जे जे स्वबळावर ठाम उभं,
ते ते आज कापलं जाणार
ज्यांची ज्यांची मूळं खोलवर,
ते ते आज कापलं जाणार
जे स्थिरचित्त, जे केवळ देत राहतं,
ते ते आज कापलंच जाणार
जे जे स्वतंत्र,
ते ते नक्कीच कापलं जाणार
ज्यांच्या मुळांना नसते अभिलाषा
आकाश हेपलण्याची नि
ज्यांच्या फांद्यांना नसतो लोभ
मुळांनी व्यापलेल्या
काही गुंठे भूखंडांचा,
ती कापलीच जाणार.
जे जे नैसर्गिक मूल्यांवर ठाम,
ते ते कापलंच जाणार.
झाडं उगारत नाहीत तलवारी,
झाडं काढत नाहीत मोर्चे,
करत नाहीत उपोषण
मागत नाहीत रेशन..
झाडं करत नाहीत गटबाजी
फणसाचा एक गट फोडून
त्यावर उगवत नाही केळी..
नारळावर चढून आंबा
बळकावत नाही त्याचं अस्तित्व
नि लावत नाही त्यावर
स्वतःच्या नावाचं बॅनर…
जिथं जिथं माणसं नसतात,
तिथं तिथं झाडं धरून ठेवतात जमीन
घरं फुटून माणसं आदळआपट करत
गाव सोडून निघून जातात
तेव्हाही पडिक जागेत
उगवत राहतात झाडं
धरून ठेवतात जमेल तशा भिंती
बांधू देतात पक्ष्यांना खोपी.
आपल्यातलं एक झाड पडलं
तरी खांद्यावर पेलून धरतात
त्याचं ओझं, त्याची माती होईस्तो
नि मातीतून पुन्हा उगवेस्तो.
झाडांना राग येत नाही
नागडं म्हटल्यानं,
झाडं दुखावत नाहीत
अंगाखांद्यावर चढल्यानं,
झाडं झोका बांधू देतात
रडणाऱ्या बाळांसाठी,
झाडं गळफासही बांधू देतात
रडून हारलेल्यांसाठी…
झाडं धरून ठेवतात महापुरात
वाहून जाणारी माणसं,
पूर ओसरल्यावर तीच माणसं
देवाचे आभार मानायला
निघून जातात तेव्हाही
झाडं काही न बोलता निमूट
शांत निथळत राहतात…
तरीही झाडं वारंवार
कापली जातात, कारण -
लोकांनी विसंबू नये झाडांवर
त्यांच्या सावलीवर
त्यांच्या फुलाफळांवर..
नि लोकांच्या रांगा लागाव्यात
सावलीसाठी, फुलांसाठी
पाण्यासाठी, खाण्यासाठी
केवळ राजमहालासमोर…
मंदिर-मशिदीच्या अंगणातलं,
राजमहालाच्या प्रांगणातलं,
झोपडीला बिलगलेलं,
आश्रमातलं, अनाथाश्रमातलं,
बगीचातलं, मसणवटीतलं,
झाड असणं हीच जात
तोच त्याचा धर्म.
झाडं सहिष्णू असतात,
झाडं सोशिक असतात,
झाडं होऊ देत नाहीत
अंगणाचं रणांगण
झाडं युद्ध थांबवतात
झाडं बुद्ध बनवतात.
म्हणूनच युद्धखोर माणसं
अधिकाधिक पिसाटून
सपासप झाडं कापत जातात
नि रचत जातात
विराट सरण स्वतःचंच…
दत्ता पाटील | datapatilnsk@gmail.com
दत्ता पाटील मराठी प्रायोगिक रंगभूमीवरील प्रयोगशील नाट्यलेखक आहेत.
