एका सम्राटाला उपरती झाली आणि तो बुद्धाला शरण जाऊन भिक्खू बनला. श्रीमंती आणि विलासी जगण्यासाठी तो सम्राट सर्वदूर प्रसिद्ध होता. मात्र याबरोबरच त्याला वीणावादनाचा ध्यास होता. त्या धुंदीत तो आनंदाने वेडापिसा होत असे.
आता चक्रं फिरलं आणि लंबक दुसऱ्या टोकाला गेला. भिक्खू म्हणून तो घोर उपासना करू लागला. इतर भिक्खू ओंजळभर धान्य शिजवून खायचे; तर हा एकच कच्चा दाणा खायचा. इतर भिक्खू पाऊलवाटेने जायचे, तर हा अनवाणी पायांनी काटेकुटे तुडवत जायचा. उन्हातान्हात, थंडीवाऱ्यात खडकावर पडून राहायचा. घोर तपस्वी म्हणून त्याचं सर्वत्र नाव व्हायला लागलं. अशा उग्र साधनेमुळे तो अगदी हडकुळा झाला. त्याचा देखणा चेहरा आणि तलम कांती पार काळवंडून गेली अन् तो मृत्यूपंथाला लागला. एक दिवस मावळतीला बुद्ध त्याच्या जवळ गेले, त्याला आवाज देत म्हणाले, “भिक्खू, मला एक सांग, वीणेच्या तारा खूप ढिल्या असल्या किंवा अति ताणलेल्या असल्या तर काय होईल?” मोठ्या कष्टाने श्वास घेत तो म्हणाला, “दोन्ही अवस्थेत सूर निघणार नाहीत.”
बुद्ध म्हणाले, “हे कळूनही तू हे काय करतो आहेस?”
मुकुंद कुलकर्णी | mukund59@gmail.com
मुकुंद कुलकर्णी हे प्रदीर्घ पत्रकारी अनुभव असलेले माजी संपादक आहेत. मध्य भारतातील आदिवासी समाजाचे आणि त्यांच्या प्रश्नांचे ते अभ्यासक आहेत. शिवाय ईशान्य भारतातील समाज, तसंच विविध धर्म आणि त्यांचं तत्त्वज्ञान हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहे.