भारतात सांस्कृतिक, प्रांतिक आणि भाषिक वैविध्याप्रमाणेच लिपीचं वैविध्यही मोठ्या प्रमाणावर आहे. आपल्या चलनी नोटेवर मागे १५ वेगवेगळ्या लिपींमध्ये रुपयाची किंमत लिहिलेली असते, हे याचं उत्तम उदाहरण.
वापरात नसलेल्या सिंधू, ब्राह्मी, खरोष्टी आणि वापरात असलेल्या देवनागरी, बंगाली-आसामी, गुरमुखी, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, उर्दू, मोडी, शारदा, अशा ८०हून अधिक लिपी भारतात पाहायला मिळतात. यात सर्वांत जुनी वाचता येणारी लिपी तमिळ(तमिळ-ब्राह्मी) की अशोककालीन ब्राह्मी हा वाद बराच जुना आहे. पण अलीकडच्या एका संशोधनात एक नवीच गोष्ट समोर आली आहे.
तामिळनाडू राज्यातील मदुराईमधील कीलडी गावात २०१५ मध्ये एक उत्खनन झालं. त्यात इसवीसन पूर्व सहाव्या शतकातील काही वस्तूंचे अवशेष मिळाले. या संशोधनात जमिनीखाली मातीच्या तीन वेगवेगळ्या थरांमध्ये मातीची शेकडो भांडी सापडली. वरच्या थरातील भांड्यांवर तमिळ लिपी होती. मधल्या थरात तमिळ सोबतच काही सांकेतिक खुणा असलेली भांडी अढळली. पुरातत्व संशोधक त्याला ग्राफिटी मार्क म्हणतात. तर खालच्या थरातील भांड्यांवर फक्त हे ग्राफिटी मार्कच आढळले. गंमत म्हणजे हे ग्राफिटी मार्क तिथून जवळ जवळ ३००० किलोमीटर लांब असलेल्या सिंधूच्या खोऱ्यातील हडप्पा, आणि मोहेंजोदडोमध्ये झालेल्या उत्खननात सापडलेल्या ग्राफिटी मार्कशी मिळते-जुळते आहेत. या उत्खननामुळे तमिळ-ब्राह्मी लिपीचं मूळ सिंधू संस्कृतीतील सांकेतिक भाषेमध्ये असण्याची शक्यता तयार झाली आहे. असं असेल तर या लिपीचा इतिहास इ.स.पू. सहाव्या शतकापर्यंत मागे जाऊ शकतो आणि तीच सर्वात जुनी वाचता येणारी लिपी ठरू शकते. अर्थात अजून संशोधन सुरू असल्यामुळे त्यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही.
मयूर पटारे | 9970355105 | mayur355105@gmail.com
युनिक फीचर्स मध्ये पत्रकार. कष्टकरी समूहात फिरून त्यातील माणसांचं जगणं समजून घ्यायला आवडतं.
