आम्ही कोण?
ललित 

दोन ध्रुवांवर दोघे आपण

  • निरंजन घाटे
  • 09.11.25
  • वाचनवेळ 5 मि.
niranjan ghate

ते दोघे प्रेमात पडले. ती सुंदर होती, हुशार होती, उच्चविद्याविभूषित होती. तो तिला शोभेलसा होता. त्यांनी एकत्र राहायचं ठरवलं. पण देशभरच्या न्यायालयांनी ‘लिव्ह-इन रिलेशनशिप'बद्दल जे निर्णय दिले ते बघून त्यांनी चक्क विधिवत लग्न केलं. त्यामुळे काही नातेवाईकांना बरं वाटलं तर काहींना आश्चर्य. त्यांचा संसार सुखाने सुरू झाला. दोघेही महत्त्वाकांक्षी होते. आयटी क्षेत्रात नोकरी करत होते. ५-६ वर्षं नोकरी करायची, पैशाची व्यवस्थित गुंतवणूक करायची, मग काही काळ आराम करायचा, एखादं मूल झालं की घरून करता येईल असा व्यवसाय करायचा, असे त्यांचे बेत होते. त्यांच्या क्षेत्रात रोज नवे बदल घडत होते. त्या बदलांची केंद्रस्थानं वेगवेगळ्या ठिकाणी होती. यांच्या हिशोबाप्रमाणे, जिथे पगार जास्त तिथे आम्ही, अशा नोकऱ्या बदलल्या जात होत्या.

त्यांच्या नोकऱ्यांच्या वेळा जुळत असतील तेव्हा त्यांचा दिवस नोकरीत जायचा. नंतर रात्री रंगायच्या. बैठ्या नोकरीतील धोक्यांबद्दल आणि दीर्घकाल कामामुळे येणाऱ्या मानसिक थकव्याबद्दल त्यांना घरी-दारी सतत ऐकावं लागत होतं. त्यामुळे ते योगसाधना करण्यातही थोडाफार वेळ घालवायचे. पिझ्झासारखं कचरान्न म्हणजे जंक फुड टाळून घरगुती खाणं मागवायचे. भरपूर पाणी, इतर द्रवपदार्थ सेवन करायचे. ताक, सोलकढी, तसंच आजकाल बारा महिने बत्तीस काळ मिळणारं पन्हं ही त्यांची आवडती पेयं होती. काही वेळा लिंबू सरबत, संत्र्याचा ज्युससुद्धा. कामाच्या ठिकाणी मात्र मिळेल ते पेय पिऊन आपण आम पब्लिक असल्याचं ते सिद्ध करायचे.

त्यांनी आहे त्यात समाधान मानायचं ठरवलं असतं तर त्यांची ही कथा इथेच संपली असती. इतर चार सामान्य माणसांप्रमाणेच त्यांचा संसार सुफळ संपूर्ण झाला असता. जगाला त्यांची दखल घ्यायची गरज वाटली नसती. पण यांना खूप पैसे मिळवून निवृत्त व्हायचं होतं. म्हणून ते नवनव्या नोकऱ्या शोधत राहिले. त्यामुळेच ही कथा जन्माला आली.

या दोघांच्या नोकऱ्या जोपर्यंत एका शहरात चालू होत्या तोपर्यंत वेळेच्या समायोजनाचा प्रश्न उद्भवला नव्हता. दोघांना नोकरीनिमित्त वेगवेगळ्या देशांमध्ये जाणं भाग पडलं आणि त्यांची कथा खऱ्या अर्थाने सुरू झाली. ‘दोन धृ्रवावर दोघे आपण' अशी परिस्थिती निर्माण झाली. त्या वेळी ताटातूट म्हणजे काय हे त्यांच्या लक्षात आलं.

दोघंही जिथे काम करत होते त्या कंपन्या यंत्रमानव निर्मितिक्षेत्रात कार्यरत होत्या. त्यांनी अशा समस्यांवर एक उपाय शोधून काढला होता. नवऱ्याला हुबेहूब बायकोसारखी दिसणारी यंत्र-स्त्री सोबतीला द्यायची, तर बायकोला नवऱ्यासारखा यंत्र-पुरुष सोबतीला द्यायचा. विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात जपानमध्ये यांत्रिक मेरिलीन मन्रोबरोबर नाचता येऊ लागलं होतं. नंतर जपानी हॉटेलांमधून यांत्रिक वेट्रेस सेवा देऊ लागल्या होत्या. आता एकटेपणा घालवण्यासाठी यांत्रिक सोबती पुरवले जाऊ लागले होते.

दिवसरात्र अशा तऱ्हेने सोबतीची सोय झाली, त्यामुळे या प्रयोगाला यश मिळतंय अशी प्रयोगकर्त्यांनी समजून करून घेतली. ही समजूत करून घेण्यात आपण घाई केली हे लवकरच त्यांच्या लक्षात आलं. कारण अशा यांत्रिक सोबत्यांमुळे इतर तक्रारी येऊ लागल्या.

या प्रकारच्या समस्येवर जपानमध्ये फार पूर्वीपासून एक उपाय केला जात होता. विसाव्या शतकाच्या अखेरीस जपानमध्ये महागाईमुळे म्हणा किंवा जागेच्या टंचाईमुळे म्हणा, पण तरुण पिढी एकेकटं राहणंच पसंत करू लागली होती. त्या वेळी कुणा तरी सुपीक डोक्यात एक कल्पना साकारली गेली, ती म्हणजे रबरी बाहुल्यांची संगत. आधी बाजारात नुसत्याच मानवी आकाराच्या मऊ बाहुल्या मिळू लागल्या. नंतर त्यांना जोडीदाराच्या गरजेनुसार अवयव देण्यात येऊ लागले. तरी तक्रारी येऊ लागल्या, तेव्हा त्या बाहुल्या पोकळ करून त्यात मानवी शरीराचं सरासरी तापमान होईल, अशा बेताने गरम पाणी भरण्याची सोय केली गेली.

पण आधुनिक काळातील तथाकथित संस्कृतिसंरक्षकांनी या विरोधात बोंब ठोकलीच. प्रकरणं न्यायालयात पोचली. विचारस्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित झाला. काही राज्यांत ईडीच्या धाडी पडल्या. विचारस्वातंत्र्याची तळी उचलून धरणाऱ्यांना अज्ञात व्यक्तींनी मारहाण केली. हे सगळं चालू असताना मूळ प्रश्न बाजूला पडला, तो म्हणजे तक्रार असलेल्यांच्या म्हणण्याचा. त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन बऱ्याच आयटी कंपन्यांनी त्यांच्या रोबोटिक्स शाखांना त्या कळवल्या आणि त्यावर उपाय शोधायला सांगितलं.

या तक्रारी सर्वसाधारणपणे एकाच प्रकारच्या होत्या. त्या म्हणजे या कृतक्‌‍ जोडीदारांकडून भावनिक प्रतिसाद अजिबात मिळत नव्हता. काहींनी ‘कष्टाच्या मानाने समाधान कमी' असं स्पष्ट लिहिलं होतं. सुरुवात बाहुल्यांमध्ये भरण्याच्या पाण्यापासून होत होती. नंतर ते साफ करणं आलंच. हे सगळे कष्ट कुणालाच नको होते. यापेक्षा या बाहुल्या येण्यापूर्वी बरं होतं, असं म्हणायला बहुतेकांनी सुरुवात केली. या यंत्रवत सहवासापेक्षा पूर्वी कल्पनेच्या विश्वात मनाप्रमाणे प्रियतम अथवा प्रियतमा मिळत असे. आपल्याकडच्या जुन्या चित्रपटांत नायक किंवा नायिका उशीला कवटाळून गाणं म्हणताना दाखवलं जायचं, हे काहीजणांना आठवत असेलच.

विसाव्या आणि एकविसाव्या शतकांच्या संधिकाली जे क्रेग व्हेंटनर नावाच्या एका शास्त्रज्ञाने जननिक प्रक्रियेत ढवळाढवळ करून हव्या त्या गुणधर्माची बालकं निर्माण करणं कसं शक्य आहे याची चुणूक दाखवली. तेव्हा काही व्यापारी वृत्तीच्या लोकांच्या डोक्यात ‘याचा फायदा करून घ्यावा' हा विचार आला. ते अपरिहार्यच होतं. दुनियेत सर्वच प्रकारचे लोक असतात म्हणा. अमेरिकेने अशा प्रकारच्या मानवी जनुकीय फेरफार करणाऱ्या संशोधनावर विनाविलंब बंदी घातली. त्यामुळे हे संशोधन इतरत्र केलं जाऊ लागलं. जेव्हा कंपन्यांच्या यंत्रमानवी शाखांना त्यांच्या पालक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना हव्या तशा जोडीदारांची निर्मिती करण्याचे आदेश दिले, तेव्हा यंत्रमानवी क्षेत्रात नवी स्पर्धा सुरू झाली. जैवतंत्रज्ञानविषयक संशोधन पत्रिकांवरची धूळ झटकली गेली.

आपल्या जोडीची ताटातूट झालेली आपण बघितलीच. किंबहुना, त्यामुळेच तर पुढचं कथानक घडलं. त्या दोघांनाही यंत्र-जोडीदार मिळाले. ते दिसण्यात अगदी त्यांच्या मानवी जोडीचे प्रतिरूप होते. त्यामुळे आपली जोडी इतर अशाच जोडप्यांप्रमाणे आनंदात जगू लागली. असा काही काळ गेला. त्यांची वार्षिक सुट्टी जवळ येत चालली होती. कधी एकदा आपल्या खऱ्या जोडीदाराला भेटतो, ही उत्सुकता त्यांना अस्वस्थ करत होती. त्यांचे यंत्र-जोडीदार भावनिक प्रतिसाद देत असले, तरीही त्यांच्या सहवासात असताना ‘हे काही खरं नाही' ही भावना मनातून काढून टाकणं त्यांना जमत नव्हतं.

त्यांची चलबिचल चालू होती, काहीशी तशीच पण थोडी वेगळीच घालमेल त्या यंत्र-जोडीदारांमध्येही सुरू होती.

(संपूर्ण लेख वाचा, यंदाच्या अनुभव मासिकाच्या दिवाळी अंकात..)

अंक पुढील संकेतस्थळांवर उपलब्ध आहे-

१. इंस्टामोजो

२. बुकगंगा

३. ॲमेझॉन

निरंजन घाटे







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results