
बऱ्याचदा अशा बातम्या आपल्या वाचण्यात येतात- अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत कुणा विद्यार्थ्याने अवघड परीक्षा पास केली, किंवा एखाद्या गरीब, पैशांची चणचण असणाऱ्या व्यक्तीने कोणाची तरी सापडलेली मौल्यवान वस्तू परत केली. असं काही वाचलं, की त्या व्यक्तींबद्दल कौतुक आणि आदर तर वाटतोच, पण त्यापलीकडेही मानवी मन नेमकं कसं काम करतं याबद्दल कुतूहल निर्माण होतं.
नेमक्या कोणत्या तत्त्वावर चालतं आपलं मन? मनाच्या अनेक समस्या आणि आजार यांची कारणं, लक्षणं आणि उपाय यावर आपण चर्चा केली. आपल्या आजूबाजूला संतापलेली, चिडलेली, निराश झालेली माणसं दिसतात. त्याबरोबर अतिशय संयमी, समंजस अशी माणसंही आपण पाहतोच. आपणही कधी चिडतो, निराश होतो, तर कधी आपण अनपेक्षितपणे एखादा प्रसंग अतिशय धीटपणे हाताळलेला असतो. माणसाच्या या नैसर्गिक ‘आदिम' आणि ‘उन्नत' भावना ज्याप्रमाणे काम करतात त्यातच त्याचं माणूसपण आहे.
आपण मागील काही लेखांत पाहिलं, की माणसाच्या भावना उत्क्रांतीदरम्यान विकसित झाल्या आहेत. माणसाला भावनांचे एकूण तीन सेट्स मिळाले आहेत असं आपण म्हणू शकतो. काही भावना माणसाच्या अस्तित्वाबरोबर तयार झाल्या. इथे या ग्रहावर टिकून राहण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी त्या आवश्यक होत्या. उदा. राग, चिंता, मत्सर, भीती, किळस, दु:ख. पण उत्क्रांतीच्या पुढच्या टप्प्यावर माणसाला समजलं की केवळ आपण जिवंत राहून चालणार नाही. आपल्याबरोबर ‘इतरही' महत्त्वाचे आहेत. यातूनच साधारण ५० ते ७० हजार वर्षांपूर्वी मस्तिष्क (कॉर्टेक्स) तयार होऊन आपल्याला भावनांचा आणखी एक सेट मिळाला. यांना आपण प्रगत भावना म्हणू शकतो. उदा. परिस्थितीचं निरीक्षण करता येणं, अनुमान काढता येणं, आपण जे काही निर्णय घेऊ त्याचे परिणाम समजू शकणं, इत्यादी. प्रगत भावना जाणतात, की मला जगायचं असेल तर इतरांनी जगणं गरजेचं आहे. सगळ्यात शेवटी तयार झाल्या त्या उन्नत भावना किंवा उत्क्रांत भावना. (या भावना कोणत्या ते पुढे येईलच.)
माणसाकडे जर या सगळ्या प्रकारच्या भावना आहेत तर जे जे त्रासदायक ते ते बदलण्यात वेळ घालवायचा की जे छान आहे ते वाढवण्याकडे लक्ष पुरवायचं, हा मानसशास्त्रातील जुना वाद आहे. पारंपरिक मानसशास्त्र पूर्णपणे मानसिक समस्या आणि मानसिक आजार यांच्यावर लक्ष केंद्रित करतं. तर नव्याने निर्माण झालेली ‘सकारात्मक मानसशास्त्र' ही शाखा असं मानते, की माणसामध्ये जशा प्राथमिक भावना आहेत तशाच प्रगत आणि उन्नत भावना आहेत; त्या वाढवणं आणि त्यांचा जास्तीत जास्त वापर करणं माणसाच्या हातात आहे. आदिम भावना आपल्याला कायम सांगत राहतात, की आपल्याकडे सतत काही तरी हक्काचं, मालकीचं असलं पाहिजे, तरच आपण जिवंत राहू शकतो. पण ते नेमकं किती असलं पाहिजे हे कधीच समजत नाही. मग माणूस आयुष्यभर धावत राहतो आणि त्यातून चिंता आणि नैराश्य यांचं चक्र सुरू होतं.
एरिक फ्रॉम या मानसशास्त्रज्ञाने ‘टु हॅव ॲन्ड टु बी'चा झगडा खूप छान मांडला आहे. आपल्याला असं वाटत राहतं, की आपल्या मालकीच्या जितक्या अधिक गोष्टी असतील तितके आपण खूप खूष किंवा समाधानी होऊ शकतो. या प्रवासात कोणी प्रसिद्धीच्या मागे लागतं, कोणी पैसे कमावण्याचा ध्यास घेतं, कोणी इतर माणसांवर हक्क गाजवायला लागतं. पण आपल्याला पाहिजे ते मिळाल्यावर माणूस समाधानी होतो का? एरिक फ्रॉमने याचं उत्तर ‘नाही' असं दिलं आहे. माणूस म्हणून आपलं अस्तित्व शोधण्यात आणि स्वीकारण्यात समाधान असतं, असं त्याचं म्हणणं. पण हा त्याने मांडलेला सिद्धांत होता. सकारात्मक मानसशास्त्राच्या अभ्यासाने या सिद्धांताला प्रयोगाची जोड दिली. माणसाला नेमकं समाधान कशाने मिळतं, या विषयावर या शाखेत अनेक ठिकाणी अनेक अभ्यास झाले आहेत.
त्याबद्दल जाणून घेण्याआधी आपण शैलाचं उदाहरण पाहू या. शैला आर्थिकदृष्ट्या वंचित गटातून आलेली मुलगी. लहानपणापासून तिने अनुभवलं होतं, की पैसे नसतील तर काही खरं नाही. सुखाने, शांततेने राहायचं असेल तर पैसा कमावला पाहिजे. तिने उच्च शिक्षण घेतलं. ती बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये कामाला लागली. भरपूर पैसा मिळू लागला तसा तिला आनंद झाला. घरात येणाऱ्या प्रत्येक नव्या वस्तूच्या रूपातही तो येऊ लागला. मग शैलाला समजलं, की कंपनीत नेहमीच्या नियमित वेळेपेक्षा जास्त थांबून काम केलं तर पैसे जास्त मिळतात. तसंच सुट्ट्या घेतल्या नाहीत तर कंपनी त्याचेही पैसे देते. हळूहळू शैला पैसे कमावणारं मशिन झाली. मग पैसा वाढत गेला त्या प्रमाणात शैलाचा आनंद वाढत गेला का?
आनंद कसा मिळतो आणि कसा वाढतो यावर २००९ साली कोलंबिया विद्यापीठात एक अभ्यास झाला. बहुतेक लोकांना वाटतं, की पैसे जितके जास्त मिळतील तितका आनंद वाढेल; पण तसं होत नाही, पैशाने काही ठराविक काळापर्यंतच आनंद मिळतो, असं अभ्यासातून दिसून आलं. प्रत्येक माणसाची आनंद अनुभवता येण्याची एक पातळी असते. त्या व्यक्तीच्या आयुष्यात काही चांगली घटना घडली (उदा. घरातील लग्न, चांगल्या ठिकाणी शिकायला जाता येणं) तर ही पातळी काही प्रमाणात वाढते; पण त्या घटनेनंतर ती परत मूळ पदावर येते. म्हणून पैसे वाढतात तशी आनंदाची पातळी वाढत नाही.
असाच आणखी एक अभ्यास झाला. लोक जितक्या जास्त वस्तू खरेदी करतात किंवा त्यांच्या मालकीच्या गोष्टी जितक्या वाढत जातात तितके ते आनंदी होतात का हे या अभ्यासात पाहिलं गेलं. वस्तू खरेदी करताना जितका आनंद होतो तितका खरेदी पूर्ण झाल्यावर टिकत नाही असं दिसून आलं. त्यातून असा निष्कर्ष काढण्यात आला, की माणसाचा आनंद इतरांशी अर्थपूर्ण पद्धतीने जोडला जाण्याने वाढतो आणि टिकतोही.
सकारात्मक मानसशास्त्र शाखेत २००५ साली आणखी एक प्रयोग झाला. प्रयोगात सहभागी झालेल्या व्यक्तींना दिवसातून तीन वेळा कोणत्याही गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला सांगितलं गेलं. हा प्रयोग तीन महिने सुरू होता. प्रयोग सुरू होण्याआधी सहभागी व्यक्तींच्या मानसिक आरोग्याची चाचणी घेतलेली होती. तीन महिन्यांनंतर पुन्हा त्यांचं मानसिक आरोग्य तपासलं, तेव्हा त्यांच्या आनंद आणि समाधानाच्या एकंदर पातळीत खूप फरक पडल्याचं दिसून आलं.
आपल्या प्राथमिक भावना आपल्याला सतत ‘काय नाही' हे पाहायला शिकवतात. म्हणजे घर विविध वस्तूंनी भरलेलं असलं तरी एखादी गोष्ट न मिळाल्याने माणसं दुःखी दिसतात. आजूबाजूला काळजी घेणारे अनेक लोक असले तरी आपल्याला प्रेम मिळालं नाही म्हणून त्रास करून घेतात. उत्क्रांतीदरम्यान माणूस जंगलात राहत होता तेव्हा त्याला ‘काय नाही' हे सतत पाहण्याची गरज होती. असं सतत शोधल्याने तो त्याचं भविष्य सुरक्षित करत होता. पण आता समाजातील ज्या घटकांना जगण्यासाठी आवश्यक गोष्टी सहज मिळत आहेत त्यांना ही सवय बाळगण्याची गरज आहे का? दुसऱ्या शब्दांत सांगायचं, तर आता जे ‘नाही' ते पाहायची गरज आहे की जे ‘आहे' ते पाहिल्याने आपण आनंदी आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ राहू शकतो?
आपण सगळीकडे पुढे असू, सगळ्यात पहिला नंबर येत असेल; आपल्याला एक तरी कला अवगत असेल, चार लोकांमध्ये बोलता येईल इतकी माहिती आपल्याकडे असेल तर आपण इतरांना आवडतो असा समज अनेकांचा असतो. मैथिली एक शहरी तरुणी. लहानपणापासून सगळ्या विषयांत पुढे असणारी, चित्रकलेच्या परीक्षा दिलेली, आरंगेत्रम झालेली, कंपनीत अनेक अवॉर्ड मिळालेली मुलगी. तिला वाटायचं, आपण सतत सगळीकडे पुढे असलो की लोकांना नक्कीच आवडू. तुम्हाला काय वाटतं? सतत सगळीकडे पुढे असणारी माणसं इतरांना आवडतात की त्यांच्याबद्दल मत्सर वाटू लागतो? आपल्याला अनेक वर्षं शिकवलेलं असतं, की कसंही करून इतरांना मागे टाकणं, स्पर्धेत सगळ्यांच्या पुढे असणं, ‘आपण मागे पडलो तर काय' या विचाराने सतत त्रस्त असणं हाच अंतिम सुखाचा आणि समाधानाचा मार्ग आहे. २०१२ मध्ये अमेरिकेत या अनुषंगाने एक अभ्यास झाला. जी मुलं वर्गात सगळ्यात जास्त लोकप्रिय होती त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या चाचण्या झाल्या. त्यात आढळलं, की एकमेकांवरील विश्वास, तदनुभूती आणि मूल्यांची स्पष्टता जितकी जास्त तितकं आनंदाचं रसायन जास्त स्रवतं. ज्या मुलांमध्ये करुणा ही भावना अधिक आढळली ती मुलं इतरांमध्ये जास्त प्रिय होती असं दिसलं. इतरांना मदत करणारी मुलं अधिक लोकप्रिय असल्याचं आढळलं.
आपण मार्च महिन्याच्या लेखात बघितलं होतं, की माणसं मनातलं न्यूनत्व हाताळताना तीन ‘पी' वापरतात. सतत सगळ्यांना खूष ठेवा (प्लीज), सतत काम करत रहा (परफॉर्म), सतत बिनचूक राहण्याचा ताण घ्या (परफेक्शन). लोकांना सतत खूष ठेवल्याशिवाय, सतत कामात जुंपून घेऊन स्वत:चं अस्तित्व सिद्ध केल्याशिवाय आणि सतत बिनचूक राहिल्याशिवाय आपण सुरक्षित राहू शकत नाही, असं आपल्या आदिम भावना आपल्याला सांगत असतात. पण असं खरंच होतं का? खरंच सतत काम करणं आनंद आणि सुरक्षा देतं का? २०१३ मध्ये यावर अभ्यास झाला. अभ्यासादरम्यान विविध वर्गांतल्या लोकांचं निरीक्षण केलं गेलं. जी माणसं स्वतःच्या कामांना आणि इतरांच्या कल्याणालाही महत्त्व देत होती त्यांच्या आनंदाची पातळी बरीच जास्त असल्याचं दिसलं. आपल्याला दोन प्रकारची माणसं दिसतात. पहिला प्रकार असा, की ज्यात माणसं स्वत:चा काही फायदा दिसल्याशिवाय काहीच करत नाहीत, तर दुसऱ्या प्रकारच्या व्यक्ती केवळ इतरांची ध्येयं पूर्ण करण्यासाठीच काम करत राहतात. स्वत:ची ध्येयं ठरवणं आणि ती पूर्ण करणं यातील समाधान घेऊ शकत नाहीत. या दोन्ही टोकांचा समन्वय ज्यांना साधता येतो ती माणसं अधिक समाधानी होतात असं दिसतं.
जास्तीत जास्त उपभोग घेण्याची इच्छा ‘भीती' या आदिम भावनेतून येते. भीती आपल्याला सांगते- जास्तीत जास्त घ्या, जास्तीत जास्त संचय करा. भांडवलशाही या भीतीला वाढवण्याचं काम करते. जास्तीत जास्त उपभोगावरच पूर्ण सिस्टीम रचली गेली आहे. आपण भीतीच्या आहारी जातो तितकी भांडवलशाही बळकट होत जाते. पण जास्तीत जास्त उपभोगाने खरंच आनंद वाढतो का? यावर एक अभ्यास झाला आहे. १९६० साली स्टॅनफर्ड विद्यापीठातील प्राध्यापक वॉल्टर मिशेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक प्रयोग केला. त्यांनी चार ते पाच वर्षांच्या मुलांना एका रूममध्ये बोलावलं आणि त्यांच्यासमोर मार्शमेलो ठेवलं. (मार्शमेलो - मुलांचा एक पाश्चात्त्य गोड खाऊ) प्रयोगकर्त्यांनी मुलांना सांगितलं, की मी थोडा वेळ रूमच्या बाहेर जाणार आहे, मी येईपर्यंत तू हे खाल्लं नाहीस तर तुला दोन मार्शमेलो मिळतील; पण मी यायच्या आधी खाल्लंस तर मात्र हे आत्ता दिलेलं एकच मिळेल. तो प्रयोग अनुभवणं ही एक मजा होती. कारण मुलांना दिसणार नाही अशा पद्धतीने बाहेरून त्यांचं निरीक्षण केलं जात होतं. प्रयोगकर्ते पंधरा मिनिटांसाठी बाहेर जाऊन पुन्हा यायचे. ते बाहेर पडल्या पडल्या काही मुलं मार्शमेलोवर झडप घालायची, तर काही मुलं प्रयोगकर्ता येईपर्यंत वाट पाहायची.
हा प्रयोग इथे संपला नाही. पुढे चाळीस वर्षं या सहभागी मुलांना नियमित भेटून त्यांच्या मुलाखती घेतल्या गेल्या. त्यात असं दिसलं, की लहानपणी त्या प्रयोगादरम्यान ज्यांनी संयम दाखवला होता त्यांना पुढे अनेक अर्थांनी आयुष्य छान जगता आलं. त्यांच्यात व्यसन, स्थूलता, इतर जीवनशैलीचे आजार दिसले नाहीत. त्यांनी ठरवलेली ध्येयं त्यांना पूर्ण करता आली. म्हणजेच उतावीळपणाने घेतलेल्या उपभोगापेक्षा संयमाने घेतलेला उपभोग जास्त मदत करतो हे सिद्ध झालं.
आपण हतबलतेविषयी एक लेख (एप्रिल अंक) पाहिला होता. त्यात असं म्हटलं होतं, की आजूबाजूची परिस्थिती माणसाला जास्तीत जास्त हतबल बनवत नेते. त्याला अनुभवातून आलेली हतबलता (लर्नेड
हेल्पलेसनेस) असं म्हटलं जातं. उदा. घरातील व्यक्तीचं मोठं कर्ज, दीर्घ आजारपणं याने माणसाला वाटू लागतं की माझ्या हातात काहीच राहिलं नाही. पण हे सर्वांच्याच बाबतीत होतं असं नाही. सकारात्मक मानसशास्त्राचा पिता मार्टिन सेलिंगमन याला असा प्रश्न पडला, की अशा परिस्थितीत काही माणसं हतबल होतात तर काही आशावादी राहतात. असं कसं होत असेल? तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं, की माणसं प्रतिकूल परिस्थितीतील कोणत्या कारणांकडे बघतात यावर त्यांची हतबलता आणि पर्यायाने नैराश्य ठरतं. अनुभवातून अशी हतबलता येऊ शकते, तर माणूस आशावादसुद्धा शिकू शकतो (लर्नेड ऑप्टिमिझम) असं त्याने मांडलं. लहानपणापासून परिस्थितीची चिकित्सा करायला शिकवली आणि आशावादी राहण्यासाठी आवश्यक असलेले घटक पाहायला शिकवलं तर माणूस बरंच काही मिळवू शकतो, अशी त्याची मांडणी आहे. या विषयांतर्गत जे काही अभ्यास झाले त्यात असं दिसलं, की आशावादी व्यक्ती जास्त निरोगी होत्या, त्यांच्यामध्ये जीवनशैलीचे आजार (उदा. मधुमेह, रक्तदाब) कमी आढळले. त्यांची आर्थिक स्थिती
आणि समाजातील स्थान दोन्ही चांगलं असल्याचं दिसलं. म्हणून उन्नत भावना आपल्या आयुष्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतात असं आपण म्हणू शकतो.
आस्था, करुणा, तन्मयता, नम्रता, कृतज्ञता, निरपेक्ष त्याग, प्रामाणिकपणा, क्षमा, निग्रह आणि संयम, सहिष्णुता या माणसातल्या उन्नत भावना आहेत. उत्क्रांतीच्या कालप्रवासाच्या दृष्टीने पाहिलं तर आदिम भावनांच्या तुलनेत उन्नत भावना अगदी अलीकडच्या आहेत. त्या आपल्या अंगी सहजी बाणवल्या जात नाहीत. कोणत्याही परिस्थितीत आदिम भावना जशा वेगाने आपला ताबा घेतात, तसं उन्नत भावनांच्या बाबतीत होत नाही. पण आपल्याला विचारपूर्वक उन्नत भावनांचा समावेश आपल्या आयुष्यात करावा लागेल. कारण उन्नत भावनांशिवाय आपल्याला भविष्य नाही. मनुष्यप्राण्याने आता सतत अस्तित्वाची चिंता केली नाही तरी चालणार आहे. आता स्पर्धेची नाही तर आस्थेची आणि सहकार्याची गरज कधी नव्हे एवढी निर्माण झाली आहे.
आपल्या मेंदूचा विकास मागच्या बाजूने होत आला आहे. आदिम भावना मानेच्या वरच्या भागात म्हणजे लिंबिक सिस्टीममध्ये निर्माण होतात, तर उन्नत भावना कपाळाच्या मागील भागात निर्माण होतात. उत्क्रांती कधीही उलट्या दिशेने जात नाही. आदिम भावना आपल्याला फक्त आपलाच विचार करायला शिकवतात, तर उन्नत भावना आपल्याबरोबर इतर लोक, समाज, प्राणी, पक्षी, पर्यावरण आणि संपूर्ण जगाची काळजी कशी घ्यायची हे शिकवतात. त्यामुळे आपण जितके मागे जाऊन केवळ आदिम भावनांचा उपयोग करू तितकं आपलं अस्तित्व टिकणं अवघड आहे. आपण वरील सर्व प्रयोगांत पाहिलं की केवळ अस्तित्व टिकणं महत्त्वाचं नाही तर आपल्याला आनंदी आणि समाधानीही राहता आलं पाहिजे. त्यासाठी उन्नत भावना महत्त्वाच्या आहेत.
आपण या लेखमालिकेत मानसिक आरोग्याचे अनेक पैलू पहिले, पण या विषयाचा आवाका यापेक्षा खूपच मोठा आहे. आपलं मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी आपण विविध मार्गांनी माहिती घेऊ शकतो, स्वत:च्या भावना आणि वर्तनाचं निरीक्षण करू शकतो आणि आवश्यक तिथे मदत घेऊ शकतो.
गौरी जानवेकर | gjanvekar@gmail.com
या क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि समुपदेशक आहेत. त्या या विषयावर लेखन करतात, कार्यशाळाही घेतात.