बुद्ध झाडाखाली निवांत पहुडले होते. एक भिक्कू पार विस्कटून त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, “भंते, माझं मन कल्लोळाने अशांत आहे. मला अपराधी वाटतं, हीनदीन वाटतं, टोकाचं निराश-वाईट वाटतं. मी काय करू?” असं बरंच काही तो उद्ध्वस्त होऊन बोलत होता. त्याचं बोलणं मध्येच थांबवून बुद्ध म्हणाले, “मला खूप तहान लागली आहे. जवळच्या ओढ्यावर जाऊन पाणी आण, बरं.”
तो भिक्कू भांडं घेऊन ओढ्यावर गेला. बघतो तर पाणी पार गढूळलं होतं. गेल्या पावली तो परतला व म्हणाला, “भंते, पाणी खूप गढूळ आहे. मी ते आणू शकत नाही.” बुद्ध मंद हसत म्हणाले. “तू परत जाऊन का बघत नाहीस?” तो भिक्कू गेला. पण तेच गढूळ पाणी. त्याला पुन्हा जायला सांगण्यात आलं. तो पुन्हा गेला. गढुळता काही सरत नव्हती. असं त्याने पुन्हा पुन्हा केलं आणि तो पार वैतागला आणि मटकन बसून राहिला. काही वेळाने तसंच हसत बुद्ध म्हणाले, “आता परत जा बरं. नाही नाही, ते पाणी तसंच असणार. अरे, जा बाबा, मला तहान आवरत नाही.” बुद्ध करुणेने उद्गारले. अखेर तो भिक्कू भांडं घेऊन गेलाच. बघतो तर गढुळता सरून पाणी नितळपणे झुळझुळ वाहत होतं.
त्याने हलकेच पाणी भरलं अन् बुद्धाच्या हाती पात्र दिलं. बुद्धांनी पाण्याकडे बघितलं आणि स्थिर नजरेने स्मित करत भिक्कूकडे बघितलं. त्याला उत्तर मिळालं होतं.
मुकुंद कुलकर्णी | mukund59@gmail.com
मुकुंद कुलकर्णी हे प्रदीर्घ पत्रकारी अनुभव असलेले माजी संपादक आहेत. मध्य भारतातील आदिवासी समाजाचे आणि त्यांच्या प्रश्नांचे ते अभ्यासक आहेत. शिवाय ईशान्य भारतातील समाज, तसंच विविध धर्म आणि त्यांचं तत्त्वज्ञान हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहे.