आम्ही कोण?
काय सांगता?  

अंतराळातला सर्वात दीर्घ मुक्काम कोणाचा?

  • टीम युनिक फीचर्स पोर्टल
  • 19.03.25
  • वाचनवेळ 2 मि.
  • Share on Tweeter
  • Share on Whatsapp
  • Share on Facebook
space station

नासाचे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर अखेर बुधवारी (१९ मार्च) पहाटे पृथ्वीवर परतले. फक्त एका आठवड्याच्या मोहिमेसाठी इंटरनॅशनल स्पेस सेंटरवर गेलेल्या विल्यम्स आणि विलमोर यांना अनपेक्षित अडचणींमुळे तब्बल नऊ महिने तिथे काढावे लागले. त्याबद्दलच्या बातम्या आपण गेले काही महिने वाचतो आहोतच. आता या दोघांच्या शारीरिक-मानसिक तब्येतीवर या दीर्घ मुक्कामाचा काय परिणाम झाला आहे, याचा अभ्यासही केला जाईल.

पण अंतराळात सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम या दोघांच्या नव्हे तर रशियाच्या व्हॅलरी पॉलिकोव्ह या अंतराळवीराच्या नावावर आहे, हे माहितीय? रशियाच्या मीर स्पेस स्टेशनमध्ये पॉलिकोव्ह जानेवारी १९९४ ते मार्च १९९५ असा तब्बल ४३८ दिवस राहिला होता. हे मीर स्पेस स्टेशन इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्याही आधी म्हणजे १९८६ ते २००१ या काळात कार्यरत होतं. माणसाला मुक्काम करता येऊ शकेल यासाठी तयार केलेलं जगातलं ते पहिलं मॉड्युलर स्पेस स्टेशन होतं. ते कार्यरत असण्याच्या १५ वर्षांच्या काळात १३ देशांतले शंभराहून अधिक अंतराळवीर तिथे मुक्काम करून आले.

पॉलिकोव्हनंतर सर्वाधिक काळ अंतराळात राहिलेला अंतराळवीर म्हणजे अमेरिकेचा फ्रँक रुबियो. रुबियो सप्टेंबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ या काळात सलग २७१ दिवस इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये मुक्कामी होता. वेगवेगळ्या मोहिमांमध्ये मिळून अनेक महिनेच काय, वर्षंही अंतराळात काढलेलेही संशोधक आहेत. उदा. रशियाचा ओलेग कोनोनेंको आजवर एकूण ११११ दिवस, म्हणजे तीन वर्षांहून जास्त काळ अंतराळात राहिला आहे. त्यापैकी ३७१ दिवस तो सलग अंतराळात होता. पेगी व्हिट्सन ही अमेरिकन अंतराळवीर तीन मोहिमांमध्ये मिळून एकूण ६७५ दिवस अंतराळात राहिली आहे. ती सर्वाधिक काळ अंतराळात राहिलेली महिला आहे. अशी आणखीही अनेक उदाहरणं आहेत. सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर या दोघांनाही वेगवेगळ्या मोहिमांमध्ये अनुक्रमे ६०८ आणि ४६४ दिवस अंतराळात मुक्काम केला आहे. अर्थात नियोजन नसताना नऊ महिने अंतराळात काढावे लागले असल्याने इतर सर्वांपेक्षा विल्यम्स आणि विलमोर य़ांचं उदाहरण वेगळं ठरतं.

टीम युनिक फीचर्स पोर्टल | 9156308310 | uniquefeatures.portal@gmail.com

टीम युनिक फीचर्स पोर्टल







प्रतिक्रिया लिहा...

Select search criteria first for better results