काही विचारतुषार
अज्ञान-ज्ञान
अज्ञानाचे बी पेरले तर अज्ञानाचे रोपच उगवणार. बाजरी पेरली, तर गहू का येणार आहे? का सफरचंदे येतील?
पण माणूस जाणून-बुजून अज्ञानाची कास धरतो, अज्ञानाचा पदर धरून जात राहतो. अज्ञानाच्या खांद्यावर हात टाकून, डोळे मिटून जगणे त्याला आवडते.
अज्ञानाचा मोह क्षणिक आनंद देतो- तेच त्याला हवे असते. तो समोरच्या क्षणावरच विसंबतो. समोरून येणाऱ्या क्षणामागे दडलेले अनंत क्षण त्याला दिसत नाहीत अथवा तिकडे तो लक्ष देत नाही. त्या अनंत क्षणांचा वेध घेणे, पाहणे याला मनाची ताकद, धिटाई, धाडस लागते. समोरून येऊन मिठी घालणारा क्षण- याला अनुभव म्हणतात, या मिठीच्या पलीकडचे जेव्हा अनुभवाला येते त्याला अनुभूती म्हणतात आणि फारच दूरवरच्या क्षणांचे रूप दिसत असते त्याला साक्षात्कार म्हणतात.
अज्ञानाची भक्ती करण्यात, आराधना करण्यात, पूजा-आरती करण्यात माणसाचे मन रमते, कारण ते करणे सोपे असते.
अज्ञानाचे खडक फोडावेत तेव्हा त्या अज्ञानाच्या आतल्या गाभ्यात जीवनातला एक अद्भुत चमत्कार दिसू लागतो. अज्ञानावर जिज्ञासेचे घाव पडतात तेव्हाच आतल्या ज्ञानाचे स्वरूप लक्षात येते, एरवी नाही. पण हे कष्टाचे काम. कारण त्यापायी अनंत हाल सोसावे लागतात. झोप उडून जाते. लोक वेड्यात काढतात. प्रपंचाची म्हणजे क्षणिक आनंदाची शुद्ध नसलेला माणूस- मग प्रपंचाबाहेर फेकला जातो. कधी कधी त्याला ज्ञान हात देते, कधी कधी ज्ञानाचा हात त्याच्यापर्यंत पोहोचत नाही नि मग थकवा सहन न होऊन तो बुडून जातो, अर्ध्या प्रवाहात.
निसर्ग
अज्ञान, ज्ञान, विज्ञान आणि तत्त्वज्ञान ही मानवी मनाच्या आकांक्षेची चतु:सूत्री आहे. हेच खरे चार वेद आहेत.
सामाजिक शैशव, कौमार्य, तारुण्य, वार्धक्य या चार अवस्थांचे ते निदर्शक आहे.
निसर्गातले नियम आणि सामाजिक स्वास्थ्याचे नियम या दोन विषयांच्या अभ्यासातच मानवी इतिहासाची गती दिसत असते.
निसर्गाचा अभ्यास म्हणजे ब्रह्मांड-आकाश, वायू, पृथ्वी, अग्नी, जल या पौराणिक पंचतत्त्वांचा खोटा, धार्मिक, कोकिळबकांनी वेढलेला अभ्यास नव्हे.
निसर्ग ही वैचारिक भावना नाही, ती ऐतिहासिक वस्तुस्थिती (मटेरियल) आहे.
आकाशस्थ (आणि अवकाशस्थ) निसर्गाचे स्वरूप आणि पृथ्वीवरील निसर्गाचे स्वरूप याचा विज्ञानाने अभ्यास व्हायला हवा. पृथ्वीवरील निसर्ग म्हणजे अन्नधान्य देणारी वनस्पतीसृष्टी अधिक खनिजसृष्टी! अन्नधान्य म्हणजे- अन्न, वस्त्र, औषध, घर आणि शस्त्र यांच्या उत्पादनावर समाजाची धारणा उभी असणे.
प्राचीन माणूस
पाषाणयुगात जेव्हा पाषाण प्रचंड होते, सूर्याच्या तापाने आणि पावसाच्या वृष्टीने झिजून लहान झालेले नव्हते, तेव्हा प्राचीन माणूस डोंगराच्या कडेकपारीत (आता फुटपाथवरच्या भिंतींच्या सावलीत बेघरवाले राहतात त्याप्रमाणे) किंवा घळीत-गुहेत (आज पुलाखाली बेघरवाले वसतीला येतात त्याप्रमाणे) राहत होता.
घर हा शब्द तेव्हा जन्म पावला नव्हता. घर नावाची कल्पनाही जन्माला आलेली नव्हती. उन्हापासून, पाऊस-वाऱ्यापासून संरक्षण करणारी जागा-निवारा, त्यालाच ते घर समजत असत. पशू-पक्ष्यांनाही-त्यातल्या त्यात पशूंनाही बांधलेले घर नसते, हे त्यांना दिसत होते.
पण कावळे, चिमण्या, घारी काड्या, पिसे चोचीत आणून घरासारखी वास्तू रचू शकतात हे जेव्हा त्या प्राचीन माणसांतील स्त्रीने पाहिले, तेव्हा तिने झाडाच्या पडलेल्या फांद्या, गवत, लाकूड, दगड-धोंडे यांचे आपल्या गुहे-कपारीभोवती कुंपण रचून घर तयार केले. का, तर आपल्या रांगत्या, छोट्या मुलांनी उघड्यावर रांगत जाऊ नये आणि त्यांना हिंस्र पशूंनी खाऊ नये वा शिंगांनी भोसकू नये म्हणून. घर ही मातृत्वाच्या मनातून निर्माण झालेली कल्पना आणि रचना आहे.
झाडांच्या फांद्या, काड्या आणि झावळ्या जमवून पक्षी जसे घरटे विणतात, तसे त्या स्त्रीने विणकामही केले असावे. मुलाला ऊब मिळावी म्हणून पहिली वल्कले-वस्त्रे त्या स्त्रीनेच विणली असावीत.
पशू- म्हणजे रानगायी, रानम्हशी, रानशेळ्या, उंट, घोडे, वाघ-सिंह इ. सस्तन प्राणी आपल्या पिलांना पाजतात, तेव्हा आपल्या स्त्रीचे दूध आपण का पिऊ नये असेही पुरुषाला वाटले असावे. लहान मुलाला पाजून झाल्यानंतर त्या स्त्रीचे स्तन दुधाने कडसले- गच्च तडसले- तर ती रग हलकी व्हावी, म्हणून स्त्री पुरुषाला आपणहून पाजतही असावी. वृद्ध- ज्यांचे दात पडले आहेत त्यांनाही ती स्त्री पाजत असावी. तेव्हा स्तनांकडे कामतृप्तीचे शृंगारिक अंग वा साधन म्हणून पाहिले जात नसावे.
कंदमुळे आणि फळे यांच्याबरोबरीने मध आणि गोदूध त्या घरात अन्न झालेले होते.
शिकारीची कल्पना नंतरची असावी.
पाण्यातली सुसर, मगर मासे खातात. वाघ-सिंह, कोल्हे-लांडगे वनगायी-वनशेळ्या, रानडुकरे, हरणे खातात, तेव्हा त्यांनी खाऊन उरलेले उष्टे मांस खाण्याची माणसाला प्रथम सवय लागली असावी. मग स्वत:च प्राणी का मारू नये, म्हणून तो शिकारीला बाहेर पडला असावा. काठ्या, काठ्यांच्या टोकाला आवळून खोचलेला टोकदार दगड अथवा फार दुरून फेकता येईल असा भाला, गलोल, गुंफण आणि बाण ही शिकारीची हत्यारे त्याने आपली कल्पना वापरून तयार केली असावीत.
तोडलेली फळे पुन्हा खाता यावीत म्हणून- कोल्हे, कुत्रे जसे हाड जमिनीत लपवून ठेवतात तसे- जमिनीत ती फळे लपवून ठेवल्यानंतर त्या कुजलेल्या फळांच्या कोयीतून-बियांतून नवे रोप आलेले पाहून त्यांना जमिनीत बी लावण्याची, म्हणजेच कालांतराने प्राथमिक शेतीची कल्पना आलेली असावी.
एके दिवशी शिकार करताना एक वृद्ध माणूस जखमी झाला. त्याचा एक पाय कामातून गेला असावा. तेव्हा त्याला उचलून शिकारसंघाने गुहेत आणून ठेवले. जखमेच्या वेदना विसरण्यासाठी तो वृद्ध माणूस बसल्या बसल्या गुहेतले खडे मांडून ठेवू लागला. काही खडे खेळून होताच उजाडले. सूर्याची पहिली किरणे त्याला दिसली. पुन्हा तोच खेळ खेळायचा त्याला चाळा लागला. खड्यांच्या डावावरून तो वृद्ध जेव्हा सूर्येादय वर्तवू लागला, तेव्हा या अधू-पांगळ्याला सूर्याचे ज्ञान आहे, सूर्य त्याच्याशी बोलत असावा असे शिकारसंघाला वाटून त्यांनी त्याला ज्ञानी म्हणजे शहाणा, म्हणजे सूर्य-चंद्राची (दिव्य) भाषा समजणारा असे ठरवले असावे. आता त्या वृद्धाला गुहेतील एक मानाची जागा मिळाली. तो वृद्ध सूर्य-चंद्राचीच नव्हे तर वादळ-पावसाची भाषा शिकू लागला, तेव्हा त्याच्याविषयीची आदराची भावना आणखी वाढली. तो वृद्ध नदी-ओढ्याची, फळा-फुलांची भाषा करू लागला. तेव्हा तर त्याला संघ-पितृत्व (राष्ट्रपतीपद) लाभले! पण मी देव नसून ही सारी सृष्टी जन्माला घालणारा एक दुसरा देव आहे, अशी जेव्हा त्या वृद्धाच्या तोंडून भाषा निघाली तेव्हा भाषेला धर्माचे म्हणजे रानटी तत्त्वज्ञानाचे महत्त्व लाभले!
प्राचीन ऋषी हे असे जन्माला आले असावेत. अगतिक वार्धक्यातले तत्त्वचिंतन!
वार्धक्याविषयी आदराची भावना अशी जन्म पावली असावी आणि वाढीला लागली असावी.
सूर्य हा प्रकाश आणि ऊब देणारा देव आहे. त्याने ठेवलेली स्त्री म्हणजे चंद्र आणि त्यांच्यापासून झालेली मुले म्हणजे नक्षत्र-तारे, असे एखादे स्तोत्र (कवन) त्या वृद्धाने रचले असावे.
प्रकाश आणि ऊब, वारा-वादळ आणि थंडी, नदी-ढग, विजा-पाऊस या निसर्गातील अद्भुत अवस्थांचेप्रतीकात्मक देव कालांतराने निर्माण झाले, तर त्यात त्या वृद्ध ऋषीला दोषी का ठरवावे?
(संपूर्ण लेख वाचा, यंदाच्या अनुभव मासिकाच्या दिवाळी अंकात..)
अंक पुढील संकेतस्थळांवर उपलब्ध आहे-
१. इंस्टामोजो
२. बुकगंगा
३. ॲमेझॉन
