सतराव्या-अठराव्या शतकात विशेषतः पाश्चात्य देशांमध्ये घोडागाड्यांचा वापर वाढत गेला. मालाची ने-आण, तसंच माणसांच्या प्रवासासाठी अधिकाधिक घोडागाड्या रस्त्यांवर येऊ लागल्या. इंग्लंडमधले डॉक्टर दूरदूरचे रुग्ण तपासण्यासाठी घोडागाड्यातून जाऊ लागले. घोडागाड्यांचा वापर वाढला तसे त्यांच्या रचनेत, आरेखनात बदल, सुधारणा होऊ लागल्या. त्यामुळे त्यांची संख्याही वाढत गेली. अधिकाधिक घोडेही मागवले जाऊ लागले. घोडागाड्यांच्या वापराच्या दृष्टीने हा सुवर्णकाळ होता.
पुढे एकोणिसावं शतक संपता संपता लंडन, न्यूयॉर्कसारख्या मोठ्या शहरांच्या रस्त्यांवर घोड्यांनी ओढल्या जाणा-या हजारो टॅक्सी, बसही धावायला लागल्या. पर्यायाने शहरांतल्या घोड्यांची संख्या वाढत गेली. एका टप्प्यावर लंडनमध्ये ४० ते ५० हजार घोडे होते, आणि न्यूयॉर्कमध्ये तर एक लाख घोडे होते, असं म्हणतात.
आणि इथेच एक नवी समस्या उभी राहिली, ज्याची तोपर्यंत कुणाला विशेष कल्पना आली नव्हती. शहरांतले घोडे वाढत गेले तसतसं तिथल्या रस्त्यांवर घोड्यांच्या विष्ठेचा खच पडू लागला. एक घोडा एकावेळी सरासरी १०-१२ किलो विष्ठा बाहेर टाकतो. अशी हजारो घोड्यांची विष्ठा दररोज रस्त्यांवर साचू लागली. त्या घाणीवर माश्या बसू लागल्या. त्यातून रोगराईचा धोका वाढीस लागला.
या समस्येवर कसा तोडगा काढायचा हे नगर नियोजनकारांनाही समजेना. असंच सुरू राहिलं तर काही वर्षांत न्यूयॉर्क शहर घोड्यांच्या विष्ठेच्या थरांखाली गाडलं जाईल, अशी भाकितं केली जाऊ लागली. पण तसं काही झालं नाही. १८९६ मध्ये पहिली स्वयंचलित गाडी तयार झाली. आणि नंतरच्या वीस-एक वर्षांत घोडागाड्या मागे पडत गेल्या. ही विष्ठेची समस्याही दूर झाली.
माणसांचं जगणं सुकर करण्यासाठी नवे शोध लागत जातात, तेव्हा त्यातून नवनव्या समस्याही उभ्या राहतात. त्या समस्यांचं निराकारण करण्यासाठी मग आणखी नवनवे शोध लावले जातात. हे चक्र सतत सुरू राहतं. सामाजिक प्रगतीविषयीच्या चर्चांमध्ये या चक्राकडे निर्देश करण्यासाठी या ‘हॉर्स मॅन्युअर प्रॉब्लेम’चा संदर्भ बरेचदा दिला जातो.
Key highlights- Back in the 19th century, cities like London and New York had quite a challenge with all the manure from horse-drawn carriages.
Fortunately, the invention of the automobile came to the rescue and helped solve this "Horse Manure Problem." It’s a great example of how new ideas can fix issues caused by older ways of doing things.
This story really highlights the ongoing cycle of progress and the clever ways people find to solve problems throughout history!
प्रीति छत्रे | preeti.chhatre22@gmail.com
प्रीति छत्रे 'युनिक फीचर्स पोर्टल'च्या सहसंपादक आहेत. अनुभवपर ललितलेखन आणि अनुवाद यात त्यांना विशेष रस आहे.
