली तरी कुठून, याचं मला नेहमी कुतूहल वाटायचं. मग एखाद्या रविवारी त्या बिरड्याची आमटी आम्ही ओरपून खायचो. ते कुतूहलच नकळत मनात बिंबलं असेल का खोलवर कुठे तरी?

व्यवसायाच्या आणि संसाराच्या धबडग्यात काही गोष्टी पार मागे पडतात. त्यात ही गोष्टही मी विसरले. इवलेसे कोंबदेखील घोंगडं डोक्यावर घेण्याची ताकद ठेवतात, ही जादुई गम्मत मुलांना दाखवावी असं मला कधीच का वाटलं नाही? मी त्यांना साधे वालसुद्धा पेरायला का दिले नाहीत?

पण सुदैवाने तशी संधी मुलांनीच मला दिली. एकदा समीर, साची आणि तिची मैत्रीण अशा तिघांनी मिळून शाळेच्या सायन्स-वीकसाठी एक प्रोजेक्ट करायचं ठरवलं. विषय होता, रोपं किंवा बिया सूर्यप्रकाशात वेगाने वाढतात की अनैसर्गिक प्रकाशात? माझ्या लहानपणी सायन्सचे प्राध्यापक असलेले माझे बाबा कोणत्याही प्रयोगात रस घेऊन आम्हाला नेहमीच मदत करत असत. आता ती आवड माझ्यात उतरणारच ना! आम्ही अनैसर्गिक प्रकाशाची साधनसामग्री, बिया, बिया लावण्यासाठी ट्रे,माती,आणि नोंदणीसाठी वह्या, अशी सगळी तयारी केली. एक सेटअप मागल्या दारच्या अंगणात आणि एक सेटअप आमच्या लॉन्ड्रीरूममध्ये केला. मुलं तेव्हा दुसरी-तिसरीत असतील. त्यांचं वय लक्षात घेता हा प्रोजेक्ट त्यांचा कमी आणि माझाच जास्त होता. पुढचा दीड-एक महिना किती पाणी दिलं, किती तास प्रकाश दिला, कोंब कधी फुटले, पानं कधी आली, उंची किती वाढली इत्यादी नोंद करत गेलो. सरतेशेवटी प्रयोगाचं उत्तर मिळालं तेदेखील चकित करण्यासारखं-रोपं दोन्हीही प्रकाशात सारखीच वाढतात. प्रयोग तर संपला; पण आता या रोपांचा करायचं काय, हा प्रश्न पडला. मला वाटतं, त्या दिवशी जिवंत रोपं टाकवत नाहीत म्हणून सुरू झालेला प्रवास त्यानंतर थांबलाच नाही.

घराच्या आवारात झाडं लावायला जागा होती, पण खूप गवत आणि तण वाढले होते. मग बाजारातून एक चौकोनी ‘रेज्ड बेड' म्हणजे भाज्यांचा वाफा बनवण्याचं साहित्य विकत आणलं. तो स्वतःच्या हाताने जोडताना कंबरडं मोडलं माझं. माती विकत आणायला गेले, तर त्यात दहा प्रकार! त्याचा अभ्यास केला आणि शेवटी एकदाची प्रयोगातली काही रोपं त्यात लागली. उरलीसुरली फुलझाडांची रोपंही जगली तर जगली, असा विचार करून जागा मिळेल तिकडे लावून टाकली आणि उरक पडला. त्या वर्षी काही झाडं जगली, काही नाही. पुढच्या वर्षी मात्र काही फुलझाडं आपल्या मनाने परत उगवली आणि आदल्या वर्षीपेक्षाही जास्त तरारली, तेव्हा कुठे मला मेन्युअल आणि पेरिनिअल रोपांमधला फरक कळला.

हळूहळू माझ्या अंगणातल्या जागा मला खुणावायला लागल्या. जिकडे-तिकडे वाढलेलं रान स्वच्छ करावंसं वाटू लागलं. जवळच्या गार्डनिंग स्टोअरमधल्या माझ्या खेपा आता वाढायला लागल्या. भाज्या पिकवायला चांगली माती हवी म्हणजे काय, बिया कोणत्या सीझनमध्ये रुजवाव्यात याची माहिती मी गोळा केली. पहिल्या वर्षी आपणहून लावल्या त्या फरसबीच्या बिया. भरभर वाढणारी वेल, पहिलं फूल, शेंग, हाताने खुडलेल्या शेंगांनी भरलेलं छोट टोपलं... माझा उत्साह वाढला. लहानपणी जादूच्या शेंगांचा वेल आकाशावर गेला त्याची गोष्ट ऐकताना वाटलं होतं तितकंच अप्रूप मला या वेलाबद्दल वाटलं. आई-बाबा, नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांना त्याचे फोटो दाखवून बागकामावर गप्पा मारणं हा माझा विरंगुळा झाला.

चार भाज्या, रोपं नि झाडं काय लावायला लागले, माझी एका नव्या जगाशी ओळख झाली, ती म्हणजे प्राणी, पक्षी,जनावरं आणि कीटकांची दुनिया. त्या घराच्या अंगणात नेहमी हरणं यायची. ती दारात दिसली की मी जशी काही शकुंतला आहे असंच मला वाटायचं. खारींची लगबग, पक्ष्यांचे रंग पाहण्यात मला खूप गंमत यायची. पण एकदा भाज्या पिकवायला लागल्यावर हे सगळे प्राणी-पक्षी मला नकोनकोसे वाटायला लागले.आपण मेहनत घ्यावी आणि फुटलेली पालवी हरणांनी सफाचट करावी, चांगलं धरलेलं रोप रॅकुन्सच्या टोळीने मुळासकट उपटावं, झाडावर लगडलेली पीचेस जरा पिकली की मग काढू म्हणून मोह आवरावा आणि अचानक दोन दिवसांत ती खारींनी सफाचट करावीत, तीदेखील मला ताकास तूर लागू न देता. याने माझा राग राग होत असे. एक नाही असे अनेक अनुभव आले. एकदा सकाळी उठून पाहते, तर माझ्या सुंदर हिरव्यागार लॉनच्या मधोमध जमीन उकरून मातीचे ढीगच्या ढीग केलेले दिसले. गोफर्स किंवा मोल यापैकी कोणी तरी हा उद्योग केला असणार हे लक्षात आलं. जमिनीखाली निमुळती भुयारं खणून त्यात राहणारे हे दोन प्राणी हातभर लांबीचेदेखील नसतील; पण ते असे कामाला लागले की रातोरात नुकसान करू शकतात. अगदी परवाची गोष्ट. मी स्नोपीज रोपं लावली. तीन-चार दिवसात रोपं चांगलीच तरारली. मग रोजची रोज ती जाऊन पाहायची हे खूळ लागलं. अचानक एक दिवस कोवळी पालवी खाऊन रोपं भुंडी करून ठेवल्याचं दिसलं. हे काम अर्थातच सशाचं होतं. असाच एक अनुभव पर्सीमनने लगडलेल्या झाडाचा. पक्षी टोचा मारमारून ही रसरशीत फळं खाली पाडतात आणि त्यावर ताव मारतात.

पण हळूहळू मी या सगळ्यावर शक्कल काढायला शिकले. किंबहुना, या सर्व प्राण्या-पक्षांपासून झाडांचं, रोपांचं संरक्षण करता करता मी त्यात मनाने गुंतत गेले. आणि तसंही अडचणी आल्या म्हणून हाती घेतलेलं काम सोडेल ती अश्विनी कुठली!

सशांना रोखण्यासाठी रोपं लहान असताना भोवती दीड फूट चिकन वायर लावणं, हरणांना अडवण्याकरता त्यांना न आवडणाऱ्या वासाची फुलझाडं बागेच्या कडेला लावणं, पक्ष्यांना अडवण्यासाठी झाडाला जाळी लावणं, भाजीपाल्यावर कीटक येऊ नयेत म्हणून वाफ्यात झेंडूची फुलं लावणं, ऑरगॅनिक उपाय म्हणून आपल्या नीमचा फवारा मारणं, या सगळ्या गोष्टी शिकायला मला बरीच वर्षं लागली; पण मी चिकाटी सोडली नाही.

खरं सांगू, माझ्या बागकामाला खरा रंग आला ते हरणांनी नासधूस केल्यानंतर. कारण त्यानंतर मी पुढच्या बागेतला एक कोपरा स्वच्छ करून ती जागा मला हवी तशी करून घेतली. पाण्यासाठी स्प्रिंकलर सिस्टीम लावून घेतली. लाकडं आणून त्याचे वाफे तयार करून घेतले आणि बागेला एक छोटं कुंपणही घातलं. घमघमाट सुटेल अशी फुलांची वेल एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला बहर डोळ्यांना सुखावेल अशी बोगनवेल त्यावर सोडली. मुलांचं संगोपन, त्यांच्या शाळेत, सोशल वर्कसाठी काढून ठेवलेला वेळ वगळून उरलेल्या वेळात माझं बागकाम सुरू झालं. माझं मन या सगळ्यात असं काही रमून गेलं की भारतातल्या करियरमुळे मिळालेली लोकप्रियताही विस्मृतीत गेली.

मला सकाळी चालायला जायची सवय. रोज वेगवेगळ्या रस्त्यांना गाडी पार्क करून तिथल्या नव्या रस्त्यांवर चालून यायला मला खूप आवडायचं. प्रत्येकाची घरं निराळी, त्यांची बाग- त्यांचं कुंपण निराळं. सीझनप्रमाणे बहरणारी त्या त्या रस्त्यावरची झाडंदेखील वेगळी! त्यांना निरखणं म्हणजे आल्हाददायक! मग हळूच फोनचा कॅमेरा बाहेर यायचा आणि ते सार टिपलं जायचं. एक दिवस वाटलं, ‘मॉर्निंग वॉक डायरीज' म्हणून पोस्ट करावं. म्हणून पहिला व्हिडिओ टाकला तो चेरी ब्लॉसमचा. एकदा आठ दिवस प्रवास करून मी घरी पोहोचले आणि माझ्या पुढच्या अंगणातली दोन झाडं मी फुलांनी बहरलेली पाहिली. असा बहरच मी आजवर पाहिला नव्हता. त्या पर्णहीन झाडावर हजारो गुलाबी रंगांची फुलं फुलली होती. पांढरट रंगावर जाणारा झाडाचा जाड बुंधा नि फांद्या आणि त्यावर हजारो फिकी गुलाबी फुलं. प्रत्येक फुलात नाजूक कातरलेल्या ५०तरी पाकळ्या होत्या. मी आ वासून त्यांचं सौंदर्य टिपत राहिले. ते झाड होतं चेरी ब्लॉसमचं.‘सातो झाकुरा' या जातीचं ते झाड वर्षातून फक्त दोन आठवडे बहरतं; पण त्या दोन आठवड्यांत ते इतकं भरभरून सुख देतं की डोळ्यांचं पारणं फिटतं. आपल्याला इतक्या सढळ हाताने सुख कोणाच्या ओटीत घालता येईल का, हा प्रश्न दरवर्षी त्या बहरलेल्या झाडाकडे पाहताना माझ्या मनात डोकावतो. त्या वर्षी न राहवून मी या चेरी ब्लॉसमचा व्हिडिओ माझ्या सोशल मीडियावर टाकला. त्या वर्षी अधूनमधून निसर्गातले रंग, प्रकाशझोत, वेगवेगळ्या आकारांचे झाडांचे घेर- जे जे मला भावलं ते ते टाकत राहिले.

एका वर्षी न वापरलेल्या बटाट्यांना मोड आले. ड्रॉवरमध्ये त्याचा घाण वास यायला लागला. पण ते कचऱ्यात टाकायच्याऐवजी मी मातीत टाकले- अर्थात बटाटे कसे लावतात यावर वाचन केल्यानंतरच. वरची पानं पिवळसर झाल्यावर मी हलक्या हाताने बाजूची माती सैल केली आणि रोपं मुळासकट उपटली. पाहते तर काय, प्रत्येक रोपाच्या मुळाला असंख्य फिंगरलिंग जातीचे बटाटे लागले होते. अर्धा किलो पेरलेल्या बटाट्याचे तीन-चार किलो बटाटे तरी निघाले त्या वर्षी. त्या रोपांकडे पाहताना वाटलं की हे प्रत्येक आईने आपल्या मुलांना दाखवावं, शिकवावंसं वाटेल असंच आहे. हे दृश्य आपण कॅमेर्यात टिपायला हवं. कारण या पुढच्या पिढीला बटाटे जमिनीखाली उगवतात की झाडावर लागतात हेही माहिती नसेल. मी पोस्ट केलेला व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आणि मला हुरूप आला. बागकामामुळे मला होणारा आनंद लोकांसमवेत वाटता यावा आणि त्यांनाही तो लुटता यावा या हेतूने मी असे व्हिडिओ शेअर करत राहिले. त्यातून ‘ग्रीन डोअर' या यूट्युब चॅनेलचा जन्म झाला. आज माझे चाहते माझ्या व्यावसायिक प्रोजेक्टइतकीच या व्हिडिओंची वाट पाहत असतात आणि भेटल्यावर आवर्जून त्याचा उल्लेख करतात.

आजवर लोकांनी माझं सेलिब्रिटीचं रूप पाहिलं होतं. त्या सिल्व्हर स्क्रीनच्या प्रतिमेत नाही म्हटलं तरी मी तुमच्यापेक्षा वेगळी आहे हेच सांगण्याचा प्रयत्न असतो; पण या व्हिडिओत माझं रोजचं रूप बहुतकरून चेहऱ्यावर मेकअप नसलेलं, कधी कधी साधे बुचड्यात बांधलेले केस असंच असतं. या माध्यमातून सिल्व्हर स्क्रीनच्या पडद्याचा अडसर बाजूला करून एक माणूस म्हणून लोकांसमोर यायला मिळतं. आजवर ज्या प्रेक्षकांनी मला इतकं प्रेम दिलं त्यांच्याशी एक माणूस म्हणून संवाद साधता येतो. आयुष्यातले छोटे छोटे आनंद मी त्यांच्यासमोर वेचू शकते. एरवी शूटिंगमध्ये २०० माणसांचा तामझाम असतो; पण हे व्हिडिओ करताना फक्त मी, हातातला फोन आणि माझी बाग इतकं सगळं सोपं असतं. या सोपेपणात, साधेपणात एक वेगळीच गंमत असते.

अर्थात, बागकामाचे व्हिडीओज, सोशल मीडियावरचे लाइक्स, तिथला प्रेझेन्स हे सगळं अलीकडच्या दोन-तीन वर्षांतलं; पण माझं परसबागेशी, निसर्गाशी नातं जुळलं त्याला एका तपाहून अधिक काळ झाला. माझ्या लेखी सोशल मीडिया हे ते प्रेम वाटण्याचं एक माध्यम आहे फक्त. हारकर हायस्कूलच्या विद्यार्थिनीने म्हटल्याप्रमाणे माझ्या व्यवसायावर माझं बागकामाइतकंच किंवा जरा जास्त प्रेम आहे, पण त्याला यशाचे ठोकताळे आहेत. तिथे अपेक्षांचं ओझं आहे. बागकामावरचं प्रेम मात्र निखळ आहे. त्याला यशाची परिमाणं नाहीत. व्यावसायिक आयुष्यात कितीही वाटलं तरी प्रयोग करायला मन धजावत नाही. कारण मिळवलेलं यश, लोकप्रियता आपण गमावू का हा प्रश्न पडत असतो. आमच्या क्षेत्रात इतकी वर्षं काढल्यानंतर मनावरचा ताण चेहऱ्यावर दाखवू न देण्यात मी सरावलेली आहे. पण बागकामाबद्दल बोलताना किंवा माझ्या बागेत मुक्तपणे फिरताना मी जरा जास्तच प्रफुल्लित असते आणि तो निर्हेतुक आनंद माझ्या चेहऱ्यावर दिसतो, हे मला माझ्या घरच्यांनी, चाहत्यांनी वारंवार सांगितलं आहे. याचं कारण ‘मी'चं अस्तित्त्व निसर्गात वावरताना विरघळून जातं. कोरी पाटी घेऊन निसर्गाला सामोरं जाता येतं. परफेक्शनचं वेड असल्यावर अपयशाची भीती मनात असणारच. पण परसबागेत जाण्यासाठी मागलं दार उघडलं की वेसण नसलेल्या वासरासारखं मन उंडारायला लागतं.

आमच्या वरच्या बाल्कनीतून समोर पाहिलं की माझ्या आवारातली सिक्क्योयाची झाडं दिसतात. कमीत कमी ९० फुटी उंचीच्या या झाडांचा वाऱ्यावर डोलणारा शेंडा मान वर करून पाहताना मानेलादेखील रग लागते. या झाडांची निगा कशी राखावी यावर माहिती काढत असताना आश्चर्यकारक गोष्ट वाचनात आली. सिक्क्योया ही जगातली सर्वांत उंच वाढणारी झाडाची जात. २०० ते ३००फूटसुद्धा उंच वाढणाऱ्या या झाडाची मुळं किती खोल असतील असं वाटतं तुम्हाला? निदान ८० ते९०फूट तरी? पण वाचल्यावर मला आश्चर्याचा धक्काच बसला, की या उंच झाडांची मुळं केवळ सहा ते बारा फूट खोल असतात. मग वादळ-पावसात कसं तग धरत असेल हे झाड? सिक्क्यो हे रेडवुड प्रजातीचं झाड. रेडवुड्स कधीच एकटी वाढत नाहीत, किमानपक्षी चार-पाच झाडं दाटीवाटीने वाढतात. त्यांच्या पाळामुळांची घट्ट वीणच त्यांना ताठ मानेने उभं राहण्याचं बळ देते. जेव्हा जेव्हा बाल्कनीतून त्या उंच झाडांकडे पाहते तेव्हा तेव्हा जाणवतं, की आपल्या यशात, आपल्या ताठ मानेने उभं राहण्यात आपले कुटुंबीय, संस्कार, सहकारी, मित्र-मैत्रिणी, प्रेक्षक या सर्वांचाच हातभार असतो. एक माणूस उभा करायला एक अख्खं गाव लागतं याचं जिवंत उदाहरण माझ्यासमोर दिमाखात डोलताना पाहून मी नतमस्तक होते. या निसर्गाची व्याप्तीच इतकी मोठी आहे, की त्याला शरण नाही जायचं तर कुणाला?

सागराचा अमर्याद जलाशय, हिमशिखरांची गगनचुंबी उंची पाहताना आपण किती थिटे आहोत याची जाणीव होत राहते; पण झाडा-पानांच्या,प्राणी-पक्ष्यांच्या निसर्गात त्यातली सुसंगती आणि विसंगतीदेखील फार मोठं काही तरी सांगून जाते असं वाटतं. मी लहान असेन अथवा मोठी, काळी असेन नाही तर गोरी, कृष असेन अथवा ताकदवान, या विश्वात असण्याचा मला समान हक्क आहे, आणि माझा जगण्याचा हेतू (पर्पज)देखील तितकाच महत्त्वाचा आहे, हा विश्वास मला निसर्गातून मिळतो. वर्षातून दोनच आठवडे बहरणारं राजस चेरी ब्लॉसम असो, नाही तर वर्षभर फुलणारं बाळबोध सदाफुली असो, त्यांना वाटेल तेव्हा बहरण्याचा त्यांना अधिकार आहे. आणि याऊपर, ऊन असो वा पाऊस, त्यांची वेळ झाली की तेही बहरतीलच याचीही शाश्वती वाटते.

शिशिरातली पानगळ आणि चैत्राची पालवी यावर अनेकांनी लिहिलं आहे, कविता रचल्या आहेत, पण दरवर्षी ते कॅमेर्यात टिपताना मनात नव्याने घर करतं, हे खरं आहे. जे विचार, जी माणसं माझ्या इच्छाआकांक्षांना पूरक नाहीत त्यांना मागे सोडल्याशिवाय नवीन विचार, नवा उत्साह अंगात भिनत नाही. पानगळीप्रमाणे आपणच त्याला रस्ता मोकळा करून द्यायला हवा हे पटत जातं. कणसाचं बी माझ्या हाताने वाटीभर मातीत खोवावं आणि काही महिन्यांत त्याचं आठ फूट उंचीचं झाड व्हावं, त्याला टपोऱ्या दाण्यांची अनेक कणसं लागावीत, यापेक्षा आणखी काय नवलाई असू शकते? ही नवलाई, निसर्गचक्र आणि निसर्गचक्रातली ताकद याबद्दल विचार करताना मनाचे बंध गळून पडतात तेव्हा उरते फक्त निरागसता. त्या निरागसतेवर माझं प्रेम आहे.

(अनुभव, मे 2023च्या अंकातून साभार)

अश्विनी भावे | ashvinib2000@yahoo.com







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 1

Satish Ananda wakase 21.09.25
Khup bhari watl wachtana....pn khrtr amerikan nawapeksha apli falafulanchya an zadamadanchya nawala kashachi sr nahi he nkki ....

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results