आम्ही कोण?
अनुभव 

वेल्ह्यातील मुलांना शिकवता शिकवता मीच गिरवले धडे

  • प्राजक्ता धुमाळ
  • 11.01.25
  • वाचनवेळ 18 मि.
  • Share on Tweeter
  • Share on Whatsapp
  • Share on Facebook
velhal-anubhav-12-jan-2025

वेल्हा तालुक्यातल्या शाळकरी मुलांसाठी शिक्षण-उपक्रम चालवताना घेतलेल्या अनुभवांचा धांडोळा. मुलांना आयुष्याची जाण देताना कार्यकर्तेही कसे घडत जातात याची झलक हे अनुभव वाचताना दिसते.

वेल्हा. पुण्याजवळचा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण, पर्यटनप्रिय तालुका. तरीही इथे वाहतुकीच्या, शाळांच्या त्रोटक सेवा-सुविधा आहेत. त्यातही पासली, मेटपिलावरे, हातवे, खुलशी ही गावं तर आणखी दुर्गम. सार्वजनिक वाहनांनी तिथवर पोहोचणं म्हणजे कसरतच! अशा परिस्थितीत कुठल्या कुठल्या कोपऱ्यांतून, पंचक्रोशीच्या पलीकडून शिक्षणाच्या ध्यासाने मुलं पायी चालत शाळांमध्ये जातात. त्यामुळे विशेषतः इथल्या माध्यमिक शाळा मुलांनी अगदी फुलून जातात. ही सगळी मुलं शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची. सुट्टीच्या दिवशी गुरांमागे जाणारी, गुरांच्या धारा काढणारी, शेतात राबणारी. त्यातही मुलींवर रोज घरच्या कामाचीही जबाबदारी. दहावीनंतर थोडक्याच मुली पुढचं शिक्षण घेतात, बाकी अनेकींच्या घरी मात्र त्यांच्या लग्नाची घाई केली जाते...

या सगळ्या बाबींचा धांडोळा घेत ‘तथापि' ट्रस्टने वेल्ह्यातली मोजकी गावं निवडून मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणारा, मुलींना जीवनकौशल्यं व लैंगिकतेचं शिक्षण देणारा ‘मुलींसाठी सुरक्षित अवकाश' असा प्रकल्प हाती घेतला आणि २०१२ मध्ये वेल्ह्यात पाय रोवले. ‘तथापि ट्रस्ट' हे स्त्रिया आणि आरोग्य या विषयात काम करणारं संसाधन व संवर्धन केंद्र. वेल्ह्यातला हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने विस्तारला गेला. ‘सुरक्षित अवकाशा'त मुलांनाही सामावून घेतलं गेलं. याच टप्प्यावर मी ‘तथापि'च्या कामामध्ये सहभागी झाले आणि वेल्ह्याशी माझं नातं जोडलं गेलं. त्या कामादरम्यानचे काही अनुभव, आठवणी सांगाव्याशा वाटतात.

शाळा सुरू होतानाचे दिवस म्हणजे पावसाळ्यातले दिवस. या वेळी वेल्ह्याचं लावण्य अगदी डोळ्यांत साठवता येऊ नये इतकं भरभरून खुललेलं असतं. रस्त्याच्या दुतर्फा उमललेली पिवळी पिवळी फुलं लक्ष वेधून घेतात. आम्ही राजगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावांतील शाळांमध्ये काम करत होतो. मी आणि माझ्या तीन सहकारी वाजेघरला एका मावशींच्या घरी राहायचो. तिथे सकाळी उठून अंगणात गेलं की समोर गर्द हिरव्या सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि भव्य-दिव्य अशा राजगडाचं दर्शन व्हायचं. केवढं सुख ते!

एका सामाजिक संस्थेमार्फत शाळेत शिकवणाऱ्या मुली म्हणून आम्ही चौघी अल्पावधीतच ओळखल्या जाऊ लागलो. या प्रकल्पात शाळा हा महत्त्वाचा घटक असल्याने अनेक शिक्षकांशी सातत्याने संवाद झाला. प्रामाणिकपणे मुलांच्या शिक्षणासाठी झटणारे, आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे, मैत्रीपूर्ण वागणारे शिक्षकही आम्हाला भेटले. काही स्थानिक कार्यकर्तेही अधूनमधून आमच्या कामाला महत्त्वपूर्ण हातभार लावायचे. वाजेघर, साखर, चिरमोडी, गुंजवणे, खाटपेवाडी, मार्गासणी, अडवली अशा अनेक गावांतील शाळांना आम्ही प्रकल्पात सहभागी करून घेतलं. गणित-इंग्रजीचं प्राथमिक शिक्षण, जीवनकौशल्य, शरीर साक्षरता, जाणिवा निर्माण करणं हा प्रकल्पाचा मुख्य हेतू. त्यासाठी आम्ही मुलांच्या वयोगटांनुसार त्यांच्याशी बोलत होतो. त्यांना आवडतील असे खेळ, छोटे छोटे प्रकल्प यातून मुलांशी जोडून घेण्याचा प्रयत्न करत होतो.

जीवनकौशल्य, लिंगभाव समानता, शरीर साक्षरता, लैंगिकता शिक्षण या विषयांतर्गत आम्ही शाळांमध्ये वेळोवेळी सत्रं घ्यायचो. कधी अंगणवाडीच्या ओट्यावर, कधी झाडाखाली एकत्र जमायचो. ही सत्रं संवादक आणि एक स्त्री म्हणून, माणूस म्हणून मला खूप शिकवून गेली. मैत्र, संवेदनशीलता, माणुसकी, प्रेम या मूल्यांची व्याप्ती मुलांसोबत माझ्यातही वाढत गेली. मुलांसोबत एका अर्थाने मीही घडत गेले.

लिंगावर आधारित कामाची विभागणी, भेदभाव समाजात, घरात, आपल्या आजूबाजूला कसा दिसतो; त्याची मुळं कुठे आहेत, यावर एकदा सातवीतल्या मुलांशी चर्चा सुरू होती. मुलांचं निरीक्षण चांगलं होतं. त्यांनी किती तरी गोष्टी सांगितल्या. उदा. मुलींचा खेळ म्हणजे दोरउड्या आणि फुटबॉल मात्र कायम मुलांकडे. सुंदर मुलगी, हुशार मुलगा अशा विशेषणांच्या जोड्या वर्गात आजूबाजूला लावलेल्या फलकावर दिसत होत्याच.

एकदा शाळेच्या वर्गात विचारलं- 'समानता म्हणजे काय? एखाद्या वाक्यात कुणी सांगेल का? फळ्यावर लिहायला आवडेल का कुणाला?' 'समानता म्हणजे कुणामध्येही भेदभाव केला जाऊ नये, सर्वांना समान वागणूक आणि समान संधी मिळाल्या पाहिजेत. समानता हा हक्क आहे.' - इयत्ता सातवीतल्या सचिनने एवढं लिहिलं तेव्हा क्षणभर मी अवाक झाले. फळ्यावर लिहिलेले ते ठसठशीत शब्द सांगत होते, की आपला संवाद मुलांपर्यंत पोहोचतो आहे. त्याचं समाधान तर होतंच, याबरोबरच सचिनची संवेदनशीलता, समज यांचीही चुणूक त्यात दिसत होती.

समानतेच्या बाबतीत वेगवेगळी उदाहरणं बघायला मिळाली. मुलींचाही हा प्रश्न होताच, की अमुकतमुक कामं मुलांनाही का सांगितली जात नाहीत? काही मुलं स्वतःचे कपडे धुणं, स्वतःचा डबा घासून ठेवणं ही कामंही करतात हे ऐकून छान वाटलं. सचिनने सांगितलं, की ‘आई शेतातून येण्याच्या आधी तो भात रांधतो, लहान बहिणीला सांभाळतो.' त्याचं न कचरता, प्रामाणिकपणे व्यक्त होणं खूप भावलं. इतर मुलं खो खो हसली त्याच्यावर, पण त्याने स्वतःवर त्याचा परिणाम होऊ दिला नाही. ‘सचिन जे काम करतो त्यात हसण्यासारखं काही नसून ती उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आणि आदर्श गोष्ट आहे,' हे आम्ही मुलांना सांगितलं.

त्याच सत्रात मयूरशी चर्चा झाली. मुलग्यांनी घरकाम करण्याबाबत मयूरचे वेगळे अनुभव होते. त्याची आजीच त्याला घरकाम करण्यावरून टोकायची, शेजारपाजारची मुलं त्याला ‘बायकूबाय' म्हणून चिडवायची. मयूर वर्गात तावातावाने हे सांगत होता. आम्ही त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, की आजी-आईला तू समजावून सांग; त्या मुलांकडे दुर्लक्ष कर. पण मयूरची स्वतःचीही घरकामासाठी पूर्ण तयारी नसावी असं दिसलं. कारण त्याने थोड्याच वेळात ‘जाऊ द्या, मला नाय आवडत बायकांची कामं करायला!' असं म्हणून संभाषण संपवूनच टाकलं. तो असं काही तरी बोलेल याचा अंदाज होताच. अशा वेळी स्वतःची समजूत घालावी लागायची, की मुलांपर्यंत मुद्दा पोहोचवणं आपलं काम आहे; परिवर्तनवादी विचार रुजायला वेळ लागेल. काही वेळा मुलांचे चेहऱ्यावरचे भावही सांगायचे, की त्यांना म्हणणं कळतंय, मुद्दा पोहोचतोय. त्यानंतर येणाऱ्या समजेची आपण वाट पाहायला हवी, हे तिथे कळायचं.

समानतेच्या मुद्द्यात आर्थिक बाब आली की मग खरा प्रश्न उभा राहतो. एकीकडे ‘आम्ही स्त्री-पुरुष समानता मानतो' म्हणताना प्रत्यक्षात स्त्रीच्या नावावर घर नसणं, सातबाऱ्यावर तिचं नाव नसणं, दागिन्यांच्या पावत्या तिच्या नावे नसणं... ही यादी बरीच लांबत जाणारी आहे. या धर्तीवर वेल्ह्यातल्या गावांत आम्ही ‘घर दोघांचं, नाव दोघांचं' हे अभियान राबवलं. प्रत्येक घरातल्या कर्त्या जोडप्याशी संवाद साधून ‘घर दोघांचं, नाव दोघांचं' हे स्टिकर त्यांची नावं घालून घराच्या दारावर चिकटवलं. या अभियानात शाळकरी मुलं आनंदाने सहभागी झाली होती हेही विशेष.

एकदा काय झालं, पाचवीत शिकणारी दामिनी तिच्या आजीला चपात्या भाजू लागत होती. शाळेतल्या गोष्टी किती सांगू न्‌‍ काय काय सांगू असं झालं होतं तिला. आजी शांतपणे हुंकार टाकत ऐकत होती. बोलता बोलता दामिनी म्हणाली, ''आजी, मुलांना पण चपात्या करता येतात ना गं? मुलांना योनी नसते बरोबर आहे, पण चपात्या तर हाताने करतात. त्यांनासुद्धा चपात्या करायला शिकवायला पाहिजे.” यावर मात्र आजीचं काही उत्तर आलं नाही. आजीच्या आयुष्यात पहिल्यांदाच कुणी तरी असं बोलत असणार. मी शेजारच्याच खोलीत होते. दोघींचं बोलणं माझ्या कानावर पडत होतं, हे दामिनीला माहीत नव्हतं. त्याच दिवशी मी दामिनीच्या वर्गासोबत लिंगभाव समानतेविषयीचं सत्र घेतलं होतं. तिच्या आजीशी झालेल्या गप्पांतून ते सत्र तिच्यापर्यंत पोहोचत असल्याची पावतीच मला मिळाली.

एकदा एका टेकडीवरच्या गावात मुलींसोबत एक सत्र घेत होते. पाच-सहा मुलींचा गट होता. मुलींना मिळणारी भेदभावाची वागणूक, त्यांना ओझं समजणं, अशा मुद्यांवर चर्चा सुरू होती. मुली त्यांचे अनुभव मांडत होत्या. कल्याणीच्या तोंडून पटकन शब्द बाहेर पडले, 'आम्ही तर पाचये'. (आम्ही तर पाच आहोत.) हे ती अगदी मिश्कील हसत म्हणाली, तरी तिच्या डोळ्यांतील वेदना लपू शकत नव्हती. (नंतर केव्हा तरी तिच्याबद्दल तिच्या एका मैत्रिणीकडे विचारणा केली तर कळलं, की स्वतःचा जोडीदार स्वतः निवडून तिने लग्न केलं. आनंद वाटला. अशी लग्नं त्यावेळच्या अनेकांनी केल्याची बातमीही मिळाली. सह्याद्रीतल्या या शूरवीर कन्या. प्रकल्पामुळे त्यांना बळ मिळालं असावं, हा विचारही खूप समाधान देणारा होता.)

नववीतल्या रंजनाचं शाळेत येणं बंद झालंय, असं शाळेतील मुख्याध्यापकांकडून आणि वर्गातील मुलींकडून कळलं. तिचं लग्न करताहेत असंही कळलं. काही वेळेला मुलीचं प्रेम ‘प्रकरण' सुरू आहे अशी कुणकुण लागली तरी मुलीची शाळा बंद करून घरचे तिच्या लग्नाच्या मागे लागतात. शिवाय दाखल्यावर मुलीचं वय वाढवून द्या, असा सपाटाही असतो. कमी वयात मुलींचं लग्न केलं जाऊ नये, शिक्षण चालू राहावं यासाठी आम्ही धडपडायचो. रंजनाचं गाव एका टेकडीवर होतं. आधी तिच्याशीच बोलावं म्हणून एकदा आडवाटेने रस्ता कापत तिच्या घरी पोहोचले. ती मातीची भिंत सुबकपणे सारवत होती. ‘आर्थिक परिस्थिती बेताची, काकी रानात गेल्यावर काकीच्या बाळाला सांभाळायला कुणी नाही, म्हणून शाळा सोडली, ' अशी कारणं ती सांगत राहिली. मग हळूहळू मुख्य लग्नाचं कारण पुढे आलं. खरं तर तिचं लग्न ठरल्यात जमा होतं. तिच्याशी बोलले. संध्याकाळी तिच्या आई-वडिलांशी बोलावं म्हणून पुन्हा तिचं घर गाठलं. आई म्हणाली, ''माझं काही नाही, त्यांच्याशीच बोला.” तिच्या वडिलांशी चर्चा झाली. त्यांना या चर्चेत रस नव्हता. त्यांचं एक वाक्य कधीच विसरता आलं नाही- “आमच्या पोरींचं हात शेणातच जाणारेत.” त्यांच्या या एका वाक्यावर वेल्ह्यातल्या मुलींचे कष्ट डोळ्यांसमोर तरळले. तिथल्याच जवळच्या गावातील मुलाशी रंजनाचं लग्न ठरलं होतं. ‘बाहेरच्या मुलींना ह्या कामाची सवय नसती, मग हितल्या हितंच लग्नं जमवली जात्यात, ' असंही ऐकलं. ‘आमच्या पोरींचं हात शेणातच जाणारेत' ही मानसिकता यातूनच निर्माण होत असणार. मी हात हलवत परत फिरले.

नंतर त्यातल्या त्यात जमेची बाजू म्हणून काही गावांमध्ये संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमांत दोन-तीन मुलींनी आपल्याला मध्येच शाळेतून काढलं जाऊ नये, कमी वयात लग्न होऊ नये, म्हणून आई-वडिलांना प्रातिनिधिक स्वरूपात लिहिलेल्या पत्रांचं जाहीर वाचन केलं.

मर्दानगी, स्त्रियांसंबंधित हिंसा याविषयीचं एक सत्र होतं. समोर सातवीतली मुलं-मुली होती. मुलांना आम्ही सिनेमातील हिंसक दृश्यं असणारी एक व्हिडिओ क्लिप दाखवली. एका हीरोने हिरॉईनच्या थोबाडीत दिली, तर केवळ मुलगे फिदीफिदी हसले. मी मुलांशी बोलले- “पुरुषाने बाईवर हात उचलला की हसणं चुकीचं आहे. त्या जागी आपल्या घरातील कुणी बाई असेल तर असं हसू फुटणार नाही. बायकांना मारझोड करणं यालाच पुरुष स्वतःची मर्दानगी समजत असतात. केवळ घरातल्या बाईकडे नाही, तर तमाम स्त्रियांकडे स्त्री म्हणून, एक माणूस म्हणून पाहणं, सन्मान करणं हा स्त्रियांचा हक्क आहे.” मुलं गंभीर होऊन ऐकत होती.

'स्त्री आणि पुरुष प्रजनन संस्था', 'वयात येणं' या सत्रांच्या वेळचा माहोलही काही औरच असायचा. लैंगिकतेसारख्या महत्त्वाच्या तरीही एरवी स्वागतार्ह नसलेल्या विषयावर बोलण्यासाठी, संवाद साधण्यासाठी शाळेतल्या मुला-मुलींपर्यंत पोहोचणं म्हणजे एक अवघड वाट असते. कॉम्प्युटर, गणित-इंग्रजीची बेसिक सत्रं ही वाट सुकर करतात. प्रजनन अवयवांची नावं घेतली की वर्गात जोरात हशा तरी पिकायचा, नाही तर पोरींच्या माना खाली जायच्या. साधारणपणे हे सगळ्याच शाळांमध्ये घडायचं. मुलांना शरीराची योग्य, शास्त्रीय माहिती नसते, त्यामुळे ऐकताना मुलं-मुली कधी कावरीबावरी झालेली दिसायची; पण साध्या-सोप्या पद्धतीने, सकारात्मक दृष्टिकोनातून शास्त्रीय माहिती बहुतेक पहिल्यांदाच त्यांना ऐकायला मिळालेली असायची. मग हळूहळू हशा मागे पडायचा, संकोच गळून पडायचा. मनातले प्रश्न विचारण्याची ही स्पेस योग्य आहे हे त्यांना जाणवायचं, तर कुणाकुणाला सर्वांसमोर प्रश्न विचारण्यात संकोच वाटायचा. मग आम्ही त्यांना कोऱ्या कागदाच्या चिठ्या देऊन त्यांच्या मनातले प्रश्न गोळा करायचो, तेव्हा प्रश्नांतली विविधता आणि कुतूहल जाणवायचं. तांदूळ खाल्ल्याने अंगावरून पांढरं जातं का? अंगात येणं आणि पाळी येणं यांचा काय संबंध आहे? पिशवी काढली म्हणजे काय? पाळीत कुठून रक्त येतं? आणि पॅड का वापरायचे असतात? अडचण त्यालाच म्हणतात का? काहींना मूलबाळ का नाही होत? बाळ झाल्यावर दूध येतं का? कसं काय? आणि दूध बाहेर कसं येतं? कधी येण्याचं थांबतं? गर्भाशय नक्की कुठे असतं? पोट गरोदरपणात इतकं मोठं कसं दिसतं? बाळ होऊ नये म्हणून जे ऑपरेशन करतात त्यात पिशवी काढून टाकतात का? नाळ नक्की बाळाच्या कुठे जोडलेली असते? संप्रेरकं काय आहेत? ती काय करतात? पुरुषांना अंगावर केस का असतात?... असे कित्येक प्रश्न!

'तथापि'ने मुलांसाठी ‘शरीर साक्षरता मुलांसाठी' या नावाचा पुस्तक संच प्रकाशित केला होता. एके दिवशी शाळेत एक गमतीशीर गोष्ट कळली, की संचातील तिसरं पुस्तक मुली लपवून ठेवायच्या- वर्गातल्या मुलांच्या हाती लागू नये म्हणून. ‘त्यात प्राण्यांच्या प्रजनन संस्थेची चित्रं पण दिली आहेत, मुलं सारखं हेच पुस्तक हातात घेतात, ' अशी त्यांनी हिरिरीने दिलेली तक्रारवजा माहिती. ‘त्या चित्रांची मुलींना लाज वाटते, पण मग अशी लाज मुलांना का वाटत नाही बरं? ' असं विचारल्यावर ‘ते मुलगे आहेत' असं पटकन उत्तर आलं. मग हा मुद्दाही चर्चेला घेतला. ‘मुला-मुलींनी सगळ्यांनी वाचा. त्यात घाणेरडं किंवा लपवण्यासारखं काहीच नाही, ' असं आम्ही आवर्जून सांगितलं. दुसऱ्या एका शाळेतला असाच किस्सा. प्रजनन संस्थेविषयीचं सत्र घेताना मुलींना वर्गाचं दार लावून घ्यावंसं वाटत होतं; म्हणजे तिथल्या शिक्षकांना, मुलांना काही ऐकायला जायला नको. सत्र संपल्यावर सत्रादरम्यान फळ्यावर काढलेली चित्रं पुसायला त्या घाईघाईने पुढे आल्या. मुलांनाही मुलींच्या प्रजनन संस्थेविषयी माहिती दिली जाणार आहे, हे कळल्यावर मुलींना आश्चर्य वाटलं. ते कसं महत्त्वाचं आहे हेही सांगणं ओघाने आलंच. तिसऱ्या एका शाळेत गर्भाशयाचं मॉडेल पाहताना आधी मुलींनी पटापट डोळे झाकले आणि माना खाली घेतल्या. स्वतःच्या शरीराबद्दल इतकी सविस्तर माहिती त्यांना पहिल्यांदाच मिळाली होती. हा संकोच हळूहळू दूर व्हायचा, सगळीकडे आम्हाला हेच चित्र दिसलं.

एकाच प्रकल्पातील वेगवेगळ्या उपक्रमांची सांगड घालणं ही एक कसोटीच असते. उदाहरणार्थ, संगणक हा केवळ एंट्री पॉइंट नसून ‘संगणक साक्षरता' हा लाइफ स्किल्सचाच विषय आहे, हे लक्षात घेऊन आम्हाला काम करावं लागायचं. ‘जीवनकौशल्य' आणि ‘संगणक शिक्षण' हे एकत्र गुंफलेले उपक्रम एकमेकांस अधिकाधिक पूरक करणं महत्त्वाचं होतं. त्यासाठी नवनवीन कल्पना आम्ही लढवल्या. उदा. लिंगभाव समानतेच्या सत्रानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या मनातली समानतेची चित्रं संगणकाच्या तासाला संगणकावर काढायला देणं.

एकदा मुलांना स्वतःचीच चित्रं काढायला सांगितली. आपण स्वतःला आवडतो की नाही, हे आपल्या मनातील स्वतःची प्रतिमा कशी आहे यावर अवलंबून असतं. कधी कुणाला स्वतःचं नाक नकटं म्हणून आवडत नाही, तर कुणाला स्वतःचे कुरळे केस आवडत नाहीत, तर कुणाला स्वतःचा आवाज आवडत नाही, त्वचेचा रंग आवडत नाही. मुलांच्याही डोक्यात असं बरंच काही असतं. स्वतःचं चित्र काढण्याचा हा उपक्रम जाहीर करताच मुलांच्या चेहऱ्यावर पेच आणि आनंद असे संमिश्र, आश्चर्यकारक भाव दिसू लागले. मुलं कसोशीने आपापली चित्रं काढायला लागली. त्यांच्या चित्राचं त्यांनाच खूप हसू येत होतं. आपलं शरीर छान आहे, ते जसं आहे तसं छान दिसतं, सौंदर्याच्या रूढ चौकटी भेदण्याची गरज आहे, हा विचार त्यांच्यापर्यंत आम्ही असा पोहोचवला; तो त्यांच्या मनात रुजवणं त्यांच्यावर सोडून दिलं!

काम शाळांपुरतं मर्यादित न राहता गावांशी जोडलं जाऊ लागलं आणि आमच्या प्रकल्पाने ‘माझं गाव, माझी शाळा' असं साजेसं वळण घेतलं. एखाद्या झाडाला नव्या फांद्या फुटाव्यात तसे कार्यशीलतेला, विचारांना नवे पैलू पडत गेले. आम्ही गावोगावी मुला-मुलींच्या सोबतीने वेगवेगळ्या प्रकारे जागर घडवला- कधी बोलक्या बाहुल्या नाचवून, कधी पथनाट्यं किंवा नाटकांतून मुलींच्या शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. लिंगभाव समानतेच्या, सुरक्षिततेच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. मुलांपुढच्या शैक्षणिक अडचणी मांडल्या; त्यासंबंधित यंत्रणांना प्रश्न केले, उपाययोजना मांडल्या. त्यासाठी लेखक दिनानाथ मनोहर यांच्या ‘सरपंचाला दिवस गेले' या पुस्तकातून प्रेरणा घेऊन मी ‘सरपंच शाळेत जातात' हे छोटेखानी नाटक लिहिलं. 'आता शिक्षण घ्यायचं! ', 'विचारा आपल्या मनाला' ही छोटेखानी नाटकंही गावरान बाज घेऊन आकाराला आली. हे सर्जनशील प्रयत्न पहिल्यांदाच हातून घडले. माझाच मला नव्याने शोध घ्यायला लावणारे हे अनुभव होते.. नाटकासाठी विषय निवडणं, नाटक शोधणं, त्याचं या मुलांसाठी पुनर्लेखन, सहलेखन करणं, नाटक बसवणं, त्याचं सादरीकरण हा मुलांच्या बरोबरीने आम्हालाही समृद्ध करणारा अनुभव असे.

एक नाटक घडताना घडलेली एक गोष्ट... नाटकाचं नाव ‘आम्ही मुली सदाफुली'. हे नाटक होतं मुलींवरील हिंसा, छेडछाडीविरोधात आवाज उठवणारं, मुला-मुलींच्या सुरक्षिततेविषयी गावकऱ्यांशी संवाद साधणारं. मुला-मुलींकडून नाटक बसवून घेत असताना मुलांची अस्मिता जागी झाली. ‘नाटकात आम्ही पण आहोत, मग ‘आम्ही मुली सदाफुली' असं आम्ही कसं म्हणू?' हा त्यांचा मुद्दा ग्राह्य होता. मग आम्ही नाटकाचं नाव बदललं. ‘विचारा आपल्या मनाला' या नावाने गावांमध्ये नाटकांचे प्रयोग झाले. मुलांच्या घडणीचे एक-एक पैलू असे उलगडत होते. प्रत्येक वेळचं लेखन नवी समज, ऊर्जा देऊन जात होतं. या मुलांना मिळणाऱ्या संधी पाहून आम्हाला आमच्या शाळेत हे अनुभव का नाही मिळाले, असं वाटलं नसतं तरच नवल!

या जागरात मुलं-मुली आमच्यासोबत मुक्कामी असायची. मुलं-मुली एकत्र असूनही संमती देताना पालक कचरले नाहीत. याउलट, आम्हा उभरत्या कार्यकर्त्यांवर त्यांनी विश्वास ठेवला. जागरातले उपक्रम सुरू असताना इतर मुलं-मुली नाचायची, इकडे-तिकडे उंडारायची, आणि त्यांचा मुक्त वावर पाहून आम्ही संवादक सुखावून जायचो. नाटक सादर करत, मुला-मुलींना घेऊन हा जागर जागवत आम्ही वेल्ह्यात राजगडाच्या पायथ्याशी वसलेल्या पाली, गुंजवणे, चिरमोडी, दादवडी, फणशी, वाजेघर, खाटपेवाडी, साखर, घावर या गावांतून फिरत होतो. सोबतीला गाणी, ओव्या, घोषणा समतेचा आवाज बुलंद करत होत्या. सतरंज्या, ढोलकी, जनरेटर, खंजिरी, मंडप, गाण्यांची पुस्तकं, पोस्टर्स, माइक सिस्टीम, खाण्या-पिण्याचं सामान आणि इतर बरंच काही असणारा खजिना आमच्यासोबत होता.

एकदा एके ठिकाणी मुक्कामाचं नियोजन गडबडलं. मग आम्ही गावकऱ्यांच्या मदतीने पर्याय शोधला आणि वाजेघरच्या मंदिरात मुक्काम करायचं ठरवलं. आम्ही अचानक तिथे पोहोचलो, तरी मंदिरात झोपलेले दोन गावकरी पटकन उठून बाहेर व्हरांड्यात झोपायला गेले. त्यांनी स्वतःहून मंदिराची स्वच्छ, शांत आणि उबदार जागा आमच्यासाठी रिकामी केली. गावकऱ्यांचं असं सहकार्य म्हणजे गावाचं गावपण असतं! आम्ही सारे दमून भागून आलो होतो, तरी छोट्या-छोट्या पुस्तकांचा एक गठ्ठा बाहेर काढताच सगळी मुलं पुस्तकांवर तुटून पडली. अंथरुणावर पडून पुस्तकं वाचण्यात मग्न झालेल्या मुलांचं ते दृश्य मनात आजही ताजं आहे. अशाच एका रात्री सगळ्यांनी गाण्यावर मनसोक्त डान्स केला, फुगड्याही घातल्या. मुलींसमोर फुगड्या घालायला लाजणारे दोन मुलगे मंदिराच्या मागे जाऊन फुगडी घालताना दिसले. यामुळे मुला-मुलींमध्ये कसा हशा पिकला होता हे आजही आठवतं. त्यांना फुगडी घालावीशी वाटणं हे कौतुकास्पदच. एरवी हे चित्र केवळ पंढरीच्या वारीतच पाहायला मिळतं..

पुस्तकांवरून आठवलं- या एकूण प्रकल्पात ‘तथापि'मार्फत आम्ही शाळांना भरपूर पुस्तकं भेट दिली. (प्रत्येक शाळेला भारतीय संविधानाची एक-एक प्रतही दिली.) पुस्तकं निवडणं ते शाळांना पुस्तकं देणं हा प्रवास मला एकदम भारी फीलिंग द्यायचा!मनात पुस्तकप्रेम धडधडत राहायचं!ठिकठिकाणी जाऊन दर्जेदार, कसदार पुस्तकांचा शोध घेणं, पुस्तकं जमवणं ही कामं सुरूच असायची. एरवी पुस्तक भांडारात जाणं हीच मोठी पर्वणी असते. त्यात वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं शोधणं म्हणजे बातच कुछ और! नंतर यातील बरीच छोटी-मोठी पुस्तकं वाचण्यावाचून मला राहवलं नाही.

एकदा असाच डोकी लढवून काही गावांमध्ये ‘जीवनकौशल्य प्रदर्शन' हा कार्यक्रम केला. त्यात विविध पोस्टर्सची पद्धतशीर मांडणी होती. लहान-मोठे, स्त्री-पुरुष असे साऱ्यांसाठी खेळ आयोजित केले होते. काही खेळ नुसते मजेशीर, तर काही मजेशीर पण योग्य मेसेज पोहोचवणारे. त्यात पुरुषांसाठीच्या खेळांमध्ये कपड्यांच्या घड्या घालण्याचा खेळ घेतला. महत्त्वाचं म्हणजे त्या कपड्यांत साडीही होती. अर्थातच परीक्षक तिथल्याच स्त्रिया होत्या. प्रत्येक गावात अनेकांनी भाग घेतला. साडीच्याच नव्हे तर इतर कपड्यांच्या घड्या घालणं हेही कौशल्याचं काम आहे हे पुरुष मंडळींना जाणवलं. हा खेळ पाहताना खरी मजा स्त्रियांना-मुलींना वाटली. नुसता हास्यकल्लोळ!महिलांना बाटलीत रिंग टाकून खेळताना पाहणं हाही गमतीशीर, प्रेक्षणीय खेळ होता- रोजच्या कामांच्या रगाड्यातून त्यांना इवलीशी उसंत देणारा.

या कार्यक्रमात एक सायकलही आमची पार्टनर होती. मुलांनी तयार केलेले पोस्टर्स अंगावर वागवत रॅलीमध्ये मनसोक्त वावरणारी ती सायकल अतिशय देखणी दिसत होती.. तिच्यासोबतचा फोटो मी जपून ठेवलाय.

या कामाच्या निमित्ताने आम्ही वेल्ह्यातील शांतता वेगवेगळ्या प्रकारे अनुभवली. कधी स्वतःशी बोलायला लावणारी, कधी पुस्तकांत रमवणारी शांतता! कधी मुलींबरोबर घेतलेल्या सत्रांच्या निमित्ताने संध्याकाळी उशिरा पायवाटांवरून चालताना निव्वळ पक्ष्यांचे, कधी रातकिड्यांचे आवाज कानांवर पाडणारी, आपण धीट आहोत असं उगाच सांगणारी शांतता! तर कधी शहरातल्या कोलाहलातून एकदम खेड्यातल्या नीरव वातावरणात उचलून फेकणारी, अर्थात नकोशी वाटणारी शांतता!या कामाच्या निमित्ताने मी दर आठवड्याला माझं गाव, वेल्ह्यातलं वाजेघर आणि पुणे असं त्रिस्थळी वावरायला शिकले. कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आपोआप वाट्याला येणारी शांतता झेलायलाही बऱ्यापैकी शिकले. एकदा मेटपिलावरेला दोघी स्कूटीवरून गेलो होतो, तर आजूबाजूला कुणी ‘चिटपाखरूही नाही' असं खरंच केव्हा म्हणतात ते कळलं.

एकदा ठरवलं- प्रकल्पात निवडलेल्या गावांच्या पलीकडच्या अतिशय दुर्गम भागातील शाळांपर्यंत पोहोचू या, त्या शाळांना काही पुस्तकं भेट देऊ या. मग हातवे, खुलशी, पासली असे वेगवेगळे मार्ग धरले. तिथवर पोहोचताना आजूबाजूला लागणारी झाडी-झुडुपं, पायवाटा, आडवळणं, मधूनच दिसणारं गुंजवणी धरणाचं निळंशार पाणी, सगळं कसं सुखावून जात होतं. दुसरीकडे, दररोज येणा-जाणाऱ्या माणसांसाठी, त्यातही शाळा-कॉलेजेसमध्ये जाणाऱ्या मुला-मुलींसाठी प्रवास गैरसोयीचा आणि किती कष्टप्रद आहे हेही तीव्रतेने जाणवत होतं. यांतल्या काही गावांपर्यंत एस.टी. जात नाही. गेली तर दिवसातून एखादीच. खासगी वाहनसेवाही तुरळक आहे, तर काही ठिकाणी तीदेखील नाही... वेल्ह्यातील कार्यक्रमासाठी आमच्या टीमने काही घोषणा तयार केल्या होत्या. त्यातली ‘गावची एस.टी. आणि मुलींची शाळा, कधीच बंद पडू नये!' ही एक आवडती घोषणा अशा वेळी आठवायची.

शाळेतील मुलींची अभ्याससहल हा आणखी एक महत्त्वाचा उपक्रम. अभ्याससहल न्यायची म्हणजे एस.टी.ने प्रवास करणं क्रमप्राप्त होतं. एस.टी. डेपो, संबंधित शाळा यांच्याशी समन्वय साधून मुलींची सहल घेऊन जाणं ते सुखरूप परत येणं, हा अनुभवही मी पहिल्यांदाच घेतला. जबाबदारी होती, पण तो अनुभव आनंददायीसुद्धा होता.

गट शिक्षणाधिकारी, शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका आणि इतर कर्मचारी यांनी या कामी वेळोवेळी सहकार्य केलं.

शिरूर तालुक्यातील पाबळच्या विज्ञान आश्रमात नेलेली अभ्याससहल खास लक्षात राहिली आहे. तिथे मुलींना करियरच्या अनेक संधींची माहिती मिळाली, स्वावलंबी आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोन मिळाला. विज्ञान आश्रम, हे नावच किती कुतूहल निर्माण करणारं! तिथे शिकणारी मुलं त्यांनी स्वतःच बांधलेल्या घरात राहत होती. त्या विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण जैविक शेती, बांधकाम, जेली, सॉसेस बनवणं असं बरंच काही शिकायला मिळतं, हे विज्ञान आश्रमाचं वेगळेपण.

काही मुलींची अभ्याससहल पौड येथील नपाते नर्सिंग होमला नेण्यात आली होती, त्यातूनही नर्सिंग या करियर क्षेत्राची त्यांना ओळख झाली. एका वर्षी वेल्ह्यातलं पोलिस स्टेशन, बँक, ग्रामीण रुग्णालय अशा ठिकाणीही अभ्याससहल आयोजित केली गेली. पोलिस, ठाणे अंमलदार, बँकेतील कर्मचारी यांनीही मनापासून माहिती दिली, मुलांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. अनेक मुलांनी पहिल्यांदाच पोलिस स्टेशन पाहिलं. तिथलं कामकाज कसं चालतं हे त्यांना पाहायला, ऐकायला मिळालं. ग्रामीण रुग्णालयातल्या सोयी-सुविधा काय आहेत, वेगवेगळे विभाग, त्यांचं कामकाज काय आहे, वेगवेगळी साधनं, मशिन्स कशाप्रकारे काम करतात हेदेखील त्यांनी आवडीने जाणून घेतलं. संवादक म्हणून आमच्यासाठीही हे अनुभव माहितीपूर्ण होते.

आम्ही कार्यकर्ते वेल्ह्यातल्या मुलांसोबत, तिथल्या गावांमध्ये अधिकाधिक वेळ घालवत गेलो तसे आमचे ‘वेल्हा'ळ अनुभव अधिक समृद्ध होत गेले. व्यक्ती म्हणून असणारी आपली तत्त्वं आणि आपण करत असलेलं काम हातात हात घालून जाताहेत नं हे तपासणं किती महत्त्वाचं असतं हे आम्ही शिकलो. प्रसंगी कणखर, ठाम भूमिका घेत आपलं ‘असणं' जपायला शिकलो. संस्था आणि कार्यकर्त्यांनी हातात हात घालून घडावं, तसं संवादक आणि सहभागी हातात हात घालून घडत असतात-कामांच्या विविधांगी प्रक्रिया, मूल्यं, कौशल्यं आणि दृष्टिकोनांसह, हे वेल्ह्याने आम्हाला शिकवलं.

ही चार-पाच वर्षांची प्रक्रिया शब्दबद्ध करताना वेल्ह्यातल्या अनेक आठवणींनी माझ्याभोवती फेर धरला आहे. अनेकांचे चेहरे डोळ्यांसमोर तरळत आहेत. डोंगररांगा, ती पिवळी फुलं आणि एकीकडे तोरणा आणि दुसरीकडे दिमाखात उभा असणारा राजगड- सारं परत एकदा कवेत घ्यावंसं वाटतंय...

प्राजक्ता धुमाळ | prajaktadhumal@gmail.com

प्राजक्ता धुमाळ सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्या आरोग्य विषयात संवाद, लेखन-संपादन, अनुवाद करतात.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 1

तुषार कलबुर्गी14.01.25
अनुभव खूपच चांगला आहे.
See More

Select search criteria first for better results