एक झेन फकीर होऊन गेला, ताकुआन त्याचं नाव. त्याला कुणी विचारलं की, “तुझी साधना काय? कुठलं व्रत, कसलं तप तू करतोयस?”
तर ताकुआन म्हणायचा, “नाही बा, माझी कुठली साधना वगैरे नाही. माझ्या गुरूने जे सांगितलं तेच व्रत.”
“काय सांगितलं?”
“जेव्हा झोप येईल तेव्हा झोप. जेव्हा भूक लागेल, तेव्हा जेव. त्यामुळे मला झोप आली की मी झोपतो, जाग आली की उठतो. भूक लागली की जेवतो, भूक नसेल तेव्हा काही खात नाही. बोलण्याची गरज असते तेव्हा बोलतो, शांत राहण्याची स्थिती असते तेव्हा मौन धारण करतो.”
“अरे, ही असली कसली साधना?”
यावर ताकुआन म्हणायचा, “ठाऊक नाही. गुरूने मला असंच सांगितलं आहे. मात्र ही साधन करताना मला एक जाणीव झाली आहे. जे जे घडेल ते मी बघतो. जेव्हापासून मी झोप, भूक, जाग, मौन, बोलणं याचा ‘स्वीकार' केला आहे तेव्हापासून मी आनंदात आहे. मला दु:ख नाही. कारण दु:खाचं मूळ ‘दु:खात' नाही तर विरोधात, अस्वीकारात आहे. जेव्हापासून मी हे ‘जाणलं' आणि ‘जगायला लागलो’ तेव्हापासून मी मस्त झालो.”
मुकुंद कुलकर्णी | mukund59@gmail.com
मुकुंद कुलकर्णी हे प्रदीर्घ पत्रकारी अनुभव असलेले माजी संपादक आहेत. मध्य भारतातील आदिवासी समाजाचे आणि त्यांच्या प्रश्नांचे ते अभ्यासक आहेत. शिवाय ईशान्य भारतातील समाज, तसंच विविध धर्म आणि त्यांचं तत्त्वज्ञान हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहे.