बीड जिल्ह्यातलं नेकनूर हे गाव गेल्या ९० वर्षांपासून आठवडी बाजाराचं ठिकाण आहे. इथला बाजार सर्वात जुना आणि सर्वात मोठा. परिसरातील ६० ते ६५ गावांच्या दृष्टीने नेकनूर हे मोक्याचं ठिकाण असल्याने इथूनच या भागाची अर्थवाहिनी चालते. या गावाची लोकसंख्या अंदाजे २५ हजार. वाढता व्यवसाय, व्यापार, शिक्षण, उद्योगधंदे, व्यावसायिक शिक्षण आणि सेवाक्षेत्र इत्यादीमुळे गेल्या २० ते २५ वर्षांत नेकनूर बरंच विस्तारलं आहे. २५ ते ३० हेक्टरचं मूळ गावठाण आता १२० ते १३० हेक्टर क्षेत्रावर पसरलं असेल, असा अंदाज गावकरी सांगतात. मात्र गावाजवळ पाण्याचा कोणताही मूलभूत स्त्रोत नसल्याने गावठाण क्षेत्रात मोठ्या प्रमाणार बोअरवेल घेतल्या जात आहेत. इथे अनेकांनी आपापले बंगले बांधले; पण आधी त्या जागी बोअरवेल घेतली.
या बोअरवेल्सद्वारे भूगर्भातील पाणी मोठ्या प्रमाणात उपसलं जातं. त्या बोअरवेल जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातच कोरड्या पडतात, पाणीटंचाई निर्माण होते.
‘हिंद’ संस्थेने या पाणी प्रश्नाचा पाठपुरावा करायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी केलेल्या अभ्यासातून दिसून आलं, की मूळ गावठाण किंवा विस्तारित नेकनूर कुठेच भूगर्भात जलपुनर्भरण होत नव्हतं; पाणी मात्र सतत उपसलं जात होतं. मग संस्थेने बोअरवेल पुनर्भरण करण्यात पुढाकार घेतला.
पाणीटंचाई समस्या आणि पुनर्भरण
नेकनूर गावठाण क्षेत्रात फेब्रुवारीनंतर विहिरी कोरड्या पडतातच. शिवाय ५०० ते ७०० फूट खोल बोअरवेल खोदली तरीही पाणी अत्यल्प मिळतं किंवा मिळतच नाही. गावात सिमेंटचं बांधकाम खूप वाढलंय. वस्तीही दाट होत गेली आहे. यामुळे पावसाचं बहुतांश पाणी नाल्या-ओढ्यांमधून वाहून जातं, भूगर्भात पाणी झिरपतच नाही.
पत्रकार सुरेश रोकडे सांगतात, “घर बांधताना प्रथम बोअरवेल घेतली जाते. विद्युत पंप टाकण्यासाठी १.५ ते २ लाख रुपये खर्च केला जातो. पंपाच्या मदतीने भरमसाठ पाणी उपसलं जातं. पण पाण्याची भरपाई कशी करायची, याचा विचार कोणीही करत नाही. दुसरं भूगर्भात पाणी टाकायचं, मुरवायचं असेल तर कोणतंही पाणी असंच झिरपलेलं चालणार नाही. तर घरांच्या छतावरील पाणी जमा करून, स्वच्छ करूनच सोडावं लागेल. कारण स्वच्छ पाणी सोडलं तरच पुन्हा स्वच्छ पाणी मिळणार.”
दोन प्रकारे पुनर्भरण
पहिलं म्हणजे घराच्या छतावरील पाणी तीन ते चार ठिकाणाहून छोट्या पाईपद्वारे एकत्र करायचं. ते पाणी एका मोठ्या पाईपने बोअरवेलमध्ये सोडायचं. मात्र त्यापूर्वी ते पाणी फिल्टर करावं लागतं. अर्थात पाणी फिल्टर करण्यासाठी कोणतंही महागडं मशीन वापरण्याची गरज नसते. तर ठिबक सिंचनासाठी जो फिल्टर वापरला जातो तोच इथेही वापरला जातो. या फिल्टरची किंमत ४ हजार रुपये आहे. एकूण बोअरवेल पुनर्भरण करण्याचा पूर्ण खर्च (पाईप आणि मजुरी धरून) ६ ते ७ हजार रुपये इतका येतो. (हा खर्च १ हजार चौ. फुट बांधकाम असलेल्या छताचं पाणी बोअरवेलमध्ये सोडण्यासाठीचा आहे. बांधकाम जास्त असेल तर जरा जास्त खर्च येऊ शकतो.)
आतापर्यंत अशा प्रकारे नेकनूर गावात १६ बोअरवेलचं पुनर्भरण झालेलं आहे. या संदर्भात हिंद संस्थेचे सचिव संजय शिंदे सांगतात, “स्वच्छ पाणी बोअरवेलमध्ये सोडायचं असल्यामुळे हंगामातील पहिला पाऊस पडण्याअगोदरच घराचं छत धुऊन काढलं जातं. असं केल्यानं पहिल्या पावसापासूनच बोअरवेलमध्ये पाणी सोडणं सुरू करता येतं. परिणामी, बोअरवेलमध्ये भरपूर पाणीसाठा होतो.”
मोठ्या घरांसाठी पुनर्भरणाची दुसरी पद्धत वापरली जाते. उदा. २ हजार चौ. फुटापेक्षा जास्त बांधकाम असलेल्या घरांच्या छतांवरचं पाणी वर दिलेल्या पद्धतीने जमा केलं तर बोअरवेलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त पाणी जमा होऊ शकतं. यावर उपाय म्हणजे बोअरवेलच्या बाजूने मोकळी जागा असते तिथे खड्डा खोदला जातो. त्या खड्यात पाणी फिल्टर होण्यासाठी दगड, खडी, वाळू, मुरूम भरलं जातं. खड्ड्यात सोडलेलं पाणी बोअरवेलमध्ये संथगतीने झिरपायला हवं असं नियोजन केलं जातं. तसंच बोअरवेलमध्ये माती ढासळू नये, यासाठी नीट तजवीज केली जाते.
अशा प्रकारच्या बोअरवेल पुनर्भरणासाठी ६ ते ७ हजार रुपये खर्च येतो. नेकनूर गावात या पद्धतीने २२ बोअरवेलचं पुनर्भरण करण्यात आलं आहे.
संजय शिंदे सांगतात, “हिंद संस्थेच्या माध्यमातून ग्रामसभेत आम्ही समजावून सांगितलं, की भूगर्भात जास्तीत जास्त पाणीसाठे निर्माण करायचे असतील तर बोअरवेलचं पुनर्भरण केल्याशिवाय पर्याय नाही.”
संदीपान मस्के सांगतात, “खड्डा खोदून बोअरवेलचं पुनर्भरण करणं जास्त फायदेशीर ठरतं. कारण बोअरवेलव्यतिरिक्त इतर भूभागातही पाणी मुरतं. थोडक्यात शोषखड्डा घेतल्याप्रमाणे ही प्रक्रिया होते. त्यामुळे भूगर्भात पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर वाढतो”.
पत्रकार रोकडे सांगतात, “मी स्वत: बोअरवेलचं पुनर्भरण करून घेतलं आहे. माझी बोअरवेल फेब्रुवारी महिन्यात कोरडी पडत होती. त्यात आता एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत पाणी मिळतं. या परिसरात सर्वच घरांमध्ये असं बोअरवेलचं पुनर्भरण करून घेतलं तर उन्हाळ्यात पाणीटंचाईचा प्रश्न किंचितही निर्माण होणार नाही.”
बोअरवेलमध्ये पाणी ५०० ते ७०० फूट खोल जातं. बोअरवेलमध्ये पाण्याचा चांगला साठा असेल तर पाण्याचा प्रचंड दाब तयार होतो. परिणामी, बोअरवेलमध्ये सोडलेलं पाणी सांधे असतील तिथे अधिक जोराने पसरत राहतं. परिसराची भूजल पातळी वाढण्यास याचा उपयोग होतो.
एकंदर बोअरवेलचं पुनर्भरण करून घेण्याचे फायदे हळूहळू गावकऱ्यांच्या लक्षात येऊ लागले आहेत. त्यामुळे पुनर्भरण करण्यासाठी अनेकजण स्वत:हून पुढे येत आहेत. हा अतिशय सोपा आणि कमी खर्चिक प्रयोग इतर गावांमध्येही यशस्वी होऊ शकतो.
सोमिनाथ घोळवे | 9881988362 | sominath.gholwe@gmail.com
सोमिनाथ घोळवे हे ग्रामीण समाज व्यवस्थेचे अभ्यासक आहेत.
