एक महापंडित पाच हजार शिष्य घेऊन बुद्धाकडे आला. म्हणाला, “माझे काही प्रश्न आहेत. त्याबाबत आपण चर्चा करू”
बुद्ध म्हणाले, “आपल्याशी चर्चा करायला मला आवडेलच. पण त्याआधी आपल्याला काही काळ इथे राहावं लागेल. मग आपण निवांतपणे सविस्तर चर्चा करू.''
महापंडित काही बोलणार तोच जवळच बसलेला भिक्खू हसला. ते पाहून महापंडित संतापला. म्हणाला, “हसतोस काय, मूर्खा? माझ्या ज्ञानाची खिल्ली उडवतोस?” बुद्ध शांत होते.
तो भिक्खु म्हणाला, “नाही.. नाही पंडित महाराज ही खिल्ली नाही, मला काही स्मरण झालं. सांगतो. मीही महापंडित होतो. गेल्या वर्षी दहा हजार शिष्यांसह, तेवढेच प्रश्न घेऊन चर्चेसाठी बुद्धाकडे आलो होतो. मलासुद्धा बुद्धाने एक वर्ष इथे राहण्यास सांगितलं होतं. फक्त एकच अट होती, ती म्हणजे, वर्षभर पूर्ण मौन पाळायचं. मी ते मान्य केलं. बरोबर वर्षानंतर बुद्ध माझ्याकडे आले आणि म्हणाले, “चल, आता चर्चा करू. विचार तुझे प्रश्न.” तेव्हा माझ्या लक्षात आलं, वर्षभराच्या मौनात माझे सारे प्रश्न विरून गेले होते आणि मी आंतरबाह्य शांत झालो होतो. तुझी चर्चेची खोडदेखील अशीच जिरणार या विचाराने मला हसू आलं, एवढंच.”
मुकुंद कुलकर्णी | mukund59@gmail.com
मुकुंद कुलकर्णी हे प्रदीर्घ पत्रकारी अनुभव असलेले माजी संपादक आहेत. मध्य भारतातील आदिवासी समाजाचे आणि त्यांच्या प्रश्नांचे ते अभ्यासक आहेत. शिवाय ईशान्य भारतातील समाज, तसंच विविध धर्म आणि त्यांचं तत्त्वज्ञान हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहे.