आम्ही कोण?
काय सांगता!  

डायहायड्रोजन मोनोक्साइड, ब्रेकिंग न्यूज आणि सारासार विचारबुद्धी

  • प्रीति छत्रे
  • 14.07.25
  • वाचनवेळ 2 मि.
zohnerism

अमेरिकेतली १९९७ सालातली एक गोष्ट सांगितली जाते. नेथन झॉनर (Nathan Zohner) नावाच्या विद्यार्थ्याने आपल्या शाळेच्या सायन्स फेअरमध्ये एक प्रकल्प मांडला. ‘डायहायड्रोजन मोनोक्साइड’ नावाच्या एका घातक रसायनाकडे त्याने सर्वांचं लक्ष वेधलं. त्याच्या म्हणण्यानुसार, हे रसायन आपल्या अवतीभोवती सगळीकडे असतं आणि त्याचा वापर आपण ताबडतोब थांबवायला हवा. आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ त्याने अनेक तथ्यं सांगितली- या रसायनामुळे दरवर्षी असंख्य माणसं मरतात; त्याने धातूच्या वस्तू गंजतात; हे रसायन वायूरूपात असतं तेव्हा आपल्याला त्याने भाजण्याचा धोका असतो; हे रसायन पोटात गेलं तर मूत्रनिर्मिती जलद होते, पोटाला तडस लागू शकते; या रसायनावर अवलंबून राहिलं आणि नंतर त्याचा वापर थांबवला तर मृत्यू ओढवू शकतो.

हे सगळे परिणाम व्यवस्थित समजावून देऊन मग त्याने आपल्या वर्गाला एक प्रश्न विचारला- ‘या रसायनाच्या वापरावर बंदी आणावी असं तुम्हाला वाटतं का?’ ५० पैकी ४३ जणांनी ‘हो’ असं उत्तर दिलं. हे विषारी रसायन वापरता कामा नये याबद्दल त्यांची खात्री पटली होती.

पण गंमत अशी, की हे रसायन विषारी, घातक वगैरे अजिबात नसतं.

‘डायहायड्रोजन मोनोक्साइड’ म्हणजे हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू. त्याचं रासायनिक सूत्र होईल- H2O. म्हणजे पाणी!

पाणी आपल्या अवतीभवती सगळीकडे असतंच. दरवर्षी जगभरात पुराच्या पाण्याने कितीतरी मृत्यू होतात. पाण्याने किंवा दव पडल्याने लोखंड गंजतं. वायूरूपातलं पाणी म्हणजे वाफ, वाफेमुळे आपल्याला भाजण्याचा धोका असतो. पण पाण्यावर आपण अवलंबून असतो, त्याविना आपण जगू शकत नाही.

...म्हणजे त्या मुलाने वेगळं काहीच सांगितलं नव्हतं. पण त्याची सांगण्याची पद्धत अशी होती, की ऐकणार्‍याला भीतीच वाटावी. प्रभावी बोलण्याने समोरची माणसं कोणत्याही गोष्टीवर किती सहजगत्या विश्वास ठेवतात हेच यातून दिसून आलं. पुढे एका पत्रकाराने या प्रकाराला ‘झॉनरिझम’ (Zohnerism) असं नाव दिलं.

काही ओळखीचं वाटतंय का यातून? आजकाल प्रसारमाध्यमांमध्ये गवगवा करून सांगितल्या जाणार्‍या कित्येक ‘ब्रेकिंग न्यूज’ हेच करत असतात. त्या सगळ्यावर विश्वास ठेवायचा का, हे ठरवणं ज्याच्या-त्याच्या हातात असतं. आपल्याला सांगितलं जातंय त्यातलं खरं काय, खोटं काय हे तपासण्यासाठी फार वेळ लागत नाही. पण ते केलं नाही तर डायहायड्रोजन मोनोक्साइड प्यायल्याच्या भीतीने एखाद्याच्या जीवावर बेतू शकतं.

‘डायहायड्रोजन मोनोक्साइड’संदर्भात इतरही काही कथा सांगितल्या जातात. त्या सगळ्याचं सार एकच- कानावर पडणार्‍या प्रत्येक गोष्टीवर सरळ विश्वास ठेवू नये; सारासार विचारबुद्धी वापरावी.

प्रीति छत्रे | preeti.chhatre22@gmail.com

प्रीति छत्रे 'युनिक फीचर्स पोर्टल'च्या सहसंपादक आहेत. अनुभवपर ललितलेखन आणि अनुवाद यात त्यांना विशेष रस आहे.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 2

Manoj Dattatray Jadhav 15.07.25
आपल्यामुळे अतिशय छान माहिती मिळाली . आजजी सत्य परिस्थिती आहे ती आपल्या लेखातून आपण व्यवस्थित रित्या मांडली.

Rajesh Mane15.07.25
छान लेख, आवडला. अनेक आभार . "डायहायड्रोजन मोनॉक्साइड" संदर्भातील इतरही कथा वाचायला आवडतील. इथे जरूर मांडाव्यात. अथवा आपल्या सवडीनुसार, मला मेलवर पाठवल्या तरी चालेल.

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results